शार्दुल ठाकूर: इंग्लंडला मायदेशात पाणी पाजणारा पालघरचा छोकरा

१८ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय.

किस्मत हमेशा बहादूरों का साथ देती हैं असं म्हटलं जातं. मराठमोळा प्रतिभावंत क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरच्या बाबतीत ही उक्ती शंभर टक्के खरी ठरली आहे. लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधेत इंग्लंडला खिंडार पाडलं ते याच ठाकूरने.

या ठाकूरगिरीच्या जोरावरच विराट कोहलीच्या भारतीय टीमने रूटच्या इंग्लंड टीमला त्यांच्याच भूमीत सपशेल लोळवलं. पाच मॅचच्या या सिरीजमधे पाहुण्या असलेल्या भारतीय टीमने २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

ओवलवरचा विजय सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला असून यात मोलाची भूमिका बजावली ती शार्दुलने. इंग्लंडच्या बिनबाद शंभर धावा झालेल्या असताना सलामीवीर रोरी बर्न्सला शार्दुलनेच तंबूत पाठवलं आणि त्यानंतर भारताने मागे वळून पाहिलंच नाही. पालघरच्या या गुणी खेळाडूने इंग्लंडच्या उरात धडकी भरवली.

विशेषतः जो रूटचा त्रिफळा उडवून त्याने भारतासाठी विजयाचे दरवाजे उघडले. त्यावर कळस चढवला तो जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने. महंमद सिराजनेही जबरदस्त मारा केला; पण दुर्दैवाने तो बळी मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

शार्दुलमुळे मॅचला निर्णायक कलाटणी

हा विजय म्हणजे सर्वार्थाने टीमच्या कामगिरीचा आविष्कार होता हे खरंच. पण मॅचला कलाटणी देणारी कामगिरी केली ती शार्दुलने. कारण या संपूर्ण सिरीजमधे आतापर्यंत इंग्लंड टीमचा कर्णधार जो रूटच्या बळावरच वाटचाल करतो आहे.

एकेकाळी भारतीय टीम म्हणजे सुनील गावस्कर असं समीकरण बनलं होतं. रूटने या सिरीजमधे तुफानी बॅटिंग केलीय. त्यामुळे त्याची विकेट ओवल टेस्टमधे निर्णायक ठरणार होती. कॅप्टन विराट कोहली म्हणाला, ‘ठाकूर मुझे ये रूट चाहिये’ झालंही तसंच. शार्दुलने रूटचा त्रिफळा उद्ध्वस्त करून इंग्लंडच्या आव्हानातली हवाच काढून घेतली.

एवढंच नाही तर या जिगरबाज खेळाडूने दोन्ही डावात अर्धशतक ठोकून आपलं अष्टपैलुत्वही सिद्ध केलं. मात्र, हे यश शार्दुलला साडे माडे तीन असं एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आला आहे.

महाराष्ट्रातल्या पालघरचा छोकरा

मुुंबईपासून जवळच असलेलं पालघर हे त्याचं गाव. १६ ऑक्टोबर १९९१ ला ही त्याचा जन्म झाला. वडील नरेंद्र हे नारळाचे व्यापारी तर आई हंसा या गृहिणी. घरची परिस्थिती सर्वसामान्य. महानगरी मुंबईपासून जवळ असलं तरी पालघर हे तसं छोटंच. क्रिकेटच्या कसल्याही सुविधा तिथं नव्हत्या. त्यामुळे शार्दुलने बोईसर इथं जायचं ठरवलं. कारण तिथं त्याचं स्वप्न साकारणार होतं.

रोज सुमारे शंभर किलोमीटरचा प्रवास आणि खांद्याला क्रिकेटचं बोजड किट. मोठा क्रिकेटपटू व्हायचं आणि भारतासाठी खेळायचं या स्वप्नाने त्याला जणू झपाटलं होतं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार शालेय पातळीवरच तो चमकायला सुरवात झाली. असंच एका मॅचमधे त्याने लागोपाठ सहा षटकार खेचले आणि तो चर्चेचा विषय बनला.

हेही वाचा: जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

रणजीपासून भारतीय टीमपर्यंत

अजून त्याला बराच पल्ला गाठायचा होता. भन्नाट वेगाने बॉलिंग करताना बँटिंगमधेही तो आपली चमक दाखवू लागला. साहजिकच मुंबईच्या रणजी टीमचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. २०१३-२०१४ च्या रणजी हंगामात या पठ्ठ्याने दहा मॅचमधे ४७ विकेट घेतल्या.

पण, त्याने खरी कमाल केली ती पुढच्या हंगामात. तेव्हा त्याने एका अप्रतिम बॉलवर चेतेश्वर पुजाराला बाद केलं. राष्ट्रीय निवड समितीला त्याच्या कामगिरीची दखल घेणं भाग पडलं. या संपूर्ण काळात त्याला मार्गदर्शन मिळालं ते दिनेश लाड यांचं. या पोरात स्पार्क असल्याचं लाड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतलं.

शार्दुल नामक कच्च्या हिर्‍यावर अशा प्रकारे पैलू पडत गेले. एवढी चमक दाखवल्यावर शार्दुलला २० ऑक्टोबर २०१८ ला वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टीममधे संधी मिळाली. त्या आधी तो टाटा स्पोर्टस् क्लब, मुंबई, पश्चिम विभाग, शेष भारत, भारत अ, भारत ब, इंडिया ब्लू, रायझिंग पुणे सुपर जायंट, चेन्नई सुपर किंग्ज, ठाणे स्ट्रायकर्स या टीमकडून खेळला.

आयपीएलमधे चमकदार कामगिरी

आयसीसी मानांकनाचा विचार केला तर सध्या टेस्टमधे तो ५६ व्या, वनडे क्रिकेटमधे ७५, तर टी-ट्वेंटीमधे ३० व्या स्थानावर आहे. एवढी अफाट गुणवत्ता असली तरी आतापर्यंत अवघ्या चार टेस्ट मॅच त्याच्या वाट्याला आल्या असून त्यात त्याने २२.७१ धावांच्या सरासरीने १४ विकेट घेतल्या. तर बॅटिंगमधे १९० धावा कुटताना ३८ ची सरासरी आहे. ६७ ही त्याची टेस्ट क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या.

तसं पाहिलं तर सुरवातीपासूूनच क्रिकेट हा भारताचा लाडका खेळ. जगमोहन दालमिया आणि इंदरजितसिंह बिंद्रा यांनी अगदी सीमारेषासुद्धा विकून या खेळाला सर्वार्थाने मालामाल केलं. त्यामुळे क्रिकेटमधे पैसा आला आणि रणजीपटूही लखपती होत गेले. त्यानंतर आयपीएलचा उदय झाला. आयपीएलला कितीही हिणवलं तरी त्यातूनच अनेक गुणवंत क्रिकेटपटू देशाला गवसत गेले.

शार्दुल हा त्यापैकीच एक. आयपीएलमधे खेळताना आपलं सगळं कसब पणाला लावून बॉलिंग, बँटिंग आणि फिल्डिंग अशा तीनही विभागांत त्याने आपला ठसा उमटवला. त्यामुळे आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्याच्यावर लठ्ठ रकमेची बोली लावली जाणार हे समीकरण पक्कं बनत गेलं.

आवर्जून दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आज हाच पालघरचा छोकरा तब्बल पाच दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा मालक आहे. जे स्वप्न त्याने उमेदवारीच्या काळात पाहिलं ते आज वास्तवात उतरायला सुरवात झालीय. पैसा, यश, कीर्ती यांसारख्या सगळ्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागल्या आहेत.

हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

एकदा अडकलाय वादाच्या भोवऱ्यात

शार्दुलची खासियत म्हणजे हे यश त्याने डोक्यात जाऊ दिलेलं नाही. त्याच्या बाबतीत आतापर्यंत एकदाच वाद उत्पन्न झाला आणि तोही जर्सीवरून. झालं असं की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे आगमन झाल्यानंतर त्याने एकदा दहा क्रमांकाची जर्सी घातली. हा जर्सी क्रमांक तर क्रिकेटच्या देवाचा म्हणजेच सचिन तेंडुलकरचा. त्यामुळे सोशल मीडियावरून मोठाच गदारोळ उडाला. शार्दुल वादाच्या भोवर्‍यात सापडला.

अखेर त्याने या दहा क्रमांकाच्या जर्सीला कायमची सोडचिठ्ठी दिली आणि स्वतःच्या जर्सीसाठी ५४ हा क्रमांक नक्की केला. दरम्यानच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दहा क्रमांकाची जर्सीच गोठवून टाकली. असो. हा एकमेव विषय सोडला तर शार्दुल कधीच वादाच्या भोवर्‍यात अडकलेला नाही.

त्याच्यावर अपेक्षांचं ओझं नको

आज त्याचं वय आहे २९. त्याला अजून बरीच मजल मारायची आहे. हे खरं आहे की, त्याच्या रूपाने रवींद्र जडेजानंतर भारताला एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू गवसलाय. पण केवळ चार टेस्ट मॅच कामगिरीच्या आधारे त्याला लगेच महान बनवण्याची घाई मीडिया आणि समीक्षकांनी करता कामा नये.

एरवी इंग्लंडमधेही इयान बोथमनंतर डेरिक प्रिंगलला दुसरा बोथम ठरवण्याची घाई त्या देशाच्या कशी अंगलट आली होती हे जुन्या जाणत्या रसिकांना आठवत असेल. आपल्या देशातही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा टिळा लागल्यानंतर अल्पजीवी कारकीर्द ठरलेल्या खेळाडूंची संख्या मोठी आहे.

भारताचा माजी वेगवान बॉलर इरफान पठाण याने शार्दुलबद्दल आतापासूनच मीडिया आणि समालोचकांना सावध केलंय. शार्दुलला वृषभ पंतप्रमाणेच आपला नैसर्गिक खेळ करू देण्याची मुभा द्यायला हवी. त्याच्यावर अपेक्षांचं ओझं लादणं भारतीय टीमसाठी आणि खुद्द शार्दुलसाठी धोकादायक ठरू शकतं. त्याची नुकतीच बहरू लागलेली कारकीर्द परिपक्व व्हायला हवी.

हेही वाचा: मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

सर्वोत्तम योगदान द्यावं लागेल

सध्याच्या जागतिक क्रिकेटचा विचार केला तर भारतीय बॉलिंग जगात सर्वोत्तम आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज या तोफखान्यात आता शार्दुलचा समावेश झाला आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर खेळण्याची अधिकाधिक संधी त्याला मिळायला हवी. अर्थातच त्यासाठी त्याला आपल्या कामगिरीत सातत्य दाखवावं लागेल.

लक्षात घ्या, रविचंद्रन अश्विनसारखा कोहिनूर हिरा राखीव खेळाडूंमधे बसवण्याची चैनही सध्या आपल्याला परवडते. सांगण्याचा मुद्दा असा की, भारतीय टीममधे सध्या कधी नाही एवढी तीव्र स्पर्धा सुरू आहे. त्यात टिकाव धरायचा तर जवळपास प्रत्येक मॅचमधे शार्दुलला आपलं सर्वोत्तम योगदान द्यावं लागेल. त्याला पर्याय नाही.

एकीकडे मराठमोळा अजिंक्य रहाणे फॉर्मसाठी झगडत असताना शार्दुल ठाकूर या दुसर्‍या मराठी चेहर्‍याने देेशाच्या असामान्य विजयात मोलाचा वाटा उचललाय ही तमाम मराठी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या दिशेनं शार्दुल

शार्दुलची खासियत म्हणजे टेस्ट, वनडे आणि टी-ट्वेंटी तीनही प्रकारात तो एकदम चपखल बसतो. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आवश्यक असलेली आक्रमकता आणि गुणवत्ता त्याच्यात ठासून भरली आहे.

टीम अडचणीत असतानाच कोणत्याही खेळाडूचा सर्वार्थाने कस लागतो. ओवल टेस्टमधल्या पहिल्या डावात भारतीय टीमची बॅटिंग ढासळत चाललेली असताना शार्दुलने जी मर्दुमकी आपल्या बॅटद्वारे गाजवली त्याला तोड नाही.

नजीकच्या काळात त्याला बॅटिंगमधेही प्रमोशन मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. कपिलदेव हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होता. त्या दिशेने शार्दुलची वाटचाल व्हावी ही अपेक्षा गैरवाजवी ठरू नये.

हेही वाचा: 

अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता

सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

स्वस्तात सर्वात मस्त असणार भारतीय रेल्वेचा थ्रीई डब्बा

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)