भन्नाट आयडिया, हेल्मेटमुळे रक्षणासोबत निरोगी हवा

१३ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं.

हिवाळा सुरू झाला की, उत्तर भारतातल्या हवा प्रदूषणाची देशभर चर्चा होत असते. यात सर्वाधिक चर्चा होते ती दिल्लीची. हवा प्रदूषणामुळे तिथल्या शाळा, कॉलेज बंद ठेवण्याची वेळ येते. काहीवेळा न्यायालयालाही यात हस्तक्षेप करून केंद्र आणि राज्य सरकारला आवश्यक त्या सूचना करावा लागल्यात. या हवा प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे दिल्लीतली वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे पर्यायाने तिथल्या गाड्यांच्या संख्येत झालेली वाढ.

दिल्लीत खासगी गाड्या वापरणं हे एकप्रकारचं स्टेटस सिम्बॉल बनत चाललंय. त्याचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होतो. त्यापुढे सरकारचे प्रयत्नही अपुरे पडतात. आता याच प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हेल्मेट बाजारात आलंय. बाईक वगैरे चालवताना हवा प्रदूषणाशी दोन हात करू शकणारी ही भन्नाट आयडिया सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय. त्यामुळे केंद्र सरकारही लोकांनी हे हेल्मेट वापरावं म्हणून प्रोत्साहन देताना दिसतंय. त्यादृष्टीने काही पावलंही उचलली जातायत.

हेही वाचा: दिल क्यों पुकारे आरे आरे?

भारतीय इंजिनिअरची कल्पना

भारतीय तरुणांच्या अनेक जुगाडू कल्पनांनी इथल्या स्टार्टअपला बळ दिलंय. अनेक भन्नाट कल्पना त्यातून साकारल्या गेल्यात. वेगळ्या आणि स्वदेशी उत्पादनांचा त्यातून जन्म झालाय. 'शेलिओस टेक्नोलॅब' हा असाच एक भारतीय स्टार्टअप आहे. याच स्टार्टअप कंपनीनं 'पुरोस' नावाचं प्रदूषणविरोधी हेल्मेट बनवलंय. सध्या देशभर या पुरोस नामक हेल्मेटची चर्चा होतेय.

भारतीय स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या नोएडा इथं 'विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजक पार्क' उभारण्यात आलाय. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याकडून त्याला मदत केली जाते. याच उद्योजक पार्कमधे पुरोस हेल्मेटची निर्मिती करण्यात आलीय. त्यात केंद्र सरकारनंही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीय. हे हेल्मेट बनवण्यात मोलाची भूमिका बजावलीय ती इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या अमित पाठक यांनी. 'शेलिओस टेक्नोलॅब'चे ते संस्थापक आहेत.

२०१६ला या हेल्मेटवर काम सुरू झालं. दिल्लीतलं प्रदूषण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या हेल्मेटचं डिझाइन तयार केलं. सुरवातीला त्याचं काम पाठक यांच्या घरीच सुरू होतं. आपण घरात किंवा अगदी ऑफिसमधेही एयर प्युरीफायर वापरत असतो. त्याचंच जोडकाम या हेल्मेटमधे करायची कल्पना पाठक यांना सुचली. घर आणि ऑफिसमधे आपण जितके सजग असतो तसंच बाईक चालवताना का असू नये या प्रश्नातून त्यांनी या हेल्मेटची निर्मिती केलीय.

हेल्मेट आतून कसंय?

हेल्मेटच्या वरच्या बाजूला एक एयर प्युरीफायर लावण्यात आलाय. समजा आपण एखाद्या धूळ किंवा खूपच प्रदूषित अशा ठिकाणाहून जातोय अशावेळी या हेल्मेटमधला फिल्टर आणि पंखा आपली चोख कामगिरी बजावेल. बाइकस्वारांपर्यंत धुळीचे कण यायच्या आधीच त्यांचा शोध घेऊन बाहेरच त्यांचा बंदोबस्त करणारी ही शुद्धीकरण यंत्रणा म्हणायला हवी. ही यंत्रणा हेल्मेटच्या मागच्या बाजूला आहे.

हेल्मेट बनवताना कंपनीने नवनव्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवलंय. या हेल्मेटमधे स्वच्छतेसाठी म्हणून एक क्लिनिंग युनिटही बसवलं गेलंय. यात चार्जिंगसाठी एक यूएसबी पोर्ट आहे. बॅटरीची क्षमता ही २६००एमएएच इतकी आहे. यात बसवलेला पंखा हा जवळपास ६ तास चालू शकतो. त्याला मायक्रोयूएसबीनं चार्जही करता येऊ शकतं. तर या हेल्मेटचं वजन हे साधारण १.५ किलो इतकं आहे. अगदी सहजपणे ते पेलवता येण्यासारखं आहे.

हेल्मेटची इतरही काही वैविध्यपूर्ण फिचर आहेत. यामधे असलेला ब्लुटूथ थेट मोबाईलशी कनेक्ट होऊ शकतो. त्यातून आपल्याला हेल्मेट किती प्रमाणात खराब झालंय याची नेमकी माहिती मिळते. तसंच हेल्मेटला लेदरचं पॅडिंग असल्यामुळे ते अगदी सहजपणे बाजूला काढून धुता येतं. हेल्मेटवरची धूळ झटकण्यासाठी केवळ कापड मारण्यापेक्षा हे अधिक सोयीचं आहे.

हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

भारतीय स्टार्टअपला नवी संधी

२०१९ला हे हेल्मेट बाजारात विक्रीला आलं. त्याआधी त्याची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी ठरल्यामुळे हे हेल्मेट बाजारात आणलं गेलं. महत्वाचं म्हणजे आपल्या फुफ्फुसावर हल्ला करू शकणारे प्रदूषित हवेतले कणही मिटवण्यात हे हेल्मेट यशस्वी ठरल्याचं अमित पाठक यांनी या हेल्मेटच्या लॉंचिंगवेळी म्हटलं होतं. २०१९ला याची चाचणी दिल्लीतच्या रस्त्यांवर घेण्यात आली होती.

या हेल्मेटची सुरवातीला किंमत ही ४५०० इतकी ठेवण्यात आली होती. ती कमी करायचं आश्वासनही कंपनीनं दिलंय. या स्टार्टअपला उभारी देण्यात केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची भूमिका फार महत्वाची आहे. तसंच हा भारतीय स्टार्टअप असल्यामुळे पुढच्या काळात या हेल्मेटच्या किंमती कमी झालेल्या पहायला मिळतील. कारण कंपनीला दरवर्षी ३ कोटी हेल्मेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोचायचं तर भरमसाठ किंमती ठेवून चालणार नाही.

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्यानं बाईकस्वारांसाठी हे हेल्मेट हवेतला मोकळा श्वास असल्याचं म्हटलंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. शिवाय कंपनीकडे स्वतःचं पेटंट असल्यामुळे जगभरात या हेल्मेटचं उत्पादन वाढवणं शक्य होईल. खरंतर एका भारतीय स्टार्टअपकडे आपली नवी कल्पना जगभर पोचवण्यासाठी नामी संधी चालून आलीय असंच म्हणायला हवं.

निरोगी हवेसाठी छोटासा हातभार

आज जगातल्या सगळ्यात जास्त प्रदूषित देशांमधे भारताचा नंबर लागतो. सातत्याने वाढत असलेल्या हवा प्रदूषणामुळे सरकारचंही टेंशन वाढलंय. तिकडे दिल्लीमधे तर हिवाळ्यातली हवा प्रदूषणाची उच्चांकी पातळी इतकी असते की तिथं शाळा, कॉलेजही बंद करावी लागतात. याला एक उपाय म्हणून केंद्र सरकारनं आणि देशातली राज्य सरकारंही इलेक्ट्रॉनिक गाड्यांना प्रोत्साहन देतायत. लोकांनी अशा गाड्या खरेदी कराव्या म्हणून सरकार आकर्षक सवलतीही देतंय.

सातत्याने वाढणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचं 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'चं म्हणणं आहे. प्रदूषित हवेतले अगदी छोटे कणही आपल्या जीवाला मोठा धोका ठरतायत. २०७०पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणं हे भारताचं लक्ष्य असलं तरी त्यादृष्टीने योग्य ती पावलं उचलायला हवीत. ग्रीनपीस साऊथ-ईस्ट एशिया आणि स्विस फर्म आयक्यू एयर या प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्थांनी २०२०ला संयुक्तरित्या एक रिसर्च केला होता. त्याचवर्षी हवेच्या प्रदूषणामुळे एकट्या दिल्लीत ५० हजारपेक्षा अधिक मृत्यू झाल्याचं आढळून आलंय.

हवेच्या प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. या प्रदूषणात आपल्या दैनंदिन जीवनातल्या गाड्या, बाइकही मोलाची भूमिका बजावत असतात. मृत्यूचं लोण आपल्या घरापर्यंतही पोचू शकतं. त्यामुळे आपण वेळीच सावध व्हायला हवं. त्यादृष्टीने पुरोस हेल्मेट हा एक फार छोटासा प्रयत्न आहे. या हेल्मेटच्या वापरानं प्रदूषणामुळे होणारे ८० टक्के धोके टाळता येतील असं अमित पाठक यांनी म्हटलंय. त्यामुळे हे हेल्मेट आपल्या फायद्याचं ठरू शकतं.

हेही वाचा:

प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?

आपट्याच्या पानांना नको, प्रथेलाच ऑप्शन हवा

‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 

पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच