प्लास्टिकचं विघटन कसं करायचं ही एक जागितक समस्याच होऊन बसलीय. प्लास्टिकवर बंदी आणली तरी आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? आणि इतर गोष्टींसाठी, पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरणं बंद होणार नाही. मग काय करायचं या प्लास्टिकचं असा प्रश्न असताना नॉयडामधल्या संशोधकांनी प्लास्टिक खाणारे जंतू शोधलेत.
प्लास्टिक, प्लास्टिक, प्लास्टिक. आधी वापरायची सवय लागली आणि आता ही सवय सुटता सुटत नाही. प्लास्टिकमुळे आपलं लाईफ खूप इजी झालं होतं. पण प्लास्टीकचा दुष्परिणाम लक्षात आल्यावर त्यावर बंदी आणली. ज्या निर्णयाचं स्वागत झालं. पण दोन महिन्यात नाही, दोन दिवसात नाही तर दोन तासातच समजलं की प्लास्टिकशिवाय राहणं किती कठीण आहे. प्लास्टिक न वापरणं म्हणजे आपण जणूकाही एक तप करत आहोत असं वाटू लागलंय. जे तप कधीच संपणार नाही.
एकतर या प्लास्टिकचा विघटन होत नाही, ना हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं. पण तरी आपण त्या प्लास्टिकच्या इतकं आहारी गेलोय की यापूर्वी आपण काय वापरत होतो हेसुद्धा लक्षात नाही. प्लास्टिकचा कचरा हा तर आपल्यासाठी नाही अख्या जगासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न. पण आता प्लास्टिकचं विघटन होणार. हो, कारण नुकत्याच प्रकाशित झालेल्या बातमीनुसार नॉयडामधल्या संशोधकांनी प्लास्टिक खाणाऱे सूक्ष्मजंतू शोधलेत.
कॅनडा, चिली आणि मेक्सिकोमधे कार्यरत असलेली प्लास्टिक ओशन ही सामाजिक संस्था. त्यांच्या माहितीनुसार जगात दरवर्षी ३० कोटी टन एवढं प्लास्टिक तयार होतं. तर ५० हजार कोटी प्लास्टीकच्या कॅरीबॅग वापरल्या जातात. त्यापैकी ५० टक्के प्लास्टिक सिंगल युज असतं. ४० टक्के फक्त पॅकेजिंगसाठी वापरतात. यातून निघालेला ८० लाख टन कचरा समुद्रात फेकला जातो. यामुळे ९०% सीबर्डना त्रास होतो. आणि एक माशाची प्रजाती नष्ट होते.
प्लास्टिक नेमकं बनतं तरी कशापासून? ज्यामुळे संपूर्ण निसर्गच नष्ट होऊ लागलाय. झाडांची मूलद्रव्यं, कोळसा, नॅचरल गॅस, खनिज तेल, मीठ इत्यादी मुख्य घटकांपासून प्लास्टिक बनतं. आणखीही बरेचसे घटक मिक्स होतात. यातून प्लास्टिक बनवण्यासाठी पॉलिमरीसेशन आणि पॉलिकाँडेन्सेशन या दोन प्रक्रिया कराव्या लागतात.
प्लास्टिक बनवताना त्यात कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन आणि सल्फर सारखे घटक एकत्र येतात. तसंच प्लास्टिक बनवण्याच्या प्रक्रियेतून सोडियम पॉलीअक्रॅलेट, जंतूनाशक द्रव्य उत्पन्न होतं. यामुळेच निसर्गाचं आणि पर्यायाने मानवाचं नुकसान होतं.
हेही वाचा: प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?
घातक प्लास्टिक आपण कधीपासून वापरू लागलो आठवतंय का? २० वर्षांपूर्वी? ४० वर्षांपूर्वी? ७० वर्षांपूर्वी? नाही. पृथ्वीवर १०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्लास्टिक वापरलं जातंय. प्लास्टिक पूर्णपणे मानवनिर्मितच आहे. पहिल्यांदा १८६९ मधे जॉन वेस्ले यांनी प्लास्टिक बनवलं. या गोष्टीला १४९ वर्षं झाली. त्यावेळी वेस्ले यांना पैसे जिंकायचे होते म्हणून त्यांनी प्लास्टिक बनवलं.
न्यूयॉर्कमधल्या एका कंपनीने हस्तिदंताला पर्याय शोधण्यासाठी किंवा तो बनवण्याचं चॅलेंज दिलं. आणि त्याबदल्यात साडेसात लाख देण्याचं सांगितलं. आणि वेस्ले यांनी कापूस, कापूर आणि इतर घटकांवर प्रोसेस करून प्लास्टिक बनवलं. बरं फक्त त्यांनी हस्तिदंतच नाही तर कासवावरचं कवच, शिंग, कापड इत्यादी वस्तू बनवल्या.
या प्रयोगानंतर साधारण ३८ वर्षांनी बेल्जियमचे रसायन शास्त्रज्ञ लिओ बाकेलँड यांनी प्लास्टिकवर संशोधन केलं. आणि त्यांनी पूर्णपणे सिंथेटीक कंम्पोनंटपासून प्लास्टिक बनवलं. आणि त्यांनीच प्लास्टिक हा शब्द आणला. त्यांनी बनवलेल्या प्लास्टिकच्या अंशाला बॅकेलाईट हे नाव दिलं. याच प्लास्टिकला पहिलं शुद्ध पास्टिक म्हटलं जातं. आज आपण जे काही प्लास्टिक वापरतो त्यामागे बॅकेलाईटच आहे.
प्लास्टिक साधारण दीडशे वर्षांपासून आहे. पण ते आपल्या रोजच्या वापरात एवढ्या वर्षांपासून नाही. तर बाकेलँड याचं प्लास्टिक म्हणजेच बॅकेलाईट हे तिकडच्या फुलणाऱ्या औद्योगिक विश्वात स्वीकरलं गेलं. आणि मोठ्या प्रमाणात वापरलही गेलं. पण दुसऱ्या महायुद्धात सगळ्यात जास्त प्लास्टिकचं उत्पन्न वाढलं. युद्धकाळात छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, प्रीजर्व करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, हॅल्मेट, सिंथेटिक बॅगा, पट्टे, कपडे इत्यादी गोष्टी बनवल्या. आणि यामुळे जवळपास ३०० टक्क्यांनी प्लास्टिकचं उत्पादन वाढलं.
पुढे युद्धानंतर प्लास्टिक प्लांट, फॅक्टऱ्या उभ्या राहिल्या. काही उद्योगपतींनी प्लास्टिकच्या जोरावर बक्कळ पैसा कमावला, प्लास्टिक कम ऑफ एज या रिसर्च पेपरमधे ही माहिती दिलीय. हा रिसर्च पेपर जोसेफ निकोलसन आणि जॉर्ज लेग्टंन यांनी लिहिलाय. जो अमेरिकेतल्या हार्पर्स मॅगझिनमधे छापून आलाय. यातला काही भाग फिलाडेल्फियाच्या सायंस हिस्ट्री इंस्टिट्युटच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट
प्लास्टिकमुळे खूपशा गोष्टी सोप्प्या झाल्या. आणि मुळात स्वस्तही झाल्या. पण जोसेफ निकोलसन आणि जॉर्ज लेग्टंन यांनी आपल्या रिसर्च पेपरमधे म्हटलंय की १९४२ नंतर काच, लाकूड, दगड, स्टील, अल्युमिनियम सारखं पारंपरिक मटेरीअल मागे पडू लागलं. आणि प्लास्टिकची ऐट वाढली. पण आता हेच प्लास्टिक आपल्या मानगुटीवर बसलंय.
मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुळे होणारे आजार आपल्या लक्षात आले. म्हणूनच आपल्या देशात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणली. बाजारातल्या पॉलीबॅगही बंद झाल्यात. पण या बंदीचं सत्य आपल्याला माहितीच आहे. बंदी असूनही सर्रासपणे पिशव्यांचा वापर होतोय. आणि आपणही कितीतरी वेळा ‘पिशवी दोगे क्या भैय्या’ असं विचारतोच. पण याच प्लास्टिकला खाऊन टाकू शकतील अशा सूक्ष्मजंतूंचा शोध भारतीय संशोधकांनी लावलाय.
जंतूंच्या शोधाची बातमी ही नक्कीच आपल्यासाठी आनंदाची आहे. संशोधकांनी 'प्लास्टिक खाणारे' बॅक्टेरिया शोधले आहेत. आपल्या संशोधकांचं हे संशोधन जगातल्या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाचं आहे. ग्रेटर नोएडा येथे असलेल्या शिव नादर युनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावला. या बॅक्टेरियामधे पॉलिस्टीरिन मारण्याची क्षमता असल्याचं आढळलं. आणि युनिवर्सिटीच्या दलदलीच्या जमिनीतून संशोधकांनी त्यांची ओळख पटवली.
पॉलिस्टीरिनचा वापर डिस्पोजेबल कप, प्लेट्स, खेळणी, पॅकिंग मटेरियल इत्यादी सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. पॉलिस्टीरिनचं उत्पादन आणि वापर पर्यावरणासाठी धोकादायक आहे. कचरा व्यवस्थापनाचीही मोठी समस्या निर्माण झाली. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या अॅडव्हान्सेस जर्नलमधे प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार पॉलिस्टीरिनचं उच्च आण्विक वजन आणि लांब ताठर पॉलिमर स्ट्रक्चरमुळे नष्ट करणे कठीण आहे. हेच कारण आहे की प्लास्टिक बराच काळ वातावरणात राहतं.
शिव नादर युनिव्हर्सिटीच्या असोसिएट प्रोफेसर रिचा प्रियदर्शिनी टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींना सांगतात, बॅक्टेरियम एक्जिगुओबॅक्टीरियम पॉलिस्टीरिनला नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. आणि प्लास्टिकपासून निर्माण होणारे पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. प्रियदर्शिनी आणि त्यांच्या टीमबरोबर स्कूल ऑफ नॅचरल सायन्सेसच्या लाइफ सायन्स विभागाची टीम होती.
एक्सिगुओबॅक्टीरियम साइबीरिकममधल्या डीआर ११ आणि एक्सिगुओबैक्टीरियम अनडेइ डीआर १४ नामक हे जंतू प्लास्टिक प्रदूषणावर मात करू शकतील. सध्या या संशोधन मुख्य टप्पा पार झालाय. पुढच्या प्रयोगावरुन कळेल की या जंतूंचा वापर करून प्लास्टिकची खरंच विल्हेवाट लागते का?
हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन
२०१५ नंतर खूपशा प्लास्टिकचं विघटन करणाऱ्या प्रक्रिया, जंतूंवर प्रयोग झालेत. त्यात २०१६ मधे जपानच्या क्योटो युनिवर्सिटीमधे ‘इडोनेल्ला सकँसिस’ नावाचे जंतू शोधले. जे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्यांसारख्या वस्तू संपवतात. त्यानंतर २०१७ मधे अमेरिकेतल्या एनर्जीज नॅशनल रिनोवेबल एनर्जी लॅबोरेटरीमधे ‘आयोडेन्नेला सॅकेन्सिस २०१-एफ६’ या जंतूचा शोध लावला. जे प्लास्टिक तोडून हळूहळू प्लास्टिक नष्ट करतात.
२०१८ आणि २०१९ मधे अळ्या शोधण्यात आल्या ज्या ४ दिवसांमधे प्लास्टिकची पिशवी खाऊन ती पचवू शकतात. पुण्यात २०१८ मधे डॉ राहुल मराठे यांनी मेणअळ्या प्लास्टिक खाऊ शकतात हे शोधलं. तर २०१९ मधे फ्रेडेरिका बर्टोचिनी यांनी सुरवंट अर्थात मधमाश्यांच्या पोळ्यातली अळी प्लास्टिक खाते हे शोधलं. पण यापैकी कोणताचा प्रयोग प्रत्यक्ष वापरात आलेला नाही.
एक्सिगुओबॅक्टीरियम साइबीरिकममधल्या डीआर ११ आणि एक्सिगुओबैक्टीरियम अनडेइ डीआर १४ प्रमाणे इतरही प्रयोगांवर संशोधन सुरू आहे. आणि हे खरंच प्लास्टिक विघटन करेल का याचा शोध घेतला जातोय. कोणाचा प्रयोग यशस्वी होतो हे येत्या काळात आपल्या समोर येईलच.
हेही वाचा:
एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १
मुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार?
सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची गोष्ट वाचावी
भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय?