कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस

१३ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत.

गेल्या तीन महिन्यांपासून दररोज आपण एकदातरी कोरोनाचं नाव ऐकतोच ऐकतो. कारण माणसांबरोबरच इतर निर्जिव आणि अमूर्त गोष्टींना झालेला हा पहिलाच रोग आहे. फक्त माणसंच नाही तर कित्येक देशांच्या अर्थव्यवस्था, आयात-निर्यात, दळणवळण, पर्यटन अशा अनेक उद्योगधंद्यांनाही कोरोनाची लागण झालीय.

भारतातही कोरोना दाखल झालाय. संपूर्ण महाराष्ट्रातही कोरोनाचे रूग्ण आढळलेत. जवळपास १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं राज्य सरकारनं सांगितलंय. लोकांमधे या रोगाबद्दल माहिती कमी आणि अफवा जास्त पसरल्यात. अशात माणसांसोबतच इतर गोष्टींनाही आपली लागण केल्याशिवाय हा वायरस गप्प बसेल कसा? कोरोना भारतात दाखल झाल्यामुळे आता भारतीय शेअर बाजारही गडगडलाय. गेल्या १२ वर्षांत दिसली नव्हता इतका निच्चांक सेन्सेक्स आणि निफ्टीनं गाठलाय.

हेही वाचा : कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं

अमेरिकेत युरोपियन नागरिकांना बंदी

एखादं इंग्रजी किंवा हिंदी न्यूज चॅनेल लावलं तर त्यात खाली आपल्याला सतत काही पट्या जाताना दिसतात. त्यावर सेन्सेक्स आणि निफ्टी यांचा दर लिहिलेला असतो. मुंबईत वसलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या शेअर बाजाराचा निर्देशांक किंवा इन्डेक्स दाखवणाऱ्या आकडेवारीला सेन्सेक्स असं म्हणतात. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक म्हणजे निफ्टी.

देशातल्या शेअरचा निर्देशांक काय असेल ते साधारण या सेन्सेक्स आणि निफ्टीवरून ठरतं. सेन्सेक्स वाढला तर वेगवेगळ्या कंपनींच्या शेअरच्या किमतीतही वाढ होते. आणि घट झाली तर शेअरच्या किमती घसरतात, असं साधं सोपं गणित आहे.

वॉल स्ट्रीटसाठी १९८७ पेक्षा वाईट दिवस

हाच सेन्सेक्स काल खूप खाली घसरला होता. आणि कालच्यापेक्षाही आजची परिस्थिती वाईट खूप वाईट झाली. या सगळ्यामागचं कारण म्हणजे अमेरिकेचा एक निर्णय. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली. त्याआधी जागतिक आरोग्य संघटनेनं खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना ही जागतिक साथ असल्याचं जाहीर केलंय.

याचे पडसाद लगेचच अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर उमटले. वॉल स्ट्रीट म्हणजे मॅनहॅटन शहरातला ८ गल्ल्यांचा एक रस्ता आहे. या रस्त्यावर मोठमोठ्या आर्थिक कंपन्यांची ऑफिसं आहेत. तिथून त्यांचं काम चालतं. युएसच्या डाऊ जोन्स या इन्डेक्समधे १५०० अंकांची म्हणजेच ५.८ टक्क्यांची घसरण झाली.

लाईव मिंटच्या बातमीनुसार, वॉल स्ट्रीटनं १९८७ च्या ब्लॅड मंडेनंतरचा सगळ्यांत वाईट दिवस बघितला. त्याचा आशियाई शेअर बाजारावर खूप वाईट परिणाम झाला.  जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्थाच संकटात आल्यानं त्याचा बाजारालाही फटका बसला. 

काही मिनिटांत कोट्यवधीचं नुकसान

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधलं ट्रेडिंग दररोज दुपारी १:३० वाजता बंद होतं. त्याआधी अनेक शेअर खरेदी करणं, विकणं असे व्यवहार म्हणजेच ट्रेडिंग चालू असतं. आज सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स ३ हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला. याचा परिणाम म्हणून निफ्टीही १०.०७ टक्के खाली आला. निफ्टी इतका खाली आल्यावर त्याला सर्किट लागलं असं म्हटलं जातं. आणि हे सर्किट लागलं तर पुढची ४५ मिनिटं ट्रेडिंग थांबवलं जातं.

भास्कर डॉट कॉमच्या एका बातमीनुसार, जुलै २००१ मधे सेबी म्हणजेच शेअर बाजाराची सर्वोच्च नियामक संस्था असलेल्या सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं सर्किटची प्रक्रिया सुरू केली होती. शेअर बाजारातल्या अचानक चढउतार झाला तर त्याला पायबंद घालण्यासाठी सर्किट म्हणजेच एक प्रकारचा ब्रेक लावला जातो. सर्किट दोन प्रकारचे असतात. अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट. निर्देशांत प्रमाणाबाहेर वाढल्यास अप्पर सर्किट लावला जातो. तर प्रमाणापेक्षा खाली आल्यास लोअर सर्किट लावला जातो.

सर्किट लावण्याबद्दल २००१ मधे मार्गदर्शक नियम तयार करण्यात आले असले तरी आधीपासूनच ही प्रक्रिया अस्तित्वात होती. पहिल्यांदा २१ डिसेंबर १९९० ला सर्किट लावण्यात आला होता. त्यानंतर २८ एप्रिल १९९२, १७ मे २००४ आणि २४ ऑक्टोबर २००८ ला सर्किट लावण्यात आलं होतं. 

हेही वाचा : आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

सर्वांत वाईट आठवडा

सत्याग्रह डॉट कॉमच्या एका बातमीत शेअर बाजाराच्या इतिहासात याआधी इतकी मोठी घसरण कधीही झालेली नसल्याचं म्हटलंय. शेअर मार्केट गडगडायला लागलंय हे पाहून सगळ्याच गुंतवणूकदारांनी आपला पैसा काढून घेतला. अनेकांनी पडत्या भावात आपले शेअर विकले. काही मिनिटातच ११ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.

आशिया खंडातल्या इतर शेअर बाजारांचीही हीच परिस्थिती असल्याचंही या बातमीत म्हटलंय. आपल्याकडे सेन्सेक्स असतो, तसं जपानमधे निकेई असतो. या निकेईमधे १० टक्क्यांनी घसरण झालीय. हाँगकाँगचा हेंगसेंग इंडेक्स ३.८ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कॉम्पॉझिट इंडेक्स २ टक्क्यांनी पडला. शेअर बाजारातल्या या उलथापालथीचा परिणाम भारतीय रुपयावरही झालेला दिसतो. डॉलरच्या तुलनेत रुपया ८२ वरून सरळ ७४.५० च्या पातळीवर येऊन पोचलाय. भारतीय रुपयाची ही घसरण विक्रमी आहे.

द क्विंटच्या एका बातमीनुसार, जगभरातल्या मार्केटनं २००८ नंतर पहिल्यांदाच एवढा वाईट आठवडा बघितला. दिवसअखेर सेन्सेक्स ४ टक्क्यांच्या तेजीसह १३२५ च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीही जवळपास टक्क्यांनी उंचावून ११९५ या पातळीवर विसावला.

परदेशी गुंतवणूक का काढून घेतली जातेय?

तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत. २००८ मधे आलेल्या आर्थिक संकटानंतरची ही सगळ्यात मोठी घसरण मानली जातेय. माजी पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग यांनी काहीच दिवसांपूर्वी ‘द हिंदू’मधे लिहिलेल्या लेखात कोरोनाचा अगोदरच संकटात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा इशारा दिला होता. अर्थव्यवस्थेत आधीच आर्थिक मंदी असताना गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेणं हे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचं आहे, असं ते म्हणाले होते.

आजचे आणि कालचे सेन्सेक्स, निफ्टीचे आकडेही आपल्याला डॉ. सिंग म्हणाले तेच सांगतायत. कोरोना वायरस आणि येस बॅंकेच्या संकटातून गुंतवणूकदारांनी बोध घेतलाय. परदेशी गुंतवणूक आपले शेअर धडाधड विकून टाकताहेत. चालू महिन्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास २१ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक काढून घेतलीय. त्यामुळेच बॅंकपासून वाहन उद्योगांपर्यंत सगळ्याच शेअरमधे मोठी घसरण दिसून येतेय.

हेही वाचा : 

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?

कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय