२१ वर्षांची हरनाझ संधू परमसुंदरी बनली, त्याची गोष्ट

१५ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणाऱ्या 'मिस युनिवर्स २०२१'चा निकाल नुकताच जाहीर झालाय. पंजाबच्या हरनाझ संधूने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर तब्बल २१ वर्षांनी विश्वसुंदरीचा मान मिळवणारी ती तिसरी भारतीय ठरलीय.

इस्त्रायलच्या इलियट शहरात पार पडलेली ‘मिस युनिवर्स २०२१’ ही सौंदर्यस्पर्धा बऱ्याच कारणांनी विशेष ठरली. त्यापैकी एक कारण होतं सुप्रसिद्ध टीवी होस्ट स्टीव हार्वेचं पुनरागमन. गेल्यावर्षी कोरोनामुळे स्टीव हा शो होस्ट करू शकला नव्हता. विनोदाचं भन्नाट टायमिंग असलेल्या स्टीवची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकली होती. या स्पर्धेत मात्र ती कसर भरून काढण्यात स्टीव पुरेपूर यशस्वी ठरलाय.

ही स्पर्धा भारतीयांसाठी यादगार ठरली. त्यांचं कारण होतं स्पर्धेचा निकाल! तब्बल ८० सौंदर्यवतींमधून निवड झालेली २१ वर्षांची हरनाझ संधू यावर्षीची विश्वसुंदरी ठरली. भारताच्या पंजाब राज्यातून येणाऱ्या हरनाझने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘मिस युनिवर्स’च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं.

हेही वाचा: कलयुगातल्या राक्षसांची ओळख करून देणारा 'असूर'

मॉडेलिंगमधून सौंदर्यस्पर्धांच्या जगात

हरनाझचा जन्म पंजाबच्या गुरदासपूरमधल्या कोहली गावचा. तिचे वडील प्रितमपालसिंग हे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात तर आई रबिंदरकौर स्त्रीरोगतज्ञ. हरनाझचं शिक्षण चंदीगढमधूनच झालंय.

वयाच्या सतराव्या वर्षीच तिने मॉडेलिंग करायला सुरवात केली होती. सौंदर्यस्पर्धांच्या ग्लॅमरस जगात २०१७ला तिचं पदार्पण झालं, तेही घरात कुणालाही न सांगता! त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ‘मिस चंदीगढ’ झालेल्या हरनाझला तिच्या घरच्यांनीही पुरेपूर प्रोत्साहन दिलं.

पुढच्याच वर्षी तिने ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया’वर शिक्कामोर्तब केलं. २०१९ला ‘फेमिना मिस इंडिया पंजाब’चं विजेतेपद मिळवून तिने ‘फेमिना मिस इंडिया’मधे भाग घेतला पण तिला ‘टॉप १२’वरच समाधान मानावं लागलं. यानंतर वर्षभर हरनाझला फारशी उल्लेखनीय कामगिरी करताच आली नाही.

यंदाचं वर्ष मात्र हरनाझसाठी खऱ्या अर्थाने लकी ठरलं. ऑगस्टमधे तिची ‘मिस दिवा युनिवर्स २०२१’च्या अंतिम २० स्पर्धकांमधे निवड झाली. तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज परीक्षकांना भावला आणि निर्विवादपणे तिला ‘मिस दिवा युनिवर्स २०२१’ म्हणून घोषित करण्यात आलं.

मिस युनिवर्समधलं आव्हान

‘मिस दिवा युनिवर्स २०२१’ सारखी प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा जिंकल्याने या वर्षीच्या ‘मिस युनिवर्स’ स्पर्धेसाठी हरनाझला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ८० स्पर्धकांमधून थेट टॉप १६, टॉप १० आणि टॉप ५मधे आलेल्या हरनाझसमोर दक्षिण आफ्रिका, कोलंबिया, पॅराग्वे आणि फिलिपाईन्समधून आलेल्या सौदर्यवतींचं आव्हान होतं.

फायनल पूर्वी हरनाझला पर्यावरण जनजागृतीबद्दल तिचं मत विचारलं गेलं. यावेळी तिने निसर्गाबद्दल मानवजातीच्या बेजबाबदार वर्तनाला जबाबदार ठरवत पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासाबद्दल खंत व्यक्त केली. भविष्यात भाषणं देत पश्चात्ताप करण्यापेक्षा आता सक्रिय होऊन निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं तिने सांगितलं.

हेही वाचा: द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

मिस युनिवर्स बनवणारं उत्तर

अंतिम फेरीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या लालेला स्वानी, पॅराग्वेच्या नादिया फेरेएरा आणि हरनाझ यांच्यासमोर ‘आजच्या युवतींना ताणतणाव आणि निर्बंधांवर मात करण्यासाठी काय सल्ला द्याल’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तरुणाईपुढे सर्वात मोठं आव्हान आत्मविश्वासाचा अभाव असल्याचं हरनाझने सांगितलं.

आपल्या ध्येयासाठी इतरांना जबाबदार ठरवण्यापेक्षा तरुणाईने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि तसा प्रयत्न करायला हवा, असं मत तिने मांडलं. मी स्वतःवर विश्वास ठेवला म्हणूनच इथवर मजल मारू शकले, असं म्हणत तिने आपल्या उत्तराचा समारोप केला. हेच उत्तर तिला ‘मिस युनिवर्स’ बनवणारं ठरलं.

यशाचं असंही मराठी कनेक्शन

पर्यावरण आणि तरुणाईपुढच्या आव्हानांना समोर ठेवून दिलेल्या आपल्या उत्तरांमधून हरनाझने परीक्षकांची मनं जिंकली. अंतिम फेरीतला तिचा बेज गाऊन सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तिचा हा पेहराव भारताची पहिली ट्रान्सवूमन सैशा शिंदे हिने डिझाईन केला होता.

यावर्षीच्या जानेवारीमधे नामांकित फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे याने तो ट्रान्सवुमन असून आपलं नाव आता सैशा शिंदे असल्याचं जाहीर केलं होतं. सैशाने करीना कपूर, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूरसारख्या अनेक अभिनेत्रींसाठी काम केलं असून २००८ला ‘फॅशन’मधेही तिच्या डिझाईनचं कौतुक झालं. आता चक्क ‘मिस युनिवर्स’चा फायनल गाऊन डिझाईन करण्याची कामगिरी तिने केली. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट होती.

सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर हरनाझच्या रूपाने २१ वर्षांनी भारताने विश्वसुंदरीच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. भारतीय स्त्रियांच्या संस्कृती, सौंदर्य आणि स्वभाव यांचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या हरनाझ संधूने भविष्यात आपल्या कर्तृत्वाने भारताची मान जगात उंचावली, तर तिच्या मिस युनिवर्स बनण्याला अधिक अर्थ लाभेल.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती