झुलन गोस्वामी: बंगालची तुफान एक्स्प्रेस

०५ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.

एखाद्या छोट्या मुलाला किंवा मुलीला तुला क्रिकेट खेळणं जमणार नाही, असं सांगितल्यावर तो किंवा ती कदाचित हिरमुसली होऊन दुसर्‍या एखाद्या खेळाचा सराव सुरू करेल. पण काही मुलं-मुली प्रवाहाच्याविरुद्ध जाऊन जिद्दीने अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवतात. त्यासाठी अक्षरशः झोकून देत आणि अनेक गोष्टींचा त्याग करत करिअर समृद्ध करतात.

भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामी हिने अशाच मोजक्या आणि मुलखावेगळ्या खेळाडूंमधे अग्रस्थान पटकावलंय. अलीकडेच तिने कारकिर्दीत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.

आपल्या देशात क्रिकेट हा धर्म किंवा लोकांचा श्वास मानला जात असला तरीही पुरुष क्रिकेट क्षेत्राला जेवढं महत्त्व दिलं गेलंय, तेवढं महत्त्व महिला खेळाडूंना मिळालेलं नाही. वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार, मान सन्मान, मानधन, शिष्यवृत्ती यात महिला खेळाडूंची नेहमी उपेक्षा झाली आहे.

क्रीडाक्षेत्रातही महिलांची कसोटी

केवळ क्रीडाक्षेत्र नाही तर उद्योग, व्यवसाय, संशोधन, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमधे पुरुषांच्या बरोबरीनेच भारतीय महिलांनीही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं असलं तरीही भारतीय महिला म्हणजे चूल आणि मूल हेच तिच्यासाठी सर्वस्व असतं असं मानणारा खूप मोठा समाज आजही अस्तित्वात आहे.

अनेक पालक आपल्या मुला-मुलींना क्रीडा क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्यात फारसे अनुकूल नसतात. अभिनव बिंद्रा, एम. सी. मेरी कोम यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे खेळाडू आपल्या शेजारच्या घरात जन्माला यावेत आणि आपल्या पाल्यांनी मात्र शिक्षणाला प्राधान्य द्यावं, अशीच भूमिका अनेक पालक घेत असतात.

आज जरी क्रिकेट भारतीयांसाठी चलनी नाणं झालं असलं तरीही महिलांसाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅचची संख्या खूपच मर्यादित असते. हे लक्षात घेतलं तर झुलन हिने मिळवलेलं यश खरोखरीच अतुलनीय आहे. स्थानिक मॅचमधे २६४ विकेटस् तर आंतरराष्ट्रीय मॅचमधे ३३७ विकेट ही तिची कामगिरी खूपच बोलकी आहे.

हेही वाचा: सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

बॉलिंग न करण्याचाच सल्ला

फूटबॉलचं माहेरघर मानल्या जाणार्‍या पश्चिम बंगालमधे झूलनला लहानपणी फुटबॉलचं विलक्षण आकर्षण होतं. नाडिया जिल्ह्यामधल्या चकदाहा या गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली झुलन लहानपणी फुटबॉलबरोबरच इतर मुलांसोबत अधूनमधून क्रिकेट खेळायची. त्यावेळी ती खूपच हळू वेगाने बॉल टाकायची.

तिच्या बॉलिंगवर प्रतिस्पर्धी खेळाडू चौकार आणि षटकारांची टोलेबाजी करायचा. त्यामुळे बर्‍याच वेळेला इतर मुलं तिला बॉलिंग न करण्याचाच सल्ला द्यायची. बॉल टाकणं हे तुझं काम नाही. तू आपली राखीव खेळाडू किंवा शेवटच्या फळीत येणारी बॉलर म्हणूनच योग्य आहे असं तिला नेहमी ऐकावं लागायचं. झुलन हिने या सर्व टीका मूकपणे सहन केल्या. या टीकाकारांना माझ्या कामगिरीने उत्तर देईन असाच निश्चय तिने केला.

सरावासाठी ८० किमीचा प्रवास

वयाच्या पंधराव्या वर्षी तिने क्रिकेटचा सराव सुरू केला. तिच्या गावात क्रिकेटच्या प्रशिक्षणाची सुविधा नव्हती. चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कोलकातामधेच प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे हे तिने ओळखलं. घरच्यांचा रोष पत्करूनच तिने हा सराव सुरू केला.

तिचं गाव कोलकाता शहरापासून ८० किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळे सरावासाठी तिला दररोज पहाटे साडेचार वाजता उठून रेल्वे गाडी पकडावी लागत असे. काही वेळेला तिची नेहमीची रेल्वे चुकायची. रेल्वे गाडीलाच उशीर व्हायचा. त्यामुळे काही वेळेला सरावाच्या ठिकाणी ती उशिरा पोचायची. उशिरा पोहोचल्यानंतर प्रशिक्षकांकडून होणार्‍या शिक्षाही ती निमूटपणे सहन करायची. तसंच चुकलेला सरावही जास्त वेळ थांबून ती पूर्ण करायची.

काट्यावाचून गुलाब नसतो हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून ती सराव करत असे. अनेक वेळेला तिच्या पालकांनी क्रिकेटचा नाद सोडून दे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, असा सल्ला दिला होता. पण क्रिकेटमधेच करियर करणार आहे; मग त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील. असंच ती आपल्या पालकांना सांगत असायची.

हेही वाचा: अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर

क्रिकेट कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट

१९९२मधे झालेल्या महिला आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचा खूप मोठा प्रभाव तिच्या मनावर झाला. १९९७ला कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपसाठी फायनल मॅच आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तिला संधी मिळाली. त्यावेळी या दोन्ही टीममधे असलेल्या श्रेष्ठ खेळाडूंच्या कामगिरीने तिच्यावर खूपच मोहिनी घातली.

तिने एकाग्रतेने आपल्या सरावावर लक्ष केंद्रित केलं. घराजवळ असलेल्या मोकळ्या पटांगणात ती वेगाने बॉल टाकण्याचाही सराव करायची. त्यानंतर सतत तीन वर्ष तिने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिला पूर्व विभागाकडून खेळण्याची संधी मिळाली.

२००० मधे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या एअर इंडियाविरुद्धच्या मॅचमधे तिने दहा षटकांमधे केवळ १३ धावांमधे तीन गडी बाद केले. या कामगिरीमुळे तिला काही दिवसांनंतर एअर इंडियाकडून खेळण्याची विनंती करण्यात आली. ही सोनेरी संधी तिने दवडली नाही. इथूनच तिच्या भावी कारकिर्दीचा पाया रचला गेला. एअर इंडिया टीमकडून तिने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिला भारतीय टीमचा दरवाजा खुला झाला.

सर्वोत्तम कामगिरी, अनेक सन्मानही

२००२ ला इंग्लंडविरुद्ध टेस्ट आणि वनडे मॅच खेळत आंतरराष्ट्रीय करिअरमधे पदार्पण केलं. इंग्लंडविरुद्ध २००६ मधे झालेल्या टी-ट्वेन्टी मॅचने तिच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय मॅचची मुहूर्तमेढ रोवली गेली. इंग्लंडची टीम तिच्यासाठी नेहमीच नशीबवान ठरलीय. २००६-२००७ला इंग्लंडविरुद्ध झालेल्या सिरीजमधे तिच्या प्रभावी कामगिरीमुळेच भारतीय महिला टीमला ऐतिहासिक विजय मिळवता आला.

पहिल्या टेस्टमधे नाईट वॉचमन म्हणून भूमिका पार पाडताना तिने अर्धशतक टोलावलं तर दुसर्‍या टेस्टमधे दोन्ही डावांत प्रत्येकी पाच गडी बाद करताना दहा विकेट घेण्याची किमयाही तिने केली. वनडेमधे न्यूझीलंडविरुद्ध २०२१ला ३१ धावांमधे सहा गडी ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१२ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांमधे पाच गडी ही तिची टी ट्वेन्टी मधली सर्वोत्तम कामगिरी आहे.

२००८ ते २०११ या कालावधीत भारतीय टीमचं नेतृत्व करण्याची तिला संधी मिळाली. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमच्या वनडे १२ मॅचमधे तर ८ टी ट्वेन्टीमधे विजय मिळवला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय मॅचमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळाला आहे.

ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिला अग्रस्थान दिलं जातं. २००७ला आयसीसी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू तर २०११ला एम. ए. चिदंबरम् स्मृती सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून तिची निवड झाली होती. पद्मश्री सन्मान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. अर्थात चाहत्यांचं प्रेम हाच तिच्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार, असं ती मानते.

हेही वाचा: भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

सातत्याने शिकण्याची जिद्द ठेवली

फास्ट बॉलर होण्याचा निश्चय तिने केला, तेव्हा कपिल देव, जवागल श्रीनाथ, ग्लेन मॅकग्रा यांच्यासारख्या बॉलरना तिने आदर्श मानलं. चेन्नईतल्या अकादमीत डेनिस लिली या ऑस्ट्रेलियाच्या श्रेष्ठ फास्ट बॉलरकडूनही तिला शिकण्याची संधी मिळाली. अशा सर्वच बॉलरकडून वेगवान बॉलिंगची भेदकता अचूकता, योग्य दिशा ठेवून बॉल टाकणं अशी विविधता आपल्या बॉलिंगमधे कशी येईल हाच ध्यास तिने ठेवला.

आपले सहकारी किंवा आपले प्रतिस्पर्धी यांच्याकडून सतत काहीतरी शिकत राहणं आणि टीमचे वेगवेगळे प्रशिक्षक यांच्याकडून जे काही मौलिक मार्गदर्शन केलं जाईल, त्यानुसार आपल्या शैलीत योग्य तो बदल करत आपली बॉलिंग अधिकाधिक परिपक्व कशी होईल आणि आपल्या टीमला कसा विजय मिळवून देता येईल याचाच विचार झुलन हिने नेहमी केला आहे.

टी ट्वेन्टीमधून निवृत्ती

प्रत्येक प्रशिक्षक हा आपल्या गुरूस्थानी आहे आणि त्याचा योग्य तो आदर आपण राखलाच पाहिजे हीच वृत्ती तिच्या वागण्यात नेहमी दिसून येते. फास्ट बॉलरला शारीरिक तंदुरुस्तीच्या काही मर्यादा असतात हे ओळखूनच तिने २०१८ला टी ट्वेन्टीमधून निवृत्ती घेतली.

मर्यादित षटकांच्या पेक्षाही टेस्ट क्रिकेटमधे खेळाडूंची सत्त्वपरीक्षा होत असते. टेस्ट हाच क्रिकेटचा खरा आत्मा आहे, असं तिने ती मानत आली. त्यामुळेच वयाच्या ३८ व्या वर्षीही तिचं अष्टपैलू कौशल्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायीच आहे.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)