उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.
बजाज ऑटो कंपनीच्या ऑफिसमधून अचानक एका जाहिरात कंपनीला निरोप जातो. लिंटास नावाची ही जाहिरात कंपनी अलिक पदमसी नावाची व्यक्ती चालवत असते. एका स्कुटरच्या ब्रँडसाठी एक गाणं बनवायचा निरोप पदमसी यांच्यापर्यंत पोचतो. गाणं बनतंही. शब्द असतात 'बुलंद भारत की बुलंद तस्वीर. हमारा बजाज.' ब्रँड असतो बजाजचा चेतक.
काही सेकंदाचं हे गाणं भारताच्या जाहिरात क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरलं. ही केवळ एक जाहिरात, गाण्याची ट्यून राहिली नाही बजाज ब्रँडची स्कुटर घेणं मध्यमवर्गीयांचं एक स्वप्न बनलं. बजाजची चेतक स्कुटर ब्रँड म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली. मध्यमवर्गीयांच्या एक स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न दाखवणारी ती व्यक्ती होती बजाज ऑटो कंपनीचे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज.
हेही वाचा: २६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी
अनेक उद्योगपतींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेतला. बजाज घराणं हे त्यापैकी एक होतं. राहुल बजाज ही तिसरी पिढी. त्यांचा जन्म १० जून १९३८ला कोलकाता इथं झाला. बजाज कुटुंबाचं महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्याशी खास नातं होतं. याच भागात त्यांची जमीनही होती. राहुल बजाज यांचं बालपणही इथंच गेलं होतं. त्यांचे वडील कमलनयन बजाजही वर्धातल्या सेवाग्राममधे वाढले. ते वर्ध्यातून तीनवेळा खासदारही होते.
अशा सगळ्या वातावरणात राहुल बजाज वाढत होते. त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतल्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळांमधे झालं. शाळेत असताना ते बॉक्सिंगमधे चँपियनही होते. दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी इकॉनॉमिक विषयात बीएची पदवी घेतली. पुन्हा मुंबईत माघारी आल्यावर त्यांनी मुंबई युनिवर्सिटीतून कायद्याची पदवी घेतली. तर १९६४ला अमेरिकेच्या हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून एमबीए केलं.
१९६५ला राहुल बजाज भारतात परतले. त्याआधी मुंबईत कायद्याचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी बजाज इलेक्ट्रिकल कंपनीत तीन वर्ष प्रशिक्षण घेतलं होतं. १९६८मधे वयाच्या तिशीत त्यांच्याकडे 'बजाज ऑटो लिमिटेड'चं सीईओपद आलं. पुण्यातल्या आकुर्डी इथं बजाज ऑटोचा कारखाना उभा राहिला. राहुल बजाज यांनी कारभार हाती घेतला आणि ते इथलेच झाले.
राहुल बजाज यांच्यावर आजोबा जमनलाल यांचा प्रभाव होता. जमनलाल बजाज ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक होते. १९२०मधे स्थापन झालेल्या या ग्रुपच्या २० पेक्षा अधिक कंपन्या होत्या. जमनलाल यांचा जन्म राजस्थानातल्या एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला होता. त्याचं शिक्षण जेमतेम चौथी झालेलं. लहानपणीच त्यांना एका श्रीमंत कुटुंबानं दत्तक घेतलं होतं. हे कुटुंब महाराष्ट्रातल्या वर्ध्यात रहायचं.
१९१५ला गांधीजी भारतात आले. जमनलाल यांची साबरमती इथं गांधीजींशी भेट झाली. पुढचं सगळं आयुष्य त्यांनी महात्मा गांधीजींच्या लढ्याला समर्पित केलं. गांधीजी जमनलाल यांना आपला मानसपुत्र मानायचे. १९२१ला वर्ध्यात सेवाग्राम आश्रम उभारण्यासाठी जमनलाल यांनी आपली जमीनही दिली होती. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ऐन भरात असताना जमनलाल यांनी या लढ्यासाठी काँग्रेसला आर्थिक मदत केली. स्वतः त्यात उतरले. अनेकवेळा जेलमधेही गेले.
राहुल यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी एकाच शाळेत होते. राहुल बजाज यांचं नावंही त्यांच्या आई सावित्री यांनी जवाहरलाल नेहरूंना विचारून राहुल असं ठेवलं. हे नाव खरंतर राजीव गांधी यांचं असणार होतं. वर्धा शहरात बजाज वाडीत त्यांचं घर आहे. तिथं नेहरूंसाठी स्वतंत्र रुमही होती. काँग्रेसच्या तिथं चर्चाही व्हायच्या. अशाप्रकारे बजाज यांचं गांधी-नेहरूंशी वैचारिक नातं होतंच पण कौटुंबिक संबंधही होते.
हेही वाचा: साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात
राहुल बजाज यांनी प्रेमविवाह केला होता. महाराष्ट्रातल्याच एका मराठमोळ्या रूपा घोलप यांच्याशी त्यांचं सूत जुळलं होतं. मारवाडी-गुजराती उद्योगपती घराण्यांमधला हा पहिलाच प्रेमविवाह होता. या प्रेमविवाह आणि आपल्या पत्नीविषयी राहुल बजाज वेगवेगळ्या मुलाखतींमधे भरभरून बोललेत.
रूपा यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांचं शिक्षण मुंबईत झालं होतं. वडील सरकारी अधिकारी होते. रूपा यांना मॉडेलिंगची आवड होती. रूपा यांना त्यावेळी 'मराठी ब्युटी क्वीन' म्हणून ओळखलं जायचं. १९६१ला राहुल आणि रूपा यांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघंही पुण्यात स्थायिक झाले.
दोन्ही कुटुंबं फार वेगळी होती तरीही रूपा यांनी प्रत्येक काळात आपल्याला भक्कमपणे साथ दिल्याचं राहुल यांनी इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी २०१६ला त्यांची ही मुलाखत घेतली होती. रूपा यांचा आपण आदर करतो. त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळाल्याचं राहुल बजाज म्हणतात.
१९४७ ते १९६९मधे भारतात लायसन्स राज होतं. सरकारी नियमानुसार कोणत्याही कंपनीला केवळ २५ टक्केच उत्पादन घेता यायचं. त्यासाठी प्रायवेट कंपन्यांना सरकारच्या वेगवेगळ्या ८० प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागायच्या. कंपनीच्या उत्पादनावर पूर्णपणे सरकारचं नियंत्रण होतं. उद्योगपतींनाही वारंवार सरकारी कार्यालयांमधे खेटा घालाव्या लागायच्या.
अशा सगळ्या काळात 'बजाज ऑटो'चं सीईओपद राहुल बजाज यांच्याकडे आलं होतं. बजाजच्या स्कुटरमुळे कंपनीला वेगळी ओळख मिळाली. स्कुटर विकत घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागायचं. सरकारच्या लायसन्स राजमुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन करता येत नव्हतं. त्यामुळे लोकांना स्कुटरच्या डिलिवरीसाठी दहा-दहा वर्ष वाट पहावी लागायची. बजाजच्या स्कुटरसाठी अधिक पैसे मोजायलाही लोक तयार असायचे.
१९९१ला भारतात उदारीकरणाला सुरवात झाली. परदेशी कंपन्या भारतात पाय रोवू लागल्या. त्यांच्याकडे सगळं तंत्रज्ञान होतं. मार्केटिंगच्या क्लुप्त्या होत्या. राहुल बजाज उद्योगपतींचं एक शिष्टमंडळ घेऊन तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटायला गेले. 'बॉम्बे क्लब' नावानं ओळखले जाणारे हे उद्योगपती उदारीकरणाचे विरोधक समजले जायचे.
शिष्टमंडळाने अर्थमंत्र्यांची भेट घेतली. आतलं बोलणं बाहेर बोलू नये अशी विनंतीही करण्यात आली. पण राहुल बजाज यांनी मात्र थेट भूमिका घेतली. आपला उदारीकरणाला विरोध नाही पण भारतातल्या कंपन्यांना समान संधी मिळायला हव्यात हे त्यांनी ठणकावून सांगितलं. एनडीटीवी इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितलाय.
हेही वाचा: जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?
बजाज यांनी स्कुटरसाठी पियाजियो या इटलीच्या कंपनीसोबत करार केला होता. पण ऐनवेळी करार मोडीत निघाला. पण राहुल बजाज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी बजाज चेतक नावानं एक स्कुटर बाजारात आणली. 'बुलंद भारत की बुलंद तस्वीर. हमारा बजाज.' या शब्दांनी लोकांचं लक्ष वेधलं. बजाजच्या चेतक स्कुटरला या एका जाहिरातीने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
मध्यमवर्गीयांचं गाडीचं स्वप्न या चेतकमुळे पूर्ण झालं. चेतकसोबत सुपर के हाही बजाजचा एक ब्रँड होता. त्यावेळी चेतक स्कुटरच्या उत्पादनवर सरकारने मर्यादा आणल्या होत्या. राहुल बजाज मागे हटले नाहीत. त्यांनी सरकारविरोधात आवाज उठवला. चेतकनंतर बजाजची पल्सर ही मोटरसायकल बाजारात आली. १९६५ला ३ कोटींची उलाढाल असलेली कंपनी २००८ला १० हजार कोटींवर पोचली. राहुल बजाज यांच्यामुळेच हे शक्य झालं होतं.
२००१ला भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. २००५ला त्यांनी कंपनीची जबाबदारी राजीव आणि संजीव या आपल्या मुलांकडे दिली होती. ते राज्यसभेवरही निवडून गेले होते. तसंच भारतीय उद्योग संघ, इंडियन एअरलाईन, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं. मागच्याच वर्षी त्यांनी तब्येतीमुळे बजाजचं सीईओपद सोडलं होतं.
आजकाल सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बोललं की थेट देशद्रोही ठरवलं जातं. उद्योगपती सरकारविरोधात बोलताना सावध पवित्रा घेत असताना राहुल बजाज मात्र त्याला अपवाद ठरले. ‘जमनलालका पोता हूँ। डरकें नहीं हात जोडकें काम करेंगे... पर डरेंगे नहीं किसीसें।’ असं १९६९ला इंदिरा गांधींनाही ठणकावून सांगितल्याचं त्यांनी एनडीटीवीच्या एका मुलाखतीत म्हटलंय.
दोन वर्षांपूर्वी 'इकॉनॉमिक टाईम'च्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांना लोक आपल्याला घाबरतात असं जाहीरपणे सांगायची हिंमत करत त्यांनी मोदी सरकारची कानउघडणी केली होती. त्यावरून बजाज यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. पण आपण कायमच सत्तेच्याविरोधी राहिल्याचं सांगत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
त्यांनी वेळोवेळी प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात भूमिका घेतली. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली. फोर्ब मॅगझीनला त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात ‘मी काही संत नाही. पण पैसे कमवण्यासाठी मी चुकीच्या मार्गाने गेलो नाही. त्याचा मला अभिमान आहे.’ असं सांगितलं होतं. आपल्या भूमिका आणि मूल्यांशी इतकं प्रामाणिक राहिल्यामुळेच ते कुणासमोर झुकले नाहीत.
हेही वाचा:
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं?
कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
केरळमधल्या जेंडर पार्कमधे फुलतायत स्त्री पुरूष समानतेची फुलं
डॉ. नरेंद्रसिंग कपानी: फायबर ऑप्टिक्सचा हा जनक आपल्याला माहीत नाही