आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन?

१४ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


१४ नोव्हेंबर हा संपुर्ण देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या आसपासची मुलं खरचं सुरक्षित आहेत की नाही हे विचार करायला लावणारा हा काळ आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या तक्रारींवरून लहान मुलांचं फार मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होतं असं समोर आलंय. हे शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा घरातलीच व्यक्ती असते.

१४ नोव्हेंबर म्हणजे बाल दिन. त्या निमित्तानं देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत असतात. या कार्यक्रमांतून साध्य काय होतं हा मात्र संशोधनाचा मुद्दा आहे. मुलांना सवलतीच्या दरात नाटक, सिनेमा दाखवून किंवा वस्तीतल्या मुलांना एखाद्या हॉटेलमधे जेवणासाठी नेऊन बरेच लोक त्याचा इव्हेंट बनवतात. आणि प्रसिद्धीसुद्धा मिळवतात. मुलांसाठी काही तरी रंगारंग कार्यक्रम आयोजित केला म्हणजे झाला का बाल दिन?

मुलांना असलेलं अभ्यासाचं दडपण, त्यांच्या दप्तराचं ओझं, शाळा आणि क्लासेसची दडपशाही या पलीकडे जाऊन विचार करण्याची ही वेळ आहे. या बाल दिनाच्या निमित्तानं मुलांच्या अडचणी समजून घेता आल्या पाहिजे. त्यांना योग्य पद्धतीनं समुपदेशन करता आलं पाहीजे.

मुलांना कसल्या आल्या समस्या असं एखाद्याला वाटेल. ते तर मस्त, निरागस आयुष्य एन्जॉय करतात. पण मुलं खरच सुरक्षित आहेत?

फक्त अर्थिक सुरक्षेचा विचार करून चालणार नाही

एखाद्याला वाटेल हा कसला प्रश्न आहे! अर्थातच, प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या सुरक्षेची काळजी घेत असतो. त्यांना कपडे, चांगला आहार, अभ्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यामागेही आपला कल असतो. पण आपल्या मुलाच्या आर्थिक सुरक्षेचा पावलोपावली विचार करणारे पालक एका महत्त्वाच्या सुरक्षेबाबत विचार करताना दिसत नाहीत.

अर्थिक सुबत्ता असलेले आणि दोघेही कमावते असलेले आई बाबा मुलांना ‘बेस्ट’ डे केयरमधे घालतात. किंवा काही जणांना वाटत असतं आमचं मूल मोठ्या शाळेत जातं, त्यामूळे चिंता नाही. शिवाय घरी काळजी घ्यायला आजी आजोबा, आत्या, काकू, मावशी यांच्यापैकी कुणीतरी किंवा घरकाम करणाऱ्या मावशी वैगरे आहेतच.

पण खरंतर, या सगळ्या पालकांना डोळे आणि मेंदू उघडा ठेवून आजूबाजूला बघायची गरज आहे. त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारावा. बाल शोषणाबद्दल आपल्याला साधारण किती माहिती आहे?

हेही वाचा : राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!

बाल लैंगिक शोषणाच्या १७ हजार तक्रारी

‘चाइल्ड अब्यूज’ म्हटलं की लोकांच्या डोक्यात येतं ते बाल कामगार आणि त्यांची होणारी पिळवणूक किंवा त्यांना होणारा मानसिक त्रास. पण हे इतकं मर्यादित नाहीय. कारण वास्तव हे त्यापेक्षा कितीतरी विदारक, विचित्र आणि काही बाबतीत किळसवाणं आहे. ज्याची सामान्य माणूस कल्पनाही करणार नाही.

पॉक्सो म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स या कायद्याबाबत लोकांना फारशी माहिती नाही. जून २०१२ मधे हा कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून आतापर्यंत लाखो केसेस दाखल झाल्यात. २०१८ या एका वर्षात महाराष्ट्रात १७३३८ केसेस पेंडींग आहेत.

कोणी म्हणेल गेल्या कित्येक वर्षांत कोर्टात अशा कितीतरी केसेस पेंडीग आहेत त्यात या १७३८८ आल्या तर काय वेगळं काय? पण या केसेस काय आहेत आणि लहान मुले कोणत्या पद्धतीनं अर्थिक शोषणाला बळी पडतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

ओळखीतली व्यक्तीच असते गुन्हेगार

कायद्यानं केलेली लहान मुलांची व्याख्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतील कुणीही. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंदवल्या गेलेल्या जास्तीत जास्त केसेसमधे बळी पडलेली मुलं ही चार ते चौदा वर्ष वयोगटातली आहेत. या वयात मुलं अज्ञान असतात. ती नेमकेपणानं व्यक्त होऊ शकत नाहीत. आणि याचाच फायदा गुन्हेगार घेतात. म्हणजे एखाद्या चार वर्षाच्या मुलीचा किवा मुलाचा लैंगिक छळ होतोय हे त्याला किंवा तिला कळणार कसं? आणि नेमकं काय झालंय किंवा होतंय ते कसं सांगणार ही मुलं?

पॉस्को कायद्याअंतर्गत दिसणारी ही आकडेवारी फार छोटी वाटत असली तरी या फक्त बाहेर आलेल्या, नोंदवल्या गेलेल्या केसेस आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यापेक्षा कितीतरी अधिक केसेस या पोलिसांकडे येतच नाही. आता काही सुज्ञ पालक विचार करतील की या सगळ्याचा आमच्याशी नेमका संबंध तरी काय? आमची मुलं घरी अगदी सुरक्षित आहेत. त्यांच्यासाठी आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगणं गरजेचंय.

हेही वाचा : …म्हणून आजच्या पिढीनं शेषन यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे!

ती गोष्ट अशी की, पोलिस स्टेशनमधे दाखल करण्यात आलेल्या या तक्रारींपैकी जास्तीत जास्त तक्रारींमधे गुन्हेगार ही परिचयाची व्यक्ती, नातेवाईक आणि काही ठिकाणी तर घरातलीच व्यक्ती होती. जे लोक तक्रार दाखल करत नाहीत अशा केसेसमधे तर गुन्हेगार ही घरातलीच, जवळची व्यक्ती असण्याची हमखास शक्यता असते. आणि त्यामुळेच घराची अब्रू, लोक काय म्हणतील अशा एक ना अनेक पोचट कारणांमुळे गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हेगार उजळ माथ्यानं समाजात वावरत असतात.

मोठ्यांचा आदर करायचा म्हणून मुलं गप्प बसतात

आपण सगळेच मुलांना फार गृहीत धरतो. त्यांना काय कळतंय! लहान आहेत अजून. या एका लेबल खाली आपण सरळ सरळ त्यांचं विचार स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दडपून टाकतो. काही नाती ही निव्वळ प्रेम आणि आदर करण्यासाठीच असतात, असं आपण मुलांना शिकवतो. आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या यांचा नेहमी आदर करायचा आणि करायचा म्हणजे करायचाच.

अशा नातेवाईकांच्या बाबतीत मुलांनी काही उलटसुलट बोलायचा प्रयत्न केलाच तरी आपण मुलांना गप्प बसवतो. मुलांचा कोंडमारा होतो. त्यांच्यावर विश्वास ठेवणारं कुणीच नसतं. निव्वळ भितीपोटी ही मुलं अत्याचार सहन करत राहतात. मुलांच्या बाबतीत असं अमानवी कृत्य करणारी व्यक्ती चांगला माणुस असूच शकत नाही. ही एक प्रवृत्ती आहे. आणि ती कुणाच्याही रुपात असू शकते अगदी बापाच्यासुद्धा!

यात काही अतिशयोक्ती नाही. वर्तमानपत्र उघडून बघा. अशा कित्येक बातम्या रोज छापुन येतात. आपण त्याकडे कानाडोळा करतो कारण ती बातमी आपल्याला रिलेट होणारी वाटत नाही. पण वास्तव आहे की त्या बातमीतील पात्र वेगवेगळया नावांचे आणि नात्यांचे मुखवटे घालून आपल्या आजुबाजुला वावरत असतात.

या बाल दिनाच्या निमित्तानं आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधा. कदाचित बर्‍याच मुखवट्याच्या आड लपलेले खरे चेहरे समोर येतील. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. तो खरा बाल दिन!

हेही वाचा : 

यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

...आणि तरीही सरदारजींवरचे जोक बंद होत नाहीत

मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकता

शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला