प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

१७ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे महाराष्ट्राच्या इतिहासलेखनाचे भीष्माचार्य. त्यांचा व्यासंग इतका मोठा की त्यांनी सांगावं आणि इतरांनी त्याला महाराष्ट्राचा इतिहास म्हणून मान्यता द्यावी, असा शिरस्ता. पण स्वजातिभिमानाच्या सालीवरून त्यांचा पाय अनेकदा घसरायचा. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या चौथ्या वर्षातल्या अहवालाचा लेख त्याचा दाखलाच होता. त्यात राजवाडेंनी बोगस कागदपत्रांचा आधार सांगत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी समाजाचा सगळा इतिहासच राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप केला.

हेही वाचा : ना बाळासाहेब ना प्रबोधनकार, त्यांनी दाखवून दिला स्वत:चाच चमत्कार!

कोदण्डाच्या टणत्काराने हादरला महाराष्ट्र 

१९१०च्या दशकात राजवाडे कंपूचे असे आरोप करण्याचे प्रकार काही नवीन नव्हते. तेव्हा ब्राह्मणेतर समाजातले तरुण नव्या जगात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होते. त्यांच्या अस्मितांचे कोंभ फुलण्याआधीच चुरडण्यासाठी राजवाडेंचा कंपू राष्ट्रवादी इतिहाससंशोधनाच्या नावाखाली इतर जातींच्या इतिहासाला विकृत रूप देण्याचं काम करत होता. 

अशावेळेस एक अवघ्या ३३ वर्षांचा एक किरकोळ शरीरयष्टीचा तरुण या सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी उभा राहिला. त्याला साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातली कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. त्याच्या ‘कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारतीय इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी’ या ग्रंथाने राजवाडेंच्या सगळ्या आरोपांच्या साधार ठिणग्या उडाल्या. हे संशोधन इतकं पक्कं होतं की त्यामुळे संशोधन मंडळाची सरकारी मदत बंद झाली आणि तरीही राजवाडे त्याला उत्तर देऊ शकले नाहीत. हे फक्त खंडनमंडन नव्हतं. तर या एका ग्रंथाने महाराष्ट्राच्या इतिहासलेखनाची दिशाच बदलून गेली. या क्रांतिकारक इतिहास संशोधकाचं नाव होतं प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे.

प्रबोधनकारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं की ते फक्त पुस्तक लिहून शांत बसले नाहीत. तर आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी इंदूरपासून गोव्यापर्यंतचा तेव्हाचा महाराष्ट्र पिंजून काढला. याच नव्या पद्धतीच्या इतिहासाचा पाया घालणारे ‘नोकरशाहीचे बंड अर्थात ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’ आणि ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे ग्रंथही महत्त्वाचे ठरले. त्याचा कळस ठरला तो ‘रंगो बापूजी’ हा चरित्रग्रंथ. 

असं चरित्र दुसरं नाही आणि चरित्रकारही 

शेवटचे छत्रपती प्रतापसिंह यांचा ब्राम्हणी संस्थानिकांनी केलेला छळ, त्यात त्यांचा झालेला करुण अंत आणि त्याविरुद्ध रंगो बापूजीने दिलेला लढा हा या ग्रंथाचा विषय होता. खरंतर ‘हिंदवी स्वराज्याचा खून’ आणि ‘साताऱ्याचे दैव की दैवाचा सतारा’ या पुस्तिकांमधे त्यांनी या विषयाची रूपरेषा मांडली होती. तसेच या विषयावर त्यांनी केलेल्या भाषणांनी सातारा परिसरात ब्राह्मणेतर आंदोलनाची मशागत केली होती. या मशागतीमुळेच कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे कार्यकर्ते तयार झाले आणि रयत शिक्षण संस्थेचं काम उभं राहिलं. कर्मवीर प्रबोधनकारांना गुरू मानत, हे यासंदर्भात मुद्दामहून नमूद करायला हवं. 

छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूआधी काही तास प्रबोधनकारांकडून रंगो बापूजींवरचा ग्रंथ पूर्ण करण्याचं वचन घेतलं होतं. ‘संदेश’कार अच्युतराव कोल्हटकरही त्यांच्या मृत्यूपर्यंत या ग्रंथासाठी प्रबोधनकारांकडे लकडा लावून होते, इतकी यातली संशोधनाची मांडणी महत्त्वाची आहे. जवळपास चार दशकांच्या संशोधनानंतर हा ग्रंथ साकारला. असा चरित्रनायक तर मराठीत कधी झाला नाहीच, पण असा चरित्रकारही नाही.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

शाळकरी वयातच लिखाणाला सुरवात

प्रबोधनकारांना विविध अंगांनी समृद्ध आणि प्रचंड संघर्षाने भरलेलं नव्वद वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. शाळेत असताना ह. ना. आपटेंच्या त्याकाळी प्रसिद्ध असणा-या करमणूक मासिकात पहिल्यांदा त्यांचं लिखाण छापून आलं. 

‘कोदण्डाचा टणत्कार’ हे त्यांचं पहिलं पुस्तक. त्याच सुमारास त्यांनी समर्थ रामदासांचं इंग्रजी चरित्र ‘लाईफ अँड मिशन ऑफ रामदास’ (१९१८) लिहिलं. पण त्याहीपेक्षा गाजला तो त्याच काळातला ‘वक्तृत्वशास्त्र’ हा ग्रंथ. या विषयावर भारतीय भाषांमधे लिहिलेलं ते पहिलंच पुस्तक होतं. लोकमान्य टिळकांनी कीर्तनकारांना हे पुस्तक वाचण्याची खास शिफारस केली होती.

ऐन तरुणपणातच प्रबोधनकारांनी सत्यशोधक आंदोलनाचं वैचारिक नेतृत्व मोठ्या हिरीरीने केलं. त्यांनी हिंदू धर्माची केलेली चिकित्सा खूपच मोलाची ठरली. त्यातलं ‘धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म’ हे छोटंसं पुस्तक फारच क्रांतिकारक ठरलं. ‘शनिमहात्म्य’, ‘हिंदू धर्माचे दिव्य’, ‘हिंदू धर्माचा ऱ्हास आणि अधःपात’ अशा पुस्तकांनी धर्माची परखड चिकित्सा केलीय. या विषयावरच्या महाराष्ट्रातल्या पुढील सगळ्याच चिंतनासाठी हे लिखाण मार्गदर्शक ठरलं. 

प्रबोधनकारांच्या वैचारिक लिखाणामधे ‘शेतक-यांचं स्वराज्य’ हे पुस्तक असंच महत्त्वाचं आहे. शेतकरी आणि ग्रामीण भारताच्या विकासातच देशाचं खरं हीत आहे, अशी मांडणी त्यांनी केली आहे. आश्चर्यकारकपणे यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव जाणवतो.

प्रबोधनचा एल्गार 

प्रबोधनकारांचा मूळ पिंड संशोधकाचा होता तरी ते हाडाचे पत्रकार होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते वृत्तपत्रीय लिखाण करत होते. पण त्यांच्या लेखणीला खरा बहर आला तो ‘प्रबोधन’मुळे. १६ ऑक्टोबर १९२१ रोजी हे पाक्षिक सुरू झालं. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादातल्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी आणि नव्या वादांना जन्म देण्यासाठी त्यांना स्वतःच्या मालकीचं नियतकालिक हवं होतं. A fortnightly Journal devoted to the Social, Religious and Moral Regeneration of the Hindu Society, असं ध्येय असणा-या प्रबोधनला राजकारणाचं वावडं मुळीच नव्हतं. 

‘सामाजिक सुधारणांना पांढरपेशा समाजाच्या पुढे नेत बहुजनसमाजापर्यंत पोहोचवणारं प्रबोधन आगरकरांच्या ‘सुधारक’च्याही काही पावलं पुढे गेलेलं होतं’, असं मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिताना रा. के. लेले सांगतात. प्रबोधनकारांच्या शैलीविषयी ते म्हणतात, ‘त्यांच्या वाणीच्या आणि लेखणीच्या शैलीला महाराष्ट्रात जोड सापडणे कठीणच! त्यांचा नुसता टोला नव्हे, तर सणसणीत प्रहार असे. वाचणा-याच्या अंगाचा तिळपापड व्हावा अशी त्यांची भाषा असे. पण ती अधिक बाळबोध, सोपी आणि अस्सल मराठमोळा वळणाची होती.’

महाराष्ट्रावर ‘प्रबोधन’चा खप आणि प्रभाव खूप होता. आपल्या अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत बहुजनवादी पत्रकारितेला मान्यता, वलय आणि विचारांचं प्रौढत्व मिळवून दिला. त्यामुळे ‘प्रबोधन’ बंद पडल्यानंतरही प्रबोधनकार हे बिरुद त्यांच्यामागे नावासारखं सन्मानानं येऊन चिकटलं. स्वतःच व्यावसायिक प्रकाशक असल्यामुळे त्यांनी प्रबोधनमधले अनेक लेख पुस्तक किंवा पुस्तिकारुपाने बाजारात आणले.त्यात ‘स्वाध्याय संदेश’ आणि ‘प्रस्थान’ हे लेखसंग्रह, त्यांनी चालवलेल्या हुंडाबंदी चळवळी दरम्यान लिहिलेली ‘कुमारिकांचे शाप’, ‘बापाची कसरत मुलीची फसगत’ ही लोकप्रिय पुस्तकं तसेच तुकोजीमहाराज होळकर बदनामीवरची ‘बाबला मुमताज प्रकरण’, ‘प्रबोधनाचा बजरंगी सोटा’ आणि ‘द टेम्प्ट्रेस’ (इंग्रजी) ही तीन पुस्तकं महत्त्वाची होती.

हेही वाचा : या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

खरा नाटककार 

‘प्रबोधन’ बंद पडल्यानंतरही ते सतत लिहित राहिले. त्यातले फक्त ‘लोकमान्य’मधल्या ‘जुन्या आठवणी’ आणि ‘मार्मिक’मधले लेख ‘ऊठ मऱ्हाठ्या ऊठ’ पुस्तकरूपाने आले. पण संयुक्त महाराष्ट्राच्या काळातलं ‘नवाकाळ’ मधलं ‘घाव घाली निशाणी’ हे महत्त्वाचं सदर कधीच पुस्तकरूपाने आलं नाही. तसंच त्यांनी जळगावच्या ‘बातमीदार’मधे लिहिलेलं आत्मविश्वास, इंग्लिश स्पीकिंग, संवादकौशल्य अशा विषयांवरचं आधुनिक सेल्फ हेल्प पद्धतीचं लिखाण खूपच वेगळं तरीही दुर्लक्षित आहे.

नाट्यव्यवसायात प्रबोधनकारांनी अनेक वर्षं घालवली. ‘खरा ब्राम्हण‘ हे संत एकनाथांच्या जीवनावरचं त्यांचं नाटक खूप वादग्रस्त ठरलं. ‘टाकलेलं पोर’, ‘संगीत विधिनिषेध’, ‘काळाचा काळ’, ‘संगीत सीताशुद्धी’ या नाटकांतून त्यांनी लोकांचं मनोरंजन तर केलंच. पण आपले विचारही स्पष्टपणे मांडले. 

संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांची पहिली चरित्रं त्यांनीच लिहिलीत. पं. रमाबाईचं त्यांनी लिहिलेलं चरित्र किंवा ‘दगलबाज शिवाजी’ हा शिवचरित्राचा वेगळा दृष्टिकोनही मोलाचा आहे. पावनखिंडीचा पोवाडा, रायगडचं प्रवासवर्णन, रेल्वेविषयक कायद्यांवरचं ‘रेल्वे प्रवाशांचा माहितगार मित्र’ हे पुस्तक किंवा वैदिक विवाह विधीचं संपादन अशी विषयांवरची प्रचंड रेंज त्यांच्या लेखनात आढळते.

एका शतकाचं आत्मचरित्र

‘माझी जीवनगाथा’ हे त्यांचं शेवटचं पुस्तक. त्यांच्या निधनाच्या दोन महिने आधी याचं प्रकाशन झालं. हे त्यांचं आत्मचरित्रच. पण यात बाकीच्या आत्मचरित्रांसारखा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आलेख मांडलेला नाही. या आठवणीच आहेत. असं असलं तरी विसाव्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास लिहिणाऱ्या कुणालाही हे पुस्तक टाळता आलेलं नाही, इतके महत्त्वाचे संदर्भ यात पानोपानी पसरलेले आहेत. अत्यंत रसाळ तरीही ठसठशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. 

प्रस्तावनाकार धनंजय कीर म्हणतात, ‘प्रबोधनकार ठाकरे एक बहुरंगी, बहुढंगी नि कर्तृत्ववान पुरुष. जिनगर,  छायाचित्रकार,  तैलचित्रकार,  पत्रपंडित, वादविवादपटू,  शिक्षक,  संपादक,  नाटककार,  टंकलेखक,  समाजसुधारक,  चळवळे,  वक्ते, नेते,  पटकथा संवाद लेखक,  चरित्रकार नि  इतिहासकार अशा विविध भूमिका त्यांनी वठविल्या... गोव्यापासून नागपूरपर्यंत सर्व महाराष्ट्र पायाखाली घालून महाराष्ट्रातील समाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण केलेल्या महाराष्ट्राच्या एका पराक्रमी पुत्राच्या या आठवणी आहेत.’ 

प्रबोधनकारांच्या आयुष्यभराचा संघर्ष यात आलेला आहे. तो खूपच प्रेरणादायी आहे. कुणाला कधी निराशा वाटत असेल तर कोणतंही पान खोलावं आणि नवी उमेद मिळवावी. पण खरं सांगायचं तर अशी प्रेरणा प्रबोधनकारांच्या साहित्यात पानोपानी आढळते.

हेही वाचा : 

उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

(प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य prabodhankar.org या वेबसाईटवर वाचता येतं.)