सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

२२ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय.

साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमधे टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. ३-० असा विजय मिळवत भारताने साऊथ अफ्रिकेला धूळ चारली. या विजयासह अनेक रेकॉर्ड टीम इंडियाच्या खेळाडूंनी केलेत. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली. तिसऱ्या टेस्ट मॅचमधे एका अशा खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली, ज्याची गोष्ट निराश झालेल्या प्रत्येकाला पूर्ण जगण्याची उभारी देऊन जाईल. या तीस वर्षांच्या खेळाडूचं नाव शाहबाज नदीम.

टीम इंडियाचे सगळे रस्ते बंद झाले होते

साऊथ अफ्रिकेच्या तिसऱ्या टेस्टमधून नदीमने इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमधे पदार्पण केलं. या खेळाडूचा हा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे. ज्या राज्यातून धोनी आला, त्याच राज्यातून शाहबाज नदीमही आलाय. धोनीची गोष्ट सगळ्यांना माहीत आहेच. पण शाहबाज नदीमची गोष्टही कमी संघर्षपूर्ण नाही.

शाहबाजचं वय ३० वर्ष. आपण तिसाव्या वर्षी डेब्यू करू, असं नदीमला स्वप्नातही वाटलं नसेल. त्याला कारणही तसंच होतं. तो पंधराव्या वर्षापासून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळू लागला. नदीमच्या बरोबरचे सर्व खेळाडू कधीच पुढे निघून गेले. पण त्याला संधी मिळत नव्हती.

त्यामुळे आलेली निराशा कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करेल. नदीमचंही तसंच झालं. क्रिकेटरचं करिअर असंही असतंच किती वर्षांचं? त्यात तिशीत आल्यानंतर आता सर्व मार्ग जवळपास बंद झाल्याचं त्याला वाटलं. त्याला वाटत होतं, टीम इंडियात येण्याचे सगळेच रस्ते बंद झालेत.

हेही वाचा: सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल काय?

आणि नदीमची दुवा कबूल झाली

नदीमचे वडील पोलिस अधिकारी. ते नदीमला सारखं म्हणायचे की तुला एकदातरी टीम इंडियासाठी खेळताना बघायचंय. उशिरा का असेना पण नदीमने त्याच्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. साऊथ अफ्रिकेविरुद्धचे सामने नदीम आपल्या वडिलांसोबतच बघत होता. पण याच सीरिजमधे आपल्याला खेळण्याची संधी मिळेल, असं त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं.

पहिल्या दोन कसोटीतच भारताने आपला मालिका विजय नोंदवला होता. कुलदीप यादव तिसऱ्या कसोटीत खेळणार होता. पण त्याला दुखापत झाल्याने भारत तिसऱ्या स्पिनरच्या शोधात होता.

नदीम नेहमीप्रमाणे सराव आटोपून नमाज पडण्यासाठी गेला. या दिवशी अल्लाने नदीमची दुवा कबूल केली. घरी आल्यावर निवड झाल्याचा निरोप त्याला मिळाला. त्याच्या जगण्याचं सार्थक झालं. त्याने अल्लाचे आभार मानले. जे स्वप्न नदीम इतकी वर्ष उराशी बाळगून होता, ते पूर्ण करण्याची संधी त्याला मिळाली.

भावासाठी भावाचा मोठा त्याग

शाहबाज नदीमला एक मोठा भाऊ आहे. लहानपणापासून दोघे भाऊ एकत्रच क्रिकेट खेळायचे. क्रिकेटचे धडे त्यांनी एकत्रच गिरवले. सिलेक्शन डे नावाची वेब सीरिज जर पाहिली असेल, तर तुम्हाला त्यातले सीन नदीमच्या आयुष्यावरुनच तर घेतले नाहीत ना, अशी शंकाही येईल.

नदीमचा मोठा भाऊ असद इक्बाल चांगला क्रिकेट खेळायचा. अंडर १५ टीमचा तो कॅप्टनही होता. पण नदीमच्या वडलांनी आपल्या दोन्ही मुलांना ताकीद दिली. माझ्या दोन मुलांपैकी फक्त एकालाच क्रिकेट खेळण्याची परवानगी देऊ शकतो, असं त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना बजावलं. इथे शाहबाजच्या भावाने कुर्बानी दिली. आपल्या धाकट्या भावाला क्रिकेट खेळायला मिळावं, यासाठी इक्बालने क्रिकेटकडे पाठ फिरवली. आणि इंजिनिअरिंग केलं. सध्या तो एका बड्या कंपनीत नोकरी करतोय.

नदीमची निवड झाल्यानंतर होकार देणं ही बाब सोप्पी नव्हती. आपल्या भावाने दिलेली कुर्बानी तो विसरला नव्हता. याच काळात त्याच्या भावाच्या बायकोचं एक महत्त्वाचं ऑपरेशन होणार होतं. प्रसंग कठीण होता. पण जे स्वप्न मोठ्या भावाने आणि वडलांनी बघितलं, त्याची किंमतही शाहबाज जाणून होता. आपल्या कुटुंबासाठीच त्याने खेळण्यासाठी होकार दिला.

हेही वाचा: महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

सगळं चांगलं, मग संधी का नव्हती?

१५ वर्षांपासून नदीमने फक्त क्रिकेटलाच सर्वस्व मानलं. त्याचा फर्स्ट क्लासमधे त्याचा दबदबाही मोठा होता. त्यात त्याने तब्बल ४२० हून अधिक विकेट्स घेतल्या. तो डावखुरा फिरकी गोलंदाज. त्याने आपली चमक आयपीएलमधेही दाखवली. सगळीकडे उत्तम खेळ करुनही त्याला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळत नव्हती. यामुळे निराश झाल्याने नदीमने अपेक्षा ठेवणंच सोडून दिलं. जवळपास सगळं संपल्यात जमा होतं.

ऐन तारुण्यात नदीमने एका क्लबसाठी खेळण्याचा विचार केला. एका क्लबमधून खेळण्यासाठी त्याने विचारणा केली. पण तिथेही त्याला नाकारण्यात आलं. मग त्याच्या वडिलांनी स्वतःचाच क्लब सुरू केला. आपल्या मुलाला आपल्याच क्लबमधे खेळण्यापासून कोण कसं नकार देईल, असा विचार वडलांनी केला. त्याच्या सरावात अडचणी येऊ नये म्हणून त्याच्या वडलांनी सगळी खबरदारी घेतली. त्याच्यासाठी वडलांनी खास लाईट्स आणि पीच-नेटची सोय वडलांनी केली.

झारखंडच्या धनबादमधे राहणारा नदीम काल परवापर्यंत वडलांबरोबर टीवीवर क्रिकेटच्या मॅच बघायचा. पण तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी त्याची निवड झाली. आता त्याचे वडील त्याला टीम इंडियाच्या कॅपमधे टीवीवर खेळताना बघू शकले. पण हा प्रवास वाटतो तितका नक्कीच सोप्पा नव्हता.

मॅचसाठी पोचायचं कसं?

नदीमला तिसरी टेस्ट मॅच खेळण्यासाठी रांचीला पोहोचायचं होतं. हातात फक्त काही तास उरले होते. शाहबाजने विमानाचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात रांचीमधे मॅच म्हटल्यावर अनेक क्रिकेटप्रेमींनी जाण्याची तयारी केली असणार. म्हणूनच विमानाचं बुकिंग फुल. आता काय करायचं, हा मोठा प्रश्न नदीमपुढे होता.

शेवटी बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला. कारण दुसरा पर्यायच नव्हता. तब्बल ४५० किलोमीटरचा प्रवास केला. आणि नदींम कसोटीच्या आदल्या दिवशी रात्री साडे अकराला रांचीत पोचला. क्रिकेटसाठी सगळं आयुष्य वेचलेला नदीम त्याचं स्वप्न तिथे जगत होता.

हेही वाचा: अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर

तीन विकेट घेत स्वत:ला सिद्ध केलं

नदीम गेली कित्येक वर्षं ज्यासाठी धडपडत होता. ती गोष्ट पूर्ण झाली. आता सगळं संपलंय, असं वाटत असतानाच आयुष्याने जगण्याची पुन्हा नवी उमेद दिली. टीम इंडियामधे एका कसोटी सामन्यासाठी खेळण्याची मिळालेली संधी नदीमनेही वाया घालवली नाही.

फिरकी गोलंदाजी करत त्याने आपल्या पहिल्याच इंटरनॅशनल क्रिकेट सामन्यात शानदार तीन विकेट्स घेतल्या. टेम्बा बावूमाची विकेट नदीमच्या इंटरनॅशनल क्रिकेटमधली पहिली विकेट ठरली. टेम्बा बावूमा सिक्स मारण्यासाठी क्रीजबाहेर पडला. पण नदीमचा फ्लायटेड बॉल घाटासारखं वळण घेत थेट रिषभ पंतच्या हातात घुसला. बॉल गेलाय कुठे हे टेम्बा बावूमाला कळेपर्यंत रिषभ पंतने सगळे स्टम्प उडवून लावले.

या विकेटनंतर नदीमने सुटकेचा नि:श्वास टाकला. आपली निवड सार्थ होती हे पटवून देण्यात तो यशस्वी झाला. प्रथम श्रेणीमधे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नदीमला उशिरा का असेना, संधी मिळाली. याने त्याच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला. टीम इंडियात त्याची झालेली निवड ही प्रत्येकाला प्रेरणा देईल. त्यामुळे जेव्हा केव्हा सगळं काही संपलंय, असं वाटेल, तेव्हा एकदा शाहबाज नदीमची गोष्ट वाचायलाच हवी.

फर्स्ट क्लासमधे असा दिसला नदीमचा क्लास

१) रणजी सीजनमधे दोनवेळा ५० हून अधिक विकेट्स

असं करणारा आजवरचा फक्त दुसरा खेळाडू

२०१५-१६ मधे झारखंडकडून खेळतात ५१ विकेट.

२०१६-१७ मधे झारखंडकडून खेळतानाच ५६ विकेट.

२) शाहबाजच्या नावावर जागतिक विक्रमाचीही नोंद

विजय हजारे ट्रॉफीमधे राजस्थान विरुद्ध जागतिक विक्रमाची नोंद

फक्त १० धावा देत तब्बल ८ विकेट्स घेतल्यात

३) प्रथमश्रेणी क्रिकेटमधले अनेक रेकॉर्ड तोडलेत

प्रथमश्रेणी क्रिकेटमधे आतापर्यंत ११० सामने खेळले

२८.५९ च्या सरासरीने ४२४ विकेट्स घेतल्या

१०६ लिस्ट मॅचमधे १४५ विकेट्स घेतल्या

११७ टी-ट्वेन्टी सामन्यात ९८ विकेट्स, यात आपलीएलच्या ४२ विकेट्स

हेही वाचा: 

अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?

भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय?

२०१९ च्या इलेक्शनमधे मुंडे भावंडांचं भवितव्य १९ सेकंदांची क्लिप ठरणार?