पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैं भी चौकीदार हे कॅम्पेन गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याला माध्यमांनीही साथ दिली. तरीही ते २०१४सारख्या कॅम्पेनसारखं गाजलं नाही. त्याचं कारण कुठेतही चौकीदारीच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीत दडलेलं असू शकतं. चौकीदारीच्या इतिहासाचा वर्तमानाच्या संदर्भातला आढावा घेणं मजेदार आहे.
मैं भी चौकीदारचं कॅम्पेन सुरू करण्याच्या आधीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार हा शब्द कॉईन करत होते. त्याची सुरवात झाली प्रधानसेवक या शब्दापासून. लोकांनी मला प्रधानमंत्री समजण्यापेक्षा देशाचे प्रधानसेवक मानलं तर बरं, असं देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं कोटेशन तीन मूर्ती भवनातल्या म्युझियममधे कोरून ठेवलंय.
पण नरेंद्र मोदींनी हाच प्रधानसेवक शब्द उचलून बेलामूम वापरला. तसंच आपण मालक नसून चौकीदार आहोत, असंही ते भाषणांतून वारंवार म्हणत राहिले. ती खरं तर महात्मा गांधींच्या समाजाचा विश्वस्त बनण्याची संकल्पना होती. ती मोदींनी सोप्या शब्दांत मांडली.
पण या चौकीदारीची चर्चा झाली ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींमुळे. त्यांनी राफेल प्रकरणात चौकीदार चोर हैं असं म्हणत मोदींच्या प्रामाणिक इमेजलाच धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदींनी मैं भी चौकीदार ही कॅम्पेन मोठ्या उत्साहात चर्चेत आणलीय. त्याच्या राजकारणावर चर्चा होतेच आहे, पण हे राजकारण बाजुला ठेवूनही फक्त चौकीदारीची चहुबाजूंनी चर्चा होऊ शकते.
चौकीदार या शब्दाचं मूळ शोधत आपल्याला इराणपर्यंत जावं लागतं. तिथल्या पर्शियन म्हणजे फारसी भाषेतला हा शब्द आहे. शेकडो मराठी कविता उर्दूत नेणारे औरंगाबाद येथील ज्येष्ठ भाषातज्ञ अस्लम मिर्झा सांगतात, `फारसीमधे चौ म्हणजे चार. चार रस्ते म्हणजे राहें जिथे एकत्र येतात तो चौराहा. त्यालाच एक पर्याय शब्द म्हणजे चौक. अशा चौकात आजही ट्रॅफिक पोलिस उभा असतो.`
`पूर्वी ट्रॅफिक नसायची पण ये जा असायची अशा महत्त्वाच्या नाक्यांवर लक्ष ठेवावंच लागायचं. छोट्या मोठ्या व्यापारी शहरांमधे, व्यापारी मार्गांवर बंदोबस्तासाठी ओटे किंवा चबुतरे असायचे. तिलाच चौकी म्हणायचे. त्याची जबाबदारी असणारा तो चौकीदार. दार हादेखील फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ठेवणारा.`
अशा चौक्या फक्त इतिहासातच नाहीतर तर आजही असतात. मुख्य पोलिस ठाण्यापासून दूर लक्ष ठेवता येणार नाहीत अशा भागात छोट्या चौक्या असतात. तिथे तक्रार नोंदवण्याचंही काम होतं. विशेषतः इंग्रजांच्या काळात पोलिसदलाचा विकास होत असताना या चौक्या महत्त्वाच्या ठरल्या. प्रत्येक गावात पोलिस ठाणं नसतं. त्याऐवजी चौकी असतात. अशा चौक्यांसाठीच ओळखले जाणारे भाग देशातल्या सगळ्याच शहरांत आहेत. उदाहरणार्थ मुंबईतली काळाचौकी किंवा शैतानचौकी.
विशेषतः राज्यांच्या, जिल्ह्यांच्या आणि पोलिस ठाण्यांच्या हद्दींवर आजही चौक्या असतात. जकातीच्या नाक्यांवर, जंगलांच्या वेशींवर चौक्या असतात. ब्रिटिशांनी मिठावर कर लावला तेव्हा मिठासाठीच्या चौक्याही तयार करण्यात आल्या. मुंबईतल्या मालाड परिसरातला एक भाग मीठचौकी म्हणून आजही ओळखला जातो. टोलनाके हे आजच्या नव्या चौकीच आहे. फक्त टोलवाल्यांना चौकीदार म्हटलं जात नाही इतकंच.
चौकीदार या शब्दाचा चौकातून घराच्या दारापर्यंत झालेल्या प्रवासाविषयी अस्लम मिर्झा सांगतात, `पुढे श्रीमंतांचे मोठे वाडे किंवा हवेल्या बनू लागल्या. त्यांच्या दरवाजावर दरबान आले. दरबान या शब्दाचा अर्थ आहे, दरवाजावर उभा राहणारा. आजही हा शब्द उत्तर भारतात, विशेषतः बंगाल बिहारकडे प्रचलित आहे. दरबानही चौकी देण्याचं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवण्याचं काम करायचे. दरवाजातच त्याची चौकीही असायची. तो चौकीदार बनला. म्हणजे आजच्या शब्दांत सिक्युरिटी गार्ड.`
चौकीदार या अर्थाचा जुना संस्कृत शब्द म्हणजे द्वारपाल. महाभारतातही चौकीदार या अर्थाने हा शब्द आलाय. शिवाय एका प्रदेशाचं नाव म्हणून द्वारपाल हा वापरलाय. पांडवांमधल्या नकुलाने वायव्येच्या दिशेने दिग्विजयाची मोहीम चालवली. त्याच्या सभापर्वातल्या वर्णनात नकुलाने केवळ आपली सेना पाठवून द्वारपाल, रमठ आणि हारहूण हे प्रदेश जिंकल्याचा उल्लेख आहे. यातला द्वारपाल हा प्रदेश खैबर खिंडीजवळचा प्रदेश असावा, असा कयास अभ्यासकांनी मांडलाय. कारण खैबर खिंड हे भारतात येण्याचं प्रवेशद्वारच होतं.
चौकीदारांचा शोध घेत प्राचीन इतिहासात घुसायचं तर आपल्याल्या मोठमोठ्या मंदिरांमधल्या द्वारपालांच्या शिल्पांना शोधावं लागतं. आजही नव्या जुन्या सगळ्या देवळांत द्वारपालांच्या मूर्ती असतातच. मूर्ती नसल्या तर किमान चित्रं तरी काढलेली असतात. लग्न आलं की गावातल्या घरांच्या दारातही द्वारपालाची चित्रं आजही गावोगाव रंगवतात.
महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोशात द्वारपाल या विषयावरचं टिपण असं, `द्वारात उभं राहून त्या वास्तूचं रक्षण करणारे ते द्वारपाल होत. हे देवसदृश योनीतले आहेत. प्रत्येक मोठ्या देवस्थानात आणि काही लेण्यांतही मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही अंगी हे उभे दिसतात. चंड-प्रचंड, जय-विजय, हरभद्र-सुभद्र, चंड-महाचंड, पद्मपाणी-वज्रपाणी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या मूर्ती अशा असतात, उजवा पाय स्वस्तिकावर ताठ, डावा पाय कुंभित म्हणजे वाकलेला, हात कमेरच्या खालच्या भागी किंचित वाकून विसावलेले, काही ठिकाणी ते आपल्या हातांनी गोपुराला आधार देत असलेलेही दिसतात.`
पण या द्वारपालांनाच देव मानून पूजण्याचे प्रकारही आपल्या देशात घडलेत. गणपतीही मूळात द्वारपाल देवताच होती, असाही दावा देवताशास्त्रातल्या अनेक अभ्यासकांनी केलाय. गणपतीच्या कथेतही त्याचे दुवे सापडतात. शिवाय तळकोकण आणि गोव्यात अनेक राखणदार देव आहेत. ते आपल्या परिसराचं रक्षण करतात, अशी श्रद्धा स्थानिकांमधे आजही आहे.
अनेक शहरांच्या वेशीबाहेरही असे देव आहेत. त्यांना देव नाही, तर देवचार म्हटलं जातं. पण अनेकदा देवापेक्षाही अधिक मान त्यांना मिळतो. उत्तर भारतात माताजी की चौकी असा एक प्रकार प्रचलित आहे. पण ही चौकी तिथे चौरंग या अर्थाने येते. चौकीदारीशी त्याचा संबंध नाही.
चौकीदारीचं काम कोणत्या समाजांकडे असायचं, याचे इतिहासात सापडणारे उल्लेख महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राच्या गावाखेड्यांत प्राचीन काळापासून महार, मातंग, बेरड आणि रामोशी हे समाज गावाच्या राखणदारीचं काम करत असल्याची माहिती संजय सोनवणी यांनी दिली. यातलं चौकीदारीचं काम करण्याचा सर्वात जुना इतिहास महार समाजाचा आहे. संजय सोनवणी त्यांच्या `महार कोण होते` या पुस्तकात लिहितात, –
`भारतातल्या बहुतेक जातींची नावं ही व्यवसायाधारित आहेत. उदा. शिंपी, सोनार, न्हावी, कुंभार, इ. म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारित असला पाहिजे. महार हे मुख्यत: ग्रामरक्षक होते. चोऱ्यादरोडे आणि आक्रमणं परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती होती. महार हा शब्दच संस्कृत महारक्षक आणि प्राकृत – पालीतल्या महारक्ख या शब्दातून निर्माण झालाय.`
`रक्ख या शब्दाचा इंग्रजी आणि पाली शब्दकोशात रक्षण असाच दिलेला आहे. कालौघात महारक्ख या शब्दाचा क्ख गळून फक्त महार हा शब्द शिल्लक राहिला. असं असलं तरी महारकी (महारक्खी) करणं, असा शब्द आहेच. या समाजाचे कितीही अवमूल्यन केलं गेलं असलं तरी, त्यांच्या पूर्वापार रक्षणाच्या मूळ जबाबदाऱ्यांत कसलाही फरक स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत पडलेला दिसत नाही.`
मात्र इस्लामी संस्कृतीच्या प्रभावानंतर चौकीदारी करणारे अनेक नवे समाज पुढे आले. अस्लम मिर्झा त्याविषयी सांगतात, `पूर्वीच्या काळी चौकीदारीचं काम पठाणांकडे असायचं. ते धिप्पाड असायचे. ते हवेल्यांचे चौकीदार असायचेच पण दुकान, पेढ्या, कारखाने इथे ते प्रामुख्याने चौकीदारी करायचे. त्यांच्या धिप्पाड देहयष्टीचा फायदा व्हायचा. तसंच मध्ययुगात हबशी म्हणजे आफ्रिकनही चौकीदार असायचे. त्यांच्या बायका म्हणजे हबशणीही श्रीमंतांच्या जनानखान्यात रखवालदारी करायच्या.`
`पेशव्यांकडे शनिवारवाड्याच्या रक्षणासाठी अरबांची फौज होती. तसंच राघोबादादा आणि आनंदीबाईंच्या सांगण्यानुसार पेशवा नारायणरावाचा खून करणारे गारदी हेदेखील इतिहास गाजवलेले चौकीदार मानायला हवेत. गारदी हा शब्द गार्ड शब्दाचं भारतीयीकरण आहे. फ्रेंचांच्या तोफखान्यावर काम करणाऱ्या अफगाण सैनिकांना गारदी म्हणायचे. पानिपतात मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख असणाऱ्या इब्राहिमखान गारदी याचं नाव त्याच्या पराक्रमासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात आदराने घ्यायला हवं.`
मात्र मागच्या शंभर वर्षांत या सगळ्यांची जागा गुरख्यांनी घेतली. गुरखे हे शूर, धाडसी, चपळ आणि प्रामाणिक समजले जात. त्यामुळे देशभरातल्या प्रमख शहरांमधे चौकीदारीच्या कामात त्यांनी मोनोपॉली बनवली. मात्र त्याचबरोबर पूरभय्यांनीही या व्यवसायात आपला जम बसवला.
पूरभय्ये म्हणजे पूरबिये. उत्तर भारतातल्या उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि बिहारचा पश्चिम भाग या पट्ट्यातले लोक. पूरभय्ये या शब्दाचाच संक्षेप आपण आज भय्या म्हणुन सर्रास वापरतो. महाराष्ट्रातही किमान दीडशे वर्षं पूरभय्ये चौकीदारी करत आहेत. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातली एक घटना याला आधार आहे. १९१४ साली टिळक मंडालेतून परतले तेव्हा त्यांना मध्यरात्री पुण्याला आणून सोडलं. ते त्यांच्या राहत्या घरी म्हणजे गायकवाड वाड्यात आले तेव्हा दरवाजावरच्या पूरभय्या चौकीदाराने त्यांची हिंदीतून चौकशी केली.
याच पूरभय्यांनी म्हणजे उत्तरेतून आलेल्या भय्यांनी गेल्या दोनेक दशकात मुंबई परिसरातून नेपाळी गुरख्यांना हद्दपार केलंय. आजकाल गुरखे चौकीदारीचं काम करताना फारसे सापडत नाहीत. ते चायनीजच्या गाड्यांवर दिसतात. विशेषतः सिक्युरिटी गार्डच्या एजन्सी बनल्यानंतर हा बदल मोठ्या प्रमाणात झाला. राज्यातल्या इतर भागात शेती सोडलेले, जमिनी विकलेले शेतकरी सिक्युरिटी बनलेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तर भारतातून येणाऱ्या सिक्युरिटी गार्डमधे ब्राह्मणांचं प्रमाण मोठं आहे. जागतिकीकरणानंतर जमीनदारीमागचं अर्थकारण बिघडलं आणि मोठ्या संख्येने ब्राह्मण शहरांत येऊ लागले. एकतर त्यांच्याकडे इतर समाजांसारखं धंद्याचं कोणतंही कौशल्य नाही. तसंच त्यांना कष्टाची सवयही नाही. त्यामुळे ते मोठ्या संख्येने चौकीदार बनलेत. तसंच सिक्युरिटी एजन्सी बनवून मोठ्या संख्येने आपल्या भाऊबंदांनीही शहरांत आणत आहेत.
मात्र भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेलं ट्विट या वस्तुस्थितीशी फारकत सांगणारं आहे. नरेंद्र मोदींनी भाजपमधल्या सगळ्यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरच्या नावापुढे चौकीदार लावण्याचे आदेश दिले होते. मात्र स्वामी यांनी ते आदेश मानले नाहीत. २३ मार्चला एका दाक्षिणात्य चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, `मी चौकीदार बनू शकत नाही. कारण मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण चौकीदार असू शकत नाहीत. खरं तर मी आदेश देतो, ते चौकीदार अमलात आणतात. माझ्याकडून चौकीदार नेमण्याच्या अपेक्षा बाळगा. बनण्याच्या नाहीत.`
उत्तरेतले ब्राह्मण मुंबईत मोठ्या संख्येने चौकीदार बनत असताना सुब्रमण्यम स्वामी मात्र वेगळंच बोलत आहेत. कारण दक्षिणेत चौकीदारीचं काम हे प्रामुख्याने तथाकथित खालच्या जातीच्या लोकांचं मानलं जातं. त्यामुळे चौकीदारीचा इतिहास फक्त आजच्या वर्तमानकाळातही रखवाली करत असल्याचं दिसून येतंय.
(साभार साप्ताहिक चित्रलेखा)