तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
मागच्या महिन्यात मी मैत्रिणीला भेटायला तिच्या कम्प्युटर क्लासमधे गेले होते. त्यादिवशी तिथं खूप गर्दी होती. तीस-चाळीस बायका, दहा-वीस कॉलेजला जाणाऱ्या मुली आणि वीस - पंचवीस पुरुषही होते. ती गर्दी एमएससी आयटी या कम्प्युटर कोर्सच्या परीक्षेसाठी जमलेली होती. त्यातली स्त्रियांची संख्या बघून मला आनंद झाला. बरं यातल्या बऱ्याच जणी साध्या गृहिणी होत्या.
अनेकांना आपल्या कामाच्या ठिकाणी कम्प्युटर नीट हाताळता यावा म्हणून किंवा सरकारी नोकरीच्या ठिकाणी नियम म्हणून या कोर्सची गरज असते, पण यातलं काहीही कारण नसतानाही आपल्याला कम्प्युटर नीट हाताळता आला पाहिजे, प्रसंगी मुलांना शिकवता आलं पाहिजे असं वाटणाऱ्या बायकांची संख्याही नजरेत भरेल इतकी होती.
खरं तर कोणतंही नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी बायका उत्सुक असतात, पण बरेचदा त्यांना त्यासाठी प्रोत्साहन आणि पूरक वातावरण मिळत नाही, त्यामुळे त्या नवं तंत्रज्ञान समजून घेण्यात काहीशा मागे राहतात आणि मग त्यांच्या ‘अडाणी’ असण्यावर जोक्स बनवून ते व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केले जातात.
क्रिकेट, राजकारण, तंत्रज्ञान म्हणलं की, ‘हॅं..तुला काय कळणार त्यातलं?’ असा कुत्सित प्रश्न अनेक बाप, भाऊ, नवरे, मित्र आपल्या मुली, बहिणी, बायका, मैत्रिणींना अजूनही विचारतात, पण जमाना बदल गया है, बॉस!
हेही वाचा: लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?
माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीला बघायला काही दिवसांपुर्वी एक स्थळ आलं होतं. मुलाकडच्या लोकांनी विचारलं, हिला काय काय येतं? तसं मुलीचे वडील म्हणाले, 'आमच्या थोरलीचं लग्न झाल्यापासून आमचं सगळं हीच बघते. सगळं येतं. काय येत नाही ते विचारा. घरातल्या लाईट्स, टीवी दुरुस्त करण्यापासून सगळं करते आणि तिला हे इतकं आवडतं, की शेजाऱ्यांकडेही काही बिघडलं तर हिलाच बोलावतात, दुरुस्ती करायला.'
त्यावर त्या बघायला आलेल्या कुटूंबाचे चेहऱ्यांवरचे हावभाव असे काही झाले, की ‘आम्हाला एक गृहकृत्यदक्ष सून हवी आहे, इलेक्ट्रिशियन नको’, मैत्रीण सांगत होती. तर या अशा पुरुषी वातावरणाला छेद देत अनेक जणी नवंनवं तंत्रज्ञान आत्मसात करत आपला अवकाश विस्तारत आहेत.
माझ्या अनेक मैत्रिणींच्या आया ज्या आज पन्नाशी, साठीच्या पुढे गेल्यात, त्या फेसबुकवर आहेत, व्हॉट्सअप चांगलं हाताळतात, इतकंच काय नेटफ्लिक्स, अमेझॉनवर वेब सीरिजही बघतात, हे सगळं बघून त्यांनी नवीन तंत्रज्ञानाला किती आपलंसं केलं आहे, हे जाणवतं. एक मैत्रीण वृद्धांसाठी मोबाईल कसा, वापरावा याच्या कार्यशाळा घेते, तिच्या कार्यशाळेतल्या अगदी ८० - ८५ वर्षांच्या आज्याही आता परदेशातल्या आपल्या नातवंडांशी वीडियो कॉलवर बोलू लागल्या आहेत.
कोरोनाच्या काळात तर सगळं जग ठप्प झालेलं असताना, नातेवाईक, आपली माणसं विखुरलेली असताना वृद्ध महिला, एकल महिला, वेगवेगळ्या शहरांत अभ्यास-नोकरीसाठी एकट्या राहणाऱ्या तरुणींना या तंत्रज्ञानानंच हात दिला. केवळ संपर्क, संवाद एवढ्यापुरताच या तंत्रज्ञानाचा वापर होत नाही, तर आपल्या दैनंदिन जगण्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न यातून केला जातो.
मासिक पाळीत पॅडऐवजी मेनस्ट्रुअल कप कसा वापरता येईल ते पाहण्यापासून स्वत:च्या घटस्फोटाच्या सुनावणीला वीडियो कॉन्फरन्सिगद्वारे हजर राहण्यापासून, झूम एपद्वारे काहीही शिकवणं वा शिकणं, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची जाहिरात करणं, यु ट्यूब चॅनल चालवणं, ब्लॉगिंग करणं, ट्रॅव्हलॉग्ज, ऑनलाईन समुपदेशन करणं अशा असंख्य बाबी तंत्रज्ञानाचा वापर करून आजच्या स्त्रिया यशस्वीपणे करताना दिसतायत.
‘आपली आजी’, ‘गावाकडच्या रेसिपी’ या यु ट्यूब चॅनल चालवणाऱ्या अगदी साध्या महिलांनाही आज लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. मोठा स्टुडिओ, मेकअप, चकचकीत वातावरण, साधनं त्यांच्याकडे नसूनही त्यांचे वीडियो हिट ठरत आहेत, ते त्यांच्या आशयातल्या साध्या मांडणीमुळे आणि हे माध्यम कसं वापरायचं याचं गमक त्यांना नेमकेपणानं कळल्यामुळे.
हेही वाचा: महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?
एका मोठ्या न्यूज चॅनेलला अँकर म्हणून काम केलेल्या पत्रकार हर्षदा स्वकुळनेही अलीकडेच तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु केलेलं असून त्याद्वारे ती उत्तम माहिती, विश्लेषण देत असते, अल्पावधीतच तिचंही चॅनेल लोकप्रिय झालं.
ग्रामीण भागातल्या कमी शिकलेल्या किंवा अगदी अशिक्षित महिलांनाही असं काम करता यावं, यासाठी ‘वीडियो वॉलिंटिअर्स’ ही संस्था काम करते. ग्रामीण भागातल्या दलित, आदिवासी, मुस्लीम आणि अतिशय गरीब महिलांना कॅमेरा, मोबाईल, लॅपटॉप, रेकॉर्डर अशी साधनं आणि प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या भागातल्या समस्यांचं रिपोर्टिंग करण्यासाठी तयार केलं जातं.
या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाचा त ही माहीत नसलेल्या अनेक महिला आज भारतातल्या कानाकोपऱ्यांतल्या गावखेड्यातल्या समस्या लोकांसमोर मांडत आहेत. ‘खबर लहेरिया’ या माध्यमसंस्थेनं तर मोठाच आदर्श घालून दिलाय. खबर लहेरियामधेही अशा प्रकारे शोषित, वंचित गटातून आलेल्या आणि पत्रकारितेचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या महिलांना साधनं, तंत्रज्ञान आणि आशय या तिन्ही पातळ्यांवर प्रशिक्षण तसंच काम करण्याची संधी दिली जाते.
एकंदरीतच नोकरी - व्यवसाय असो की छंद जोपासणं, काही कलाकृती निर्माण करणं, अगदी ‘मी टू’ सारख्या आपल्यावरील लैंगिक अत्याचारांना वाचा फोडण्याची चळवळ असो, स्त्रियांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आपलं आयुष्य सोपं करण्याचा, ते अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तंत्रज्ञानाने किती जणींचं आयुष्य सुखकर झालं, हा ही एक महत्वाचा प्रश्न आहे.
आपण ज्या पुरुषप्रधान व्यवस्थेत आहोत, त्याचं प्रतिबिंब स्त्रियांच्या तंत्रज्ञान वापरातही उमटतं. समाजमाध्यमांपासून विविध तंत्रज्ञानांचा वापर करण्याची स्त्रियांची संख्या जसजशी वाढत गेली, तसंतसं याबाबतीतले गुन्हेही वाढू लागले. स्त्रियांविरूद्ध केले जाणारे सायबर गुन्हे वाढले.
आपल्या मतांशी एखादी स्त्री सहमत नसेल तर तिला ट्रोल करणं, तिचं चारित्र्यहनन करणं तर आता नेहमीचंच झालं आहे पण त्याहीपुढे प्रेमात एखाद्या स्त्रीनं नकार दिला, तर तिचा फोन नंबर सार्वजनिक करणं, तिचे फोटो हवे तसे एडीट करून पसरवणं, अगदी खासगी क्षणांचे फोटो, वीडियो सार्वजनिक करणं, तसंच सोशल मीडियावर किंवा अगदी मॅट्रिमोनियल साईट्सवरच्या फोटोंचाही गैरवापर, आर्थिक फसवणूक असे गुन्हे दररोज केले जातात.
या सगळ्या गुन्ह्यांची दरवर्षी किती प्रमाणात नोंद होते, याची आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वेबसाईटवर ‘महिलांविरुद्ध केले केलेले सायबर गुन्हे’ या विभागात मिळते, मात्र त्यातही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे किती, आर्थिक फसवणुकीचे किती, महिलांच्या प्रायवसीचा भंग करणारे गुन्हे किती? अशी वर्गवारीनुसार नोंद मात्र नाही. अश्या गुन्ह्यांची नोंद होत नाही, तोपर्यंत या सगळ्यावर उपाययोजना म्हणून काय धोरणं आखावीत, यासाठी डेटाच उपलब्ध होत नाही, हा एक धोरणदृष्ट्या मोठाच अडसर आहे.
हेही वाचा: बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?
दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो, सर्वच महिलांना तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे का? हा. राज्यातल्या, देशातल्या ग्रामीण भागातल्या, दुर्गम भागातल्या लाखो महिलांकडे साधा मोबाईलसुद्धा उपलब्ध नाही, कम्प्युटरआणि इतर साधनं तर दूरची गोष्ट. बऱ्याच जणींकडे मोबाईल असलेच तर रेंजच नसते, एखादा फोन करायचा झाला तरी दूर कुठेतरी टेकडीवर जावं लागतं.
अशा स्थितीत या महिला तर संपर्क, संवाद, माहिती, शिक्षण यापासून दूरच राहतात. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरजवळच्या आदिवासीबहुल भागातील अनेक गरीब आदिवासी मुलींना साधा एमएससी आयटी
कोर्स करणंही परवडत नसल्यानं, अनिल साबळे सामाजिक कार्यकर्त्या कवीनं त्यांच्यासाठी आर्थिक मदत उभारून त्यांना या कोर्सचं शिक्षण देण्याचा विडाच उचलला आहे.
या मुलींच्या शिक्षणावरच्या रिपोर्टिंगसाठी मी या भागात फिरले होते, तेव्हा त्यांच्याशी संवाद करताना हे लक्षात आलं की, कॉम्प्यूटर शिकण, तो पाहणं, दररोज हाताळायला मिळणं, घरात कॉम्प्यूटर, लॅपटॉप असणं हे या मुलींना केवढं मोठं स्वप्नं वाटतं. सर्वसामान्य स्त्रियांसाठी हे अगदी सहज उपलब्ध असलं तरी या मुलींसाठी मात्र कॉम्प्यूटर शिकायला मिळणं ही ‘लक्झरी’ आहे.
तंत्रज्ञानाच्या अशा असमान उपलब्धतेमुळे वंचित घटकातल्या लोकांच्या, स्त्रियांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास अलीकडे ‘डिजीटल डिवाईड’ या संकल्पनेखाली केला जातो.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालं आहे, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. कसं ते समजून घेण्यासाठी मिया खलिफा या पॉर्न स्टारचं उदाहरण बोलकं आहे. मिया खलिफा अमेरिकेतील एक पॉर्नस्टार होती, नंतर तिने ते काम सोडून दिलं आणि स्पोर्ट्स कमेंटेटर म्हणून काम करू लागली. पण आजही लोक तिच्याकडे पॉर्न स्टार म्हणून बघतात. का?
ज्या पॉर्न वेबसाईटशी तिनं करार केले होते, त्यांनी तिचे वीडियो त्या वेबसाईटवरून काढून टाकण्यासाठी नकार दिला. इतकंच नाही, तर युट्यूबवर अजूनही तिचे एक दोन पॉर्न वीडियो आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं होतं, की तिला तिचा भूतकाळ विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आहे, पण लोक आणि ज्या माध्यमांवर तिचे विडिओ उपलब्ध आहेत, ते तिला तिचा भूतकाळ विसरूच देत नाहीत.
युटयूब किंवा पॉर्न वेबसाईट्सच्या माध्यमांतून तिचे वीडियो जगभर पसरले नसते तर तिला नवीन आयुष्य सुरू करणं तुलनेनं सोपं गेलं असतं. याचाच अर्थ आजच्या काळातल्या तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेली ही माध्यमं एखाद्या व्यक्तीची आणि विशेषत: स्त्रियांची जी प्रतिमा बनवतात, ती नंतर बदलणं किंवा पुसून टाकणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. आज जरी गुगलवर मिया खलिफा सर्च केल्यावर तिच्या नावापुढे स्पोर्ट्स कमेंटेटर अशी तिची ओळख तिथे येत असली तरी विडिओ तंत्रज्ञानानं लोकांच्या मनावर तिची जी इमेज ठसवली आहे, ती पूर्णपणे पुसली जाणं जवळपास अशक्य आहे.
यात बाजारु पुरुषप्रधान व्यवस्थेचा नि तशी मानसिकता बनलेल्या समाजाचाही सहभागही तेवढाच आहे. हीच मानसिकता मग कधी हातात असलेल्या व्हॉट्सअपचा वापर करून फक्त मेसेज पाठवून बाईला तलाकही देते आणि लाईव लोकेशन, वीडियो कॉल या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाल मरतानाचा वीडियोही पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
हेही वाचा: चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
तंत्रज्ञानाच्या आधारे स्त्रिया आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू लागल्या, जगभर फिरू लागल्या तरी हेच तंत्रज्ञान त्यांनाच ग्राहक - बाजारपेठ म्हणूनही वापरतं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतरही माध्यमं वापरणाऱ्या सर्वच वापरकर्त्यांचा डेटा या सेवा पुरवणाऱ्या कंपन्या गोळा करत असतात आणि विविध उत्पादन कंपन्यांना देतात.
‘२०५० ला तुम्ही कसे दिसाल?’ असं एखादं पॉप अप फेसबुकवर दिसलं की, अनेकांना त्यावर क्लिक करून ते करून पाहण्याचा मोह होतो, जेव्हा त्यावर क्लिक करून त्याचा रिझल्ट तुम्ही मिळवता, तोपर्यंत तुमचा डेटा अनेक उत्पादक कंपन्यांपर्यंत पोचलेला असतो. सौंदर्यप्रसाधनं, कपडे, बूट इतर स्टायशिल वस्तू, काळ्या त्वचेला गोरं करणाऱ्या क्रिम्सपासून ते वाढलेलं पोट लपवण्याचे पट्टे आणि स्तनांचा आकार मोठं करणारी तेलं आणि बाईला उपभोग्य वस्तू समजून तयार केलेली जाणारी अशी अनेक उत्पादनं तुम्हालाच विकली जातात.
कळत - नकळत या जाळ्यात बरेच जण अडकतात, विशेषत: स्त्रिया. आणि मग कृत्रिम बुद्धिमत्ता तुमचं सगळं वर्तन अगदी भावनाही हळूहळू नियंत्रित करू लागते. स्त्रियांचा खासगी अवकाश तर संपतोच पण त्याचबरोबर त्यांच्या डेटाचा, फोटोंचा कसा वापर- गैरवापर केला जाईल, हे कुणीही सांगू शकत नाही नि त्यावर नियंत्रण ठेवणंही गुंतागुंतीचं होऊन जातं.
हे असं सगळं का घडतं? तर तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन आणि धोरणनिर्मिती यात लिंगभावाच्या अंगाने विचार करणाऱ्या स्त्री-पुरुषांचा असलेला अभाव. म्हणजे आपल्याकडे विज्ञान, गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या, पुढे जाऊन विज्ञान-तंत्रज्ञान शिकणाऱ्या स्त्रिया खूप आहेत.
शिकल्यानंतर त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष वापर करत संशोधन करणं, धोरण बनवणं किंवा अगदी हे विषय शिकवणं - यातल्या स्त्रियांचा सहभाग आहे जवळपास २१ टक्के. म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानात उच्चशिक्षण घेतलेल्या शंभरपैकी २१ महिलाच पुढे एकतर शिक्षणक्षेत्रात जातात, किंवा संशोधन, नोकरी करतात.
पत्रकार रितीका चोप्रा यांनी याबद्दल केलेल्या रिसर्च पेपरवर आधारित ही आकडेवारी आहे. तेव्हा या क्षेत्रांत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांची संख्या इतकी कमी असेल, तर महिलांच्या दृष्टीकोनाने तंत्रज्ञान विकसित होणार तरी कसं? या प्रश्नावर विचार केला तरी या लेखाचं इप्सित साध्य होईल.
हेही वाचा:
#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?
चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?
(प्रियांका तुपे यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय )