योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं

२१ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरं करायला एक विशेष महत्व आहे. यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्ही कारणं आहेत. तसंच दैनंदिन जीवनात योगासनांना मोठं महत्त्व आहे.पण त्यातल्या काही बेसिक गोष्टीही समजून घ्यायला हव्यात.

दरवर्षी आपण २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करतो. या दिवशी अनेकजण योगाचे फायदे आणि आपले फोटो शेअर करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अगदी छोट्यातल्या छोट्या नेत्या, अभिनेत्यापर्यंत प्रत्येकजण आपापले विडिओ, फोटो जिकडे तिकडे अपलोड करतात. योगामुळे कसा आपल्या आयुष्यात फरक पडलाय किंवा पडतोय हे दाखवण्याचा अट्टाहास सगळीकडे चाललेला असतो. सोबत आपलं शरीर योगामुळे कसं फिट बनलंय हे सांगण्याची नुसती स्पर्धा चाललेली असते.

यंदाची योगा दिवसाची थीम आहे क्लायमेट एक्शन. संयुक्त राष्ट्राने ही थीम जाहीर केलीय. तसंच भारत सरकारनेही योगा फॉर हर्ट अर्थात ह्रदयासाठी योगा ही थीम जाहीर केलीय. २१ जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं आपल्याला या काही बेसिक गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

योग दिवस कधी साजरा होतो?

जगभरात २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिवसाला मान्यता दिली. आणि जगाला हेल्दी राहण्याचा मंत्र दिला.

जगभरातले असंख्य लोकं फिट राहण्यासाठी योगा करतात. पण आंतरराष्ट्रीय योग दिवस भारताने जगाला दिला. २७ सप्टेंबर २०१४ मधे मोदींनी संयुक्त राष्ट्र सभेत योग दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. तसा प्रस्ताव आल्यानंतर तीन महिन्यांत याला मान्यता देण्यात आली. संयुक्त राष्ट्राने ११ डिसेंबरला २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

हेही वाचाः भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी

२१ जूनची निवड का केली?

आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी ही कारणं आहेत. पारंपरिक कारण थेट अध्यात्म किंवा संस्कृतीशी जोडलं गेलंय. खगोलशास्त्रानुसार, सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्याची स्थिती बदलते म्हणजेच उत्तरायण संपत. आणि दक्षिणायन सुरु होतं. हा खरंतर अपेक्षित असा नैसर्गिक बदल आहे.

सूर्याचं दक्षिणायन सुरु होतं तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. अशा वेळेस वातावरणातही बदल होतो. याच काळात अनेक प्रकारच्या रोगांचं प्रमाण वाढत असतं. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

योगासन केल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती येते असा समज आहे. आणि मन आणि बुद्धीच्या स्वास्थ्यासाठीही त्याचा उपयोग होतो. याचसाठी वातावरणातल्या बदलाचा पहिला दिवस म्हणुन आंतरराष्ट्रीय योगा दिवस २१ जूनला साजरा करण्याचं निश्चित झालं.

हेही वाचाः हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

भारत आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस

२०१५ मधे पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदींसोबतच ३५ हजाराहून अधिक लोकांनी आणि ८४ देशांच्या प्रतिनिधिंनी दिल्लीच्या राजपथावर २१ आसनं केली होती. या कार्यक्रमाने गिनिजमधे आपले रेकॉर्ड केले. पहिलं रेकॉर्ड होतं ३५,९८५ लोकांना घेऊन योगा करण्याचं आणि दुसरं होतं ८४ देशांना यात जोडण्याचं.

योग दिवसाची उद्दिष्टं:

  • योगासनांच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचं लक्ष वेधून घेणं आणि दुर्धर आजारांचं प्रमाण कमी करणं.
  • आपल्या बिझी शेड्यूलमधून स्वतःच्या आरोग्यासाठी एक दिवस काढून लोकांना एकमेकांच्या जवळ आणणं.
  • लोकांमधे वैश्विक बंधुभाव निर्माण करणं.
  • योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करणं. 
  • संपूर्ण जगामधे विकास आणि शांती यांचा प्रसार करणं.

हेही वाचाः 

आज रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवण्याआधी हे वाचा

वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

अधीर रंजन चौधरीः माजी नक्षलवादी ते काँग्रेसचा संसदीय दलाचा नेता