द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्सः स्वप्नांमधून जगण्याचा अर्थ लावायला शिकवणारं पुस्तक

०६ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


माणसाच्या जन्माएवढाच स्वप्नांचा इतिहास आहे. मानवी मनाशी निगडित असलेल्या स्वप्नांचा उलगडा करणं अजून सुरूच आहे. या सगळ्या संशोधनाच्या केंद्रस्थानी सिग्मंड फ्रॉइड यांचं द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे पुस्तक आहे. आज ६ मे हा फ्रॉइडचा जन्मदिवस. यानिमित्ताने स्वप्नांचा अर्थ लावायला शिकवणाऱ्या या पुस्तकाचा हा परिचय.

जगभरातल्या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांच्या महत्त्वांच्या पुस्तकांचा सांगोपांग परिचय करून देणारं पुस्तक अंजली जोशी यांना लिहिलंय. मुंबईच्या शब्द प्रकाशनाने ‘लक्षणीय’ नावाने हे पुस्तक काढलंय. या पुस्तकात मनोविश्लेषण थिअरीचा जनक सिग्मंड फ्रॉइडच्या द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स या पुस्तकाचा परिचय करून देण्यात आलाय. या परिचयाचा हा संपादित अंश.

आपल्याला स्वप्नं का पडतात? त्यांना काही अर्थ असतो का? आपली कुठली गुपितं स्वप्नांतून दिसतात? असे अनेक प्रश्‍न माणसाला शतकानुशतके पडताहेत. या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला सिग्मंड फ्रॉइड यांच्या द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स पुस्तकात मिळतात. एवढंच नाही तर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी स्वप्नोपचारांचा कसा उपयोग होऊ शकतो, याचीही माहिती मिळते.

मनोविकृतीचा अभ्यास करताना फ्रॉइडने स्वप्नांचं सखोल विश्‍लेषण केलं. त्यातून त्याने काही सिद्धांतांची निर्मिती केली. या सिद्धांतांची माहिती देणारं हे पुस्तक म्हणजे स्वप्नांवरची मार्गदर्शिका आहे. हे पुस्तक स्वप्नांबद्दलचं औत्सुक्य तर जागं करतंच, पण वाचकांना स्वत:ला पडत असणार्‍या स्वप्नांचं विश्‍लेषण करायलाही उद्युक्त करतं.

हेही वाचाः कितीही टाळा फ्रॉइडने सांगितलेला सेक्स आडवा येणारच!

पुस्तकातल्या उल्लेखनीय गोष्टी

  • सद्गुणी मनुष्य ज्या इच्छा केवळ स्वप्नांद्वारे पूर्ण करतो, त्या दुर्गुणी मनुष्य प्रत्यक्षात करतो.
  • स्वप्नं म्हणजे अबोधाकडे जाणारा राजमार्ग होय.
  • स्वप्नं कुठल्या स्मृतीवर आधारित असतील हे अबोध मन म्हणजे अनकॉन्सियस माईंड ठरवतं आणि त्याचं कार्य बोध मनापेक्षा फार वेगळं असतं.
  • बोध मनाला ज्या घटना महत्त्वाच्या वाटतात त्यांच्यापेक्षा बोध मनाने दुर्लक्ष केलेल्या किंवा अतिशय क्षुल्लक अशा घटनांविषयी स्वप्न पडते.
  • स्वप्नांत कुठल्याही घटना, व्यक्ती, जाणिवा कितीही असंबद्ध आणि अतार्किकतेने पाहिल्या जात असल्या तरी अबोध मनाची करामत अशी की, त्या आपणांस तेव्हा सुसंगत वाटत असतात.
  • स्वप्नांना अर्थाचे अनेक स्तर असू शकतात आणि एका स्वप्नदृश्यात अनेक संकल्पना एकवटलेल्या असतात.

कोण आहे हा फ्रॉइड?

ऑस्ट्रियातल्या विएन्ना युनिवर्सिटीतमधे मनोवैद्य शाखेत एमडी केलेले सिग्मंड फ्रॉइड हे ‘विसाव्या शतकातले सर्वांत प्रभावशाली मानसशास्त्रज्ञ’ म्हणून मानसशास्त्राच्या इतिहासात अजरामर आहेत. ते ऑस्ट्रियातले नावाजलेले मेंदूविकारतज्ज्ञ आणि मनोवैद्यकीयतज्ज्ञ होते. त्यांनी मनोविश्‍लेषण अर्थात सायकोएनालिसीस हे मानसोपचारशास्त्र विकसित करून मानसशास्त्रात एक नवीन प्रवाह निर्माण केला. 

फ्रॉईड यांचं योगदान इतकं महत्त्वाचं आहे की वृत्तपत्रांनी आणि मासिकांनी प्रभावी मानसशास्त्रज्ञांवर केलेल्या हजारो पाहण्यांत फ्रॉईड यांचं नाव कायम अग्रक्रमांकासाठी निवडलं जातं. त्यांच्या सिद्धांतांवर देशविदेशांतील विचारवंतांमधे इतकं विचारमंथन झालं की, त्यातून मनोविश्‍लेषणाची व्यापक चळवळ उभी राहिली.

अर्थात फ्रॉईड यांच्या सिद्धांतास तज्ज्ञांनी जितकं उचलून धरलं तेवढाच हा सिद्धांत वादग्रस्तही ठरला. ते एक सिद्धहस्त लेखक होते. त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची, लेखांची आणि निबंधांची एकूण संख्या ३२० एवढी आहे.

हेही वाचाः फ्रेंच सरकारने लुई ब्रेल यांचा मृतदेह कबरीतून बाहेर का काढला?

सहा वर्षांत विकल्या निव्वळ ३५१ प्रती

या पुस्तकाची गणना मानसशास्त्रातल्या अभिजात आणि महत्त्वपूर्ण पुस्तकांत केली जाते. मात्र या पुस्तकाची सुरवातीची वाटचाल सुखकर नव्हती. फ्रॉईड यांच्या वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत ते प्रकाशित होऊ शकलं नव्हतं. पहिल्यांदा १८९९ मधे ते प्रकाशित झालं, तेव्हा त्याची गणना ‘अपयशी पुस्तक’ अशी झाली. ६ वर्षांत केवळ ३५१ प्रती विकल्या गेल्या. संशोधकांकडून दुर्लक्षिलं गेलं.

दहा वर्षांनी दुसरी आवृत्ती आली. इंग्रजी आवृत्ती निघायला १४ वर्ष लागली. या पुस्तकाचं फ्रॉईड यांनी किमान ८ वेळा पुनर्लेखन केलं. स्वतःलाच पुस्तकाचं महत्त्व माहीत असल्यामुळे ते लिहून पूर्ण झाल्यानंतर फ्रॉईड यांनी ‘ज्या अंतर्दृष्टींवर हे पुस्तक आधारलेलंय ती जीवनात फक्त एकदाच मिळत असते,’ असे उद्गार काढले होते. मूळ पुस्तक दीर्घ आणि गुंतागुंतीचं असल्यामुळे फ्रॉईड यांनी ‘ऑन ड्रीम्स’ या नावाची पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती काढली.

१८९५च्या उन्हाळ्यात ऑस्ट्रियातील ग्रीनझिंगमधे फ्रॉइडचं वास्तव्य होतं. या पुस्तकाचं बीज या सुमारास त्याच्या मनात रुजण्यास सुरवात झाली. आपला मित्र विल्हेम फ्लिस याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, ‘पुढे कधी तरी या घरात एक स्मृतिस्तंभ कोरला जाईल की सिग्मंड फ्रॉईड यांना स्वप्नांचं गुपित ज्या घरात उलगडलं ते हेच घर होय.’ पुढे हे घर उद्ध्वस्त झाले. पण ‘ऑस्ट्रियन सिग्मंड फ्रॉइड सोसायटी’ने त्याच ओळी कोरलेला एक स्मृतिफलक या प्रसंगाचं जतन करण्यासाठी तिथे उभारलाय.

स्वप्नांना दिला मानवी अर्थ

लेखकाला लागलेल्या स्वप्नांच्या या आगळ्यावेगळ्या शोधास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. त्या काळात स्वप्नांचा विषय हा एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या संशोधनाचा विषय ठरणे ही नावीन्यपूर्ण घटना होती. कारण तोपर्यंत स्वप्नांचा आणि अंधश्रद्धांचा दाट संबंध जोडला होता. क्वचित काही वेळा स्वप्नांची आध्यात्मिक आणि दिव्य पातळीवरून मीमांसा केली जात.

या दोन्ही अर्थांच्या पलीकडे जाऊन स्वप्नांचा मानवी अर्थ शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. स्वप्नप्रक्रिया कशी असते, स्वप्नांचं मानसशास्त्र काय, स्वप्नांची मीमांसा कशी करावी, त्यासाठी काय पूर्वतयारी करावी याबाबत उदाहरणासह माहिती दिली. तसंच स्वप्नांचा अर्थ सांगताना स्वतःच्या वैयक्तिक जीवनावरही प्रकाश टाकला.

मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करताना फ्रॉइडला जाणलं की दाबून ठेवलेल्या लैंगिक आणि आक्रमक इच्छा या मानसिक आजारांचं खरं कारण असतात. रुग्णांच्या स्वप्नांचं विश्‍लेषण केलं तर त्यांच्या मानसिक घडामोडींबद्दल बराच ऐवज मिळू शकेल आणि दमित इच्छा हुडकून काढता येतील. म्हणून उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या स्वप्नांचं विश्‍लेषण करावयास सुरवात केली. आणि स्वत:च्या मानसोपचारांत त्याने स्वप्नमीमांसा तंत्र अर्थात ड्रीम एनालिसिसचा समावेश केला.

हेही वाचाः जरी आंधळे आम्ही, तुला पाहतो रे

स्वप्नांचं एनालिसिस कसं करावं?

स्वप्नांची निर्मिती अबोध मनातील अतृप्त इच्छांची तृप्ती करण्यासाठी होते, असा सिद्धांत त्याने मांडला. या सिद्धांतास इच्छापूर्तीचा सिद्धांत असं म्हटलं जातं. आपल्या पूर्ण न झालेल्या इच्छांचं प्रगटीकरण स्वप्नांद्वारे होतं याचं स्पष्टीकरण देताना फ्रॉइड म्हणतो की, अबोध मनातल्या अनेक इच्छा या लैंगिकतेशी आणि आक्रमकतेशी निगडित असतात. त्या सामाजिक संकेतांना झुगारणार्‍या नसल्यामुळे बोध मनात त्यांना प्रवेश निषिद्ध असतो. बोध मनाची सेन्सॉरशिप इतकी भक्कम असते की, त्या जागेपणी आणि जशाच्या तशा प्रगट होऊ शकत नाहीत.

झोपेत बोध मनाचं नियंत्रण ढिलं पडतं तेव्हा त्या स्वप्नांद्वारे प्रगट होतात. त्या मूळ स्वरूपात प्रगट होणं बोध मनाला मानवणारं नसतं. म्हणून त्या वेश बदलून स्वप्नांद्वारे स्वत:चं अस्तित्व दाखवून देतात. यास फ्रॉइड ‘स्वप्नांचं विपर्यस्तीकरण’ अर्थात ड्रीम डिस्टॉर्शन म्हणतो.

तो म्हणतो की आपण स्वप्नांत जे बघतो, ते खर्‍या इच्छांचं विपर्यस्त स्वरूप असतं. त्यांचा खरा अर्थ छुपा असतो आणि तो शोधून काढावा लागतो. उदाहरणार्थ, स्वप्नात खोका किंवा गुहेसारखी एखादी पोकळ वस्तू दिसत असेल तर ती गर्भाशयाचे प्रतीक असते किंवा एखादी लोंबणारी वस्तू दिसत असेल तर ती पुरुष जननेंद्रियाचं प्रतीक असते. वरवर सालस, निष्कपट वाटलेली स्वप्ने ही खरे तर शेळीचा वेश पांघरून आलेल्या लांडग्याप्रमाणे असतात, असं फ्रॉइड म्हणतो.

संशोधकांचं एकमत होईना, तरीही

फ्रॉइड स्वत:ला पडलेल्या स्वप्नांची उदाहरणं देतो. एकदा लहान असताना त्याने बाथरुममधे न जाता पलंगावरच लघवी केली. त्यामुळे त्याचे वडील उद्वेगाने ‘याच्या हातून काहीच धड होणार नाही!’ असं म्हणाले. एका स्वप्नात आपले वडील आपल्यासमोर लघवी करताहेत, असं त्याला दिसलं. त्याचा अर्थ असा होता की त्याला वडिलांना सांगायचं होतं की बघा, मीही काहीतरी करून दाखवलं. म्हणजेच अनुचित जागी लघवी केल्याबद्दलची अपराधी भावना वडिलांबद्दलच्या स्पर्धात्मक भावनेत रूपांतरित झाली होती.

स्वप्नांना काही निश्‍चित अर्थ असतो, हे संशोधकांनी आजतागायत एकमताने मान्य केलं नाही. त्यामुळे लेखकाने मांडलेली मते ही व्यक्तिनिष्ठ पातळीवर राहतात. त्यांना शास्त्रीय बैठक देता येत नाही.

शेवटच्या परिच्छेदात एक उत्कृष्ट कोटी करून तो पुस्तक संपवतो. तो म्हणतो, ‘स्वप्नं भविष्याचे सूचन करतात हे मिथक आहे. खरं तर असं म्हणायला हवं की, स्वप्नं आपला भूतकाळ उलगडत असतात.’

The Interpretation of Dreams By Sigmund Freud  
Originally published in German, १८९९
In English, Macmillan, १९१३

हेही वाचाः 

काँग्रेसच्या हातातून संधी निसटून जातेय का?

आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

१५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

मोनालिसा चित्राचा पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची

चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

(साभार शब्द पब्लिकेशन. पुस्तकासाठी संपर्क- येशू पाटील ९८२०१४७२८४)