म्हणून तर मी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहिलाः बाबासाहेब आंबेडकर

०७ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं शेवटचं पुस्तक. बाबासाहेबांनी यात बुद्ध आणि त्यांचं नवयान मांडलं. या क्रांतिकारक पुस्तकामुळे जगाला बुद्ध नव्याने कळले. त्याची प्रस्तावना अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे. आपण बुद्धापर्यंत कसं पोचलो आणि जगाला बुद्ध धम्म का गरजेचा आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलंय. आज तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त आपण ती वाचायलाच हवी.

मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मी इतकं उच्च शिक्षण कसं काय घेतलं? दुसरा प्रश्न विचारला जातो माझा कल बुद्ध धम्माकडे कसा काय झुकला? हे प्रश्न मला विचारले जातात, त्याचं कारण मी ज्या समाजात जन्मलो तो समाज भारतात ‘अस्पृश्य’ मानला जातो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची ही जागा नाही. पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रस्तावनेत देणं उपयोगी ठरू शकेल.

हेही वाचा: ‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच

रामायण, महाभारतातल्या गोष्टी वाचल्या जायच्या

या प्रश्नाचं थेट उत्तर असं की, बुद्धाचा धम्म हा श्रेष्ठ आहे. अन्य कुणाही धर्माशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही. विज्ञाननिष्ठ आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल, तर स्वीकारार्ह असा एकच धर्म म्हणजे बुद्धांचा धर्म. हा जो विश्वास मी व्यक्त करतो आहे, ते मत गेल्या पस्तीस वर्षांत सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास केल्याने दृढ झालं आहे. मी बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे कसा वळलो याची वेगळी कथा आहे. ती जाणून घेणं वाचकांना आवडेल असं वाटतं. 

माझे वडील सैन्यात अधिकारी होते, त्याचबरोबर ते एक धार्मिक गृहस्थही होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवलं. लहानपणापासून मला वडिलांच्या धार्मिक जीवनात काही अंतर्विरोध जाणवायचे. माझ्या वडिलांचे वडील रामानंदी असले तरी वडील कबीरपंथी होते. त्यांचा विश्वास मूर्तिपूजेवर नसला, तरी ते आमच्यासाठी गणपतीची पूजा करायचे. हे मला आवडायचं  नाही. पंथाच्या पुस्तकांचं त्यांचं वाचन होतं. असं असलं तरीही मी आणि माझे मोठे बंधू यांनी आमच्या बहिणी, जमलेल्या अन्य मंडळींना रामायण आणि महाभारतातला काही भाग दररोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी वाचून दाखवला पाहिजे, यासाठी वडील भाग पाडायचे. पुढची अनेक वर्ष हे सुरू राहिलं.

बुद्धाच्या जीवनावरचं पुस्तक भेट

इंग्रजी चौथीची परीक्षा मी पास झालो, त्या वर्षी माझ्या समाजातल्या लोकांनी माझं अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा आयोजित करावी असं त्यांना वाटतं होतं. इतर समाजातली शैक्षणिक स्थिती लक्षात घेता हा काही साजरा करावा असा प्रसंग नव्हता. पण इथपर्यंत पोचलेला आमच्या समाजातला मी पहिलाच मुलगा आहे, असं या सभेच्या आयोजकांना वाटत होतं. त्यांना मी मोठी उंची गाठली आहे असं वाटलं.

ते परवानगी घ्यायला वडिलांकडे गेले. असलं काही केल्यानं मुलं बिघडतात असं सांगून त्यांनी  परवानगी नाकारली. फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काय केलं त्याने? असं म्हणाल्याने आयोजकांची निराशा झाली. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. 

माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळूसकर यांना भेटले आणि मध्यस्थी करायला सांगितली. दादांनी ती मान्यही केली. थोड्या युक्तिवादानंतर वडील ऐकले आणि ती सभा झाली. दादा केळूसकर सभेचे अध्यक्ष होते. ते त्यांच्या काळातील साहित्यिक. त्यांचं भाषण झाल्यानंतर मला बक्षीस म्हणून त्यांनी बुद्धांच्या जीवनावरचं बडोदा सयाजीराव ओरिएण्टल सीरिजसाठी लिहिलेलं पुस्तक भेट म्हणून दिलं. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचलं. फार प्रभावित आणि प्रेरित झालो.

हेही वाचा: साथीच्या आजाराला पळवता येऊ शकतं असं सांगणारं अमेरिकेतलं सेंट लुईस शहर

वडिलांना प्रश्न विचारलाच

मला प्रश्न पडला की वडिलांनी बौद्ध साहित्याची ओळख आम्हाला का करून दिली नाही. हा प्रश्न माझ्या वडिलांनाही विचारण्याचा निश्चय केला. एके दिवशी तो विचारलाही. मी विचारलं, की ब्राह्मण क्षत्रिय उच्च जातींचेच गोडवे गाऊन शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधःपतनाच्या कथाच वारंवार सांगणाऱ्या रामायण आणि महाभारतातल्या कथा वाचायला का सांगता? हा प्रश्न वडिलांना आवडला नाही.

ते इतकंच म्हणाले, ‘तू असले मूर्ख प्रश्न विचारू नकोस. तुम्ही अद्याप लहान आहात. सांगितलं तेवढं ऐकायला पाहिजे.’ माझे वडील म्हणजे जणू रोमन हुकूमशहा सारखेच होते आणि आम्हा मुलांवर ते हुकूमशाही गाजवायचे. मीच एकटा मोकळीक घेऊन त्यांच्याशी बोलू लागलो होतो. माझी आई लहानपणीच वारल्याने आत्याच्या देखरेखीखाली मी वाढलो होतो.

असं झालं पहिलं बंड

काही काळाने मी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावेळी नक्कीच माझ्या वडिलांनी मला उत्तर देण्याची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, ‘मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचायला सांगतो कारण आपण अस्पृश्य आहोत. त्यामुळे तुझ्यात न्यूनगंड येईल, हे स्वाभाविक आहे. तो दूर करायला रामायण आणि महाभारताची मदत होईल. द्रोण आणि कर्ण यांच्याकडे पाहा. ती सामान्य माणसं. त्यांनी मोठी उंची गाठली होती. वाल्मिकीकडे पाहा. तो मूळचा कोळी होता. पण त्याने रामायण लिहिलं. अशा प्रकारे तुमच्यातला न्यूनगंड घालवण्यासाठी मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचावयास सांगतो.’

माझ्या वडिलांच्या म्हणण्यात तथ्य होतं पण माझं समाधान झालं नाही. मी वडिलांना सांगितलं की, मला महाभारतातली कोणतीच पात्रं आवडत नाहीत. मी म्हणालो, ‘मला भीष्म आणि द्रोणच काय, पण महाभारतातला कृष्णसुद्धा पटत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी आहेत कारण त्यांनी सांगितलं एक आणि केलं दुसरंच. कृष्णाचाही लबाडीवर विश्वास होता. त्याचे जीवनचरित्र लबाडय़ांनी भरलेले आहे. तितकीच अढी मला रामाबद्दलही आहे. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणातलं त्याचं वर्तन पाहा. सीतेशीही अमानुष वागले.’

यावर माझे वडील शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिलं नाही. बंड झालं आहे, याची त्यांना कल्पना आलेली होती.

पुस्तक लिहिण्याची कुळकथा

दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. लहान वयातच बुद्धाकडे वळलो तरी रिकाम्या डोक्याने वळलो नाही. मला पार्श्वभूमी होती. बुद्धांच्या कथा मला माहीत झाल्यानंतर त्यांची तुलना करायचो. त्यातला विरोधाभास पाहणं शक्य होतं. बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यात रस घेण्याची माझी सुरवात ही अशी आहे.

हे पुस्तक लिहिण्याची कुळकथा वेगळी आहे. कलकत्त्याच्या ‘महाबोधी सोसायटीज् जर्नल’च्या संपादकांनी १९५१ सालच्या त्यांच्या वैशाख अंकासाठी मला एक लेख लिहायला सांगितला. या लेखात मी असं  म्हटल होतं की, विज्ञाननिष्ठ  समाजाने स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म आहे. अन्यथा त्या समाजाचा ऱ्हास होऊ शकतो. मी असंही म्हटलं होतं की, आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचं तर बुद्ध धम्माची कास धरावी लागेल.

हे कोरोना स्पेशलही वाचा: 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

१९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी

कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस

पुस्तकात मूळचं माझं काही नाही 

बुद्ध धम्माची वाटचाल मंद गतीने व्हायचं कारण असं की, या धर्माचं साहित्य इतकं अधिक आहे की कुणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. या धर्माला ख्रिस्तीधर्मीयांच्या ‘बायबल’सारखा एकच एक ग्रंथ नाही, ही यामागची मोठी अडचण ठरते आहे. या लेखानंतर मला अनेकांनी पत्राने आणि तोंडी विनंत्या केल्या की, असं एखादं पुस्तक तुम्हीच लिहा. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे काम हाती घेतलं.

टीका होण्याआधीच मी हे स्पष्ट करू इच्छितो की, या पुस्तकात मूळचं असं माझं काही नाही. अनेक पुस्तकातलं साहित्य याकरता जमवलं आहे. अश्वघोषाच्या ‘बुद्धचरित’ ग्रंथाचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. यातली काव्य प्रतिभा उत्कृष्ट आहे. काही प्रसंगांच्या वर्णनासाठी तर मी त्यातली भाषा शैली उचलली आहे. 

माझं मूळ काम जर या पुस्तकात काही असेल तर ते एवढंच की, मी मुद्दय़ांची केलेली मांडणी होय. त्यात  स्पष्टता आणि सुलभपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना यातल्या काही बाबी डोकेदुखीसारख्या वाटतील, याचा उहापोह मी पुस्तकाच्या परिचयात केला आहे.

तीन पुस्तकांमुळे बुद्ध धम्माचं योग्य आकलन

ज्या सगळ्यांची या कामात मदत झाली त्या सगळ्यांचे आभार मानतो. साकरुली गावचे नानकचंद रत्तू आणि नांगल खुर्द जिल्हा होशियारपूर, पंजाब इथे राहणारे प्रकाश चंद यांनी पुस्तकाचे हस्तलिखित टाइप करून दिले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विशेषत: नानकचंद रत्तू यांनी आपल्या तब्येतीची काळजी न करता तसंच आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ माझ्यावरच्या प्रेमापोटी हे काम केलं. त्यांच्या कष्टाचं मोल करता येणार नाही.

मी या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हापासून आजारी होतो. आताही आजारीच आहे. या गेल्या पाच वर्षांच्या काळात माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झाले. काही वेळा तर माझी परिस्थिती अशी होती की डॉक्टर मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देण्याचं काम माझी पत्नी आणि माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झालं. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनीच हे काम तडीस न्यायला मदत केली आहे. संपूर्ण पुस्तकाच्या मुद्रितशोधनात रस घेणारे एम. बी. चिटणीस यांचेही आभार.

मी हे नमूद करू इच्छितो की, हे पुस्तक तीन पुस्तकांपैकी एक असून त्या तीन पुस्तकांमुळे बुद्ध धम्माचे योग्य आकलन व्हायला मदत होईल. अन्य दोन पुस्तकं पहिलं ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्‍स’ आणि दुसरं ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ अशी आहेत. त्यांपैकी काही भाग लिहून झाले असून, तीही लवकरच प्रकाशित होतील.

हेही वाचा: 

नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,

मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?

(अभिजीत ताम्हणे यांनी लोकसत्तासाठी केलेला प्रस्तावनेचा अनुवाद तसंच समता सैनिक दलाने प्रकाशित केलेल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकातल्या प्रस्तावनेवर आधारित.)