वर्ल्डकपच्या तोंडावर आयपीएलचा टीम इंडियाला फायदा की नुकसान?

१६ मे २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आयपीएल मॅच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येते. आणि यंदा वर्ल्डकप आहे तर वर्ल्डकपच्या आधी थकवणारी आयपीएल खेळल्याने क्रिकेटर्सचा परफॉर्मन्स ढासळतो, चांगला होतो, सराव होतो, नेमकं काय होतं? यावरुन खूप वाद विवाद सुरु आहेत. तर आपण वर्ल्डकप संघात सामील झालेल्या प्रत्येक क्रिकेटरच्या परफॉर्मन्सबद्दल समजून घेऊया.

भारतासाठी २०१९ हे वर्ष अनेक दृष्टीने महत्वाचं आहे. १७ व्या लोकसभेसाठीच्या निवडणूक प्रक्रियेचे सात टप्पे, आयपीएल सारखा मोठा इवेंट. आणि क्रिकेटचा देश समजल्या जाणाऱ्या भारतासाठी महत्वपूर्ण असणारा वर्ल्ड कप याच वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आले आहेत. निवडणुका आणि आयपीएल तर एकाच वेळी आले. यापूर्वीसुद्धा २०१४ च्या लोकसभेवेळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. 

त्यावेळी आयपीएल भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. पण यंदाची आयपीएल बीसीसीआयने भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने निवडणुकीच्या सात टप्याच्या वेळापत्रकानुसार आपले वेळापत्रक आखून आयपीएलसाठी लागणाऱ्या सरकारी व्यवस्थेवर येणारा ताण टाळला. त्यामुळे आयपीएलचा इवेंट व्यवस्थित पार पडला.

आयपीएल क्रिकेटर्सना थकवणारी?

पण, बीसीसीआयने सरकारी व्यवस्थेवरील ताणाचे मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे केलं असलं तरी इंग्लंडमधे ३० मे पासून  होणाऱ्या वर्ल्डकपच्या तोंडावर आयपीएलचा जवळपास दीड महिना चालणारा आणि थकवणारा १२ वा हंगाम खेळवणे गरजेचंच आहे का? असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांनी विचारायला सुरवात केली होती. त्यातच काही माजी खेळाडूंनीही ‘सांभाळून खेळा रे बाबानों’ असे म्हणत भारतीय चाहत्यांना पॅनिक अटॅक देण्याचे काम केले. 

यामुळे चर्चेला जास्तच उधाण आलं. त्यानंतर काही प्रशिक्षक आणि खेळाडूंनी वर्ल्डकप आधी आयपीएल कशी महत्वाची आहे हे पटवून देण्याची मोहीम सुरु केली. त्यातच आयपीएलला सुरवात झाली आणि बुमराह सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर जखमी झाला. यामुळे पुन्हा काय गरज, काय आहे आयपीएलची देशापेक्षा पैसा मोठा झाला काय? अशा आशयाच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरवात झाली.

हेही वाचा : क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

आयपीएलमुळे वर्ल्डकपमधे फायदा होईल?

पण, आता आयपीएलही संपली आहे मुंबई जिंकली आहे. बुमराहने फायनलमधे जबरदस्त गोलंदाजी करत धोनीच्या सीएसकेचे फॅन असलेल्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणीही आणलं. आता   आयपीएल संपली तरी त्याच्या परिणामांची चर्चा काही संपलेली नाही. काही देशी, काही परदेशी खेळाडूंनी आयपीएलचा वर्ल्डकपला सामोरे जाताना चांगला फायदा झाला असे मत व्यक्त केलं. 

त्यामुळे आपल्या आपल्याच देशात खेळली गेलेली आयपीएल वर्ल्डकपच्या दृष्टीने आपल्याला फायदेशीर ठरली का नाही? याची चर्चा होणे गरजेचे आहे. जरी विश्रांती, मोठ्या स्पर्धेपूर्वी टचमधे राहणं हे दोन मतप्रवाह असले तरी या दोन्हीच्या अनुषंगाने चर्चा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आयपीएलचा वर्ल्डकप खेळणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूंवर साधारण काय परिणाम झाला याची चर्चा करायला हवी. याची सुरवात कॅप्टनापासून करुयात.

विराट कोहली

विराट कोहलीने १२ व्या हंगामातील १४ सामन्यात एक शतक आणि २ अर्धशतकं ठोकत ३३.१४ च्या सरासरीने ४६४ धावा केल्या. यामुळे त्याची फलंदाजीतील कामगिरी आकडेवारी पाहिली तर बऱ्यापैकी म्हणता येईल. पण, आयपीएल ही स्पर्धा जशी भारताली शहरांशी निगडीत आहे तशीच ती कॅप्टनांशीही निगडीत आहे. 

स्पर्धेपूर्वी यंदाची आयपीएल विराट आणि धोनी यांच्यात असेल असं मानलं गेलं. पण, स्पर्धा संपताना ती धोनी आणि रोहित शर्मा यांच्यामधे परावर्तित झाली. याचे कारण विराटच्या नेतृत्वाखली आरसीबीचे १४ सामन्यात झालेले ८ पराभव. त्यामुळे कॅप्टन म्हणून विराट अपयशी ठरला. त्यामुळे धोनीचा ‘हेल्पिंग हँड’ स्ट्राँग झाला. 

रोहित शर्मा 

भारताचा लंबे शतकोंका अरबी घोडा असलेल्या रोहितला यंदाच्या आयपीएलमधे फक्त २ अर्धशतकं करता आली. त्याने आयलीएलमधे १५ सामन्यात  २८.९२ च्या सरासरीने ४०५ धावा केल्या. पण, ही हिटमॅनची साधारण कामगिरी. 

त्याच्या नेतृत्व गुणांमुळे विशेषतः भारताचा ‘मास्टर’ माईंड असलेल्या माजी कॅप्टन धोनीला १२ व्या हंगामात चारहीवेळा मात देण्यामुळे झाकून गेली. पण, वर्ल्डकपमधे तो कॅप्टन नाही त्याला सलामीला येत चांगली कामगिरी करावीच लागले. त्यामुळे आयपीएलचा बॅट्समन म्हणून रोहितला फार फायदा झाला असे म्हणता येणार नाही.

शिखर धवन

आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात अडखळत खेळणाऱ्या दिल्लीच्या या सलामीवीराने स्पर्धेच्या उत्तरार्धात आपल्या बॅटचे जलवे दाखवले. त्याने खेळलेल्या १६ सामन्यात ५ अर्धशतकं ठोकत ३४.७३ च्या सरासरीने ५२१ धावा केल्या. त्यातील नाबाद ९७ धावांची खेळी लाजवाब होती. त्यामुळे आयपीएल खेळण्याचा शिखर धवनला चांगलाच फायदा झाला. त्याने जगविख्यात गोलंदाजांचा सामना करत फलंदाजीचा चांगला सराव करुन घेतला आहे. त्यामुळे वर्ल्डकपला तो चांगल्या फॉर्म आणि आत्मविश्वासानिशी सामोरा जाईल.

हेही वाचा : सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

केएल राहुल

केएल राहुलकडे कसोटीतील एक चांगला सलामीवीर म्हणून बघितलं जातं. त्याने इतिहासात केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर वनडे टिममधे आपलं स्थान पक्कं केलं. पण, अचानक त्याच्या या दमदार कामगिरीला ग्रहण लागलं. आणि त्याचे वनडेतलंच नाही तर कसोटी टीमातल्याही स्थानावर बालट आले. पण, चान्सेसच्या बाबतीत तो फारच नशिबवान ठरला. 

त्याला वर्ल्डकपपूर्वी पुनरागमनाची संधी मिळाली त्याने धावाही केल्या पण, अजूनही त्याच्याबद्दल मनात शंकेची पाल चुकचुकत होती. आयपीएलमधे या शंका कुशंकांना त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावत सीमारेषेपारच ठेवलं. त्याने आयपीएलमधे असा काही धमाका केला की त्याने थेट स्टँड बाय सलमीवीरापासून आता चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजीवर अधिकार सांगितला आहे. त्याने एक शतक, सहा अर्धशतकं करुन १६ सामन्यात ५२९ धावांसहित १२ व्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे ही आयपीएल राहुलसाठी संजिवनी ठरली आहे.

हेही वाचा : विजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल?

विजय शंकर

अवघ्या ९ सामन्यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या या ऑलराऊंडरला थेट वर्ल्डकपचे तिकीट मिळाल्याने लोकांनी भुवया उंचावणं, टीका होणं हे सर्व प्रकार झाले. त्यावेळी निवड समितीने हा थ्री डायमेंशनल खेळाडू आहे असं सांगत समर्थन केलं. त्याला चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन तर गोलंदाजी करणार अशी जॉब प्रोफाईल सेट करण्यात आली. 

पण, आयपीएलच्या १४ सामन्यात एकदाच ४० धावांची खेळी करणाऱ्या विजयने गोलंदाजीतही फक्त ८ षटकं टाकून १ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे किटबॅगमधे ९ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असणाऱ्या आणि आयपीएलमधे सुमार कामगिरी करणारा विजय अशा परिस्थितीत वर्ल्डकपचं प्रेशर कसं हँडल करणार हा मोठा प्रश्न आहे. 

केदार जाधव

मॅच फिनिशर धोनीच्या छत्रछायेखाली खेळणाऱ्या केदार जाधवसाठीही टच मधे येत फिल गुड होण्यासाठी ही आयपीएल कामी आलेली नाही. त्याला १२ व्या हंगामात खेळलेल्या १२ सामन्यात एकदाच अर्धशतकी आकडा पार करता आला आहे. त्याने ९५.८५ च्या सुमार स्ट्राईक रेटने १६२ धावाच केल्या आहेत. यात भरीस भर म्हणजे ३४ वर्षाच्या केदारला पहिला वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली. पण आयपीएल सामन्यादरम्यान खांदा दुखावल्याने या संधीची माती होण्याची भीती वर्तवली जातेय. त्यामुळे गुणी असूनही आता सगळं नशिबावर येऊन ठेपलं.

हेही वाचा : ऑस्ट्रेलिया विजय ऐतिहासिक, पण काहीतरी मिसिंग

महेंद्र सिंह धोनी

भारतीय टीमासाठी २०१८ मधे कोणाच्या खराब फॉर्मची सगळ्यात जास्त चिंता होती, तर ती धोनीच्या फॉर्मची. पण, बरोबर वर्ल्डकपच्या आधी धोनीने ऑस्ट्रेयिलात सलग तीन अर्धशतकं ठोकत शेर बुढा हो गया तो क्या अव्वल शिकार तो वही करता है. हे सिद्ध करुन दाखवलं. 

त्यानंतर आयपीएलमधे त्याने आपले रेप्युटेशन कायम राखत १२ सामन्यात ४१६ धावां केल्या. यातील सर्वात जास्त चर्चा झाली ती आरसीबी विरुद्ध ४८ चेंडूत केलेल्या ८४ धावांची. या खेळीने चाहत्यांना ‘ओल्ड धोनी इज बॅक’ असा विश्वास मिळाला. या विश्वासाच्या जोरावरच भारताने वर्ल्डकपवर आपली दावेदारी अधिक बळकट केली.

हार्दिक पांड्या

कॉफीवाल्या करणच्या नादाला लागून महिलांविषयी केलेल्या बेलगाम वक्तव्याने बॅड बॉय इमेज झाली. यासाठी आपलं सीसीआय या प्रतिष्ठीत क्रिकेट क्लबचं सदस्यत्व गमवावं लागलं. तसंच ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडावा लागला. त्यानंतर त्याने न्युझीलंड विरुद्ध भारतीय टीमात पुनरागमन केलं.

पण, त्याने आपल्याविरुद्ध असलेला चाहत्यांचा राग कमी केला तो आयपीएलमधे. १६ सामन्यात ४०२ धावा केल्या पण, त्याने सर्वांची मने जिंकली ती कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ३४ चेंडूत केलेल्या ९१ धावांच्या दमदार खेळीने. याचबरोबर त्याने १६ सामन्यात १४ विकेट काढत इंग्लंडला रवाना होण्यासाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिले. 

हेही वाचा : पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?

रविंद्र जडेजा

अगदी काही महिन्यापूर्वी यझुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांचं वनडे करिअर संपुष्टात आल्याची चर्चा होतहोती. पण, झुंजार वृत्तीच्या डावखुऱ्या फिरकी बॉलर जडेजाने आपण आजूनही टीमासाठी उपयुक्त असल्याचं सिद्ध केलं. यंदाच्या आयपीएलमधे १६ सामन्यात ६.३५ च्या सरासरीने धावा देत १५ विकेट काढल्या आहेत. तसंच बॅटिंगमधेही आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यामुळे भारताकडे फिरकीच्या विभागात एक पर्याय वाढला आहे.

यझुवेंद्र चहल

यंदाच्या आयपीएलमधे आरसीबीने खराब कामगिरी केली, तरी त्यांच्या गोलंदाजीतला एकमेव हुकमी एक्का याही हंगामात चांगली कामगिरी करुन गेला. चहलने १४ सामन्यात १८ विकेट काढल्या आहेत. त्यामुळे वर्ल्डकपला सामोरे जाताना जगभरातील चांगल्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी आयपीएलमुळे चहलला मिळाली आहे. हा अनुभव त्याला इंग्लंडमधे कामी येईल.

कुलदीप यादव 

कुलदीप यादवची चायनामन गोलंदाजी इंग्लंडमधे डोकेदुखी ठरेल, असा अंदाज जाणकार वर्तवत होते. पण आयपीएलमधे कुलदीपची झालेली धुलाई पाहता त्याचा आत्मविश्वास नक्कीच खालावला असणार. त्याने ९ सामन्यात टाकेल्या ३३ षटकात ८.६६ च्या सरासरीने २८६ धावा दिल्या आहेत. इतक्या धावा देवून त्याला फक्त ४ विकेट घेण्यात यश मिळालं. त्यामुळे आयपीएलचा कुलदीपला फायदा होण्याऐवजी तोटाच झाला.

हेही वाचा : ऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं? ते कार्तिकला कसं मिळालं?

मोहम्मद शमी

भारताचा कसोटीतील प्रमुख बॉलर आणि एकदिवसीय सामन्यात ‘बेंच स्ट्रेन्थ’ अशी प्रतिमा असलेला बॉलर म्हणजे मोहम्मद शमी. बरेच जाणकार याच्या सीम पोजिशनचे चाहते आहेत. पण, याला एकदिवसीय सामन्यात खेळवावे का नाही या द्विधा मनस्थितीत भारतीयटीम व्यवस्थापन कायम असायची. पण, ही आयपीएल त्याची ही वनडेची ‘बेंच स्ट्रेन्थ’ ब्रेक करणारी ठरली.

त्याने वनडे, टी-२० साठी लागणारी चलाखी आणि अचूकता साध्य करत १४ सामन्यात १९ विकेट काढल्या आहेत. हा भारतीयटीम व्यवस्थापनासाठी सुखद धक्का म्हणता येईल. कारण इंग्लंडमधे जाताना तुमच्या फास्ट बॉलरांची धार चांगली असणं गरजेचं असतं.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने आपला खांदा सुरुवातीच्याच सामन्यात दुखवून घेत भारतीयटीम व्यवस्थापनाचे चांगलेच आवळे शिजवले होते. पण, आयपीएल फायनलमधे केलेल्या भेकद माऱ्यामुळे आता इतर देशांच्या फलंदाजांचे धाबे दणाणलेत. फायनलमध्यल्या बुमराहच्या त्या ४ षटकांच्या जोरावर भारताने आपली वर्ल्डकप दावेदारी बळकट केली आहे. त्याने आयपीएलमधे १६ सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार

यंदाची आयपीएल भुवनेश्वर कुमारसाठी सर्वसाधारणच राहिली आहे. काही सामन्यांत कॅप्टनाची भूमिका बजावावी लागल्याने गोलंदातील त्याचा फोकस हलल्यासारखे वाटले. त्यामुळेच भारतातील इतर बॉलर १९-२० विकेट काढत असताना त्याची गाडी मात्र फक्त १३ विकेटपर्यंत येवून थांबली. त्यातच त्याची इकॉनॉमी ७.८१ पर्यंत पोचल्याने वर्ल्डकप पूर्वी त्याचा आत्मविश्वस दुणावला असेल असं म्हणणं धाडसाचं असेल. 

एकंदर टीमाच्या दृष्टीने पाहिले तर आयपीएलमुळे कही खुशी, कही गंम असेच वातावरण टीमात असल्याचं पहायला मिळत आहे. याचा अर्थ असा नाही की आयपीएल खराब गेली म्हणून वर्ल्डकप खराब जाणार आहे. आणि आयपीएलमधे चांगली कामगिरी वर्ल्डकपमधेही अच्छे दिन घेवून येईल. या दोन्ही स्पर्धांचे स्वरुप वेगवेगळे आहेत. आयपीएल फक्त महायुद्धापूर्वीचा युद्धसराव आहे.

हेही वाचा : आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही