कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?

२२ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणार अशी घोषणा, चर्चा तर खूप झाली. आणि शेवटी काल २० ऑगस्टला कृत्रिम पाऊस पडला. तुम्हाला माहीत आहे, हा पाऊस कसा पाडतात आणि त्याचे फायदेतोटे काय आहेत? सध्या जगभरात कृत्रिम पावसाच्या धोक्यांवर चर्चा सुरू आहे.

यंदा पावसाने आपली गोची केली. जराही पावसाचा आनंद लुटता आला नाही. कारण महाराष्ट्राच्या एका भागात महापूर आला. आणि दुसऱ्या भागात पावसाचा एकही थेंबही पडला नाही. सध्या तर पूरग्रस्त भागात पुनर्वसनाचं काम सुरू आहे. तर दुष्काळग्रस्त भागात विज्ञानाच्या मदतीने कृत्रिम पावसाचा प्रयोग होतोय.

काळ्या ढगांवर रसायनं फवारणी

कृत्रिम पाऊस पाडणार असं सरकारकडून जूनपासूनच सांगितलं जात होतं. पण शेवटी कालच्या मंगळवारी मराठवाड्यात हा पाऊस पडला. सोमवारीचा दिवस नक्की केला होता. पण तांत्रिक अडचणीमुळे पाऊस पाडण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मग मंगळवारी संध्याकाळी हा प्रयोग झाला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर हा पाऊस पडल्याचा दावा सरकारच्या महसूल विभागाने केलाय, असं दैनिक सकाळने आपल्या बातमीत म्हटलंय.

कृत्रिम पाऊस पहिल्यांदा अमेरिकेत झाला. याचा शोध हवामानशास्त्रज्ञ व्हिन्सेंट शेफर यांनी १३ नोव्हेंबर १९४६ ला लावला. हा पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग इत्यादी घटक गरजेचे असतात. यातल्या कोणत्याही घटकाचा असमतोल झाल्यास पाऊस पडत नाही.

मग ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवावं लागतं. आणि विशिष्ट तापमानाला थंड करावं लागतं. पुढे त्याचं पाण्याच्या थेंबांत रूपांतर होतं. कृत्रिम पाऊस म्हणजे नेमकं काय हे इन शॉर्ट सांगायचं असेल तर काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायनं फवारून पाऊस पाडणं.

हेही वाचा: फेसबूकर्स पूरग्रस्तांसाठी कशी मदत करतात, याचं कुबेर ग्रुप हे उदाहणरण

पाऊस पाडण्यासाठी मिठाचा वापर

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वातावरणात किमान ७० टक्के मॉइश्चर म्हणजे आर्द्रता असणं गरजेचं असतं. यासाठी सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाचे कण फवारले जातात. हे कण ४ ते ११ मायक्रोमीटर आकाराचे असतात. हवेतलं बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एका लहान कणसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्या कणावर बाष्प जमा होतं. आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही निर्मिती नैसर्गिकरित्या थांबल्यास कृत्रिम पाऊस पाडावा लागतो.

मिठाच्या फवारणीमुळे कणांभोवती ढगातलं बाष्प जमा होण्याची क्रिया सुरू झाली की पाऊस पडू लागतो. तसंच सिल्वर आयोडाईडनच्या फवाऱ्याने उंचावरच्या पांढऱ्या ढगांमधूनही पाऊस पाडतो. अमेरिका आणि कॅनडासारख्या ठिकाणी तर गारांचा आकार फार मोठा लहान करण्यासाठी. आणि गारांची संख्या वाढवण्यासाठी सोडियम आयोडाईडचे कण फवारतात.

फसलेले कृत्रिम प्रयोग

अमेरिका, इस्राइल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिका खंडातले काही देश आणि युरोपमधल्या काही देशांमधेसुद्धा असे प्रयोग होतात. तिथे हे प्रयोग करणं दरवर्षीचं आहे. पण आपल्याकडे तसं होत नाही. आणि आपल्याकडचा प्रत्येक यशस्वी होतोच असंही नाही.

भारतात याआधीचे कृत्रिम पावसाचे प्रयोग अयशस्वी ठरल्याचं हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी इंडिया टुडेला सांगितलं. प्रा. जोहरे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजीमधे १३ वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम केलंय.

२००३ ला कर्नाटक आणि महाराष्ट्र, २००४ ला आंध्र प्रदेशात प्रयोग झाले. २००७ चा प्रयोग अमेरिकन कंपनीने केला. २००९ ते २०११ मधे पुण्याच्या आयआयटीएमने कायपिक्स नावाचा प्रयोग हाती घेतला. त्यानंतर २०१०, २०११ ला तिन्ही राज्यांतल्या दुष्काळी भागात प्रयोग करण्यात आले. मात्र हे सर्व प्रयोग फसल्याचं प्रा. जोहरे सांगतात.

हेही वाचा: ‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

चीनकडे आहे कृत्रिम पावसाचा फॉर्म्युला

‘सध्या जगभरात कृत्रिम पावसाचे प्रयोग होतात. पण यापैकी फक्त ३० टक्के ठिकाणी यश आलंय. त्यामुळे परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विचार करून मगच हा निर्णय घ्यायचा असतो. कृत्रिम पावसाचं शास्त्र अजूनही पूर्णपणे विकसित झालेलं नाही. त्यामुळे अगदीच गरज असेल, तरच कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा,’ असं हवामानतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

जगात कृत्रिम पावसाचे प्रयोग अयशस्वी झाल्याचा इतिहास आहे. ढगांवर रसायन फवारल्यानंतरही ते ढग पुढे वाहून निघून गेल्यास त्याचा काहीच उपयोग होत नाही. सोलापूर तसंच मराठवाडा हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. याठिकाणी कृत्रिम पावसासाठी अनुकूल ढग असतील की नाही याबाबत शंका आहे. म्हणूनच या अनिश्चित शास्त्रावर भारतासारख्या विकसनशील देशाने अवलंबून राहू नये.

आजवर फक्त चीनने कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीरित्या केलाय. पण त्यांनी या प्रयोगाचा फॉर्म्यूला जगात कोणाशीही शेअर केला नाही. तो सगळ्यांपासून लपवून ठेवलाय, असं अमेरिकी वेबसाईट न्यूज ब्रिटवर लिहिलंय.

कृत्रिम पाऊस म्हणजे पैशाचा खेळ

आयआयटीएम संस्थेने कायपिक्स प्रयोगावर साधारण २५० कोटी खर्च केलेत. सारखी सारखी अमेरिकेतली विमानं भाड्याने घेऊन हे प्रयोग होतायत. भारताला हे प्रयोग परवडणार नाहीत. मुख्य म्हणजे प्रयोगानंतर किती पाऊस पडला याची नोंदही होत नाही. कोणते ढग निवडण्यात आले, प्रयोग कधी आणि कशा प्रकारे होईल याचीसुद्धा माहिती दिली जात नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोग हा केवळ पैशाचा खेळ आहे, असा आरोपच प्रा. जोहरे यांनी केला.

आजच्या संकटावर मात करण्यासाठी कृत्रिम पाऊस हा भरवशाचा नाही. म्हणूनच सरकारने काही ठोस पावलं उचलण्याबद्दल नुकत्याच घोषणा केल्यात. वेगवेगळ्या देशांप्रमाणे आणि विशेषत: इस्राइली तंत्राच्या धर्तीवर नद्याचं पाणी साठवणं, पाईप लाईनद्वारे जोडणं आणि वॉटरग्रीडच्या माध्यमातून धरणं जोडण्याचं काम येत्या काळात होणार आहे.

कृत्रिम पाऊस धोकादायक

पाऊस ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तर त्याचा परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. ढगामधे फवारण्यात येणारं रसायन ढगाच्या प्रकारानुसार त्या त्या प्रमाणात फवारलं गेलं पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारलं तर मात्र असलेले ढगसुद्धा विरून जातात. त्यामुळे नैसर्गिक होणार पाऊसही दडी देण्याची शक्यता असते.

तसंच कृत्रिम पावसासाठीच्या फवारणीत वापरण्यात येणारं सिल्वर आयोडाईड हे रसायन धोकादायक असतं. ते पर्यावरणाला हानी पोचवतं. यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आणलीय. कृत्रिम पावसामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याचीच शक्यता जास्त आहे, असंही द एशियन एजच्या बातमीत लिहिलंय.

हेही वाचा: 

सोनिया गांधींपुढे काँग्रेसला बांधून ठेवण्याचं आव्हान

तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?

लोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे?

काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा