खरंच पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणं म्हणजे देशद्रोह आहे?

२२ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


बंगळुरू इथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या सभेत अमुल्या नावाच्या एका मुलीनं पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी तिच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. कायद्यात आणि समाजात देशद्रोहाची काय व्याख्या आहे, अशा दोन स्तरांवर देशद्रोहाच्या मुद्दयाकडे बघायला हवं. त्यानंतरच आपल्याला पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं देशद्रोह आहे की नाही, हे नीट कळेल.

पाकिस्तान जिंदाबाद!
हिंदुस्तान जिंदाबाद!!
वसुधैव कुटुंबकम!!!

या तीन घोषणांचा काही अर्थ लागतोय की नाही? भारतीय संस्कृतीत वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेला खूप महत्त्व आहे, असं आपण नेहमी म्हणतो. आपल्या लाडक्या ज्ञानेश्वर माऊलींनीही अवघे विश्वाची माझे घर असं म्हटलंय. पर्यटनाच्या सरकारी जाहिरातींमधेही अनेकदा या वाक्याचा वापर केला जातो. सगळ्या जगालाच आपण आपलं म्हणत असू तर या जगातला कोणताही देश जिंदा आणि आबाद राहावा यासाठी कुणी घोषणाबाजी केली तर त्याला विरोध का होतो? अशी घोषणाबाजी करणं देशद्रोहाच्या कलमाखाली येतं का? असा प्रश्न सध्या वेळोवेळी चर्चेत येतोय. बंगळुरूतल्या घटनेनं पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालीय.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात २० फेब्रुवारीला एक सभा आयोजित करण्यात आली होती. एआयएमआयएम पक्षाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सभेतच अमुल्या निधी या १९ वर्षांच्या विद्यार्थीनीने पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली. यावरून तिच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. शुक्रवारी तिच्याविरूद्ध गुन्हाही दाखल केला गेला. सध्या तिला १६ दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीय. जामिनासाठी तिला सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा : देशद्रोहाच्या कलमाला किंग ऑफ आयपीसी असं का म्हणतात?

नेमकं काय झालं?

बीबीसीनं दिलेल्या एका बातमीनुसार, नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि मुस्लिम नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बंगळुरूमधे सभेचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम चालू असतानाच अमुल्यानं मंचावर येऊन पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यानंतर ओवेसी आणि इतर कार्यकर्त्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातातून लोक माईक हिसकावून घेत असतानाच तिने हिंदुस्थान जिंदाबाद अशाही घोषणा दिल्या. शेवटी महिला पोलिसांना बोलावून तिला मंचावरून खेचत खाली नेण्यात आलं.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर ओवेसी आणि इतर कार्यकर्ते यांनी तिला विरोध केला. तेव्हा अमुल्यानं मला मिनिटभर बोलू द्या, अशी विनंती केली. पण पाकिस्तानच्या घोषणाबाजीने मैदानावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर तिचं म्हणणं कुणीही ऐकून घेत नव्हतं.

तिच्या हातातून माईक हिसकावून घेण्यात आला. त्यानंतरही अमुल्या मोठ्याने ओरडून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. ती हिंदूस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊ लागली. पण गर्दी आणि आवाजामुळे तिला काय म्हणायचंय हे लोकांना ऐकूच आलं नाही. शेवटी महिला पोलिसांनी तिला खेचत खाली आणलं.

कोण आहे अमुल्या?

अमुल्या ही बंगळुरूच्या कॉलेजात शिकणारी आणि वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेणारी विद्यार्थिनी आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती एक्टिव असते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू झाली तेव्हापासून अमुल्या प्रकाशझोतात आली. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात तिला बोलायची संधी दिली जाते.

१६ फेब्रुवारीला अमुल्यानं फेसबुकवर एक पोस्ट टाकलीय. या पोस्टमधे तिने भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश सगळेच देश जिंदाबाद आहेत असं म्हटलं. बहुतेक हीच भूमिका घेऊन ती मंचावर बोलायला उभी राहिली. पण, तिनं सुरवातीलाच पाकिस्तान जिंदाबाद अशी दिल्यानं तिला पुढे बोलूच दिलं गेलं नाही, असं एनडीटीवीच्या बातमीत म्हटलंय.

आता पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाच्या कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. अगोदरच शाळेत शिकणाऱ्या सातआठ वर्षांच्या मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून चर्चेत असणाऱ्या कर्नाटक पोलिसांनी अमुल्याच्या प्रकरणातही तातडीने पुन्हा एकदा हेच कलम अमलात आणलंय.

देशद्रोहाचं कलम काय सांगतं?

देशद्रोहाचा मुद्दा आपल्या दोन पातळ्यांवर पाहता येतो. एक म्हणजे कायद्यात देशद्रोहाची काय व्याख्या आहे आणि दुसरं म्हणजे समाजाच्या मनात देशद्रोहाची काय व्याख्या आहे. इंडियन पीनल कोड म्हणजेच आयपीसीच्या १२४ अ या कलमानुसार देशात द्वेष किंवा तिरस्कार पसरवणारं कुणी काही बोललं तर त्याला देशद्रोही असं म्हणता येतं.

याचा अर्थ अमुल्याच्या वक्तव्यामुळे देशात द्वेष किंवा तिरस्कार पसरतोय असा होतो. पण तिच्या एका वाक्यावरून किंवा एका घोषणेवरून संपूर्ण देशात तिरस्काराची भावना पसरेल इतका आपला देश कमकुवत आहे का? असा सवाल कायदेतज्ञ प्रोफेसर फैझान मुस्तफा विचारतात. प्रोफेसर मुस्तफा हे हैदराबादच्या नालसर लॉ युनिवर्सिटीचे कुलगूरू आहेत.

लिगल अवेअरनेस वेब सिरीज या नावाने ते एक युट्यूब चॅनल चालवतात. या युट्यूब चॅनलवर त्यांनी एका वीडियोतून पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणं हे देशद्रोही आहे का या प्रश्नाची सविस्तर चर्चा केलीय. प्रोफेसर मुस्तफा यांच्या मते, '१२४ अ कलमानुसार प्रक्षोभक वक्तव्यांमधून हिंसा होत नाही तोपर्यंत त्या वक्तव्याला देशद्रोही या कॅटेगरीमधे टाकता येत नाही.'

ते म्हणतात, ‘अमुल्यानं घोषणा दिल्या ती जागा आणि वेळ चुकीची होती हे खरंच आहे. पण अमुल्यानं पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली तेव्हा समोर असलेल्या प्रेक्षकांपैकी कुणीही उत्तेजित होऊन तिला प्रतिसाद दिला नाही. कुणी टाळ्या, शिट्याही वाजवल्याचं दिसलं नाही. पण त्यानंतर तिनं हिंदूस्तान जिंदाबादची घोषणा दिली तेव्हा मात्र प्रेक्षकांनी तिला साथ देत तिच्या घोषणांमधे आपलाही आवाज मिसळला. त्यामुळे तिच्या वक्तव्यानं कुणाच्या भावना उत्तेजित झाल्या आणि हिंसा झाली असं झालेलं नसताना तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल केला गेला?’

हेही वाचा : सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?

रवीशंकरही देशद्रोही?

‘ही १९ वर्षाची अमुल्या जागतिक शांततेवर विश्वास ठेवते असं दिसतं. तिच्या फेसबुकवरही तिने तशा पोस्ट टाकल्यात. सगळेच देश जिंदाबाद आहेत, असं ती म्हणते. ही जबाबदारी फक्त अमुल्याची किंवा देशातल्या नागरिकांची नाही तर राष्ट्राचीसुद्धा आहे. भारतीय संविधानातल्या कलम ५१ नुसार घटकराज्यानं आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तसंच, देशांमधे न्याय्य आणि आदराचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’

मुस्तफा हे संविधानाचे अभ्यासक आहेत. संविधानातल्या मुलभूत हक्कांमधेही मानवतावादाचा प्रश्न येतो तेव्हा मानवतावाद म्हणजे फक्त आपल्या देशातल्या लोकांचं भलं असं म्हटलेलं नाहीय. तर कुठल्याही देशातल्या, जगातल्या लोकांसाठी हा मानवतावाद लागू होतो. त्यामुळे कुठलातरी देश जिंदाबाद राहावा असं म्हटलं जात असेल तर तो कायद्यानं गुन्हा नाहीय, असं मुस्तफा यांचं म्हणणं आहे.

'आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाणारे श्री श्री रविशंकर यांनीही एका कार्यक्रमात जय हिंद, पाकिस्तान जिंदाबाद असं म्हटलं होतं. दिल्लीत मार्च २०१६ मधे भरवण्यात आलेल्या वर्ल्ड कल्चर फेस्टीवलमधे ते असं म्हणाले होते. पाकिस्तान जिंदाबाद आणि जय हिंद या दोन घोषणा हातात हात घालून गेल्या पाहिजेत, असं रविशंकर म्हणाले. मग आता त्यांनाही देशद्रोही म्हणायचं?'

पाकिस्तान आपला दुश्मन आहे का?

मुस्तफा सांगतात, काही वर्षांपूर्वी भारताच्या पंजाब प्रांतातून खलिस्तान हा वेगळा देश व्हावा अशी मागणी होत होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ३१ डिसेंबर १९८४ ला चंदीगडमधे बलवंत सिंग आणि आणखी एका माणसाने खलिस्तान जिंदाबाद, राज करेगा खालसा अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्यावर सुनावणीवेळी १९९५ मधे सुप्रीम कोर्टाने एखाद दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या एक किंवा दोन घोषणांना द्वेष पसरवणाऱ्या म्हणता येणार नाही. त्यामुळे या घोषणा देशद्रोही नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा दिला होता.

अमुल्याचा वीडियो जवळपास सगळ्याच न्यूज चॅनेल्सनी आपल्या युट्यूबवर शेअर केलाय. या वीडिओखाली ‘दुश्मन देश के नारे न लगायो’अशा कमेंट्स लिहिल्या गेल्यात. पाकिस्तान आपला दुश्मन आहे आणि त्यासाठी बोलणाऱ्या किंवा भारतातल्या कुठल्यातरी गोष्टींबद्दल बोलणाऱ्या सगळ्याच गोष्टी देशद्रोही आहेत, अशी समाजाची समजूत झालीय. एखाद्या कायद्याविरोधात सभा होत असताना अमुल्यानं असं विधान केल्यानं तिचं म्हणणं लोकांपर्यंत पोचलं नाही. ते फक्त घोषणेपुरतंच मर्यादित राहिलं. तिचं वाक्य चूक किंवा अयोग्य असू शकतं. पण याचा अर्थ ती देशद्रोही असा होत नाही.

'आपला भारत देश हा जगातला सगळ्यात शक्तीशाली देश आहे, असं म्हटलं जातं. पण हा शक्तीशाली देश आता इतका असुरक्षित प्रजासत्ताक बनू लागलाय का, की कुणी जरासं खुट् जरी केलं तरी आपल्याला असुरक्षित वाटू लागतं. एवढ्याशा गोष्टीनं आपल्या देशाचं काही वाकडं होईल, असं आपल्याला वाटावं इतका आपला देश कमकुवत आहे का?' असा प्रश्न प्रोफेसर मुस्तफा विचारतात.

हेही वाचा : 

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?

एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?

भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण