जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

२३ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


युरोपात कोरोनानं हैदोस घातलाय. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी अशा साऱ्या महाशक्तींनी पाय टेकलेत. अचानक आलेल्या या संकटाविरोधात लढण्यासाठी आता सारे देश आपापल्या पातळीवर कामाला लागलेत. अमेरिका, इटली, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, इटली, कॅनडा अशा सर्वच देशांनी कोरोना पॅकेज जाहीर केलंय. कृती कार्यक्रम जाहीर करून तो राबवणंही सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर भारताचं करंट स्टेट्स आपण चेक केलं पाहिजे.

जगभरात धुमाकूळ घालून झाल्यानंतर कोरोना वायरस आता हळूहळू भारतात जाळं पसरवायच्या बेतात आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी लोकांना बाहेर पडू नये, घरातच रहावं असं आवाहन केलं जातंय. पण यासोबतच भारतात आरोग्य सेवांची काय स्थिती आहे याकडेही पाहावं लागेल.

इंडियन एक्सप्रेसमधे गेल्या शनिवारी २१ मार्चला कोरोना वायरसची बाधा झालेल्या देशांच्या तुलनेत भारतीय आरोग्य सेवेचं करंट स्टेटस काय सांगता यावर प्रकाश टाकण्यात आलाय. इटली आणि चीनमधे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेले रुग्ण हे आधीच डायबेटीस, किडनी, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांनी बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. पण असे काही निर्देशक किंवा एखादा मूलभुत घटक असेल तरच कोरोनाचा उद्रेक होतो, असं बाकीच्या देशांमधे तरी स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा : पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

कोरोनाचा धोका वृद्धांना जास्त

कोरोनाबाधित चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, इराण, इटली, ब्रिटन या देशांचा विचार करता चीन आणि अमेरिकेनंतर भारतामधे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजाराच्या रूग्णांची संख्या मोठी आहे. मधुमेह आणि किडनीच्या आजारासंबंधी भारतावरचा भार हा इटली, चीन आणि ब्रिटनपेक्षा जास्त आहे.

‘द लॅन्सेट’ या मेडिकल जर्नलने प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार, इटलीत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांपैकी दोन तृतीयांश मृत हे डायबेटीस, कॅन्सर, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार असणारे किंवा धूम्रपान करणारे होते.

‘चायनीज सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’च्या अहवालानुसार, बहुतेक मृत हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामधे बहुतेकांना उच्च रक्तदाब, डायबेटीस, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचा आजार होता. शिवाय, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तीव्र श्वसनाचा त्रास निर्माण होणाऱ्या रुग्णांचं वय हे सरासरी ६१ इतकं आहे आणि त्यांना डायबेटीस, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यासंबंधी आजार होते, असं वुहानमधल्या एका संशोधनात स्पष्ट झालंय.

कोरोना संसर्गित रुग्णाच्या वयासंबंधी असे वेगवेगळे अहवाल समोर येतायत. सर्वाधिक फटका बसलेल्या चीनमधे संसर्गित रुग्णांचं सरासरी वय हे ४८.९ वर्ष इतकं होतं. दुसरीकडे इटलीमधे बळी पडलेल्या रुग्णांचं सरासरी वय हे ८१ इतकं होतं.

अमेरिकेतल्या सीडीसी अर्थात सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन या संस्थेनं कोरोना संदर्भात व्यापक संशोधन प्रसिद्ध केलंय. त्यानुसार ८५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे १० ते २७ टक्के इतकं आहे. रुग्णालयात दाखल केलेले ४५% रुग्ण आणि मृतांपैकी ८० टक्के रुग्ण हे ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

हेही वाचा : कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

भारत तर तरुणांचा देश

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ६ टक्के लोकसंख्या ही ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेली तर एक चतुर्थांश लोकसंख्या ही १४ पेक्षा कमी वयोगटातली आहे. इराणदेखील याबाबतीत भारताच्या जवळपास आहे. त्यांची ५.४ टक्के लोकसंख्या ही ६५ वर्षावरील तर एक चतुर्थांशपेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही १४ पेक्षा कमी वयोगटातली आहे. इतर सहा देशांच्या तुलनेत भारतात १४ वयोगटाखालील लोकसंख्या ही सर्वाधिक असल्याचं जागतिक बँकेचा अहवाल सांगतो.

इटलीत तुलनेने २३ टक्के लोकसंख्या ही वयोवृद्ध गटात मोडते. त्यामुळे कदाचित तिथं कोरोनाच्या बळींची संख्या मोठी असू शकते. ब्रिटनमधे वयोवृद्ध गटातली लोकसंख्या १८.५ टक्के, अमेरिकेत १५.४ टक्के, दक्षिण कोरियामधे १३.९ टक्के तर चीनमधे ती १०.६ टक्के इतकी आहे. भारताच्या तुलनेत या देशांमधे वयोवृद्धांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा : कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

कोणाची आरोग्य सेवा किती सक्षम?

भारतात तरुणांची संख्या जास्त आणि वृद्धांची संख्या कमी अशी परिस्थिती असली तरी भारताला आपण सेफ आहोत असं समजण्याची गरज नाही. कारण, कोरोना तरुणांनाही होतो आणि योग्य उपचार मिळाले नाहीत तर तरुणांचाही जीव जाऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनंच स्पष्ट केलंय. या पार्श्वभूमीवर आपण भारतातली आरोग्य सेवेची तब्येत तपासायला हवी.

जागतिक आरोग्य संघटनेने इराण, ब्रिटन, अमेरिका, इटली, चीन, दक्षिण कोरीया आणि भारत या सात देशामधल्या दवाखान्यात प्रत्येकी दहा हजार लोकसंख्येमागे किती खाटांची म्हणजेच बेड्सची उपलब्धता आहे, याचा मागोवा घेतला. इराणमधे प्रत्येकी दहा हजार लोकांमागे १५ खाटा उपलब्ध होऊ शकतात. ब्रिटनमधे २८, अमेरिका २९, इटली ३४, चीन ४२ तर दक्षिण कोरीयामधे चक्क १४२ खाटांची उपलब्धता आहे. या सहा देशांच्या तुलनेत भारतातील उपलब्ध खाटांची संख्या नगण्य आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात सध्या १५ हजार ९८० विलगीकरण खाटं तर ३७ हजार ३२६ क्वारंटाईन खाटांची उपलब्धता आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रत्येकी ८४ हजार भारतीयांमागे एक विलगीकरण खाट तर प्रत्येकी ३६ हजार भारतीयांमागे एक क्वारंटाईन खाट उपलब्ध आहे. यावरून आपल्याला भारतातल्या आरोग्य सेवेची परिस्थिती किती भीषण आहे, याचा अंदाज येईल.

म्हणून इटलीला बसला फटका

सध्या भारताच्या जीडीपीतली १.३ टक्के रक्कम ही आरोग्य क्षेत्रावर खर्च होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ही रक्कम जीडीपीच्या चार ते पाच टक्के इतकी असावी. तरच कोणताही देश आरोग्य क्षेत्रात समाधानकारक कामगिरी करू शकतो.

लंडनमधील ब्लूमबर्ग या संस्थेतर्फे दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना,संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीवर आधारित 'जागतिक आरोग्य निर्देशांक' काढला जातो. २०१९ च्या या निर्देशांकामधे भारताचा क्रमांक हा १२० वा होता.

कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिकन सिनेटने एक ट्रिलियन डॉलर्सचा अर्थात एक लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. यासंदर्भातली चीनमधली अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. पण त्यांनी प्रचंड निधी खर्च केलाय, हे नक्की. इटलीमधे कोरोनाशी लढण्याची कोणतीही पूर्वतयारी नव्हती. त्यामुळे त्याचा मोठा फटका त्या देशाला बसला.

हेही वाचा : एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

आरोग्य क्षेत्रासाठी किती निधी?

भारतात खासकरून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आरोग्याच्या पायाभूत सुविधा अत्यंत तोकड्या आहेत. सध्या भारतात कोरोना दुसऱ्या स्टेजवर आलाय. या विरोधात लढण्यासाठी आरोग्य क्षेत्रात निश्चित अशा मोठ्या निधीची तरतूद करणं अत्यावश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा करताना आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'कोविड१९ इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स'ची घोषणा केलीय. याद्वारे सर्व घटकांशी संपर्क ठेवून वेळोवेळी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं. 

पण यासंदर्भात अर्थमंत्री सीतारामन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नेहमीप्रमाणेच कोणतेही ठोस मत व्यक्त करणं टाळलं. फक्त याबाबत सरकार योग्य पाऊलं उचलत असल्याचं सांगितलं. खासकरून आरोग्य क्षेत्रासाठी नेमका किती निधी शासनाने बाजूला काढून ठेवलाय हे ना पंतप्रधान स्पष्ट करतात, ना अर्थमंत्री, ना आरोग्यमंत्री! अशा प्रकारच्या विशेष निधींची तरतूद करण्याचा केंद्र शासन अजून तरी नुसता विचारच करत असल्याचं दिसतं.

आणि सध्या कोरोनाचं संकट एवढ्या वेगानं पसरतंय की तिथं अजून ठरवाठरवीच सुरू असेल तर बाब चिंतेची आहे. कारण कोणत्याही संकटाचा सामना करायचा असेल तर त्याविरोधात आपण तेवढ्याच वेगानं कृती केली पाहिजे. जगभरातल्या देशांनी आपण कोरोनाविरोधातल्या लढाईत किती पैसा आणि कसा खर्च करणार हे जाहीर केलंय. पॅकेज जाहीर केलंय. आपल्याकडे अजून अशी कुठलीच घोषणा झाली नाही.

हेही वाचा : 

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक