जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
युरोपाच्या उत्तरेला स्कॅनडेनेविया म्हणून एक भाग आहे. एकसारखी संस्कृती असणारे, एकसारखी भाषा बोलणारे लोक युरोपातल्या या भागात राहतात. डेन्मार्क, नोर्वे आणि स्वीडन असे तीन देश प्रामुख्याने या भागात येतात. अनेकदा आईसलँड, फिनलँड आणि आसपासच्या काही बेटांचाही त्यात समावेश केला जातो. स्वच्छ हवा, प्रदुषणमुक्त जगणं, सुंदर निसर्ग अशा गोष्टींसाठी हा भाग प्रसिद्ध आहे.
यातला आकाराने आणि लोकसंख्येनेही सगळ्यात मोठा म्हणून स्वीडन हा देश ओळखला जातो. स्वीडनचे नागरिक नेहमीच त्यांच्या नव्या विचारासाठी प्रसिद्ध असतात. पण सध्या हा देश चर्चेत आलाय तो कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे.
कोरोना वायरसचा प्रसार थांबवण्यासाठी स्वीडनमधे काही फारश्या उपाययोजना केल्या जात नाहीयत. तिथली सगळी हॉटेलं, शाळा, कॉलेजं चालू आहेत. काही प्रमाणात सोशल डिस्टसिंग पाळून माणसं एकत्र जमायलासुद्धा परवागनी दिलेली आहे. पण ५० पेक्षा जास्त माणसं एकत्र जमायला परवागनी नाही. वृद्धाश्रमातल्या कुणालाही बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या कुणाला आतही येता येणार नाही. म्हाताऱ्या माणसांनाही घरात राहण्याचा सल्ला दिलाय.
कुणी म्हणेल, लॉकडाऊन न केल्यानं देशातल्या लोकांना कोरोना वायरसची लागण होणार नाही का? पण तिथल्या सरकारला हेच तर हवंय! स्वीडनमधल्या अनेक लोकांना कोरोनाची लागण व्हावी हीच तिथल्या लोकांची आणि सरकारची इच्छा आहे. आणि हेच कोरोनाविरोधातल्या लढाईतलं त्यांचं ब्रम्हास्त्र आहे. असा प्रयोग भारतात यशस्वी होऊ शकेल का हे पाहण्याआधी स्वीडनने नेमकं काय केलंय ते पहायला हवं.
हेही वाचा : डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
स्वीडनमधे चाललेला हा एक सामाजिक प्रयोग आहे. असा प्रयोग करणारा स्वीडन हा एकमेव देश असेल. वैज्ञानिक भाषेत या प्रयोगाला हर्ड इम्युनिटी असं म्हणतात. हर्ड म्हणजे कळप किंवा लोकांचा गट आणि इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. थोडक्यात, देशातल्या बहुतांश लोकांची कोरोना वायरसविरोधातली रोगप्रतिकारक वाढवायची आणि रोगाचा प्रसार कमी करायचा, असा प्रयोग स्वीडनने चालवला आहे.
जवळपास शंभर वर्षांपूर्वी हर्ड इम्युनिटी ही संकल्पना जगासमोर आली. पण त्याचा वापर गेल्या १० वर्षांत वाढला. सध्या कोरोना वायरसच्या काळात तर हर्ड इम्युनिटी सगळ्या जगभर गाजली. ‘एखाद्या देशात किंवा समाजात पुरेशा लोकांकडे रोगप्रतिकारक शक्ती असली की त्या साथरोगाचा झपाट्याने प्रसार होत नाही. कारण, त्या आजाराविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती लोकांकडे असल्याने लोक आजारी पडत नाहीत. अशी परिस्थिती आली तर त्या देशात हर्ड इम्युनिटी येते.’ असं वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. पॉल हंटर यांनी डीडब्लू न्यूजच्या एका वीडियोमधे सांगितलंय.
हर्ड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय हे पाहण्यासाठी आपल्याला ऑक्सफर्ड ऍकेडमिक जर्नलमधे प्रसिद्ध झालेला पॉल फाईन, केन ऍम्स आणि डेविड हेमॅन या लंडन स्कून ऑफ हायजीनमधल्या साथरोग विभागातल्या डॉक्टरांचा रिसर्च पेपरचा आधार घेता येईल.
या निबंधात सांगितल्याप्रमाणे, कोरोनासारखा नवा वायरस येतो तेव्हा त्याविरोधातली रोगप्रतिकाक शक्ती जगातल्या कुठल्याच माणसाकडे नसते. त्यामुळे जगातल्या कुठल्याही माणसाला या वायरसची लागण होण्याचा धोका असतो. शिवाय, हे रोग संसर्गजन्य असल्याने एका माणसाकडून त्याची लागण दुसऱ्या माणसांला व्हायला फार वेळ लागत नाही. मग दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे असा हा प्रसार वाढतच जातो. पण या साखळीतला तिसऱ्या किंवा चौथ्या माणसाकडे या वायरसविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती असेल तर वायरसचा प्रसार तिथेच थांबतो.
अशा प्रकारच्या अनेक साखळ्या एकाचवेळी देशात सुरू असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती विकसित केलेला एखाद दुसरा माणूस असून चालत नाही. तर लोकांच्या एका मोठ्या गटाला ती विकसित करावी लागते. तेव्हा देशात हर्ड इम्युनिटी आली, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अशा लोकांचा वापर तो वायरस आणि त्या वायरसची लागण न झालेले, त्याविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती विकसित करू न शकणारे यांच्यामधली ढाल म्हणून करता येतो.
हेही वाचा : कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी
आता रोगप्रतिकारक शक्ती विकसित केलेला गट किती लोकांचा असावा हे त्या वायरसचं संक्रमण किती पटकन होतं यावर ठरतं. रोगाची लागण झालेला एक व्यक्ती एकावेळी किती लोकांपर्यंत या वायरसचा प्रसार करू शकतो हे पहावं लागतं. समजा, ही संख्या दोन असेल, म्हणजे एका व्यक्तीमुळे एकावेळी दोन लोकांना लागण होत असेल तर त्या दोन व्यक्ती पुढे चार लोकांना लागण करतील. त्या चार व्यक्ती पुढे आठ लोकांना लागण करतील आणि अशाप्रकारे प्रसार वाढत जाईल. अशानं एकावेळी १५ जणांना कोरोनाची लागण होते.
आता हर्ड इम्युनिटी मिळवायची असेल तर देशातल्या किमान ६० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण व्हावी लागेल. त्यातले काही मरतील. पण जे वाचतील ते इतर अनेकांना वाचवू शकतील. म्हणजे एका व्यक्तीमुळे दोघांना लागण होत असेल तर त्या दोनपैकी एक व्यक्ती हर्ड इम्युनिटीच्या गटात यायला हवी. दुसऱ्या व्यक्तीकडून पुन्हा ज्या दोन लोकांना वायरसची लागण होईल त्यातल्या एका व्यक्तीकडे हर्ड इम्युनिटी असेल. थोडक्यात, हर्ड इम्युनिटी असणाऱ्या देशात १५ लोकांना कोरोनाची लागण होण्याऐवजी फक्त ४ लोकांनाच होईल.
अशाप्रकारची हर्ड इम्युनिटी आपण याआधीही मिळवल्याचं ऑक्सफर्डमधल्या रिसर्च पेपरमधे लिहिण्यात आलंय. आपल्या लहानपणी असणारे गोवर, गालगुंड, रूबेला, डांग्या खोकला, कांजण्या आणि पोलिओ हे रोग आता सहसा कुणालाही होत नाहीत. याचं कारण, याविरोधातलही हर्ड इम्युनिटी आपण विकसित केली आहे.
ही हर्ड इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती दोनच मार्गांनी मिळवता येते. एकतर, त्या वायरसची लस घेतली असेल तर किंवा त्या वायरसची लागण होऊन आपण त्यातून बरं झालो असू तर. आता हा कोरोना वायरस नवा असल्याने अजूनही या वायरसविरोधातली लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे कोरोना वायरसची लागण होऊन त्यातून बरं होण्याचा एकमेव मार्ग आपल्याजवळ उरतो.
म्हणूनच ही हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या स्वीडनने आपल्या देशात लॉकडाऊन केलेला नाही. लस उपलब्ध नसल्याने जास्तीत जास्त लोकांना कोरोनाचं संक्रमण होऊन ते त्यातून बरे व्हावेत यासाठी स्वीडन प्रयत्न करतो आहे. त्याचे शेजारी म्हणजे, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनी कोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन केलाय. पण लॉकडाऊन ही एक हस्यास्पद गोष्ट आहे, असं स्वीडनचे साथरोगतज्ञ डॉक्टर अन्डर्स टेग्नेल यांनी बीबीसी इंग्लीशला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
कुठल्याही देशात आरोग्य मंत्रालय हे सरकारच्या अधीन असतं. पण स्वीडनमधे ही संस्था स्वायत्त आहे. तिथं त्याला पब्लिक हेल्थ एजन्सी असं म्हणतात. सार्वजनिक आरोग्याबाबतचे सगळे निर्णय या संस्थेकडून घेतले जातात आणि ही संस्था जे निर्णय घेईल ते सरकारला मान्य करावे लागतात. त्यामुळे कोरोनाविरोधातल्या या युद्धात स्वीडनची रणनीती काय असली पाहिजे हे ठरवणारी व्यक्ती म्हणजे हे डॉक्टर अन्डर्स टेग्नेल. पब्लिक हेल्थ एजन्सीचे प्रमुख्य.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
ग्लोव घातल्याने कोरोना वायरसपासून संपूर्ण संरक्षण होतं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
आपण लॉकडाऊनच्या माध्यमातून संक्रमण थांबवण्याचा विचार केला तरी कधी न कधी लॉकडाऊन काढावा लागणार. आणि लॉकडाऊन काढल्यावर पुन्हा कोरोनाचं संक्रमण सुरू होणार. त्यामुळे हर्ड इम्युनिटी हाच वायरसला थांबवण्याचा जालिम उपाय आहे, असं डॉक्टर अन्डर्स टेग्नेल यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी स्वीडनने केलेल्या या प्रयोगात अत्यंत जोखीम आहे. अनेकांनी स्वीडनच्या या प्रयोगावर टीकाही केलेली आहे.
वर्ल्डओमीटर या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रात्री १० वाजेपर्यंत स्वीडनमधल्या २५,२६५ लोकांना कोरोनाची लागण झालीय. त्यातले ४९७१ लोक बरे होऊन घरी गेलेत तर ३१७५ लोकांचा मृत्यू झालाय. या मृतांपैकी ८० टक्के लोकांचं वय ७० वर्षांपेक्षा जास्त होतं. स्वीडनचा हा प्रयोग यशस्वी होतोय, असं म्हटलं जातंय.
भारताची सद्य स्थिती आणि लॉकडाऊनमधेही बाहेर फिरणारी माणसं पाहता भारताने अनौपचारिकपणे हा प्रयोग चालू केलाच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण तसा कोणताही अधिकृत निर्णय सरकारने घेतलेला नाही. मात्र, ब्लूमबर्ग या वेबसाईटवरच्या एका लेखात सांगितल्याप्रमाणे, भारतात ९३.५ टक्के लोक ६५ पेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळेच जास्तीत जास्त तरूण लोकसंख्या असणाऱ्या या देशात हर्ड इम्युनिटीचा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे.
‘कुठल्याही देशाला खूप काळ लॉकडाऊन चालू ठेवणं परवडणारं नाही. भारतासारख्या देशाला तर नाहीच नाही. म्हाताऱ्या लोकांना कोरोनाचं इन्फेक्शन होऊ न देता भारतात हर्ड इम्युनिटी मिळवणं शक्य आहे. हर्ड इम्युनिटी मिळाली तर साथरोगाचा प्रसार थांबेल आणि आपल्याकडची वृद्ध माणसंही सुरक्षित राहतील,’ अशी प्रतिक्रीया ब्लूमबर्गच्याच लेखात साथरोगतज्ञ जयप्रकाश मुलीयील यांनी दिलीय. हर्ड इम्युनिटीचा प्रयोग भारताने सुरू केला तर नोव्हेंबरपर्यंत भारतातल्या ६० टक्के लोकांकडे रोगप्रतिकारक शक्ती आलेली असेल असं ब्लूमबर्गच्या एका अहवालातंही सांगण्यात आलंय.
स्वीडनमधे हा प्रयोग यशस्वी करण्यामागे तिथल्या नागरिकांचंही मोठं योगदान आहे. स्वीडनमधल्या नागरिकांना सरकारवर आणि सरकारला त्यांच्या नागरिकांवर पूर्णपणे विश्वास आहे. म्हणूनच एकमेकांपासून अंतर ठेवून चाला असा कोणताही नियम तिथल्या सरकारनं केलेला नाहीय. हा सल्ला तिथल्या लोकांना दिलाय आणि लोकं हा सल्ला पूर्णपणे पाळताना दिसतायत. शिवाय, स्वीडनमधलं सार्वजनिक आरोग्य हे कुठल्याही राजकीय नेत्याच्या नाही तर प्रत्यक्ष डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्याच हातात आहे. त्यामुळे हर्ड इम्युनिटीचा प्रयोग स्वीडनसारख्या देशात यशस्वी झालाही असेल.
पण स्वीडनच्या तुलनेत भारताची स्थिती पाहता असा प्रयोग भारतात यशस्वी होऊ शकेल का? इथल्या मोठ्या लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली तर त्या सगळ्यांवर हॉस्पिटलमधे चांगले उपचार करून त्यांचा जीव वाचवण्याची, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता भारताकडे आहे का? भारतातले राजकारणी वैज्ञानिक आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत.
हेही वाचा : विमान कंपन्यांना भवितव्य नाही, गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफेट यांचं स्पष्टीकरण
भारतातली कोरोनाबाधितांची आकडेवारी युरोपीयन देशांपेक्षा कमी वाटत असली तरी लोकांची तपासणी करण्याच्या बाबतीत भारत सगळ्यात मागे आहे, हेही समजून घ्यावं लागेल. द फॉरेन पॉलिसी या वेबसाईटवरच्या एका लेखानुसार, भारतात दर १ लाख लोकांमागे फक्त ६९४ टेस्ट उपलब्ध आहेत. १ हजार लोकांमागे हॉस्पिटलमधे ०.५५ बेड आणि १.३ बिलीयन लोकसंख्येसाठी फक्त ४८ हजार वेंटिलेटर्स उपलब्ध असताना कोरोना सारख्या मोठ्या संकटाचा सामना भारत कसा करू शकेल असा प्रश्न अनेक तज्ञांना पडलाय.
भारतात हर्ड इम्युनिटीचा प्रयोग का यशस्वी होऊ शकणार नाही याची तीन कारणं फॉरेन पॉलिसीच्या लेखात दिलीयत. पहिलं, कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड १९ या आजाराबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळालेली नाही. त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती किती लागते आणि ती किती काळ टिकते हेही आपल्याला माहीत नाही. या प्रश्नांवर भारतातच नाही तर जगभर संशोधन होतंय. पण अजून ठोस उत्तर आपल्या हातात पडलेलं नाही.
दुसरं, भारताकडे तरूणांची लोकसंख्या जास्त आहे म्हणून त्यांना हर्ड इम्युनिटीचा प्रयोग करण्याचा सल्ला दिला गेला असला तरीही त्यातली गुंतागुंत समजून घ्यायला हवी. भारतातल्या २० ते ४४ या वयोगटातल्या २२ टक्के लोकांना हायपरटेन्शनचा, ४ टक्के लोकांना डायबेटीसचा त्रास आहे. भारतातले अनेक तरूण एचआयवी वायरससह जगतात. अनेकांना अस्थम्याचा त्रास आहे. शिवाय, दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसनं असणारे तरूणही भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे हर्ड इम्युनिटीच्या प्रयोगात अनेक तरूणांचा जीव जाण्याची शक्यता आहे.
तिसरं, फक्त हर्ड इम्युनिटी लागू केल्याने काम संपणार नाहीय. त्यासाठी तितक्या प्रमाणात आरोग्य सेवा उभाराव्या लागतील. सार्वजनिक आणि खासगी आरोग्य सेवांमधे समन्वय साधावा लागेल. शिवाय, म्हाताऱ्या माणसांना लोकसंख्येतून वेगळं करणं आणि संपूर्ण लोकसंख्येला सोशल डिस्टन्सिंग पाळायला लावणं भारताला शक्य नाही. अशा परिस्थितीत हर्ड इम्युनिटीचा प्रयोग करणं म्हणजे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतातलं ‘जो ताकदवान तोच जगणार’ हे दुष्ट तत्त्व वापरणं. म्हणूनच हर्ड इम्युनिटी हे भारतासाठी कोरोनाविरोधातल्या युद्धात ब्रम्हास्त्र ठरू शकत नाही.
हेही वाचा :
‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच
महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं
कोरोनावरचा उपाय म्हणून वायरल होणाऱ्या ५ गोष्टींमागचं अर्धसत्य
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?
कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट
आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं