बॉटलबंद फ्रूट ज्यूस पिणं खरंच हेल्दी आहे की तब्येतीची वाट लागते?

०८ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणून कोल्ड ड्रिंकऐवजी डाएट कोल्ड ड्रिंक पिऊ लागलो. पण त्याची चव काही अनेकांना आवडली नाही. मग बाजारात फ्रूट ज्यूस आला. आणि त्यामुळे फ्रूट ज्यूसचं मार्केटही वाढलं. पण महत्त्वाचं म्हणजे या फ्रूट ज्यूसमधे खरीखुरी फळचं वापरलेली नसतात.

आपण लहान असताना फ्रिज उघडायला, गारेगार पाणी प्यायला किंवा बर्फाचा तुकडा काढून खायला आपल्याला खूप आवडत होतं. पण आईबाबा सारखं थांबवायचे. मोठं झाल्यानंतर आपल्याला फक्त फ्रिजमधलं पाणी आणि कोल्डड्रिंक पिण्याची सवय लागली.

कोल्डड्रिंक नाही फ्रूट ज्यूस

पूर्वी आपण फक्त पाहुण्यांसाठी किंवा बाहेर हॉटेलमधे गेल्यावर किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधेच कोल्ड ड्रिंक असायचं. पण नंतर आपण रोजच पिऊ लागलो. घरी आलेल्या पाहुण्यांनाही चहापेक्षा कोल्ड ड्रिंक देण्याचा ट्रेंड आला. हा ट्रेंड फक्त उन्हाळ्यापुरता नव्हता. तर आपण वर्षाचे १२ महिने कोल्डड्रिंक पिऊ लागलो. पण सध्या ट्रेंड बदलतोय.

आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार आपणही सतत ट्रेंडनुसार बदलतो. सध्या आपल्या अनेक हेल्थ इशूजमुळे हेल्दी गोष्टी करतोय. त्यातच आपण कोल्ड ड्रिंक अर्थात सॉफ्टड्रिंक कमी करून पॅक्ड फ्रूट ज्यूस पिण्यावर भर दिलाय. आणि नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार भारतात पॅकेज्ड ज्यूसची विक्री मार्च २०१९ पर्यंत ४० टक्क्यांवर गेलीय. म्हणजेच लोक अधिक हेल्दी पर्यायाकडे वळतायत.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

कोल्ड ड्रिंक पिण्याने काय होतं?

राज्याच्या अन्न सेवा आणि शेती विभागाचे सहाय्यक संचालक रितेश शुक्ला यांनी अलीकडेच एक वार्षिक अहवाल सादर केलाय. या अहवालातल्या माहितीनुसार, भारतात पॅकेज्ड ज्यूसचं मार्केट वाढू लागलंय. सुरवातीला फक्त २ टक्के खप होत होता. २०११ मधे हा खप १२ टक्के, २०१५ मधे १६ टक्के तर २०१८ मधे २९ टक्क्यांवर गेलाय. आणि २०१९ मधे विक्री ११ टक्क्यांनी वाढलीय. याचा अर्थ एकूण उत्पन्न १ हजार १०० कोटींचं झालंय.

याबद्दल मार्केट रिसर्च करणाऱ्या रिसर्च अँड मार्केट्स कंपनीच्या वरिष्ठ संस्थापक लॉरा वुड 'कोलाज'शी बोलताना म्हणाल्या, जगात पहिल्यांदा १६७६ ला पॅरिसमधे लिमोनाडियर हे कोल्डड्रिंक आलं. ते लिंबापासून बनवलं होतं. भारतात पार्ले कंपनीने १९७० मधे लिम्का आणलं. या ड्रिंक्समधे सोडा असतो. कित्येकदा त्यात आर्टिफिशिअल फ्लेवर टाकले जातात. ड्रिंक पूर्णपणे साखरेचं असतं. तसंच आर्टिफिशिअल स्वीटनरही टाकलं जातं. त्याचबरोबर फॉस्फरिक अँसिड आणि कॅफेन असतं. याचे दुष्परिणाम गेल्या १५ वर्षांमधे आपल्याला दिसलेत. म्हणूनच ज्यूसकडे लोक वळलेत. त्यामुळेच एकूण जगातही पॅकेज्ड ज्यूसच्या व्यापारात २ टक्क्यांनी वाढ झालीय.

कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंकमधले सर्वच घटक हे शरीरासाठी घातक असतात. सातत्याने हे ड्रिंक पित असल्यास लठ्ठपणा, पचन प्रक्रियेत बिघाड, मधुमेह, दातांचे आजार तसंच लिवरमधे बिघाड, कॅन्सर आणि हृद्यरोग होण्याच्या शक्यता वाढतात, असं डायेटिक क्लिनिकच्या संचालक आणि आहारतज्ज्ञ शीला शेहरावत यांनी सांगितलं.

हेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

फ्रूट ज्युसपेक्षा फळंच चांगली

आता आपण फ्रूट ज्यूसकडे वळलो आहोत खरे पण हे ज्यूस खरंच हेल्दी असतं का? जेव्हा १०० टक्के रिअल फ्रूट ज्यूस म्हणतात तेव्हा त्यात फक्त २५ टक्के फ्रूट असतं. आपल्या शरीरासाठी आर्टिफिशिअल फ्लेवर, कलर, स्विटनर आणि प्रिझर्वेटीव हे घातक असतात. आणि तेच नेमकं या ज्यूसमधे असतात.

कित्येकदा ज्यूसच्या पॅकवर नो प्रिझर्वेटीव असंसुद्धा लिहिलेलं असतं. अशावेळी त्यातला ऑक्सिजन काढलेला असतो. ज्यामुळे ज्यूसमधे असणारे चांगले घटक आणि फळांचे गुणधर्म मरून जातात. तसंच काही ज्यूसमधे फळांचे कण, तुकडे असतात. पण ती फळं वॅक्युम ड्राय करून टाकतात. जेणेकरून ज्यूस दीर्घकाळ टिकेल. पण यामुळेसुद्धा फळांचे गुण उरत नाहीत.

या ज्यूसमधे फळांमधून मिळणारं लोह, प्रोटीन, विटॅमिनपेक्षा कॅलरीजच जास्त असतात. कॅलरी दोन प्रचारच्या असतात. गुड आणि बॅड कॅलरीज. पॅकेज्ड ज्यूसमधे मात्र बॅड कॅलरीज असतात. एका सफरचंदात ७८ कॅलरीज मिळत असतील तर १०० मिलिलिटरच्या पॅकेज्ड ज्यूसमधून १२० कॅलरीज आपल्या पोटात जातात. अशावेळी शेहरावत सल्ला देतात की, वेळ मिळाला तर घरी ज्यूस बनवून प्या. किंवा फळं कॅरी करून फळच खात जा.

हेही वाचा: 

एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल

आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे