राजकारण हा खरंच तत्त्वशून्य व्यवसाय असतो का?

१५ जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितीन प्रसाद भाजपचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. पण काँग्रेसच्या विचारधारेला तिलांजली देत त्यांनी भाजपमधे प्रवेश केला आणि ज्यांच्यावर कठोर टीका केली त्यांचे गोडवे गायला लागले. त्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. शशी थरुर यांनी काही मुलभूत पण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. ‘द क्विंट’वर आलेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट.

आपले ज्येष्ठ बंधू ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमधे प्रवेश केल्यानंतर वर्षभरातच जितीन प्रसाद यांचा भाजपात जाण्याचा निर्णय अत्यंत भयावह आहे. कोणतीही व्यक्तिगत कटुता न बाळगता मी हे विधान करतोय. हे दोघेही माझे मित्र होते. ते माझ्या घरी आलेत. मी त्यांच्या घरी गेलोय. जितीनच्या तर लग्नालाही मी हजर होतो. त्यामुळे माझ्या विधानात वैयक्तिक असं काही नाही. कोणाच्या व्यक्तिगत आवडीनिवडीशी याचा काही संबंध नाही. त्यांच्या कृत्यामुळे मला वाटणाऱ्या निराशेचं कारण अधिक व्यापक आहे.

या दोघांनाही प्रिय अशा 'भारता'ला भाजप आणि त्यांच्या कट्टर धर्मांधतेच्या धोक्याविरुद्ध सजग करण्यासाठी प्रखर आणि प्रभावी आवाज उठवणाऱ्यांत हे दोघे आघाडीवर असायचे. इतर कोणाहीपेक्षा तीव्र स्वरात ज्या रंगांची सतत निर्भत्सना करत तेच रंग ते आज मोठ्या आनंदाने मिरवताना दिसतायत.

यातून हाच प्रश्न निर्माण होतो की ही माणसं प्रतिनिधित्व तरी कशाचं करतात? कोणत्या श्रद्धा आणि मूल्यांच्या आधारे त्यांचं राजकारण चालतं? की निव्वळ वैयक्तिक प्रगती आणि सत्ताप्राप्ती यासाठीच ते राजकारणात आहेत? राजकारण हा एक तत्त्वशून्य व्यवसाय असतो का?

हेही वाचा: नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

पक्ष म्हणजे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा?

राजकारण हे तत्त्वांचंच असायला हवं. नाहीतर ते अर्थहीन होतं. विशिष्ट तत्त्वं, श्रद्धा यांचा संबंध नसलेल्या व्यवसायातच कुणाला रस असेल तर त्याला बँकर होता येईल. वकील किंवा अकाऊंटंट बनून चार पैसे मिळवता येतील किंवा सीईओ होऊन सत्ताही गाजवता येईल. एखाद्या डिटर्जंटने कपडे नीट स्वच्छ केले म्हणजे झालं. त्या डिटर्जंट कंपनीच्या व्यवस्थापकाची विचारसरणी काय आहे याच्याशी मग कुणाला देणंघेणं नसतं.

राजकारणाचं तसं नसतं. प्रत्येक राजकीय पक्षाची परिपूर्ण समाजाची आपली म्हणून एक कल्पना असते. ही कल्पना प्रत्यक्षात आणायला तो पक्ष कटिबद्ध असतो. आपल्या कल्पनेतला समाज कसा घडवायचा, आपला पक्ष कसा चालवायचा याबद्दलच्या निश्चित  धोरणांनुसार प्रत्येक पक्ष कार्यरत असतो. ही त्या पक्षाची विचारसरणी असते.

एखादा नवपदवीधर आपल्याला सर्वात चांगला पगार आणि सोयी देते ती कंपनी निवडतो. आपण राजकारणात जातो तेव्हा पक्ष निवडताना असा विचार नाही करत. आपल्या मनोभूमिका, जीवननिष्ठा पुढे नेणारा पक्ष आपण निवडतो.

आपण निवडतो तो पक्ष केवळ आपल्या वैयक्तिक आकांक्षांच्या परिपूर्तीसाठीची संघटनात्मक चौकट  नसतो. आपल्या राजकीय वाटचालीत जी तत्त्वं, श्रद्धा आणि ज्या धारणांचा पुरस्कार आणि रक्षण करायला आपण कटिबद्ध असतो त्यांचं प्रतिबिंब आपल्याला पक्षात दिसत असतं.

राजकारण मॅचसारखं नसतं

राजकारण म्हणजे काही आयपीएलची मॅच नाही की यावर्षी एका टीमकडून तर पुढच्या वर्षी दुसऱ्या टीमकडून खेळावं. कोणत्याही दोन आयपीएलच्या टीममधे नाव, युनिफॉर्म आणि निवडलेले खेळाडू सोडले तर इतर काहीच फरक नसतो. राजकीय पक्षांमधे मात्र धोरणं, तत्त्वं, श्रद्धा या महत्त्वाच्या गोष्टी असतात.

एकतर तुम्हाला सार्वजनिक क्षेत्राला जास्त वाव असावा असे वाटू शकतं किंवा सगळे उद्योग सरकारी बंधनातून पूर्णतः मुक्त असावेत असं तुमचं मत असू शकतं. एकतर सर्वसमावेशक समाज ही तुमची निवड असते किंवा मग जातीधर्मात विभागलेला समाज तुम्हाला हवा असतो. एकतर वंचितांचं नीट रक्षण होईल अशी कल्याणकारी राज्यव्यवस्था तुम्ही निर्माण करु इच्छिता किंवा प्रत्येकाने आपापलं पहावं, राज्याने त्यात सहभागी होऊ नये असं वाटतं. हे परस्परविरोधी आहे.

आयपीएलप्रमाणे अधिक संधीच्या फायद्यासाठी एका टीममधून दुसऱ्या टीममधे उडी मारणं राजकारणात मुळीच ठीक नसतं. आयपीएलमधे आपली टीम टूर्नामेंटमधे काही चमकदार कामगिरी करत नाहीय किंवा व्यवस्थापन आपल्याला योग्य स्थानावर बॅटिंगला पाठवत नाहीय म्हणून तुम्ही दुसरी टीम शोधू लागला तर कुणी तुम्हाला दोष देणार नाही. चांगली संधी मिळते तिथं चषक जिंकण्याची आणि इतर फायदे आपल्याला मिळण्याची अधिक शक्यता वाटते तिथे जाण्याचा खेळाडूचा हक्क सर्वमान्य असतो.

हेही वाचा: महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

विचारसरणी राजकारणाचा भाग

राजकारणात मात्र हा मार्ग योग्य नसतो. इथं टीमच्या ध्येयधोरणांवर तुमची श्रद्धा असते म्हणून तुम्ही टीममधे असता. आपल्या टीमची कामगिरी कितीही खराब होते आहे असं तुम्हाला वाटो, ती तुमची टीम असते. तुमचे सिद्धांत, तुमची मूल्यं यांचं ते मूर्त रुप असतं.

कॅप्टन तुम्हाला कितीही वाईट वागणूक देत असो, तुमच्या धारणांच्या विरोधी धारणा जोपासणाऱ्या कॅप्टनला आपली निष्ठा तुम्ही वाहूच शकत नाही. याचं कारण अगदी उघड आहे. तुमची विचारसरणी हा तुमच्या राजकारणाचा इतका अंगभूत भाग असतो की ती अशी झटकून टाकायला तुम्ही धजावूच शकत नाही.

तर आत्मसन्मानही शाबूत राहील

अर्थात हेही खरं की पक्ष म्हणजे काही निव्वळ  तुमच्या तत्वांवर आधारित पवित्र संस्था नसते. हाडामांसाच्या माणसांनी मिळून बनलेली ती एक संघटनासुद्धा असते. माणसंच ती चालवतात. आपापले पूर्वग्रह, दोष आणि उणिवा असलेली माणसं. पक्षाची धोरणं तुम्हाला मोलाची वाटणारी असली तरी योग्य रीतीने ती मतदारांना पटवण्यात तुमचा पक्ष कमी पडत असेल. कदाचित पक्ष इतक्या अकार्यक्षमतेने चालवला जात असेल की धोरणं योग्य असूनही तुमचा  पक्ष निवडणूक मात्र कधीच जिंकू शकणार नाही.

अशा काही कारणांमुळे सोडावा हा पक्ष अशी भावना तुमच्या मनात येऊ शकेल. पण मग तुमचा  आत्मसन्मान शाबूत असेल, आजपर्यंत ज्या विचारसरणीच्या आधारे आपण प्रवास केला त्या विचारसरणीविषयी तुमच्या मनात काही सन्मान शिल्लक असेल तर समान किंवा तत्सम  विचारसरणीच्या एखाद्या अन्य पक्षात तुम्ही जाल किंवा तुमचा स्वतःचाच पक्ष काढाल. अगदी सुसंगत विचारसरणीचा एखादा प्रादेशिक पक्ष तुम्ही निवडाल. तुमच्या अगदी विरोधी विचारसरणी असलेल्या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षात तुम्ही मुळीच शिरणार नाही.

पूर्वीच्या काळात राजकारणात आलेल्या बहुसंख्य लोकांचा विचार असाच होता. आपले मूळचे पक्ष सोडले त्यांनी, फूट पाडली किंवा अन्य पक्षात विलीन झाले. काही स्वतःचाच स्वतंत्र पक्ष काढते झाले. आपल्या मूळ श्रद्धा मात्र त्यांनी कधी सोडल्या नाहीत.

हेही वाचा: वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?

बस पक्ष जिंकणारा हवा

पण गेल्या काही वर्षात व्यावसायिक महत्त्वाकांक्षा असलेल्या राजकारण्यांचा उदय होत असलेला आपण पाहतोय. एखादं ध्येय बाळगून नाही तर व्यवसाय म्हणून राजकारणात येतात. आपली वैयक्तिक घोडदौडीपुढे तत्त्वं, उर्मी या गोष्टींना त्यांच्या लेखी  फारशी किंमत नसते.

कोणत्याही कारणाने का असेना एखाद्याने निवडलेला पक्ष अपयशी होऊ लागला तर त्याला पुन्हा यश मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ काळ कराव्या लागणाऱ्या  कठोर संघर्षाला त्याची तयारी नसते. 'माझा विश्वास कोणत्या मूल्यांवर आहे?' याची नाही तर 'यातून माझ्या वाट्याला काय येणार आहे?' याची त्याला जास्त फिकीर असते.

पराभव आणि पुनरुत्थान या राजकारणाच्या आलटून पालटून होणाऱ्या प्रक्रियेसंदर्भातही त्याला धीर धरवत नाही. तो राजकारणात पुढेपुढे जाऊ इच्छित असलेला एक व्यावसायिक असतो. उच्च ध्येय, मूल्यांचा आणि सिद्धांतांचा पुरस्कार आणि त्यांचं रक्षण या प्रेरणा त्याला खुणावत नाहीत. स्वतःला याहून मोठं पद केव्हा मिळेल याकडेच त्याचं लक्ष असतं. आणि ते पद त्याला लगेचच्या लगेच हवं असतं. दीर्घकालीन भविष्यासाठी प्रतीक्षा करण्याची त्याची तयारी नसते.

आपल्या देशातले राजकारणी आता येत्या निवडणुकीपलीकडे पाहूच शकत नाहीत. ती त्यांची जन्मजात उणीव बनलीय. ज्या पक्षात ते आहेत तिथे जर त्यांना स्वतःचं भवितव्य सुरक्षित दिसलं नाही तर दुसऱ्या बाजूला जाताना त्यांना मुळीच अपराधी वाटत नाही. तो जिंकणारा पक्ष असला म्हणजे झालं.

राजकारण कशासाठी करायचं?

काही वेळा या राजकारण्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही आज जे बोलत आहात त्याच्या नेमके विरोधी बोलतानाचा जुना वीडियो किंवा बातमी तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला थोडी लाजबीज वाटते का हो? की आपली मूळ विचारधारा आपण टाकून दिली या गोष्टीची मनाला टोचणी लागू न देता पूर्वी आपण जितक्या प्रभावीपणे व्यक्त झालो तितक्याच प्रभावीपणे आताही व्यक्त होत आहोत याबद्दल तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेता?

कोणत्या प्रलोभनापोटी जितीन प्रसाद आज भाजपात गेले याविषयीचे अनेक अंदाज विविध माध्यमांतून सांगितले जातील. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. राजकारण करायचं कशासाठी? जितीन यांचं उत्तर हे मुळीच योग्य उत्तर नाही असं मला वाटतं.

हेही वाचा: 

राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण

हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!

कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?

लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच

'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!