कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय.
मेड अर्काईव अमेरिकेतलं एक महत्वाचं मेडिकल जर्नल. आरोग्यविषयक वेगवेगळी संशोधनं इथून प्रकाशित केली जातात. सध्या कोरोना वायरसमुळे अशा जगप्रसिद्ध वेबसाईट, जर्नल नेमकं काय म्हणतायत याकडे जगाचं लक्ष लागलेलं असतं. अशातच यावर्षीच्या जानेवारी महिन्यात कोरोना वायरस हवेतून पसरत असल्याचं एक संशोधन जर्नलमधून प्रकाशित करण्यात आलं.
महत्वाचं म्हणजे भारतातल्या सेंटर फॉर सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायल टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं होतं. हवेतल्या काही नमुन्यांमधे त्यांना हा वायरस आढळून आला. त्यानंतर 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन' अर्थात डब्ल्यूएचओनं केलेल्या अशाप्रकारच्या एका संशोधनातूनही ही गोष्ट पुढे आली. त्यामुळे काळजीत भर पडली.
अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं तिथल्या स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझरचं मशीन बनवलंय. हे मशीन कोरोना वायरसचे हवेतले कण तिथल्या तिथे नष्ट करत असल्याचं म्हटलं जातंय.
कोरोना वायरसनं गेल्यावर्षी जगभरातल्या अनेक देशांना तडाखा दिला. सुरवातीला ज्यांना त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला त्यात चीनच्या बरोबरीनं इटलीचं नाव घेतलं जायचं. इटली हे युरोपातलं कोरोना वायरसचं केंद्र बनलेलं होतं. पण त्याचवेळी इटलीमधली कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी, वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे हा देश जगभर एक मॉडेल म्हणून उभा होता.
त्याच इटलीतल्या 'इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी' अर्थात आयसीजीईबी आणि 'एल्टेक के-लेझर' नावाच्या एका स्थानिक कंपनीनं एकत्र येत लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून एक लेझर मशीन बनवलंय. पण केवळ चार भिंतींच्यामधेच ही मशीन काम करेल.
बंद खोलीतल्या हवेचा लेझरच्या किरणांशी संपर्क आल्यामुळे वायरस किंवा बॅक्टेरिया जागच्या जागी नष्ट होतील असं हे मशीन बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ५० सेकंदामधे वायरस मारायची क्षमता या मशीनमधे असल्याचा दावा आयसीजीईबीमधे वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या सेरेना झकीनिया यांनी केलाय.
हेही वाचा: तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
इटलीच्या 'एल्टेक के-लेझर' या कंपनीला ही मशीन बनवायचं पेटंट मिळालंय. त्यामुळे हे मशीन आता जगभर पोचेल. फ्रान्सिस्को जनाटा हे या कंपनीचे संस्थापक आहेत. या मशीनची उंची ५ फूट ९ इंच असून वजन जवळपास २५ किलोग्रॅम इतकं आहे. जिथं एसी आहे अशा ठिकाणीही ही मशीन ठेवता येणं शक्य आहे असं कंपनीचं म्हणणं आहे.
मशीनचं लायसन्स घेण्यासाठी म्हणून अनेक कंपन्या पुढे येतायत. असं असलं तरी या मशीनमुळे वायरस किंवा बॅक्टेरिया केवळ हवेतल्या हवेत मारला जाईल. ते इतरत्र कुठं असतील तर हे मशीन काम करणार नाही असंही म्हटलं जातंय. आपण एखाद्याशी बोललो आणि त्यामुळे वायरसचा संसर्ग होत असेल तर हे मशीन उपयोगाचं नाही.
अनेक आजारांमधे लेझर ट्रीटमेंट घेतली जाते. त्याचे अनेक परिणामही होतात. सध्याचं मशीन केवळ चार भिंतींच्या आत काम करेल. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञ यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याकडे बोट करतायत. या मशीनमधून चार भिंतींच्या आत जी काही लेझर किरणं बाहेर पडतील त्यामुळे त्वचा, डोळ्यांना इजा पोचेल असं म्हटलं जातंय.
कोरोना वायरस मारण्यासाठी ही पद्धत योग्य नसल्याचं अनेक शास्त्रज्ञ म्हणतायत. जर्नल ऑफ फोटोकेमेस्ट्री अँड फोटोबायोलॉजीमधे गेल्यावर्षी नोव्हेंबरला एक रिसर्च संशोधन आलं होतं. यात लेझर मशीननं कॅन्सरसारखा आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो असं म्हटलं गेलं. ही माहिती डी डब्ल्यूडी या वेबपोर्टलवर वाचायला मिळते.
शास्त्रज्ञांनी या धोक्याकडे लक्ष वेधलं असलं तरी आयसीजीईबीच्या सेरेना झकीनिया आणि एल्टेक जनाटा यांनी असे काही धोके नसल्याचं म्हटलंय. ही मशीन मानवी त्वचेवर कोणताही परिणाम करत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तसंच ती १०० टक्के सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
हेही वाचा:
कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल
पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो