अर्णब घाबरू नकोस, जेएनयू तुझ्या सोबत आहे!

०६ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत.

रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना ४ नोव्हेंबरच्या सकाळी अलिबागमधून अटक करण्यात आली. २०१८ मधल्या अन्वय नाईक प्रकरणात ही अटक झालीय. या आर्किटेक्टला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप गोस्वामी त्यांच्यावर आहे. अटकेनंतर जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि मानवी हक्क कार्यकर्ते अविनाश पांडे यांनी अर्णब गोस्वामींना संबोधित करणारं एक फेसबूकवर प्रसारित केलं. त्या पत्राचा रेणुका कल्पना यांनी केलेला अनुवाद इथे देत आहोत - 

तुझ्या अटकेची बातमी मिळाली अर्णब गोस्वामी. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. इतका अपमान? अशी हाणामारी? इतकी धक्काबुक्की?

हो अर्णब, आम्ही तुझ्यासोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत. आठवत असेलच ना? द्वेष तर तू सतत भडकवत होतास. तुझ्या समांतर कोर्टात स्वतःच वकील, स्वतःच न्यायाधीश बनून आम्हाला देशद्रोही घोषित केलं होतंस. लोकांना आमच्याविरोधात भडकवलं होतंस. 

तुझ्या या डमी कोर्टात तू आम्हालाही बोलावलं होतंस, तेही कित्येक वेळा! हे मी नाकारणार नाही. पण तिथे बोलू काहीच दिलं नाहीस. मग आम्ही येणंच बंद केलं. तू लोकांना भडकवत राहिलास. भर कोर्टात आमच्यावर हल्ले झाले. तरीही आम्ही आरोपीच होतो. आजही तेच आहोत.

तू आणखी शिकार निवडत राहिलास. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल वाट्टेल ते!

हेही वाचा : नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

आत्ता सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणातही तू हेच केलं होतंस ना, अर्णब? सुशांतच्या हत्येविषयी तर तुझ्याकडे सगळे पुरावे होते आणि त्यातल्या रिया चक्रवर्तीच्या सहभागाविषयीही. तुझ्या आणि तुझ्या मागे असणाऱ्या शर्मा, कुमार, चौधरी यांनी मिळून सीबीआय, ईडी, एनसीबी आणि अजून काय काय सोडलंत तिच्या मागे! आणि तुझे कॅमेरामॅन कम गुंडे, ते तर तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, ते वेगळंच. कोर्टात तिची सुनावणी होती, तेव्हा तुझ्या गुंडांनी जवळपास तिचं लिंचिंगच केलं होतं. तिच्या सोबत लैंगिक हिंसाही केली होती.

पण एक गोष्ट सांगू अर्णब? त्या मुलीचा चेहरा अजूनही आठवतोय. इतकी हिंसा होत असतानाही तुझ्या गुंडांच्या नजरेत नजर घालून पाहणारे तिचे डोळे. भावनाहीन पण तणावग्रस्त चेहरा. निर्भय आणि आव्हान देणारा. जेलमधे जाताना ती हसतही होती. तुझ्या गुंडांकडे पाहून हातही हलवला होता. महिनाभर आत राहिली होती.

पण अर्णब, तू तर फारच भित्रा निघालास. फारच छोटा आहेस तू. मला वाटलं होतं की आपल्या स्टुडियोतून तू ओपन चॅलेंज देतोस तसंच आव्हान पोलिसांना देशील – आ जा उद्धव, आ जा परमवीर. पण तुझा तर धड आवाजाही फुटत नव्हता. तू विनवणी करत होतास, ‘सोशल डिसन्सिंग ठेवा, मी तुम्हाला विनंती करतो. आय रिक्वेस्ट यू!’ तू तर आत्तापर्यंत कुणालाही कधीही विनवणी केली नव्हतीस. तुझ्याकडून इतक्या भित्रेपणाची अपेक्षा नव्हती. तुला रियाकडूनच शिकायची गरज आहे.

कसंय की तुझी सगळी सावजं जमिनीतल्या लढाईतून वर आलेत, पोलिसांशी संघर्ष करत मोठी झालीत. आमचे उमर खालिद, सुधा भारद्वाज, कन्हैया कुमार यांच्या डोळ्यात भीती नसणं समजून घेता येतं. रिया चक्रवर्ती तर आमच्या जगापासून अतिशय वेगळी. बॉलिवूड सारख्या श्रीमंत, सुरक्षित क्षेत्रातून आलेली. तीही घाबरली नाही. सामोरी गेली. तिच्या वडलांवर, इंडियन एयर फोर्सच्या ऑफिसावर तुझ्या गुडांनी हल्ला केला. तेव्हा वाटलं होतं, आता ती मोडून पडेल. पण ती वाकली नाही.

तू तर किती आठवड्यांपासून स्टुडियोमधून ओरडत होतास की मी आर्मी ऑफिसरचा मुलगा आहे. खरंच आहेस का रे? रियाने तर ते सिद्ध केलं. तू मात्र विनवणी करण्यात काहीही कमतरता ठेवली नाहीस, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, औषध घेऊ द्या, सासूसासऱ्यांशी बोलू द्या, बायकोशी बोलू द्या! तुझा आवाज एकदाही वाढला नाही. आपल्या स्टुडियोत तर हर कुत्ता शेर होता हैं. पण निदान असं लाचार तरी व्हायचं नव्हतं! इज्जतीत पोलिसांबरोबर जायला हवं होतं. ती हिम्मत फक्त डॉक्टर काफील खान यांच्याकडे होती. त्यांना तर रस्त्यावरच्या कोणत्याही संघर्षाचा अनुभव नव्हता. त्यांचे वडील तर सैन्यातही नव्हते.

एक गोष्ट सांगू? तू सारखं सारखं सांगत होतास, तुझ्या बायकोशी वाईट वर्तणूक केली. तुझ्या मुलांना मारलं, वगैरे. त्यावर खूप म्हणजे खरंच खूप दुःख दाखवण्याचा प्रयत्न केलास. मला त्यांचा आनंद तर झाला नाहीच, पण तुझ्या मुलासाठी वाईटही नाही वाटलं रे, अर्णब. किती खाली खेचलंस तू स्वतःला आणि तुझ्यासोबत आम्हालाही!

हेही वाचा : ३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा!

मी स्वतः विद्यार्थी राजकारणात होतो. पोलिसांच्या मारहाणीचा बळी ठरलोय. मग मानवी हक्कांसाठी काम करायला सुरवात केली. मी वेदना पाहिलीय. स्वतःला काहीतरी वीआयपी म्हणवून घेत तू सतत विनंत्या करत होतास. मला पोलिसांचा दुष्टपणा चांगलाच माहितीय. 

पण माहितीय अर्णब? तेव्हाही मला सुधा भारद्वाजची मुलगी, बिनायक सेन यांची मुलगी नाही आठवली. त्यांनी आपल्या आई वडलांना आयुष्यभर संघर्ष करताना पाहिलं होतं. मला पुन्हा रिया आठवली, तिचे वडील आठवले. काफिल खान यांची दूध पिणारी मुलगी आठवली. बापापासून कित्येक वर्ष तिला लांब ठेवण्यात आलं.

तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत अर्णब. तुझ्याइतकं खाली घसरणं शक्यच नाहीय आम्हाला. धीर धर. देशाच्या न्यायव्यवस्थेवर, कायद्यावर विश्वास ठेव. जसा आम्ही ठेवतो. वर्षानुवर्ष चार्जशीट नसताना जेलमधे घालवून पुन्हा सन्मानानं मुक्त होतो. आम्हाला त्या गमावलेल्या वर्षांची भरपाईही मिळत नाही. हिंमत बाळग अर्णब. 

तू नशीबवान आहेस की आताची ही काँग्रेस अँतानियो मायनो म्हणजेच सोनिया गांधींनी घडवलीय. त्यात खोटे असतील तर दहशतवाद्याचे आरोपही रद्द होतात. अर्थातच ही फार चांगली गोष्ट नाही. कोणत्याही निरपराधाला एक दिवसदेखील जेलमधे रहावं लागलं तर तो अन्याय ठरतो. पण ते सुटतात तरी. तू ज्यांचे तळवे चाटतोयस ना अर्णब, त्यांनी बनवलेल्या संविधानात लटकला असतास तर रायगडच्या रस्त्यावरच गाडी पलटली असती.

हेही वाचा : आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

धीर धर अर्णब, आम्ही तुझ्या सोबत आहोत. शेवटी जेएनयू आहोत आम्ही. तुला शिक्षा झालीच पाहिजे पण ती न्यायालयाकडून. पोलिसांनी ती देणं काही बरोबर नाही.

नाही नाही. आता आम्ही तुझ्यासाठी रस्त्यावर वगैरे येऊ, असा विचार मनातही नकोस. तुझ्या डमी कोर्टाने पाठवलेले गुंडं लक्षात असतीलच. त्यांनी दिलेल्या जखमा नुकत्याच कुठे भरल्यात. आणि आमचे संघर्ष अनेक ठिकाणी सुरू आहे. ज्यांची शेतं बळकावली जातायत त्या शेतकऱ्यांसोबत, आदिवासांसोबत, भाजप विधेयकाच्या बलात्कार पिडित स्त्रियांसोबतही आणि नोकऱ्या हिसकावून घेतल्यात अशा तरूणांसोबत उभं राहून आम्ही लढत आहोत. आम्ही थोडे बिझी आहोत.

मला पूर्ण खात्री आहे की सगळे देशभक्त तुझ्या सोबत उभे असतील. सगळ्यात आधी तर टीवी चॅनेल. ते सुधीर चौधरी, ते तर तुझ्याआधी तुझ्यापेक्षाही मोठे देशभक्त होते ना? नविका कुमार? कोण ते शिवशंकर? दीपक चौरसिया, वगैरे वगैरे? तू देशद्रोह्यांविरोधात लढण्यासाठी सगळ्या देशभक्तांना एकत्र करत होतास. मला पूर्ण खात्री आहे तुझ्यासारख्या ‘नेशन फर्स्ट’वाले आत्तापर्यंत पोचलेही असतील. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला असेल. तुझ्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ते एका हाकेत संपूर्ण देशाला जागे करत असतील.

अरे हो, अर्णब- तुझ्यासाठी तर लॉकडाऊनमधे सुप्रीम कोर्ट उघडत होते ना? आत्ताही तुझं वकील तिथे पोचले असतीलच. तू लवकर परत ये. मला पूर्ण खात्री आहे की मुंबई पोलिस तुझा चांगलाच पाहुणचार करतील. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत. ते फार पूर्वीपासूनच देशभक्त विचारांचे आहेत.

हेही वाचा : 

हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?

जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी

(लेखक जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्ता, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असून हिंदी आणि इंग्रजी पेपपमधे स्तंभलेखन करतात.)