जॅक मा हे चीनमधले मोठे बिझनेसमन. १९९५ ला ते अमेरिकेत गेले. तिथं आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी इंटरनेट वापरलं आणि इंटरनेटवर पहिला शब्द शोधला ‘बियर.’ या शब्दानं त्यांच्या जगण्याला वेगळं वळण दिलं. एक सामान्य शिक्षक ते जगभर आर्थिक साम्राज्य वाढवणारा बलाढ्य उद्योगपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
जॅक मा. एक हडकुळा, सडपातळ माणूस. चिनमधले मोठे बिझनेसमन आहेत ते. पण त्यांच्याकडे पाहिलं की इतकं मोठं आर्थिक साम्राज्य उभं करणारा हाच का असा बघता क्षणी प्रश्न पडावा. त्यांचा प्रवास डोळे दिपवणारा आहे. हा माणूस बघता बघता कंपन्या काढतो काय. आणि जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्वतःला नेऊन बसवतो काय!
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांना हे शक्य झालंय. त्यांच्या यशाचा पासवर्ड आज जगभरातल्या तरुणांना, काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांना प्रेरणा देतो. त्यांच्या जिद्दीला सलाम करतो. हाच प्रवास पडझडीच्या काळात उभं रहायची ऊर्जा देतो. जॅक मा यांच्या थक्क करणाऱ्या या प्रवासाला नकाराच्या अनेक बाजूही आहेत.
कोरोनाच्या काळात मोठमोठे उद्योगधंदे बंद पडत असताना क्लाउड कॉम्प्युटिंग सर्विस आणि मोबाइल अॅपचा वापर करत त्यांनी आपला अलिबाबा ग्रुपचा व्यवसाय वाढवला. त्यांच्याकडे असलेल्या भन्नाट कल्पनांमुळेच हे शक्य झालं. ते करताना आशियातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला नंबरही मिळवला. शिक्षकाच्या नोकरीतून मिळणारा तुटपुंजा पगार त्यांना ४४.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक संपत्तीच्या मालकीपर्यंत घेऊन गेलाय.
हेही वाचा: जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?
जॅक यांचं खरं नाव मा युन. त्यांच्या नावामागची स्टोरी त्यांच्या इतकीच इंटरेस्टिंग आहे. १५ ऑक्टोबर १९६४ मधे त्यांचा चीनच्या दक्षिण पूर्वेकडच्या हाँगझोयू शहरात जन्म झाला. घरची आर्थिक स्थिती फार हलाखीची होती. त्यांना एक मोठा भाऊ आणि छोटी बहीण होती. आपल्या मित्रांसोबत भांडणं, मारामाऱ्या करण्यात ते कायमच आघाडीवर असायचे.
जॅक यांना लहानपणापासूनच इंग्रजी शिकायची इच्छा होती. १९७२ ला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन हाँगझोयू शहराच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यामुळे ते शहर आकर्षणाचं केंद्र बनलं. पर्यटकांचा ओघ सुरू झाला. जॅक यांच्यासाठी ही चालून आलेली संधीच होती. पर्यटकांमुळे त्यांना इंग्रजी शिकता आलं. शहर दाखवण्याच्या बहाण्यानं त्यांनी इंग्रजीचे धडे घेतले. त्यांच्याशी मैत्री केली. ते दुभाषाचं काम करू लागले.
तेव्हा ते अवघ्या ९ वर्षांचे होते. मा युन हे नाव त्यांना एका पर्यटक मित्रानं दिलंय. चीनमधे कॉलेजमधे प्रवेश हवा तर त्यासाठी परीक्षा द्यावी लागायची. ही संधी वर्षातून केवळ एकदाच मिळायची. नापास झाल्यामुळे त्यांना कॉलेजमधल्या प्रवेशासाठी तब्बल ४ वर्ष वाट पहावी लागली. हावर्ड यूनिवर्सिटीतही त्यांना शिकायचं होतं. पण तब्बल १० वेळा त्यांना रिजेक्ट करण्यात आलं.
१९८८ ला हाँगझोयू नॉर्मल युनिवर्सिटीमधून त्यांनी इंग्रजीमधे बीएची डिग्री घेतली. आता काम शोधायचं होतं. ३० ठिकाणी नोकऱ्यांसाठी अर्ज केले. पण सगळीकडे नकारघंटा ऐकायला मिळाली. पोलिसात भरती होण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांच्या शरीरयष्टीमुळे तिथंही निराशा आली. शेवटी हाँगझोयू टीचर्स कॉलेजमधे इंग्रजी शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. इंग्रजी विषयाशी केलेली दोस्ती त्यांच्या कामाला आली.
नोकरी करत असतानाच हॅबो ट्रान्सलेशन एजन्सी ही ट्रान्सलेशन कंपनी जॅकनी काढली. १९९५ मधे जॅक मित्रांसोबत अमेरिकेला गेले. तिथं इंटरनेटचा वापर ज्या पद्धतीनं व्हायचा ते बघून जॅक चकीतच झाले. त्यांची इंटरनेटच्या जगाशी ओळख झाली. एक वेगळं जग त्यांना खुणावत होतं. एकदा इंटरनेटवर त्यांनी बियर हा शब्द सर्च केला. इतर देशांमधल्या बियरची त्यांना माहिती मिळाली. पण चीनची बियर असा शब्द त्यांना काही सापडला नाही.
मग त्यांनी इंटरनेटवर चीनची माहिती शोधली. पण हाती काहीच आलं नाही. आपल्या देशाची माहिती देणारं काहीच इंटरनेटवर नाही या विचारानं त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. त्यांनी चीनसाठी एक इंटरनेट कंपनी बनवायचा संकल्प केला. यी बिंग या आपल्या कम्प्युटर शिक्षक असलेल्या मित्राच्या सोबतीनं हा संकल्प त्यांनी प्रत्यक्षात आणला. यातूनच चायना पेज नावाची वेबसाईट अस्तित्वात आली. एप्रिल १९९५ मधे जॅक आणि त्यांच्या मित्रानं पहिलं ऑफिस थाटलं. १० मे १९९५ ला चायना पेजचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं.
चीनची माहिती देणारं एक स्वतंत्र माध्यम आपल्याकडेही असावं हा चायना पेज मागचा उद्देश होता. दुसरीकडे त्यांनी अमेरिकेतच आपल्या मित्रांसोबत चिनी कंपन्यांसाठी वेबसाईट बनवायला सुरवात केली. चायना पेज या वेबसाईटचा फायदा लोकांना होत होता. पण त्याचा आर्थिक तोटा जॅक यांना सोसावा लागला. शेवटी ही साईट चीनमधल्याच झेजिआंग टेलिकॉम कंपनीनं विकत घेतली.
हेही वाचा: 'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
१९९८ ते १९९९ दरम्यान जॅक यांनी एका माहिती तंत्रज्ञान कंपनीचं नेतृत्व केलं. शिवाय सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमधेही काम केलं. १९९९ मधे हे सगळं सोडून ते पुन्हा हाँगझोयूला परतले. तोपर्यंत एक ई कॉमर्स कंपनी बनवायचं ग्लोबल स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. कंपनीचं नावंही सगळ्या जगाला माहीत असेल असं असावं हा विचार त्यांच्या मनात होता.
त्यांनी लहानपणी अलिबाबाच्या कथा ऐकल्या होत्या. आवडीनं एकमेकांना सांगितल्याही होत्या. सगळ्यांनाच या नावाचं आकर्षण असतं. त्यांनाही होतं. ही गोष्ट त्यांनी हेरली. याच अलिबाबाच्या नावानं त्यांनी आपली कंपनी काढली.
कंपनीची सुरवात डिजिटल मार्केटिंग पासून झाली. ते ऑनलाईन खरेदी विक्रीचं एक माध्यम बनलं. आज ती ई कॉमर्स, ऑनलाईन बँकिंग, डिजिटल मीडिया, मनोरंजन या क्षेत्रात वावरतेय. जगभर आपलं प्रस्थ वाढवणाऱ्या अलिबाबाची तुलना अमेझॉनशी केली जाते.
२००५ पर्यंत अलिबाबा ग्रुपनं आपल्या दमदार एन्ट्रीनं बलाढ्य इबे या ई कॉमर्स कंपनीला बाजारातून बेदखल व्हायला भाग पाडलं. २००५ मधे इंटरनेट कंपनी असलेल्या याहूनं एक अरब डॉलर इतकी गुंतवणूक यात केली. भारतातल्या डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या पेटीएममधे अलिबाबानं गुंतवणूक केली.
२०११ मधे कंपनीवर नकली सामान विकत असल्याचे आरोप होऊ लागले. त्यामुळे कंपनीतल्या बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१४ ला कंपनीने शेअर्सची विक्री करणारा 'इनिशीयल पब्लिक ऑफर' आयपीओ जाहीर केला. शेअर विकण्यात आले. ही विक्री फायद्याची ठरणार होती. तसंच झालं.
कंपनीची १५० अरब डॉलर इतकी घसघशीत कमाई झाली. या कमाईनं जॅक मा चीनचे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले. जॅक मा यांनी २०१३ ला अलिबाबाचं सीएओ पद सोडलं. २०१९ ला वयाच्या ५५ व्या वर्षी कंपनीचे सीईओ डॅनियल झांग यांच्याकडे त्यांनी कारभाराची सूत्र दिली. कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांचं काम मात्र चालू आहे.
हेही वाचा: साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात
२००८ मधे त्यांनी जॅक फाउंडेशनची स्थापना केली. हे फाउंडेशनं शिक्षण, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य या विषयावर काम करतं. जॅक मा २०१७ मधे एका शॉर्ट फिल्ममधून अभिनयातही उतरले. अनेकांसाठी जॅक यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतोय. ते कायमच आपल्यापेक्षा हुशार व्यक्तींच्या शोधात असतात. जगभरचं ज्ञान असणं म्हणजे त्यांच्या लेखी हुशार असणं नाहीय. सोबतीला प्राधान्य देणं त्यांना महत्वाचं वाटतं.
'स्मार्ट' लोकांनी एकमेकांच्या सोबतीनं जगाला अधिक सुंदर बनवायचा संकल्प करायला हवं असं ते म्हणतात. पण शहाण्या माणसांनी एकत्र काम करणं सोपं नसल्याचंही त्यांना वाटतं. जॅकना आपल्या आयुष्याचा प्रवास अद्भुत वाटतो. यशस्वी व्हायचं तर वेगवेगळ्या वयात असताना आपण काय करायला हवं याचा कानमंत्र त्यांनी दिलाय. वीशी, तिशीत असताना एक चांगला बॉस आपल्याला शोधायला हवा. योग्य पद्धतीनं काम करायचं तर त्यासाठी एक चांगली कंपनीही जॉईन करावी. असं जॅक म्हणतात.
तिशी, चाळीशीत आपल्याला स्वतःला काही वेगळं करायचं असेल तर त्यात पूर्ण ताकदीनं उतरावं. अपयश आलंच तर ते झालेलं नुकसान या वयात भरून काढता येईल. एखादी गोष्ट इंटरेस्टिंग आहे म्हणून ते करायचा धोका चाळीशी, पन्नाशीत घेऊ नये असं जॅकना वाटतं. जे चांगलं आहे तेच करावं. पन्नाशी, साठीत नवी तरुणाई उभी करायचा प्रयत्न करायला हवा. त्यांना ट्रेनिंग देऊन तयार करावं. तर साठी नंतर आपल्या नातवंडांसोबत आपला वेळ घालवून आयुष्य जगावं असं जॅक म्हणतात.
हेही वाचा: २६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी
मागच्या ऑक्टोबरमधे जॅकनी एक भाषण दिलं होतं. चीनच्या वित्तीय नियामक संस्था आणि सरकारी कंपन्यांच्या बरोबरीनं सरकारवरही भाषणातून सडकून टीका केली होती. तेव्हापासून ते दोन महिने गायब होते. 'आफ्रिकाज बिजनेस हिरो' या प्रसिद्ध टीवी शोमधूनही त्यांचं नाव काढण्यात आलं. त्यांचा फोटोही काढून टाकण्यात आला. आंतरराष्ट्रीय मीडियासाठी हा बातम्या आणि चर्चेचा विषय ठरला. बातम्या चालत राहिल्या. मागच्या आठवड्यात ते माध्यमांसमोर आले. चीन सरकारवर केलेली टीका त्यांना भोवली होती. त्याचाच हा सगळा परिणाम होता.
बिजनेसमधे नवी सुरवात करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं. त्यांचे प्रयत्न दाबून टाकणाऱ्या व्यवस्थेत बदल करायला हवा असं जॅक मा यांनी म्हटलं होतं. जागतिक बॅकिंगचे नियम म्हणजे 'म्हाताऱ्यांचा क्लब' असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यांनंतर वाद निर्माण झाला नसता तर नवल. चीनमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे नेते त्यामुळे खवळले. त्यांच्या कंपन्यांना कोंडीत पकडायचा प्रयत्न झाला.
जॅक यांनी आधीच आपल्या इंट ग्रुपचे शेअर्स सार्वजनिक करायचा निर्णय घेतला होता. जवळपास ३७०० करोड डॉलरचा हा आयपीओ नोव्हेंबरमधे चिनी अधिकाऱ्यांनी रद्द केला. कंपनीची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात येईल अशी स्थिती निर्माण झाली. या सगळ्यामागे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा हात असल्याचं म्हटलं जातंय. अलिबाबा ग्रुपची चौकशी होत नाही तोपर्यंत जॅक मा यांना चीन बाहेर पडता येणार नसल्याचा आदेश सरकारनं दिलाय.
हेही वाचा:
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं?
कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
केरळमधल्या जेंडर पार्कमधे फुलतायत स्त्री पुरूष समानतेची फुलं
निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?
डॉ. नरेंद्रसिंग कपानी: फायबर ऑप्टिक्सचा हा जनक आपल्याला माहीत नाही