जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

१५ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज १५ ऑगस्ट. भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस. स्वातंत्र्य दिनाला जोडून यंदा रक्षाबंधन सणही आलाय. भावाबहिणीचं नातं न तुटणार. अतूट. देशाच्या स्वातंत्र्यासाठीही भावाबहिणीच्या एका जोडीने असाच अतूट संघर्ष केलाय. जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याएवढं स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेली भावाबहिणीची जोडी आपल्याला आढळत नाही.

भारताचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयाच्या इच्छापूर्तीचा सुवर्णक्षण होता आणि हे ध्येय महात्मा गांधी यांच्या पुढाकाराने प्राप्त झालं. तरी त्यात काँग्रेसशिवायही अनेक विविध राजकीय विचारांच्या आणि सशस्त्र क्रांतिकारकांचाही वाटा होता हे वास्तव आहे. भारतमातेच्या हजारो मुलामुलींनी या स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतले.

स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग एका घरातील सर्व सदस्यांना प्रेरित करत. त्यातूनच स्वातंत्र्यसंग्रामात कार्य केलेले पतीपत्नी, भाऊबंध, पितापुत्र आपल्याला आढळतात. पण केवळ स्वातंत्र्यसंग्रामातच नाही तर स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महान कार्य करणारे भाऊ आणि बहीण म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित.

नेहरू कुटुंबातली तीन भावंडं

काँग्रेस नेते मोतीलाल नेहरू आणि स्वरूपराणी या दाम्पत्याचे थोरले अपत्य म्हणजे जवाहर. तर दुसरं अपत्य म्हणजे स्वरूपकुमारी अर्थात विजयालक्ष्मी. विजयालक्ष्मी हे त्यांचं लग्नानंतरचं नाव. त्यांचे हे नाव भगवदगीतनुसार, श्रीकृष्ण आहे तिथेच विजय आणि लक्ष्मी आहे हे प्रतित करणारं आहे.

मोतीलालजींचं तिसरे अपत्य म्हणजे कृष्णकुमारी. जवाहर, स्वरूपकुमारी आणि कृष्णकुमारी या तीन भावंडात वयाचं अंतर बरंच आहे. जवाहरलाल आणि स्वरूप यांच्यात ११ वर्षाचं तर कृष्णा आणि जवाहर यांच्यात १८ वर्षाचं अंतर आहे. या भावंडांना लहानपणी खूप कमी काळात एकमेकांसोबत राहायला मिळाला.

जवाहरलाल पंधराव्या वर्षी १९०४ मधे युरोपात शिकायला गेले तेव्हा विजयालक्ष्मी  केवळ चार वर्षाच्या होत्या. १९०७ मधे कृष्णाचा जन्म होईपर्यंत विजयालक्ष्मी यांना आपण एकटीच आहोत असं वाटायचं. जवाहरलाल शिक्षण पूर्ण करून १९१५ ला परतल्यानंतर विजयालक्ष्मी पंधरा वर्षाच्या होत्या. त्यामुळे जवाहरलाल यांच्याबद्दल त्यांच्या मनात भाऊ आणि पिता अशा मिश्र स्वरूपाच्या आदरयुक्त आणि प्रेमाच्या भावना होत्या.

मोतीलाल नेहरू अगदी सुरवातीच्या काळात पाश्चात्य वेशभूषा आणि शिष्टाचार पाळणारे आधुनिक विचाराचे होते. त्यांनी आपला मुलगा आणि मुलगी यात कधीच भेद केला नाही. सर्वांना उच्च शिक्षण दिलं. समतेचा आदर्श निर्माण केला.

हेही वाचाः पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

स्वातंत्र्याशी नातं सांगणारे बहीण भाऊ

जवाहरलाल आणि कमला नेहरूंच्या लग्नातले अगदी लहानसहान प्रसंग विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यांच्या ‘द स्कोप ऑफ हॅप्पीनेस’ या आत्मचरित्रात मांडलेत. कमलासोबत जवाहरचं लग्न ठरलं. त्यांच्या लग्नातले दागिने स्वतः मोतीलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी यांनी बनवून घेतले होते. फेब्रुवारी १९१६ मधे वसंतपंचमी दिवशी कमला आणि जवाहरलाल यांचं लग्न झाला.

१९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिरेचा जन्म झाला. इंदिरा हे नाव मोतीलाल नेहरूंच्या आईवरून म्हणजे इंद्रा यांच्यावरून ठेवले. जवाहरलाल यांच्यावर बुद्ध विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी तिचं 'प्रियदर्शिनी' असं नाव ठेवलं. पुढे 'इंदिरा प्रियदर्शिनी'  म्हणून प्रचलित झालं. अर्थातच हे नाव आत्या विजयालक्ष्मी पंडित यांनीच ठेवलं असणार.

जवाहर आणि विजयालक्ष्मी यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरवात होमरूल लीगपासून झाली. लखनौ इथे १९१६ मधे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात जवाहरलाल आणि विजयालक्ष्मी यांनी एकत्रित सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे त्यावर्षी भाऊबीजला विजयालक्ष्मी यांनी जवाहरला ओवाळलं. तेव्हा विजयालक्ष्मी यांना सोन्याची एक पीन भेट म्हणून दिली. त्यावर रत्नजडीत नाव कोरलं होतं. H R. म्हणजेच होम रूल अर्थात स्वराज.

जवाहर आणि विजयालक्ष्मी या बहीणभावाच्या व्यक्तिगत जिव्हाळ्याच्या नात्यातही त्यांच्या राजकीय आणि सामाजिक ध्येयांचा विचार पूर्णपणे रुतून बसला होता. म्हणूनच जवाहरलालबद्दल विजयालक्ष्मी यांच्या मनात एक पितृतुल्य बंधू, राजकीय, सामाजिक क्षेत्रातला गुरु आणि पक्ष म्हणून एक नेता अशी भावना होती.

भावाच्या पसंतीचा नवरा

विजयालक्ष्मी यांची आणि महात्मा गांधी यांची पहिल्यांदा १९२० च्या सुरवातीला भेट झाली. त्यानंतर त्यांनी सत्याग्रही होवून वडील आणि भावासोबत स्वातंत्र्यसंग्रामात सक्रीय सहभाग घ्यायला सुरवात केली. गांधीजींच्या सत्याग्रहास अनेक लोकांचा पाठिंबा मिळत होता. १९२० च्या शेवटी 'मॉडर्न रिव्यू' या नियतकालिकात 'एट द फिट ऑफ गुरू’ या शीर्षखाखाली एक लेख छापून आला. हा लेख लिहिला होता रणजीत सीताराम पंडित या संस्कृत विद्वानाने. त्यांनी कल्हणाच्या 'रजतरंगीनी' या संस्कृत ग्रंथाचं हिंदी भाषांतर केलं होतं.

रणजीत आणि जवाहर यांची मैत्री काही वर्षापुर्वी झाली होती आणि या मैत्रीत गुरु शिष्य हा भाव अधिक होता. 'At the feet of Guru’ यामधे गुरु म्हणजे जवाहरलाल होते हे विशेष. गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वजण कार्य करत असताना आपल्या भावाला कुणी गुरु म्हणतं हे पाहून विजयालक्ष्मी यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी रणजीत पंडित यांना भेटायचं ठरवलं. पण हा योग वेगळाच जुळून आला. त्याचवर्षी रणजीत अलाहाबादला आले. विजयालक्ष्मींना भेटले आणि पुढे विजयलक्ष्मी आणि त्यांचं लग्न झालं. अर्थात हे सर्व भाऊ जवाहरनेच ठरवलं होतं.

मोतीलाल नेहरूंना आपली मुलगी संस्कृत विद्वानाच्या घरात द्यायची होती. मोतीलाल नेहरूंची ही अट आणि जवाहरलाल यांची पसंद हा योग जुळून आला. परंतु अलाहाबादमधील काश्मिरी पंडितांनी हे लग्न समाजाबाहेर आहे असा आरोप करत या लग्नाचा विरोध केला. पण यावेळी जवाहरलाल हेच खंबीरपणे रणजीत आणि विजयालक्ष्मी यांच्या पाठीशी राहिले.

हेही वाचाः काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?

नान आनंदी रहा!

पंडित आणि नेहरू ही दोन्ही घराणी सारस्वत ब्राह्मण होती. काश्मिरमधून येऊन नेहरू घराणं अलाहाबादमधे स्थायिक झालं होतं. आणि पंडित घराणं मुंबई प्रांतात. विजयालक्ष्मी आणि रणजीत यांचं १९२१ मधे लग्न झालं. लग्नानंतर दोन दिवसांनी विजयालक्ष्मी आपल्या सासरी जाणार होत्या. पण जवाहरलाल कोण्यातरी गावात सभेसाठी गेले होते. मात्र निरोपाच्या वेळी नक्की येईन असं सांगितलं. 

निघायची वेळ झाली, पण खूप वाट पाहूनही जवाहर आलाच नाही. आपला भाऊ निरोप द्यायला आला नाही म्हणून त्या हवालदिल झाल्या होत्या. दु:खी मनाने स्टेशनवर गेल्या. तिथे अचानक जवाहरलाल दिसताच त्या जवाहरला कडकडून मिठी मारून रडू लागल्या. त्यावेळी विजयालक्ष्मींचा चेहरा हातात घेत, त्यांच्या कपाळाचे चुंबन घेत जवाहरलाल म्हणाले ‘नान आनंदी रहा’. विजयालक्ष्मींना ते लाडाने 'नान' म्हणत तर कृष्णाला 'बेट्टी' म्हणतं. नान याचा अर्थ नन्ही बिटीया. जवाहरलाल यांना दोन्ही बहिणी 'भाई' म्हणायच्या.

नेहरूंचा पहिला तुरुंगवास

विजयालक्ष्मींचे लग्न झालं त्याच वर्षाच्या शेवटी ६ डिसेंबर १९२१ ला जवाहरलाल यांना पहिला कारावास घडला. नेहरूंनी कारावासात असताना बहिणीला एक पत्र लिहिलं. ते लिहितात, 'कारागृह हे एक विद्यापीठच असतं. स्वातंत्र्याच्या प्रेरणेसोबत इथे खूप काही शिकायला मिळतं.' हाच संदेश मनात ठेवत अलाहाबादमधे २६ जानेवारी १९३२ रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करताना सविनय कायदेभंगाच्या चळवळीत विजयालक्ष्मी यांना दीड वर्ष कारावासाची शिक्षा झाली.

पुढे १४ महिन्यांनी त्यांची सुटका केली गेली. याकाळात त्यांनी रामायणासह विवेकानंद, प्लेटो, डिकन्स, शेक्सपियर यासह अनेक ग्रंथाचं वाचन केलं. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीत मॉडर्न हिस्ट्रीचं शिकलेल्या विजयालक्ष्मींवर आपल्या भावाच्या कर्तृत्वाची छाप होती. मात्र त्यातून त्यांचं स्वतःचं कर्तृत्वही सिद्ध होत होतं.

हेही वाचाः इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

देशातल्या पहिल्या महिला मंत्री

उत्तर प्रांतात १९३७ मधे स्थापन झालेल्या गोविंद वल्लभ पंताच्या मंत्रिमंडळात त्या देशातील पहिल्या महिला मंत्री बनल्या. स्वातंत्र्यानंतरच्या शीतयुद्धाच्या कठीण काळात त्यांनी अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांत राजदूत म्हणून कार्य केलं आणि विशेष म्हणजे १९५३ मधे युनोच्या जनरल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मानही त्यांच्या रूपाने भारताला मिळाला. हा खरं तर भारतीय कन्येचा, भगिनीचा आणि भारताचाच गौरव होता.

भाऊ जवाहरलालप्रमाणे त्या प्रखर लोकशाहीवादी होत्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी आपल्या भाचीच्या म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधात भुमिका घेतली, हे विशेष.

रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन्ही सण भाऊ आणि बहीण यांच्या उत्कट प्रेमाचे प्रतिक. पण यात आजपर्यंत एखाद्या स्त्रीची कर्तृत्ववान भावाला ओवाळणारी बहीण एवढीच ओळख असते. पण भाऊ आणि बहीण दोघंही एकमेकांच्या प्रेमातून प्रेरणा घेत देश घडवण्याचं महान कार्य करतात ही बाब अशा भावनोत्कट भारतीय परंपरेचा खराखुरा आदर्श ठरते. स्त्रीपुरूष समतेचा संदेशही देतात.

ओवाळणीत मिळाली भगवद्गीता

नेहरू वारले तेव्हा विजयालक्ष्मी म्हणाल्या, 'भाई एकदा मला म्हणाला होता. मला मृत्यू आला तर तो बुद्ध पौर्मिमेदिवशी यावा आणि अगदी तसंच घडलं.'

स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय आणि त्यानंतर भारताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जडणघडण या कार्यात या बहीणभावांनी अतुल्य कार्य केलंय. या कामाची ऐतिहासिक नोंद जगासमोर आहे. भाऊबीज आणि रक्षाबंधन या सणाला बहिणीने ओवाळल्यावर भावाने भेट देण्याची प्रथा आहे. विजयालक्ष्मी सांगतात, ओवाळल्यावर भाईने मला भगवद्गीता भेट दिली होती आणि ही मौल्यवान भेट जवाहरलालच्या स्मृती म्हणून आजही उराशी कवटाळून ठेवलीय.

हेही वाचाः 

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत

अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी

टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे