अमेरिकेतल्या सिएटल शहरात जय शेंडुरे हे संशोधक म्हणून काम करतात. कोरोनावरची लस शोधून काढण्याच्या नादात एक वेगळंच गुपित त्यांच्या हाती लागलंय. हे गुपित फुटायच्या भीतीपोटीच तिथल्या सरकारनं शेंडुरे यांना संशोधन करायला बंदी घातली होती. मात्र, सरकारच्या परवागनीशिवाय त्यांनी आपलं संशोधन पूर्ण केलं. वाचा ट्रम्प प्रशासनाला घाम फोडणाऱ्या जय शेंडुरेंची ही कहाणी.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी शहर किंवा अख्खा देशच्या देश लॉकडाऊन करणं, शाळा, कॉलेज, सरकारी आणि खासगी ऑफिस यांना सुट्ट्या देणं चालू आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होईलही. पण तो पूर्णपणे रोखण्यासाठी संशोधन करून कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करणंही गरजेचं आहे. भारत, अमेरिका, तैवान अशा अनेक देशात हे संशोधन सुरू आहे. काही ठिकाणी माकडावर केलेले प्रयोग यशस्वी झाल्यामुळे माणसांवर प्रयोग करण्याची तयारीही सुरू झालीय.
अशातच, जय शेंडुरे हा कोल्हापूरचा रांगडा गडी कोरोना वायरस विरोधातली लस शोधून काढण्यात अग्रेसर आहे. अमेरिकेतल्या सिएटल शहरात जय शेंडुरे आणि त्यांची टीम कोरोनाविरोधी लस तयार करण्यासाठी संशोधन करतेय. हे संशोधन जवळपास यशस्वी झालं असून आता फक्त त्यावर शिक्कामोर्तब व्हायचा राहिलाय, अशी बातमी १९ मार्चला दैनिक पुढारीत छापून आलीय. पण या संशोधनाच्या आत आणि बाहेरही बरंच काही शिजतंय.
हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक, मुंबई लॉकडाऊन होणार?
जय शेंडुरे हे अमेरिकेतल्याच सेलॉन शहरात जन्मलेले आणि तिथंच वाढलेले भारतीय वंशाचे अमेरिकन संशोधक आहेत. शेंडुरे कुटुंब हे मूळचं आपल्या कोल्हापूरातल्या हुपरी गावातलं. मात्र जय यांच्या आईवडलांनी तत्कालीन पुणे युनिवर्सिटीतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थलांतरित झाले. ‘माझ्या आईचे पालक त्याआधीही कित्येक वर्ष पुण्यातच राहत असत. अजूनही माझ्या आईकडचे अनेक नातेवाईक पुण्यातच राहतात,’ अशी माहिती खुद्द जय यांनीच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिलीय.
प्रिन्सटन युनिवर्सिटीतून पदवी शिक्षण घेतल्यावर फुलब्राईट स्कॉलरशीप मिळवून ते पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमधे संशोधन करण्यासाठी आले होते. तेव्हा लहान मुलांच्या मेंदूत किंवा जीन्समधे असणाऱ्या क्षयरोगाची संभावना ओळखण्यासाठी टेस्ट विकसित करणं असा त्यांचा विषय होता. हे संशोधन पूर्ण झाल्यावर अमेरिकेत परतून त्यांनी हॉवर्ड युनिवर्सिटीतून पीएचडी पूर्ण केली. सध्या ते अनुवंशशास्त्रज्ञ म्हणजे ह्युमन जेनेटिक्समधे काम करतात.
जनुकीय संकेतावली म्हणजेच जिनोम उपलब्ध असेल तर त्यामुळे भविष्यात होऊ शकणाऱ्या रोगाचं निदान आधीच करता येतं, असं महत्त्वपूर्ण संशोधन शेंडुरे यांनी केलं होतं. या संशोधनाचे जागतिक पातळीवर आरोग्य क्षेत्रात दूरगामी परिणाम झालेत. २०१२ मधे त्यांनी गर्भाची ‘डीएनए ब्ल्यू प्रिंट’ विकसित केली होती. बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला होणाऱ्या संभाव्य रोगाचं निदान शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचं हे संशोधन जागतिक पातळीवर क्रांतिकारक ठरलं होतं. अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी, सायन्स जर्नल्सनी या संशोधनाची प्रकर्षाने दखल घेतली होती, अशी माहिती पुढारीच्या बातमीत देण्यात आलीय.
अमेरिकेत दरवर्षी २० ते ३० हजार लोक फ्लू आणि त्यातून येणाऱ्या तापामुळे मरतात. त्यामुळे या फ्लूवरचं औषध शोधण्यासाठी शेंडुरे आणि त्यांची टीम अमेरिकेच्या सिएटलमधल्या फ्लू स्टडी सेंटरमधे संशोधन करत होती. सिएटल शहर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनच्या जवळ येतं. या वॉशिंग्टनमधेच कोरोनाचा संसर्ग झालेले सर्वाधिक अमेरिकी लोक आढळलेत. याकडे आत्ता जगाचं लक्ष गेलंय. पण कोरोनाची ही अमेरिकी स्टोरी जानेवारीमधेची सुरू झाली.
जानेवारीच्या शेवटी या सिएटलमधे कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला. आणि काही कळायच्या आतच अनेकांना कोरोनानं ग्रासलं. एवढी भयानक परिस्थिती अचानक कशी उद्भवली हे कुणालाच कळत नव्हतं. अचानक घडणाऱ्या घडामोडींमुळे सिएटल फ्लू स्टडी सेंटरमधल्या डॉक्टर हेलेन च्यु आणि जय शेंदुरे यांना वेगळीच शंका आली.
फ्लूवर औषध शोधण्यासाठी फ्लू झालेल्या व्यक्तींची स्वॅब टेस्ट म्हणजेच थुंकीचं परीक्षण करण्यासाठी सॅम्पल्स मागवले होते. हे सॅम्पल्स फ्लूचं निदान करण्यासाठी वापरण्याऐवजी कोरोनाची तपासणी करण्यासाठी वापरण्याची परवानगी परवानगी द्यावी अशी, विनंती शेंडुरे आणि त्यांच्या टीमनं तिथल्या राज्य सरकारकडे केली होती. मात्र तशी परवानगी त्यांना देण्यात आली नाही.
पुन्हा परवानगी मागत बसलो तर ती मिळवण्यात तीन चार आठवडे उलटतील असा विचार करून सरकारच्या धोरणाविरोधात जात शेंडुरे यांनी कोरोनावर संशोधन चालू केलं, अशी बातमी द न्यूयॉर्क टाइम्सनं दिली होती. यावरून सोशल मीडियावर गदारोळही माजला होता. सिएटलमधल्या डॉक्टरांना शांत करणाऱ्यांची तुलना कोरोनाबद्दल धोक्याची सूचना देणाऱ्या डॉक्टरला गप्प करणाऱ्या चीनमधल्या सरकारशी करत होते. पण अमेरिकेतल्या स्थानिक प्रशासनानं त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
हेही वाचा : कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा
संशोधन करण्यासाठी पुन्हा काही लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात एलिझाबेथ श्लाइडर यांचाही समावेश होता. ‘कोरोनाशी पंगा घेणारी बाई’ या मथळ्याखाली 'कोलाज'ने त्यांची स्टोरी यापूर्वी प्रकाशित केलीय. एलिझाबेथ यांनीही ‘लॅबमधून फोन करून मी कोरोना पॉझिटीव असल्याचं मला सांगण्यात आलं,’ असा खुलासा केला होता. थोडक्यात, परदेशी नागरिकांच्या संपर्कात नसणाऱ्या अनेकांना कोरोना झाला होता, असं ट्रम्प यांना नको असलेलं कडू सत्य शेंडुरे यांच्या टीमनं समोर आणलं.
जानेवारी महिन्याच्या शेवटी सिएटलमधे पहिला कोरोना रूग्ण सापडला असं सिएटलचे सरकारी अधिकारी सांगतात. त्यानंतर आत्तापर्यंत फक्त सिएटलमधल्या १९० लोकांना कोरोनाची लागण झालीय, असंही सांगण्यात आलं. मात्र, शेंडुरे यांच्या संशोधनानुसार सरकारनं जाहीर करण्याच्या सहा आठवडे आधीपासूनच कोरोना सिएटलमधे पसरलाय आणि जवळपास ११०० लोकांना त्याची नकळत लागण झाली असावी.
सरकारनं जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच कोरोना विषाणू सिएटलमधे येऊन पोचले होते हे शेंडुरे यांच्या संशोधनातून सिद्ध होईल, आणि आपला भोंगळ कारभार जगजाहीर होईल अशी भीती सरकारला होती. त्यामुळेच सरकारनं शेंडुरे आणि टीमला संशोधन करण्याची परवानगी नाकारली असावी, अशी शंका घेतली जातेय. आणि त्याला आत्तापर्यंतच्या घडामोडींमुळे दुजोराही मिळतोय.
सरकारनं परवानगी नाकारल्यावरही आम्ही हा रिसर्च चालू ठेवणार असं शेंडूरेंनी ठामपणे सांगितलं. संकटाच्या काळात आम्ही माघार घेणं हे नैतिकदृष्ट्या बरोबर नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
द न्यूयॉर्क टाइम्सने सिएटल फ्लू स्टडी सेंटरमधे बेकायदेशीर टेस्टिंग चाललंय असा खुलासा केल्यावर जय शेंडुरे यांनी आपल्या सहकाऱ्यांचं म्हणणं मांडलं होतं. ‘आधी कधीही न पाहिलेल्या अशा आरोग्य आणीबाणीच्या प्रसंगात लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजेत, असं आम्हाला वाटतं.’ असं ते एका जाहीर निवेदनात म्हणाले होते.
शेंडुरे आणि त्यांची टीम अजूनही जोमाने काम करतेय. सत्य बाहेर काढण्यासोबतच स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी जोडण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांचं संशोधन अंतिम टप्प्यात आलंय. ‘लवकरच कोविड – १९ म्हणजेच कोरोनावर औषध निघेल,’ अशी आशा ते व्यक्त करतात.
हेही वाचा : विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव
हेही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
सगळ्यांनाच मास्क वापरण्याची गरज आहे का?
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?
१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?