जेएनयू आंदोलनाला विरोध म्हणजे आपल्याच मुलांच्या करियरवर घाला

२२ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


कॉलेजमधे शिक्षण घेऊन, नोकरी करून, मान खाली घालून जगायला सगळेच शिकवत असतात. पण जेएनयूमधे प्रश्न विचारायला शिकवलं जातं. सरकारला सतत प्रश्नांच्या घोकळ्यात ठेवायला हवं हे शिकवलं जातं. या जगाला आणखी सुंदर कसं करता येईल हे शिकवलं जातं. तेही कमी फीमधे. हा जेएनयू पॅटर्न इतर युनिवर्सिटींमधे राबवायला हवा.

जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी म्हणजे जेएनयूचं वातावरण आता चांगलंच तापलंय. फी दरवाढीविरोधात तिथले विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. त्यांचं आंदोलन दाबुन टाकण्यासाठी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले गेलेत. या लाठीचार्जमधे कुणाचं डोकं फुटलंय, कुणाच्या पायाला फ्रॅक्चर लागलंय तर कुणाच्या हाताला जबर मार लागलाय.

जेएनयूमधे चालेल्या या आंदोलनाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर विशेषतः फेसबूकवर वायरल होतायत. यासोबतच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांवर काही जणांकडून टीका केली जातेय. जेएनयूमधे विद्यार्थी खूप वर्ष शिकत राहतात, तिथं अश्लील उद्योग चालतात असं बोललं जातं. याविषयी आणि जेएनयूमधे शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांविषयी जे सुशील यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलीय. 

जे सुशील अशा अनेक विषयांवर लिहितात. अनेक विषयांवर कडक पण अभ्यासपूर्ण टीका करतात. बीबीसी हिंदीमधली पत्रकारितेची नोकरी सोडून ते आता अमेरिकेत स्थायिक झालेत. विविध कलांवर सध्या त्यांचा एक वीडिओ ब्लॉग चालू आहे.

जे सुशील हे स्वतः जेएनयूचे विद्यार्थी होते. त्यावेळी त्यांना काय अनुभव आले याविषयी आणि फी वाढीमागे नेमकी काय भूमिका आहे याविषयी त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधे लिहिलं आहे. त्या पोस्टचा मराठी अनुवाद पुढे देत आहोत -  

जेएनयूच्या बस स्टॅण्डवर काढली रात्र

माझं शिक्षण आयआयएमसी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून पुर्ण झालं. माझ्या बॅचमधे मी दुसरा आलो होतो. तरीही मला नोकरी मिळाली नाही. माझ्या बॅचमधल्या कोणालाही नोकरी मिळाली नव्हती. जेएनयूचा कॅम्पस मी पाहिला होता. तिथं शिकावं अशी इच्छा होती.

पहिल्यांदा अर्ज दाखल केला तेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही. मला अमर उजालामधे नोकरी मिळाली. साधारण वर्षभरानं मला तिथून काढून टाकलं. तेव्हा जेएनयूची एंटर्न्स जवळ आली होती. घरातून पैसे मिळणार नव्हतेच. रहायला घर नव्हतं. खायला पैसे नव्हते. जेएनयूचा फॉर्म भरला होता पण अभ्यास करायला पुस्तकंही नव्हती.

मित्रांची उधारी इतकी वाढली होती की आता पुन्हा त्यांना पैसे मागायला लाज वाटत होती. अनेकदा जेएनयूमधे जाऊन मेसमधून गपचूप थाळी घेऊन मी खात असे. मेसवाल्यानं एकदा ‘पावती कुठंय?’ असं विचारलं. मी भुकेला आहे हे माझ्या तोंडावरच दिसत होतं. ‘खूप भूक लागलीय’ मी म्हणालो. तेव्हा मेसवाल्यानं ताटलीत भाजी वाढली आणि म्हणाला ‘बैठ जाओ.’ पण जेवण संपल्यावर मेस मॅनेजर जाब विचारेल की काय अशी भीती वाटत होती. असं तीन-चार वेळा झालं.

हे लिहितानाही हात थरथरतोय. झोपायला छप्पर नव्हतं म्हणून अनेकदा जेएनयूच्या बस स्टॅण्डवर मी रात्र काढलीय. जेएनयूमधले माझे मित्र मला भेटले की नाश्ता करायला घेऊन जायचे. माझी अवस्था काय आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं. एकदा एक सिनियर बोलता बोलता म्हणाला, ‘झोपायची अडचण असेल तर माझ्या रूमवर येत जा. कधी कधी चेकिंग होतं. ते मी सांभाळून घेईन.’ पण मी गेलो नाही.

हेही वाचा : इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा

कमी फी नसती तर शिक्षणच घेऊ शकलो नसतो

जेएनयूच्याच एका विद्यार्थानं अभ्यास करण्यासाठी जुनी पुस्तकं दिली. भूक लागली की ओलं कापड पोटाभोवती गुंडाळून मी अभ्यास करत बसे. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. परीक्षेच्या आधी माझं एडमिट कार्ड आलं नव्हतं. जेएनयूमधल्या एका विद्यार्थी नेत्यानं स्वतः एक्झाम कंट्रोलरशी भांडण करून मला ते मिळवून दिलं. नवीन एडमिट कार्डसाठी पैसे भरावे लागले. ते पैसेही त्या विद्यार्थी नेत्यानेच स्वतःच्या खिशातून दिले. नंतर वर्षभरानं मी त्याला परत केले.

एडमिशन झाल्यानंतर माझ्याकडे मेसचं बील द्यायला पैसे नव्हते. महिन्याला हजार रूपये पाठवणंही माझ्या वडिलांना शक्य नव्हतं. कुणाकडून तरी १५०० रूपये उधारी करून त्यांनी मला पाठवले. त्यातून मी पहिल्या सेमिस्टरची ४५० रूपये फी भरली. सहा महिने माझ्या मेसचं बील एका मित्रानं भरलं. सेमिस्टरची फी आज ते जितकी करू पाहतायत तितकी असली असती तर मी कधी शिक्षण घेऊच शकलो नसतो.

माझ्यासारखे अनेक गरीब विद्यार्थी जेएनयूमधे आजही आहेत. काही वर्षांपूर्वी मी बुलेटवरून कॅम्पसमधे जात होतो, तेव्हा एक मुलगा स्काय ब्रीजवरून चालत जाताना दिसला. त्याचा चेहरा पडला होता. त्यानं माझ्या गाडीला लिफ्टसाठी हात केला. मी त्याला गाडीवर बसवलं. त्याच्याशी बोलू लागलो तेव्हा कळलं. त्याची गोष्ट माझ्यासारखीच होती. बाप शेतकरी. मेसचे महिन्याचे ८०० रूपये भरायला त्याच्याकडे पैसे नव्हते. शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना ही गोष्ट कधीही समजणार नाही.

दिवसभर कॉलेज आणि रात्रभर अभ्यास

आम्ही जेएनयूमधे आलो तेव्हा हॉस्टेलचा प्रश्न होता. बाहेर राहण्यासाठी माझ्यासारख्या अनेकांकडे पैसे नव्हते. तिथं एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगमधे बस पास मिळत असे. विद्यार्थी युनियनने प्रशासनाशी बातचीत करून त्या बिल्डिंगच्या सगळ्यात मोठ्या खोलीत दहा बेड लावले. एक बाथरूम होतं. डॉर्मेट्री सारखं आम्ही राहत होतो. आमच्यातल्या फक्त एकाच मुलाला त्याचे वडील नियमित पैसे पाठवायचे. बाकी सगळे बाहेर चहा पितानाही पैश्यांचा हिशोब ठेवायचे.

मी सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण यातच पोट भरवत असे. संध्याकाळी मित्रांच्या पैशातून चहा प्यायचो. आम्ही सैन्यात नव्हतो. दिवसभर मेहनत करून रात्री झोपायचं असं आमचं नव्हतं. रात्री आम्ही आपापल्या गाद्यांवर बसून अभ्यास करायचो. त्यातल्या काहींना झोपायचं असायचं. तेव्हा लाईट लावता यायची नाही. मग काही जण लायब्ररीत जायचे.

आमच्यापैकी कुणाचे वडील शिक्षक होते. कुणाचे शेतकरी तर कुणाचे पोलिस कॉन्स्टेबल. माझे वडील मजूर होते. सगळे अशाच घरातून आले होते. दहा लोकांसोबत एका खोलीत फक्त एका बेडवर सगळा संसार मांडून कोणाला रहायला आवडेल? अशा वातावरणात अभ्यास तरी कसा होईल?

हेही वाचा : फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?

पण आमच्याकडे इतर कोणताही मार्ग नव्हता. बाहेर राहणं शक्य नव्हतं. मुनिरका भागात एका खोलीचं भाडं दोन हजार रूपये होतं. त्यातही एका खोलीत दोनापेक्षा जास्तच लोक राहयचे. आम्हा दहा जणांपैकी कुणालाही हे परवडणारं नव्हतं. जेएनयूच्या मेसमधे मिळणाऱ्या अन्नाइतकंही पौष्टिक अन्न घरात बनू शकत नाही अशी काही जणांची परिस्थिती होती. आम्ही शिक्षण असं पूर्ण केलं आहे. म्हणून जेएनयू आम्हाला आवडतं.

ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनीच शिकायचं

जेएनयूमधे चाललेल्या आंदोलनावर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. ते त्यांच्या मुलांचं भविष्य खराब करतायत. एका अशा वाईट चक्रात आपण आपल्या मुलांना ढकलतोय ज्यातून कधीही बाहेर पडणं शक्य नाही. थोडी वेगळी गोष्ट आहे. म्हणून हळुहळू वाचा आणि नेमकं काय होतंय हे समजून घ्या.

शिक्षणाच्या जबाबदारीतून सरकार आपले हात झटकू पाहतंय. जे पैसे फेकणार ते शिक्षण घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. एका प्रकारचं अमेरिकन मॉडेल ते आपल्यावर लादू पाहतायत. हे मॉडेल भारतात यशस्वी होईल का हा एक वेगळाच चर्चेचा मुद्दाय.

भारतात गेल्या आठ वर्षांत अमेरिकेच्या मॉडेलवरून तीन ते चार प्रायवेट युनिवर्सिटी उघडल्यात. अशोका युनिवर्सिटी, जिंदाल युनिवर्सिटी आणि दिल्लीतल्या ग्रेटर नोएडा मधे शिवनाडर युनिवर्सिटी. आता या युनिवर्सिटी उघडणारे लोक कोण आहेत हे काही तुम्ही विचारू नका. शिक्षण म्हणजे पैसे कमवण्याचं साधन असं मानणारे हे सगळे मोठे उद्योगपती आहेत. 

शिक्षण हे पैसे कमवण्याचं साधन असावं की नाही हा एक नैतिकतेचा वेगळाच प्रश्न आहे. आता या तीन युनिवर्सिटीमधली ग्रॅज्युएशनची फी पहा. चार वर्षांच्या ग्रॅज्युएशनमधे दर वर्षाला चार लाख रुपये फी आहे. म्हणजे एकूण १६ लाख रुपये! यानंतरही तुम्हाला नोकरी मिळेलच याची काहीही खात्री नाही. तरीही लोक इथं जातात. शिक्षण घेतात. त्यानंतर काय होतं? कुठलीशी छोटी मोठी नोकरी धरतात. ज्यांच्याकडे अजून पैसा आहे ते परदेशात जातात.

हेही वाचा : कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?

आपल्या नाही, मुलांच्या भविष्याचा विचार करा

हेच मॉडेल हळुहळू प्रत्येक युनिवर्सिटीत लागू केलं जातंय. जास्तीत जास्त दहा ते वीस वर्ष. आज ज्यांची मुलं छोटी आहेत ते दहा ते बारा वर्षांनंतर मुलांच्या ग्रॅज्युएशनचा खर्च कसा करू शकणारेत याचा विचार करा. मुलं कर्ज काढतील आणि शिक्षण पूर्ण करतील. आणि कर्ज फेडण्यासाठी शिक्षण झाल्यानंतर लगेच कुठंतरी नोकरी करू लागतील. हे कर्ज फेडायला अनेक वर्ष लागतील. हेच तर अमेरिकन मॉडेल आहे! आणि हे भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला जातोय.

आता निर्णय तुमचा आहे. काय करायचं हे तुम्ही ठरवायचंय. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अनेक केंद्रीय युनिवर्सिटी उघडल्या होत्या. जास्तीत जास्त तरूणांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी. आता याच युनिवर्सिटींचं खासगीकरण केलं जातंय. आता काय निवडायचं हे तुमच्यावर आहे. फक्त हा प्रश्न आपल्या भविष्याचा नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे एवढं लक्षात ठेवूया.

जेएनयूचं मॉडेल दुसऱ्या ठिकाणीही लागू केलं पाहिजे

जाता जाता एक गोष्ट सांगतो. अमेरिकेमधे प्रायमरीपासून ते बारावीपर्यंतचं शिक्षण मोफत आहे. हे शिक्षण दर्जेदार असतं. ग्रॅज्युएशनसाठी जवळपास एक लाख डॉलर्स इतकी फी लागते. रहायचा, खायचा खर्च वेगळा. पीएचडीची गोष्ट वेगळीय. युनिवर्सिटी चांगली असेल आणि स्कॉलरशिप मिळाली तर एकदमच भारी. पण त्यासाठी जागा कमी आहेत.

जेएनयूमधे दर्जेदार उच्च शिक्षण दिलं जातं आणि फार पैसेही मोजावे लागत नाहीत. मग बाकी युनिवर्सिटीमधे शिक्षण महाग आहे म्हणून इथलं शिक्षण महाग केलं जातंय का? हे तर असं झालं की नोटाबंदीत मी रांगेत उभा राहिलो तर काय बिघडलं? राहुल गांधीला रांगेत उभं केलं की नाही?

हा संकुचित विचार आहे. जेएनयूमधे स्वस्तात शिक्षण मिळतंय. भारताच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या युनिवर्सिटींमधलं शिक्षण स्वस्त कसं करता येईल याचा विचार करायला हवा. बाहेरचं मॉडेल जेएनयूमधे नको. जेएनयूचं मॉडेल इतरत्र लागू केलं पाहिजे. पण त्याची मागणी कुणीही करत नाही.

हेही वाचा : सरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोहन सिंग

बुद्धीला बुद्धीने उत्तर द्यावं

फी वाढीचा विरोध करणाऱ्या विद्यार्थांवर आणि जेएनयूवर निशाणा साधला गेलाय. तिथं देशद्रोहाचे नारे दिले जातात असा खोटानाटा आरोप केलाय. असा आरोप करण्याऱ्यांनी दिल्ली पोलिसांना एक प्रश्न विचारावा. आज तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी नारा देणाऱ्यांना अटक का करण्यात आली नाही? केजरीवाल किंवा लालू प्रसाद दिल्ली पोलिसांना कंट्रोल करत नाहीत. पण पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारायची हिम्मत कुणाच्यातही नाही.

जेएनयू काही स्वर्ग नाहीय. तिथं अनेक अडचणी आहेत. त्या अडचणींवर उपाय काढायचा सोडून डाव्या विचारसरणीच्या बौद्धिक आतंकवादाला चॅलेंज करण्यासाठी फी वाढवणं हा कोणता मार्ग आहे? त्यांच्या बौद्धिकतेला उत्तर देताना बुद्धीचाच वापर करावा. 

काही लोक आरोप करतात की तिथं अश्लील चाळे चालतात, मुलं सर्रास सेक्स करतात वगैरे. मला सांगा, जेएनयूमधे कुणी कुणावर जोरजबरदस्ती, बलात्कार करतंय का? दोन व्यक्ती त्यांच्या मर्जीनं एकमेकांसोबत राहत असतील तर त्याविषयी बोलणारे आपण कोण आहोत? 

इतर युनिवर्सिटींमधे शिक्षण घेणारे त्यांचं लिंग आणि योनी घरी ठेवून मग युनिवर्सिटीत येतात का? ज्याला शरीरसंबंध करायचे आहेत तो गाव किंवा शहर कुठंही करेल. जेएनयूमधे आपल्या मर्जीनं लोकं राहतात. कोणी त्रास देत असेल तर तशी तक्रारही इथं केली जाते आणि छेड काढणाऱ्याला कानफटात मारण्याची हिम्मतही इथं दाखवली जाते.

प्रत्येक युनिवर्सिटी जेएनयूसारखी असावी

असो. ज्याला हे समजूनच घ्यायचं नाही त्यांनी न घेवो. खरंतर देशाला विचार करणाऱ्या आणि समजून घेणाऱ्या लोकांची गरज नाही. त्यांना मान खाली घालून गुपचूप मशिनसारखं काम करणारे लोक हवेत. कारण देशातले अनेक लोक स्वतः असं आयुष्य जगतायत.

गरीब विद्यार्थांना शिक्षण घेता येईल यासाठी भारतातल्या प्रत्येक युनिवर्सिटीनं जेएनयूसारखं असलं पाहिजे. हॉस्टेलची फी कमी असावी. चांगले शिक्षक असावेत. प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे. सरकारला सतत प्रश्नांच्या घोकळ्यात ठेवायला हवं हे शिकवलं पाहिजे. कॉर्पोरेटच्या तत्त्वांवर टीका करणं शिकवायला हवं. या जगाला आणखी सुंदर कसं करता येईल हे शिकवायला हवं. कॉलेजमधे शिक्षण घेऊन, नोकरी करून, मान खाली घालून जगायला सगळेच शिकवत असतात.

हेही वाचा : 

 बाजार समित्या बरखास्ती ही तर दुसरी नोटाबंदीच

इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी

(जे. सुशील यांच्या फेसबूक पोस्टचा अनुवाद : रेणुका कल्पना)