मध्यरात्री नझरुल काझींनी जन्मस्थळी बसवला जिजाऊंचा पुतळा

१२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज राजमाता जिजाऊंच्या जन्मदिवशी सिंदखेदराजाला हजारोंची गर्दी उसळलीय. पण त्यातल्या फार कमी जणांना माहीत असेल या मातृतीर्थाचा पाया एका मुसलमान कुटुंबाने रचलाय. त्यावर आज मराठा सेवसंघाने भव्य जिजाऊसृष्टी उभारलीय. या आधुनिक तीर्थस्थळाचा आजचा ऑन द स्पॉट रिपोर्ट.

जेमतेम ३० हजार लोकवस्तीचं तालुक्याचं ठिकाण असलेलं सिंदेखेडराजा शहर आज लाखो शिवभक्तांच्या गर्दीने फुललंय. शहराच्या मधोमध असलेल्या जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधव यांच्या वाड्यात भगवे फेटे बांधलेल्या असंख्य जिजाऊप्रेमींनी गर्दी केलीय. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी तिथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

घोषणांनी वातावरण जिजाऊमय

लखुजीराजे जाधव यांच्या वाड्यात चिरेबंदी चौथऱ्यावर चढून गेल्यानंतर उजव्या हाताला कोपऱ्यात चांगल्या अवस्थेत असलेली एक खोली आहे. ही खोली बाळंतघर असावी, असा शोध इतिहास संशोधकांनी लावलाय. तेव्हापासून हीच खोली जिजाऊंचं जन्मघर असल्याची गोष्ट लोकांमधे रूढ झालीय. याच खोलीत असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो जिजाऊ भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.

‘जय जिजाऊ जय शिवराय’, ‘तुमचं माझं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय’, ‘एकच वारी बारा जानेवारी’ अशा असंख्य घोषणांनी आज सिंदखेड राजाचा आसमंत दुमदुमून गेलाय. सगळं वातावरण जिजाऊमय होऊन गेलंय.

जिजाऊंचा विचार कुटुंबाला कळावा म्हणून

याच गर्दीत मला भरत म्हस्के भेटले. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातल्या कांबी या गावाहून ते इथे आलेत. गेल्या चार वर्षांपासून ते या मातृतीर्थला, जिजाऊसृष्टीला भेट देतात. इथे येण्यामागची प्रेरणा सांगताना ते म्हणाले, ‘राजमाता जिजाऊ या शिवाजी महाराजासारख्या महान राजाला जन्म देणाऱ्या आई आहेत. त्या भविष्यात समाजालाही दिशा देऊ शकतात. त्यांचा मला अभिमान वाटतो म्हणून त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी मी दरवर्षी सिंदखेडराजाला येत असतो. इथे येताना मी एकटा येत नाही. माझा मुलगा, सुना, नातू, नाती या सगळ्यांना घेऊन येत असतो. कारण जिजाऊंचा आदर्श माझ्या घरातल्या प्रत्येकाने घेतला पाहिजे, असं मला वाटतं.’

या सगळ्या गर्दीत एक व्यक्ती मात्र खूप धावपळ करत होती. ती व्यक्ती म्हणजे अॅड. नाझेर काझी. ते सिंदखेडराजा नगरपरिषेदेचे अध्यक्ष आहेत. आणि दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन नगरपरिषदच करत असते. यंदाही नगरपरिषदेने सोहळ्याची चोख व्यवस्था केलीय. नगरपरिषद प्रांगणात भला मोठा मंडप उभारलाय. येणाऱ्याजाणाऱ्यांचं, पाहुण्यांचं, नेत्यांचं स्वागत ते या मंडपात करत असतात.

ब्राम्हण अबलेला लखुजीराजेंची मदत

नाझेर काझी हे स्वतः राजघराण्यातले आहेत. लखुजीराजे जाधव यांच्या आधी सिंदखेडराजाची जहागिरदारी ही काझी घराण्याकडे होती. या गडबडीतच मी त्यांच्याशी संवाद साधला. नाझेर काझीही कमालीच्या आत्मीयतेने जिजाऊ जन्मस्थळाचा इतिहास सांगू लागले.

नाझेर काझी सांगत होते, ‘१४ व्या शतकाच्या आसपास सिंदखेडराजा परगण्याची जहागिरी आमच्या कुटुंबाकडे होती. पण दीडशे वर्षानंतर आमची जहागिरी एका ब्राम्हण व्यक्तीकडे गेली. पण कालांतराने त्या ब्राम्हण कुटुंबातला पुरुषवंश खंडित झाला. आणि शेवटी एकच महिला जिवंत राहिली. या काळात एक गुंड या महिलेला त्रास देत होता. त्यावेळी लखुजी जाधव हे देवगिरी किल्ल्यावर दौलताबादला ४० हजारी मनसबदार होते. या ब्राम्हण महिलेने लखुजी जाधव यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली. त्यानुसार लखुजी जाधव यांनी सिंदखेडराजा इथे येऊन त्या गुंडाचा शिरच्छेद केला. त्या ब्राम्हण महिलेला भयमुक्त केलं. पण शेवटी ती ब्राम्हण एकटी आबला असल्यामुळे तिने आपली जहागिरी लखुजी जाधव यांना देऊन टाकली.’

तिथून पुढे लखुजीराजे जाधव सिंदखेडराजाचे जहागीरदार झाले. लखुजीराजे जाधव यांचं पाचवं अपत्य राजमाता जिजाऊ यांचा जन्मही याच सिंदखेडराजात झाला. त्यांची सोयरीक इथेच जमली. लग्नही सिंदखेडराजामधेच झालं. लग्नानंतर भोसले आणि जाधव कुटुंबात कमालीचं वितुष्ट निर्माण झालं. परिणामी शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर जिजाऊ फक्त एकदाच सिंदखेडराजाला आल्या. जिजाऊ नंतर कधी इथे आल्याचे काहीच पुरावे नाहीत.

जिजाऊंचा भौगोलिक भिंती तोडणारा वारसा

विदर्भात जन्मलेल्या या वीर मातेचं मराठवाड्यातल्या मुलाशी लग्न झालं. पश्चिम महाराष्ट्रात कारकीर्द बहरली तर कोकणात त्यांनी देह ठेवला. असं कुठल्याही भौगोलिक सीमा नसलेल्या जिजाऊ यांचा भव्यदिव्य असा जन्मोत्सव सिंदखेडराजा इथे गेल्या काही वर्षांपासून मोठ्य प्रमाणात साजरा होऊ लागलाय.

सिंदखेडराजा इथे हा जन्मोत्सव साजरा होऊ लागला याचीही कहाणी मोठी रंजक आहे. इंग्रजांच्या काळात देशातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू, वारशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाला होतं. पण इंग्रजांच्या तावडीतून देश मुक्त झाल्यानंतर हळूहळू देशी अस्मिता जागी होऊ लागली. त्याचवेळी जिजाऊंचं जन्मस्थळ चर्चेत येऊ लागलं.

खरंतर स्वातंत्र्यपर्यंत सिंदखेडराजाचे जाधव हे जहागिरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. त्यामुळे लखुजीराजे जाधव यांचा राजवाडा ओस पडला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनेक दशकं पुरातत्व खत्यानेही या वाड्याकडे कमालीचं दुर्लक्ष केलं. त्यामुळे लखुजीराजे जाधव यांचा राजवाडा नामशेष होण्याच्या मार्गावर होता.

नामशेष होत असलेल्या राजवाड्याची गोष्ट

पण त्याचवेळी सिंदखेडराजा गावात नझरूलहसन गुलामहुसेन काझी नावाचं मोठं प्रस्थ होतं. नझरूल काझी हे शिक्षित असल्यामुळे त्यांना इतिहासाची जाण होती. आणि राजमाता जिजाऊ यांचा जन्म हा याच राजवाड्यात झाला याची त्यांना माहिती होती. हे नझरूलहसन काझी म्हणजे सिंदखेडराजाचे सध्याचे नगराध्यक्ष नाझेर काझी यांचे आजोबा.

सगळ्यांच्या दुर्लक्षामुळे राजवाडा पूर्णपणे उद्धवस्त झाला होता. प्रचंड दुरवस्था झाली होती. पण या अख्ख्या वास्तूत फक्त दोनच खोल्या सुस्थितीत होत्या. त्यावेळी नझरूल काझी यांनी काही इतिहास संशोधकांची भेट घेऊन वाड्याची माहिती मिळवली. आज जिथे जिजाऊ जन्मस्थळ आहे, ती खोली चांगल्या स्थितीत होती. मुख्य वस्तूच्या एका कोपऱ्यात असलेल्या या खोलीत नाहनीघर आहे.

पूर्वीच्या काळी अशा खोल्या बाळांतघर म्हणून वापरल्या जात. ही माहिती मिळाल्यानंतर काझी यांनी या खोलीत जिजाऊंची पुण्यतिथी साजरी करायला सुरवात केली. ही गोष्ट आहे १९७० ची. म्हणजे जवळपास पन्नास वर्षांपूर्वीची. हे करत असताना गावातले अनेक प्रतिष्ठित लोकही त्यांच्यासोबत होते. त्यांचंही या कामी महत्वाचं योगदान आहे.

सुरवातीला पुण्यतिथी साजरी केली जात होती. मात्र काही अभ्यासकांनी पुण्यतिथी साजरी न करता जयंती साजरी करण्याचा सल्ला दिला. पण १९७० मधे काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिजाऊंची जयंती कधी असते याची माहिती नव्हती. अनेक संशोधकांनी इतिहासाचे संदर्भ शोधून १२ जानेवारी ही जिजाऊंची जन्मतारीख असल्याचा शोध घेतला. तेव्हापासूनच १२ जानेवारीला सिंदखेडराजा इथे जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा होऊ लागला. पण त्याचं स्वरूप हे फक्त एका छोट्या गावापुरतं मर्यादित होतं.

नझरूल काझींनी बसवला पुतळा

पुढे काझी यांनी या जन्मखोलीत जिजाऊंचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला. पण पुरातत्व खात्याने याला विरोध केला. तेव्हा काझी यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मध्यरात्री जिजाऊंच्या जन्मखोलीत जिजाऊंचा पुतळा बसवला. आज शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदुमुस्लिम वाद पेटवून मोकळे होऊन आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचे दिवस आहेत. त्यावेळी नझरूल काझी यांनी जिजाऊंच्या जन्मस्थळाचा विकास होण्यासाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. कौतुक करण्यासारखी आहे.

जिजाऊ जन्मस्थळ विकासामधे आणखी एका मुस्लिम व्यक्तीचा मोठा वाटा आहे. १९८२ मधे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी सिंदखेडराजा इथल्या जिजाऊ जन्मस्थळाला भेट दिली. जिजाऊ सृष्टीला भेट देणारे अंतुले पहिले मुख्यमंत्री होते. यासाठी नझरूल काझी यांनी खूप प्रयत्न केले. अंतुलेंच्या भेटीनंतर हे जन्मस्थळ खऱ्या अर्थाने चर्चेत आलं.

पुढे १९९० मधे मराठा सेवा संघाची स्थापना झाली. संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊ जन्मस्थळाला भेट देत त्या ठिकाणच्या दुरवस्थेवर ठिकठिकाणी बोलायला सुरवात केली. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या पुढाकारातून सिंदखेड राजाला जिजाऊ जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. या काळातच जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. त्यांचा प्रचारप्रसार करून जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या घराघरात पोचवलं. जिजाऊंचा विचार घराघरात पोचला. या सगळ्यांमुळे आज सिंदखेडराजा इथे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लाखो लोकांची गर्दी उसळत आहे.

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)