रिलायन्स जिओचं गिगा फायबर आपण कसं वापरू शकतो?

१३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज रिलायन्स कंपनीची वार्षिक सभा झाली. यात जिओचं गिगा फायबर लाँच ५ सप्टेंबरला लाँच होण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. गिगा फायबर आहे तरी काय? आणि यामुळे जिओ ग्राहकांना काय फायदा होईल?

भारतातली सगळ्यात मोठी कंपनी कोणती? असा प्रश्न आपण लहान मुलांना विचारला तरी ते पटकन म्हणतील, रिलायन्स इंडस्ट्रीज. याच रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड कंपनीची आज १२ ऑगस्टला वार्षिक सर्वसाधारण सभा अर्थात एजीएम होती. आणि ही सभा कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी घेतली.

१० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था

दरवर्षी एजीएममधून रिलायन्सच्या ग्राहकांना सरप्राईज मिळतं. नवनवीन योजना, सवलतींची घोषणा यात होत असते. त्यामुळे उद्योग क्षेत्रातल्या स्पर्धकांपासून आपल्या सारख्यांनाही एजीएममधे काय घोषणा होतात याची उत्सुकता लागलेली असते. यंदा रिलायन्सची ४२ वी सभा मुंबईत सकाळी अकराला सुरू झाली.

यावेळी मुकेश अंबानी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत. त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे, भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे. आणि भारताला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सध्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही तात्पुरती आहे.

२०२३ पर्यंत ५ हजार ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य आहे. पण माझ्या मते २०३० पर्यंत भारत १० हजार ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश होईल, असंही अंबानी म्हणाले.

हेही वाचा: परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार?

जिओचे युजर्स ३३ कोटींवर

येत्या वर्षभरात रिलायन्स कंपनी ही कर्जमुक्त होईल. आणि कंपनी आर्थिकदृष्ट्या स्थिर होईल. ही उद्योग क्षेत्रातली खूप मोठी गोष्ट मानली जातेय. सौदी अरेबियातली तेल कंपनी सौदी अरॅमको ही रिलायन्समधे २० टक्के गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक ७५ अब्ज डॉलर्सची असेल, असंही अंबानी म्हणाले.

रिलायंस उद्योग समुह देशातला सगळ्यात जास्त जीएसटी आणि आयकर भरणारा ठरलाय. यात जिओचं मोठं योगदान आहे. जिओने टेलिकॉम क्षेत्रावर ३२ टक्के वर्चस्व मिळवलंय. त्यांचे युजर्स तर ३३ कोटींवर गेलेत.

५ लाख घरांमधे गिगा फायबर

जिओच्या घोषणा या ग्राहकांना खुश करणाऱ्या आहेत. यातल्या जिओ फायबर वेलकम प्लॅनमधे एका वर्षाच्या कालावधीसाठी जिओ फायबर सेवा घेणाऱ्यांना मोफत ४ के एलईडी टीवी आणि ४ के सेट टॉप बॉक्स देण्यात येतील. ४ के म्हणजे ४ हजार रेजोल्युशनमधे आपल्याला चित्र दिसेल.

जिओ फायबर टू द होम म्हणजेच एफटीटीएचद्वारे घरापर्यंत फायबर कनेक्शन येईल. आतापर्यंतच्या इतर ब्रॉडबॅण्ड सेवांमधे फायबर कनेक्शन बिल्डिंगपर्यंत आणलं जातं आणि तिथून घरापर्यंत केबलने कनेक्ट केलं जात. पण आता थेट घरापर्यंत फायबरचं कनेक्शन मिळेल. म्हणजे केबल खराब होण्याचं टेन्शन दूर होऊ शकतं.

२०१६ पासून या गिगा फायबरच्या चाचण्या सुरू झाल्या. सध्या तब्बल ५ लाख घरांमधे ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. येत्या ५ सप्टेंबरपासून ही सेवा सगळ्यांसाठी खुली होईल.

हेही वाचा: बराक ओबामांचं सध्या काय चालू आहे?

जगातलं सगळ्यात मोठं ब्रॉडबँड

अति वेगवान इंटरनेट सेवा हे या फायबर नेटचं वैशिष्टयं असेल. अमेरिकेतल्या इंटरनेटची स्पीड जगात सगळ्यात जास्त आहे. तिथे ९० एमबीपीएस स्पीडने इंटरनेट चालतं. तर आता जिओ फायबरचा प्लॅन १०० एमबीपीएसपासून सुरू होईल. आणि १ जीबीपीएसच्या प्लॅनमधे सगळ्यात जास्त स्पीड असेल. म्हणूनच हे जगातलं सगळ्यात मोठं ब्रॉडबँड ठरेल. ही सेवा घेण्यासाठी दरमहा ७०० ते १० हजार रुपयांपर्यंतचे विविध प्लॅन उपलब्ध करण्यात येतील.

याशिवाय प्रिमियम ओटीटी म्हणजे ओवर द टॉपर मीडिया सर्विसही देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. म्हणजे आता आपल्याला हॉटस्टार, नेटफ्लिक्स हे आधीच इन्स्टॉल करून मिळतील. पण नेमक्या याच सेवा दिसतील की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

जिओ फायबर, गिगा फायबरेचे फायदे

आपल्याला सिनेमे बघायला किती आवडतात. पण दरवेळी थिएटरमधे जाऊन बघायला वेळ नसतो. पण जिओ फायबरच्या ग्राहकांना नवीन सिनेमे रिलिज झाल्याबरोबर लगेच बघता येणार आहेत.  याला 'जिओ फर्स्ट डे फर्स्ट शो' असं नाव देण्यात आलंय. २०२० पर्यंत ही सेवा सुरू होईल.

जिओ फायबरच्या ग्राहकांना फॅमिली प्लॅन्स, डेटा शेअरिंग, इंटरनॅशनल रोमिंग आणि लँडलाईनवरून कॉल करण्यासाठी खास स्वस्त दरही आकारले जातील. महिना ५०० रुपयांमधे अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉल करता येतील. जिओ फायबरच्या ग्राहकांसाठी देशातल्या व्हॉईस कॉलिंगसाठी पैसे आकारले जाणार नाहीत.

जिओ गिगा फायबर सेट टॉप बॉक्स हा स्थानिक केबल ऑपरेटरकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेट टॉप बॉक्सने गेमिंगही करता येईल आणि सध्या बाजारात असणारे सगळे गेमिंग कन्ट्रोलर्स यासोबत चालणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

जिओची ही सेवा कशी घ्यायची यासारख्या गोष्टींसाठी आपल्याला सध्या तरी पुढची घोषणा होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

हेही वाचा: 

आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

तणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज