आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

११ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?

भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानचा ठाण्यातला पदाधिकारी अनंत करमुसे याने घरबांधणी खात्याचे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरचे आरोप सध्या गाजत आहेत. शिवाजी महाराजांचं नाव सांगणाऱ्या या संस्थेशी संबंधित असूनही शिवरायांच्या आदर्शांना न शोभणारी पोस्ट करमुसेने वायरल केली होती.

समर्थन करता येणार नाही

त्या विधिनिषेधशून्य पोस्टमुळे वैतागून आव्हाड यांनी त्यांच्या बॉडीगार्डना पाठवून स्वतःच्या बंगल्यावर बोलावून घेतलं. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्या बॉडीगार्डनीच त्याला मारहाण केली, असे आरोप करमुसे यांनी केलेत. या प्रकरणानंतर कुरमुसे याच्या अनेक जुन्या पोस्ट वायरल झाल्या.

या पोस्ट्सला केवळ अश्लील आणि विकृत म्हणता येणार नाहीत, तर त्यापुढे जाऊन किडलेल्या मनोवृत्तीच्या म्हणाव्या लागतात. त्यामुळे केवळ त्याच्या आरोपांवर विसंबून राहाता येणार नाही. दुसरीकडे या प्रकरणात राष्ट्रवादीचे पाच कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आव्हाड त्यांच्यावर दोष टाकून सहज नामानिराळे राहू शकतात.

अर्थातच आव्हाड यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत. सीसीटीवी कॅमेराचे उपलब्ध फुटेजही त्यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी. दोषी असतील तर आव्हाड यांच्यावर कायद्यानुसार कारवाईही व्हायला हवी. आव्हाड दोषी असतील तर त्यांच्या या कृतीचं समर्थन कोणीही करू नये.

हेही वाचाः तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

आरोप सिद्ध नसेल, तरीही

जितेंद्र आव्हाड यांनी हे केलंच असावं, असा त्यांच्या विरोधकांचा आणि समर्थकांचाही सूर आहे. त्याला आव्हाड यांचं आजवरचं रावडी राजकारणच कारण आहे. त्यांनी एका मुलीची छेड काढणाऱ्याला घरी जाऊन कानफटवण्याचं प्रकरण काही वर्षांपूर्वी टीवी चॅनलवर गाजलं होतं.

तेव्हाही चूक कबूल करण्याऐवजी त्यांनी टीवीवाल्यांनाच शहाणपणा शिकवण्याचा उद्धटपणा केला होता. कुरमुसेचे आरोप खरे असतील तर या प्रकरणातला आव्हाडांचा सराईतपणा लक्षात येणारा आहे. यापूर्वीही त्यांनी असे प्रकार करून पचवले असण्याची एक शक्यता नाकारता येत नाही.

आव्हाड असोत किंवा मुलगी पळवून आणण्याचं जाहीर वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम असोत, हे शिवसेनेच्या दादागिरीच्या राजकारणाच्या प्रभावातून निर्माण झालेल्या संस्कृतीचे प्रोडक्ट आहेत. आज शिवसेनेचा सर्वसमावेशक चेहरा समोर येतोय. त्याचवेळेस शरद पवारांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगणारे आव्हाड असंस्कृत राजकारणाचं प्रतीक बनलेत. अंगावर आलं तर शिंगावर घेण्याच्या करामती सत्तापदं नसताना चालून जातात. आता त्या चालू शकणार नाहीत.

हेही वाचाः ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 

तर मुख्यमंत्र्यांनी `खेद` व्यक्त करावा

आज आव्हाड राज्यात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत. सत्ता त्यांच्या हातात आहे. गृहखातं त्यांच्या पक्षाकडे आहे. त्यांच्यावर राज्यघटनेने कायदा सांभाळण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. अशावेळेस त्यांनी कायदा हातात घेतला असेल, तर ते चुकीचंच आहे. अशा प्रकारच्या हिंसेचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. विशेषतः सगळं राज्य कोरोनाशी लढा देत असताना आव्हाडांनी स्वतः किंवा त्यांच्या इशाऱ्यावरून कुणालाही मारलं असेल, तर त्याचं गांभीर्य वाढलंय.

सत्तेवरची मंडळी अशीच समांतरं कोर्ट चालवायला लागली, तर कायद्याचं राज्यच धोक्यात येईल. अशाने दंगली उसळतील. डोळ्यासाठी डोळा काढला, तर एक दिवस जगच आंधळं होईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याचा निषेध नोंदवायला हवा. निदान पंतप्रधान करतात तसा तोंडदेखला खेद तरी व्यक्त करायला हवा. अर्थात हे आव्हाड दोषी असतील तरच करावं.

हेही वाचाः जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

पुरोगामी हिंसेचं समर्थन कसा करेल?

अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विचारवंत यांनी सोशल मीडियावर आव्हाड यांची बाजू घेतलीय. त्याचं कारण करमुसेच्या प्रतापात दडलंय. आईबहिणीवरून शिव्या घातल्याशिवाय त्याच्या पोस्ट पूर्ण होत नाहीत. त्याने आतापर्यंत आव्हाड यांच्यासह अनेकांच्या आई, मुली, बहिणी, बायको यांच्याविषयी अत्यंत अभद्र लिहिलंय. त्याच्यामुळे आव्हाड यांचा निषेध करणाऱ्यांनीही करमुसेची बाजू घेतलेली नाही.

भिडे, मोदी, शाह, फडणवीस आणि इतर हिंदुत्ववाद्यांवर टीका केल्यावर ही करमुसे आणि गँग कमरेखालचं बोलून जीव नकोसा करतात. सतत खोटी माहिती रेटतात. जातधर्मावरून तेढ वाढवतात. ते सतत सहन केल्यामुळे ठकासी ठक किंवा शठं प्रतिशाठ्यं या न्यायाने त्यांनी ट्रोलरच्या विरोधात आव्हाडांचं समर्थन केलंय. अशांना कायद्याची भाषा कळणार नाही, असा त्यांचा दावा आहे. या दाव्यात तथ्य असलं तरी खरा पुरोगामी हिंसेचं समर्थन करू शकणार नाही. कारण हिंसेची दिशा पुढे नाही, तर मागे नेणारीच असते.

हेही वाचाः अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?

जितेंद्र आव्हाड जी डायलॉग मारायला खूप आवडतात..
म्हणून या निमिताने सत्या चित्रपट ची एक line..

मौका सभी को मिलता है !

— nitesh rane (@NiteshNRane) April 7, 2020

नीतेश राणेंचं ट्विटर बघायला हवं

आज या करमुसे प्रकरणानंतरही अनेक ट्रोलर तेच करत आहेत. उदाहरणादाखल आमदार नीतेश राणेंच्या ट्विटवरच्या कमेंट पाहता येतील. राणेंनी आव्हाडांना डायलॉग सांगितलाय, मौका सभी को मिलता हैं. त्यावर अनेकांनी आव्हाड प्रकरण हिंदू मुस्लिम वादावर नेलंय. आव्हाडांना जैतूद्दीन म्हणणं किंवा मुसलमानांनी एका हिंदूला मारलं, अशा प्रकारचे तेढ वाढवणारे आरोप दिसतात.

दुसरीकडे काही जणांनी अनंत करमुसेनेच नीतेश राणेंना शिव्या घातल्याचे जुने स्क्रीनशॉट शेअर केलेत. करमुसेने आव्हाडांचा मॉर्फ केलेला फोटो टाकून, तुमच्याबाबत असं झालं तर काय, असा प्रश्न विचारणारेही आहेत. करमुसेची बाजू घेण्याआधी त्याची हिस्ट्री तपासा, असं सांगत काळजी घेण्याचा सल्लाही त्यांना दिलाय.

हा सल्ला खरं तर इतर भाजपवाल्यांसाठीही आहे. कोरोना प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या संयत आणि आश्वासक भूमिकेचं देशभर कौतुक होत असताना, राज्यातली भाजप त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते. पण तेल लावलेल्या पैलवानासारखे उद्धव त्यातून सुटत होते. आता मात्र आव्हाड प्रकरणी ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचे रखडलेले मनसुबे प्रत्यक्षात आणण्यासाठी जोरात प्रयत्न चालवलेत.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

हे करमुसेला वाचवण्यासाठी नको

तिथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपला पक्ष कोरोनाच्या काळात कोणतंही आंदोलन करणार नसल्याचं सांगितलं होतं. तरीही माजी खासदार किरीट सोमय्या थेट करमुसेला भेटायला चालले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जेलभरो आंदोलनाचे इशारे देत आहेत. विनय सहस्रबुद्धेंसारखे विद्वान राज्यपालांना भेटून तातडीने राजीनामा मागत आहेत.

हे सारं फक्त जितेंद्र आव्हाडना धडा शिकवण्यासाठी असेल, तर ठीक आहे. पण ते करमुसेसारख्या नीच प्रवृत्तींना वाचवण्यासाठी असेल, तर मात्र आपल्या सगळ्यांसाठीच हे अडचणीचं आहे. ही ट्रोलगँग जणू काही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, असंच भाजपच्या नेत्यांचं वर्तन आहे. या ट्रोलरना कोणताही विधिनिषेध नाही. ते कोणाचेही नाहीत.

कुणीही शहाण्या माणसाने या प्रकरणात आव्हाडांची बाजू घेऊ नये, तशीच करमुसेंसारख्यांचीही बाजू घेऊ नये. थोडी कारवाई होताच, हिंदुत्ववादी म्हणवून घेणारी सनातन संस्था भाजपच्या विरोधात उलटल्याचं आपण पाहिलेलं आहेच. उद्या कट्टरता भिनलेले ट्रोलरही उलटले तर आश्चर्य नाही. ही विषवेल आहे. ती सगळ्यांनी मिळून मुळापासून महाराष्ट्राच्या पवित्र मातीतून कायमची उपटून टाकायलाच हवी.

हेही वाचाः पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

मारहाणीने ट्रोलर संपणार नाहीत

पण एका अनंत करमुसेला फटकावल्याने हे होणार नाही. उलट या मारहाणीने कट्टर हिंदुत्ववाद्यांसाठी नवा हिरो जन्माला आलाय. यातून नवे करमुसे जन्माला येणार आहेत. फांद्या छाटून काही होत नाही. उलट नवी पालवी फुटते. ही भयंकर ट्रोलरना संपवायचं असेल तर मुळावर घाव घालायला हवेत. त्याची हिंमत कोणात आहे? इथे विचारच कामाला येऊ शकतात. महाराष्ट्राच्या मातीतले पुरोगामी विचारच हे करू शकतात.

करमुसेंसारख्यांना आजवर कोणी पोसलं हे भाजपच्या सत्ताकाळात उघड झालेलं आहेच. तरीही त्यांच्याच ओंजळीने पाणी पिणाऱ्यांच्या मनगटात मुळावर घाव घालण्याचं बळ असण्याची शक्यता नाही. भिडे गुरुजींनी द्वेषाचं विष किती खोलवर रुजवलंय हे महाराष्ट्राला त्यांच्या ऐंशीव्या वर्षी लक्षात आलं. तेच सनातन संस्थेच्या डॉ. आठवलेंच्या बाबतीतही घडलं. तोपर्यंत त्यांना पोसत कोण होतं, याचा इतिहास शोधला, तर मुळावर घाव घालता येईल. सांगली मिरजच्या दंगलीत भिडे गुरुजींचा बचाव करणाऱ्यांना आता तरी पश्चात्ताप होत असेल, तर ते शक्य आहे.

फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने राज्य करणारे नेते आजही आतून ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सत्तेसमोर नतमस्तक होणारे असतील, तर करमुसेंना संपवता येणार नाही. आजही बहुजनहिताच्या गोष्टी करणाऱ्या राजकारण्यांना संस्था सांभाळण्यासाठी, दिवे ओवाळून घेण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी इतकंच नाही तर राजकीय सल्लामसलतीसाठीही तथाकथित उच्च जातीचा टेंभा मिरवणारेच हवे असतील, तर करमुसे नावाची कीड राहणारच.

हेही वाचाः पंजाबराव देशमुखांना आपण आतातरी स्वीकारायला हवं: डॉ. स्वामिनाथन

करमुसे प्रवृत्ती गाडायची असेल तर

स्वतःला विद्रोही आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या राजकारण्यांनी विचारांसाठी प्राण पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांचा फक्त वापरच करून घेतलाय. त्यांच्या घोळक्यात शिरायचं आणि आपले मतदारसंघ बळकट करायचे, हे बहुसंख्य बहुजनी राजकारण्यांची स्ट्रॅटेजी दिसलीय. त्यांना विचारांशी मतलब कधीच नव्हता. डोळा होता तो मतांवरच. जितेंद्र आव्हाडही या सगळ्याला अपवाद नाहीत.

आपले कपडे नसलेले मॉर्फ फोटो पाहिल्यावर टाळकं बिघडलं असेल आणि एखाद्या विकृत ट्रोलरला मारहाण केलीही असेल किंवा नसेलही. पण यात कुणाला पराक्रम वाटत असेल, तर कृपया तसं मानू नका. आज डॉ. पंजाबराव देशमुखांचा स्मृतिदिन आणि उद्या महात्मा फुलेंचा जन्मदिन आहे. धर्माच्या, संस्कृतीच्या, जातवर्चस्वाच्या नावावर कुणी माझ्या लाखो माणसांना नागवं करतंय, असं वाटून अख्खं आयुष्य त्यांच्यासाठी अर्पण करणारे हे महापुरुष आहेत. आपण मारहाणी करण्यापेक्षा त्यांना थोडंसं समजून घेतलं तरी, करमुसे प्रवृत्ती कायमची गाडण्याचा मार्ग सापडेल.

हेही वाचाः 

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय?

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?