दु:खाकडे पाहण्याची तटस्थ नजर साहित्यिकाकडे पाहिजे - दामोदर मावजो

२२ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद.

गोव्यातले सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर झाला. देशाच्या साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान. ऋजू स्वभावाचे, मृदू बोलणारे मावजो भूमिका घेणारे साहित्यिक म्हणून ओळखले जातात. या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग जुळून आला. यावेळी भाषा, समाज आणि साहित्यिक या अनुषंगानं ते भरभरून बोलले. त्याचाच हा लेखाजोखा.

प्रश्न: तुम्हाला लेखनासाठी माणसाचं दुःख प्रवृत्त करतं की त्याचा उन्माद? तुमच्या लेखनामागची प्रेरणा नेमकी कोणती?

मला अमुकतमुकच असं नाही सांगता येणार. माझं गाव आहे, गावातले लोकही आहेत. एक घटना सांगतो. मला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आल्यावर विश्‍वासच बसला नाही. त्यांच्या विश्‍वासार्हतेवर मी भरवसा ठेवला.

मी आणि माझी बायको शैला दोघंच घरी होतो. बातमी खरी आहे का पाहण्यासाठी मी टीवी लावला. नागालँडमधे आपल्याच माणसांवर लष्कराकडून गोळीबार झाला होता. दहशतवादी समजून निष्पाप लोकांचा नाहक बळी घेतला गेला होता. त्यांच्या घरातल्या लोकांचा आक्रोश माझ्या कानावर पडला. ज्ञानपीठाच्या बातमीमुळं झालेला सगळा आनंदच कोसळून पडला.

आता हे अनुभव कधीतरी साहित्यात येणारच. मानवी जीवनातली विसंगती माझ्या साहित्यात येते. समाजात काही विपरीत दिसलं की मला चीड येते. याचं कारण, वाचनानं दिलेली विवेकबुद्धी. समाजाचं बोलणं आणि वागणं यातली विसंगती लेखनाला प्रवृत्त करते.

हेही वाचा: प्रभाकर सिनारीः गोव्यात क्रांतीला मुक्तीकडे नेणारा नायक

प्रश्न: सामाजिक अन्याय घडवणार्‍या व्यवस्थेकडं साहित्यिक म्हणून तुम्ही कसं पाहता? तुमची भूमिका काय असते?

माझा पिंड साहित्यावर पोसलेला आहे. साने गुरुजींनी मला खूप हळवं करून सोडलं. लहानपणी बालरामायण, महाभारत अशी पुस्तकं आधी भेटली. त्याची असंख्य पारायणं केली. वि. स. खांडेकरही वाचले. पोर्तुगीज काळात पुस्तकावरच नाही तर लिहिण्यावरही बंदी होती. लग्नाची आमंत्रणं जरी छापली तरी ती सेन्सॉर करून घ्यावी लागत. १६८४ ते १९१०पर्यंत बंदीमुळं कोकणी बोलताही येत नव्हतं.

सुरवातीचा शंभर वर्षांचा काळ सोडला तर नंतरचा काळ बंदीचाच होता. मराठी, हिंदी, कन्‍नड या भाषांचा उत्कर्ष होत होता तर कोकणीला मात्र बंदीला सामोरं जावं लागलेलं. १९१०मधे राजेशाही उलथवून नंतर पहिल्या पोर्तुगीज प्रजासत्ताकची राजवट सुरू झाली, तेव्हा बंदी उठवली. या बंदी आणि सेन्सॉरशिपमुळं कोकणीचं मात्र मोठं नुकसान झालं. गोव्यात अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यच नव्हतं.

या पार्श्‍वभूमीवर पाहता गोमंतकीय कलावंतांनी केलेला कलाविष्कार हा बंडखोरीचाच आहे. जितेंद्र अभिषेकी, किशोरीताई आमोणकर, मोगुबाई कुर्डीकर, सूरश्री केसरबाई केरकर अशा नामवंत कलावंतांना बंडखोरीमुळं गोव्याबाहेर जावं लागलं. साहित्यातही बंडखोरी केल्यामुळं बा. भ. बोरकर यांना पळून जावं लागलं. त्यांच्या सुरवातीच्या सगळ्या कविता बंडखोरच आहेत. रेंदर म्हणजे माडावर चढून नारळ काढणारे, त्यावेळी उत्स्फूर्तपणे गाणारे स्थानिक सामान्य लोक. त्यांना बोरकर आपला गुरू मानत. बोरकरांना जवळची भाषा वाटली ती मराठी.

प्रश्न: गोव्याच्या शेजारी कन्‍नड भाषिक कर्नाटक, मराठी भाषिक महाराष्ट्र अशी मोठी राज्यं आहेत. या भाषांचा सांस्कृतिक संगम म्हणजे गोव्याची कोकणी संस्कृती, असा गोव्याबाहेरच्या बहुतेकांचा समज आहे. तुम्ही या भाषा आणि गोव्याची कोकणी संस्कृती याविषयी काय सांगाल?

भाषावाद आपण निर्माण केलाय. भाषाकारणात राजकारण घुसल्यानं या विषयाला वेगळंच वळण मिळालं. खरं तर सगळ्या आपल्याच भाषा आहेत. कन्‍नड द्रविडीयन भाषा आहे. कोकणी, मराठी, गुजराती या इंडो-आर्यन भाषा आहेत. कोकणीत १५ टक्के तर गुजराती १० आणि कन्‍नडमधे ४० टक्के मराठी शब्द आहेत.

देशातलं असं भाषासौहार्द कायम राहिलं पाहिजे. त्यामुळेच विविधता टिकून राहील. भाषा सौहार्दामुळंच विविधतेतली एकता आपण जपून ठेवू शकू. नाहीतर एक दिवस दक्षिण भारत, उत्तर भारत असे तुकडे पडण्याची भीती वाटते. अशी फाटाफूट होणं कधीही मान्य नाही.

हेही वाचा: विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी

प्रश्न: समाजवादी साहित्यिक म्हणून तुमची ओळख आहे. साहित्यिक आणि राजकीय भूमिकेविषयी तुमचं मनोगत?

राजकारण हा प्रत्येकाच्या जीवनाचा अपरिहार्य हिस्सा आहे, याची जाणीव ठेवायला हवी. भाजपचं राजकारण मला पटत नाही. त्यांचा अतिरेकी राष्ट्रवाद मला मान्य नाही. याचा अर्थ, मी काँग्रेस किंवा कम्युनिस्टांच्या राजकारणातही नाही. मला गौतम बुद्ध खूप आवडतो, खूपच भावतो. येशू ख्रिस्त तर अपरंपार आवडतो. तो मुळापासून अभ्यासला पाहिजे. आता बुद्धाची देवळं बांधली जात आहेत. तेच येशू ख्रिस्ताचंही होतंय.

मला तर ‘वाद’ शब्दच आवडत नाही. शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक वेगळे कसे असू शकतात? मी त्यांच्यातलाच आहे. त्यांच्यावर अन्याय झाला तर मी त्यांच्या बाजूने उभा राहीन. केवळ भाजपला विरोध म्हणून नाही. शेतकरी आंदोलन असेल, शाहीन बाग असेल, मला तिथं जायचं होतं. पण आरोग्य आणि वयाच्या ऐंशीकडं सुरू असलेल्या वाटचालीमुळे जाता आलं नाही.

दु:खाकडे पाहण्याची तटस्थ नजर साहित्यिकाकडे पाहिजेच. दुसर्‍याच्या कॅन्सरच्या वेदनेवर आधारित कथा मी लिहिलीय. कालांतरानं मलाही कॅन्सर झाला. मग माझ्या असं लक्षात आलं की, मी व्यवस्थित लिहिलेलं होतं. कॅन्सरच्या वेदनांशी अगोदर मी तादात्म्य पावलो होतो आणि नंतर कॅन्सर मलाही प्रसन्‍न झाला.

प्रश्न: ‘अँथनी गोन्साल्वीसचा दूधभाऊ’ हा काय प्रकार आहे?

मी एकदीड वर्षाचा असेन. आई तापानं फणफणत होती. त्यामुळं ती मला स्तनपान करू शकत नव्हती. त्यामुळं मी रडायला लागलेलो. दारावरून जाणार्‍या एका महिलेनं रोजच्यासारखं माझ्या आईला हटकलं. ती आमच्या घरात आली. तिलाही बाळ झालेलं होतं. मी दुधासाठी रडतोय, हे बघून तिनं मला आपलं दूध पाजलं.

ही महिला म्हणजे ‘माय नेम इज अँथनी गोन्साल्वीस’ या गाजलेल्या गाण्यातली अँथनी यांची आई. ते होते प्रख्यात संगीत संयोजक. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्यांचं नाव सर्वदूर पोचवलं. अँथनी यांच्या बहिणी मला ‘दूधभाऊ’ म्हणून हाक मारायच्या. हे सगळं मला मोठं झाल्यावर समजलं.

हेही वाचा: चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!

प्रश्न: माणसानं निसर्गाची अपरिमित हानी केली, दमन केलं. ही जगभरची स्थिती. समुद्र म्हणजे प्लास्टिकनं भरलेली कचराकुंडी झालाय. माणूस आणि निसर्ग या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? सागरी जीवनावर मराठीत कादंबरी निर्माण झालेली नाही. तुम्ही या अनुषंगानं काय सांगाल?

‘त्सुनामी सायमन’ या माझ्या कादंबरीत सागरी जीवन आहे. ‘कार्मेलीन’ ही कादंबरी सागरी जीवनाशी निगडित आहे. त्यात खारवी समाजाविषयी लिहलंय. सध्या ‘त्सुनामी सायमन’ कादंबरी वाढवावी आणि आम्हाला वेबसिरीज करू द्यावी, असा आग्रह होतोय. पण मला त्यात रस नाही. तो माझा प्रांत नाही.

राजकारणाविषयी लिहायचं झाल्यास लोक मागं फिरतात, ते मला आवडत नाही. लेखकाने स्पष्ट बोलावं, स्पष्ट लिहावं. लिहिताना शिवी जरी द्यायची असली तरी ती अशी द्यावी की लोकांना आपण चुकलो याची जाणीव व्हावी. त्यांना शिवीचा राग येऊ नये. शिवीचा राग शिगेला गेला तर विषयाला भलतंच वळण मिळतं. लेखकानं प्रश्‍नांची सर्वंकष मांडणी करावी आणि संबंधितांना उत्तरं शोधायला प्रवृत्त करावं. त्यांच्यासमोर उत्तरांचे विकल्प ठेवावेत.

प्रश्न: साहित्यिक होऊ पाहणार्‍या तरुणांना तुम्ही काय सांगाल?

लेखक, साहित्यिक बनण्यासाठी आजचे तरुण धडपडत आहेत. त्यामधल्या अनेकांना लेखक आणि साहित्यिक या शब्दामधला फरक कळत नाही. ते चार शब्द लिहून लेखक व्हायचा प्रयत्न करतात. चार शब्दांमुळे कुणी साहित्यिक होत नाही. लोक आपल्याला साहित्यिक बनवतात.

आजच्या तरुणांनी प्रचंड वाचन करावं. तंत्रज्ञानाचा वापर साहित्यासाठी कसा करता येईल, याचा विचार करावा. भारतीय साहित्याचा अनुवाद करून ते जगभर पोचवावं. त्यासाठी तरुणांनी परकीय भाषाही शिकाव्यात.

हेही वाचा: 

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

गोव्याला जाण्याआधी निवडा आपल्या आवडीचा बीच

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

(दैनिक पुढारीतून साभार)