जोश हा वीडियो ऍप आणि डेलीहंट चालवणारी वर्स भारतातली महत्वाची स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीमधे जगभरातल्या बड्या कंपन्यांनी ६१ बिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय. भारतीय कंपनीमधे झालेली ही यावर्षीची सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. कंपनीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर करायचाय. त्यामुळे ही गुंतवणूक महत्वाची ठरणार आहे
चीनचं लोकप्रिय ऍप टिकटॉकच्या छोटेखानी वीडियोंनी अनेकांना भुरळ घातली. अनेकांना जगभर वायरल होण्याची संधी मिळाली. अगदी ग्रामीण-शहरी भागातली पोरं-पोरी भन्नाट वीडियो बनवून कानाकोपऱ्यात पोचली होती.
भारत सरकारनं २०२०ला टिकटॉकवर बंदी आणली. त्यामुळे टिकटॉक स्टार्सची अस्वस्थता वाढली. हीच संधी हेरत एका भारतीय स्टार्टअप कंपनीनं टिकटॉकसारखाच एक ऍप बाजारात आणला. त्याचं नाव होतं जोश आणि ती कंपनी होती वर्स. ही वर्स कंपनी यावर्षी सगळ्यात जास्त गुंतवणूक झालेली भारतीय कंपनी ठरलीय.
हेही वाचाः आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं
आपल्या कल्पकतेचा चालना मिळावी म्हणून २००७ला वीरेंद्र गुप्ता आणि शैलेंद्र शर्मा या दोघांनी वर्स कंपनीची स्थापना केली. वीरेंद्र गुप्ता हे सध्या वर्सचे सीईओ आहेत. या कंपनीचे अध्यक्ष असलेले उमंग बेदी हे २०१८ला वर्सशी जोडले गेले. त्यांचं मुख्यालय हे बंगळुरू इथं आहे. वर्स ही मेड इन इंडिया कंपनी आहे.
आपल्या कल्पक आयडिया आणि ऍपच्या जोरावर वर्समधे आतापर्यंत २ बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक झालीय. यातल्या १.५ बिलियन डॉलरची गुंतवणूक तर कंपनीला मागच्या वर्षी झाल्याचं कंपनीच्या वेबसाईटवरची आकडेवारी सांगते. योग्य संधीची चाहूल लागणं आणि त्याचा पुरेपूर वापर केल्यामुळेच कंपनीला हे यश मिळालंय.
या वर्षी कंपनीमधे ६१ बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक झालीय. याआधी स्वीगीनं अशीच गुंतवणूक मिळवली होती. जगभरातून सर्वाधिक गुंतवणूक झालेली वर्स भारतातली यावर्षीची सगळ्यात मोठी कंपनी ठरलीय. यामधे कॅनडाच्या पेंशन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड तसंच ओंटारियो टीचर्स पेंशन प्लॅन बोर्ड, तर अमेरिकेच्या लक्सर कॅपिटल, सुमेरू वेंचर्स अशा गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केलीय.
जून २०२०ला भारत सरकारने डेटा सुरक्षेचं कारण देत अनेक चिनी ऍपवर बंदी घातली. त्यात लोकप्रिय ठरलेलं चीनचं टिकटॉक ऍपही होतं. टिकटॉक अचानक बंद झाल्यामुळे वीडियोचा वेगळा प्लॅटफॉर्म हातचा गेला. त्यावर ज्यांचं पोट चालत होतं अशांच्या हातची रोजीरोटीही त्यामुळे गेली. बारामतीच्या मोढवे गावचा सूरज चव्हाण हा असाच एक टिकटॉक स्टार. टिकटॉकमुळेच तो सगळीकडे वायरल झाला. पण त्यावरच्या बंदीनं सुरजला गुलीगत धोका दिला.
टिकटॉकवर बंदी आल्यामुळे वर्सकडे एक आयती संधी चालून आली होती. ती संधी हेरून वर्सनं सप्टेंबर २०२०ला जोश नावाचा एक छोटा वीडियो ऍप बाजारात आणला. स्थानिक भाषेत कंटेंट, मनोरंजन देत अल्पवधीतच कंपनीनं हा जोश वाढवला. आज जोश ऍप १२ भारतीय भाषांमधे उपलब्ध आहे. डिसेंबर २०२०ला जोश हा भारतातल्या सर्वाधिक पसंतीचं शॉर्ट वीडियो ऍप ठरलं होतं. आज जोशनं दीड कोटींच्या युजर्सचा आकडा पार केलाय.
डेलीहंट हे वर्सचं सगळ्यात मोठं न्यूज ऍप आहे. त्याचे तीन कोटींपेक्षा अधिक युजर्स आहेत. सध्या या ऍपची स्पर्धा वीडियो ऍप मोज आणि इन्स्टाग्राम रिल्सशी आहे. वर्सनं पब्लिकवाईब नावाचं एक ऍपही बाजारात आणलंय. त्यातून स्थानिक भाषेतल्या बातम्या आणि इतर अपडेट दिल्या जातात. त्याचे ५० लाख युजर्स आहेत.
हेही वाचाः तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ
टिकटॉकवर बंदी आल्यावर वर्स लगेचच ऍक्शन मोडमधे आली. त्यासोबत इनमोबीचा रोपोसो, टाईम ऍमेक्स टकटक असे वीडियो ऍपही यात उतरले होते. पण सर्वाधिक पसंतीचं ठरलं ते वर्सचं जोश ऍप. कंपनीला या सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगभरातल्या १ बिलियनपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोचायचंय. आताची गुंतवणूक ही त्यासाठी सर्वाधिक फायद्याची ठरणार आहे.
लोक मनोरंजनाची वेगवेगळी माध्यमं शोधतायत. त्यांना विरंगुळ्याची साधन हवी आहेत. त्यामुळे आपल्या आयडिया इतरांपेक्षा वेगळ्या कशा असतील याच्या प्रयत्नात या कंपन्या आहेत. ही भुरळ घालणारी मनोरंजनाची साधनंही त्यांना लोकांपर्यंत पोचवायची आहेत. अर्थात ३० ते एक मिनिटांच्या वीडियोतून खरंच काही घडतं का हाही प्रश्न आहे. यात खरंतर कंपन्यांची आर्थिक गणितंही दडलीत. वर्सही त्याला अपवाद असायचं कारण नाही.
एखादं माध्यम स्थानिक भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकतं. त्यासाठी वर्सच्या संस्थापकांना कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा ठरवलाय. आताची गुंतवणूक त्यादृष्टीने कंपनीला महत्वाची ठरणार आहे.
तंत्रज्ञान बदलतंय. ऑनलाईन शॉपिंग हा आर्थिक उलाढालीचा एक उत्तम पर्याय बनत चाललाय. तोच धागा पकडत वर्स कंपनी आता ऑनलाईन व्यापार क्षेत्रातही उतरतेय. त्यासाठी वर्स वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलणी करतंय. त्यादृष्टीने पावलंही टाकली जातायत. त्याचाच भाग म्हणून एक स्वतंत्र ऍपही लॉंच करायची कंपनीची योजना आहे.
केवळ वर्स नाही इतर इतरही अनेक कंपन्या काळाची गरज ओळखून कंपनीची बांधणी करतायत. एकाचवेळी इतर प्लॅटफॉर्मचा वापर आपली कंपनी वाढवण्यासाठी केला जातोय. मोज ही अशीच एक भारतीय वीडियो कंपनी आहे. बंगळुरूस्थित १५ भाषांमधे सेवा देणाऱ्या या कंपनीनं ऑनलाईन व्यापारासाठी म्हणून मागच्या वर्षी ऑक्टोबरमधे फ्लिपकार्टसोबत करार केलाय.
रोसोपो ही 'इनमोबीज ग्लांस' या कंपनीची वीडियो प्लॅटफॉर्म असलेली एक कंपनी आहे. रोसोपोचा वापर करून आपण संगीत, कविता, फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरचे वीडियो शेअर करू शकतो. या कंपनीत रिलायन्सनं २० कोटी डॉलरची गुंतवणूक केलीय. त्यामुळे रोसोपोही आता ऑनलाईन व्यापाराच्या क्षेत्रात उतरेल.
हेही वाचाः
लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?
मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही