जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी

१९ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत.

चैत्राच्या मासात फुलल्या चारी वाटा

जोतिबा देव माझा रत्नागिरीचा राजा मोठा

चैत्र महिना सुरू होतो आणि रंगबिरंगी पानाफुलांनी सार्‍या रानवाटा फुलून जातात. लवलवत्या कोवळ्या पानांची चैत्रपालवी डोळ्यांना सुखावते. चैत्राची पुनव येते आणि वाडी रत्नागिरीचा डोंगर माणसांनी फुलून येतो. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ हा जयघोष सगळीकडे घुमू लागतो. खारीक, खोबरं आणि गुलालाची उधळण होते. सासनकाठ्या बेभान होवून नाचू लागतात.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

सगळीकडे गुलालाच्या पायघड्या पसरल्या जातात. नगारा वाजू लागतो आणि जोतिबाची पालखी यमाईच्या भेटीला निघते. हत्ती घोडे, उंट आणि भालदार चोपदार यांच्या लवाजम्यासोबत लाखो भक्त या सोहळ्यात सहभागी होतात. गेली हजारो वर्ष हा लोकसोहळा त्याच उत्साहाने अखंडपणे चालू आहे.

महाराष्ट्राचं लोकदैवत, दख्खनचा राजा

खरं तर जोतिबा हे अवघ्या महाराष्ट्राचं लोकदैवत. दख्खनचा राजा. गेली हजारो वर्ष या दैवताने महाराष्ट्राचं लोकजीवन व्यापून टाकलंय. बहुजन कष्टकरी जनतेचं सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि सकस बनवलंय. केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातल्या अनेकांचं ते कुलदैवत आहे. महाराष्ट्राच्या या लोकदैवताची आज यात्रा. दख्खनच्या माणसांचा लोकोत्सव. इतकी काय जादू केलीय या लोकदैवताने की ज्याचं गारुड आजही इथल्या बहुजन कष्टकर्‍यांच्या मनावर कायम आहे.

हेही वाचाः डॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान

मानवी जीवनाचा सुरवातीचा काळ निसर्गातल्या अनाकलनीय कुतुहलाने भारलेला होता. आपल्या अवतीभवतीचा निसर्ग, त्याचं बदलणारं स्वरूप, त्यातली स्थित्यंतरं याचं त्याला भयही असायचं आणि आकर्षणही वाटायचं. यामागचं रहस्य तो शोधू लागला. त्यातूनच अनेक दंतकथा आणि लोककथांचा जन्म झाला. अनेक देवदेवतांची निर्मिती झाली. या लोककथा, दंतकथा, देवदेवतांची निर्मिती हे त्याचं सृजन होतं.

जोतिबा, यमाईच्या भेटीचा लोकोत्सव

भयचकीत करणार्‍या निसर्गातल्या बदलांना सामोरं जाण्यासाठी बळ मिळावं म्हणून तो या लोकदैवताना तो शरण जावू लागला. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे उत्सव करू लागला. मानवी जीवनाच्या विकासाच्या एका टप्प्यावर हे उत्सव लोकोत्सव बनले. ही लोकदैवतं आपल्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली.

हेही वाचाः प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

जोतिबा हे असंच एक लोकदैवत आहे. आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेल्या दख्खनच्या पठारावरच्या अनेक कष्टकरी जातसमुहांचं हे दैवत. इथे शेती करणार्‍या मराठा-कुणबी, माळी, धनगर या शेतकरी जातीबरोबरच अनेक पशुपालक जाती आहेत. यातल्या मराठा कुणबी या जातसमूहाचं जोतिबा हे कुलदैवत आहे. जोत म्हणजे नांगर आणि जोतिबा म्हणजे जोत हाकणारा. यमाई म्हणजे धरती. चैत्र पुनवेला जोतिबा यमाईला भेटायला निघतो. त्याचा हा लोकोत्सव.

लोकगीतांमधून उलगडणारा भाऊराया जोतिबा

वाडी रत्नागिरीचा जोतिबा हे इथलं लोकदैवत. दख्खनच्या भूमीचा लोकपालक. इथल्या लोकजीवनावर जोतिबाची अफाट मोहिनी. अनेक कथा आणि गीतामधून जोतिबा इथल्या परिसरात आपल्याला भेटत जातो.

रात्रीच्या सपनाची किती सांगू मी भावना 
माहेरचा देव आलाया जोतिबा पावणा

कोण्या कष्टकरी बहिणीला जोतिबा नुसता देव वाटत नाही तर तो जीवाभावाचा पावणा वाटतो. पुढे जावून ती म्हणते,

चैत्राच्या महिन्यात देव जोतिबा घोड्यावरी
टाकी नजर खेड्यावरी

हा नुसता देव नाही तर तो क्षेत्रपालसुद्धा आहे. आपण दुबळे असलो तरी जोतिबा हा बंधुराया आपल्या पाठीशी आहे. तो आपल्या वाईट प्रसंगत मदतीला धावून येतो हे सांगताना ही बहीण म्हणते,

दुबळं माझंपण सार्‍या जगाला माहीत

बंधु जोतिबा आला सार्‍या खजिन्यासहित

देव जोतिबाच्या वाट सारी गुलाबाची पेवं

बाळा माझ्याला किती सांगू भक्ता उधळीत जावं’

अशा अनेक लोकगीतांच्यामधून जोतिबा आपल्याला भेटत राहतो. इथल्या कष्टकरी स्त्री-पुरुषांची तो प्रेरणा बनतो.

जोतिबा, खंडोबा आणि रवळनाथ

जोतिबा हे दख्खनचं दैवत तर रवळनाथ हे गोमंतक आणि कोकणचं लोकदैवत. या दोन दैवतांच्यामधील साम्य उलघडून दाखवताना जेष्ठ संशोधक आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक रा. चि. ढेरे आपल्या लज्जागौरी या ग्रंथात या दैवतांची मूर्ती, उपासना पद्धती या आधारे काही निष्कर्ष मांडतात.

ते लिहितात ‘ज्यांची मुख्य ठाणी कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबाचा डोंगर इथे आहे. तो जोतिबा महाराष्ट्रातील नाना जातीजमातींचं कुलदैवत आहे. खंडोबाप्रमाणे त्याची प्रकृती लोकाभिमुख आहे. महराष्ट्रातील खेड्यापाड्यात नांदणारा क्षेत्रपाळ भैरव याच्याशी खंडोबा आणि जोतिबा हे दोघंही जिव्हाळ्याच्या नात्याने निगडीत आहेत. मराठी जणांना प्रिय असणार्‍या पुरुष देवापैकी विठोबा हा विष्णुरूप बनलेला आहे. त्याचे विष्णुरूपत्व चिरस्थायी झालेले आहे. आंध्रामधे नांदणारा आणि परंतु अनेक महाराष्ट्रीय घराण्यांचा कदाचित आंध्र, कर्नाटकातून महाराष्ट्रात येवून स्थायिक झालेल्या घराण्यांचा कुलदैवत असलेला वेंकटेश हाही विठोबा प्रमाणेच विष्णुरूपत्व पावलेला आहे. वेंकटेश हा बालाजी आहे. विठोबा हा बाळकृष्णाच्या लिलांवर दावा सांगणारा आहे. वेंकटेशची पत्नी पद्मावती ही रुसून वेगळ्या गिरीखाली येवून राहिली आहे. विठोबाची पत्नी रखुमाई ही रुसून वेगळ्या मंदिरात राहिली आहे.

धनगरांच्या कथेप्रमाणे तर विठोबाची पत्नीसुदधा पदुबाई म्हणजे पद्मावती हीच आहे. असे हे साम्य पुष्कळ बाबतीत आहे. परंतु खंडोबा आणि जोतिबा हे दोन देव मात्र शिवरूप बनण्याच्या प्रयत्नात असूनही आपली मूळ प्रकृती अद्यापही सांभाळून आहेत. महात्म्य कथांनी त्यांना शिवावतार बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही मूर्ती विधानाच्या आणि उपासनेच्या मुख्य बाबतीत त्यांनी स्वत्व मुळीच सोडलं नाही. आपलं स्वत्व सांभाळणारे आणि म्हणूनच आपले अंतरंग सर्वस्व प्रगटणारे हे दोन देव जर आपण बारकाईने न्याहाळले तर कदाचित स्वत्व सोडणार्‍या पूर्वनिर्दिष्ट देवांचे विठोबा आणि व्यंकोबा यांचं मूळ रूप शोधण्यासही ते आपणास सहाय्य ठरण्याचा संभव नाकारता येणार नाही.’

रा. चिं. ढेरे हे कोकण आणि गोव्यातल्या रवळनाथ या देवतांचे संबंधही दाखवून देतात. रवळनाथ हेही लोकदैवत आहे. त्याची मूर्ती आणि उपासना पद्धती यातूव जोतिबा आणि रवळनाथ एकच असल्याचं ते सांगतात. इतकंच नाही तर रवळनाथाच्या सहाय्याने जोतिबाचं स्वरूप समजून घेणं सोपं जाईल असंही त्यांना वाटतं.

सासनकाठी, जोतिबा आणि रवळनाथ

पंढरीच्या विठोबाची जशी दिंड्यांची परंपरा आहे तशीच जोतिबाच्या सासनकाठीची परंपरा आहे. सासनकाठी हे जोतिबाच्या चैत्रयात्रेचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या अनेक गावांतून सासनकाठ्या घेवून लोक पायी चालत वाडी रत्नागिरीला निघतात. गुलालाची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत या सासनकाठ्या पुनवेला डोंगरावर पोचतात.

हेही वाचाः महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

पताका लावलेल्या उंचच्या उंच सजवलेल्या या सासनकाठ्या वाजतगाजत खेळवल्या जातात. सातारा गावाच्या निमाम पाडळी या गावच्या सासनकाठीला प्रथम मान आहे. त्यापाठोपाठ मिरज तालुक्यातल्या विहे, कसबे डिग्रज, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या निगवे, हिम्मतबहादूर चव्हाण, कसबा सांगावं, किवळ, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज करवीर, कवठे गुळंद, मानपाडळे अशा एकापाठोपाठ एक मानाच्या ९८ सासनकाठ्या यात्रेत असतात. हलगी, झांज, घुमके आणि सुंदरीच्या तालावर या काठ्या नाचवल्या जातात.

जोतिबाच्या यात्रेत जशा सासनकाठ्या चैत्रपुनवेला नाचवतात तशाच सासनकाठ्या बलिप्रतिपदेला रवळनाथाच्या पालखी आणि आरतीसमोर नाचवल्या जातात. तिथंही चांगभलंचाच जयघोष केला जातो. जोतिबाप्रमाणे रवळनाथाचे पुजारी हेसुद्धा गुरवच आहेत.

जोतिबा फुलेंचा जोतिबा समजून घेऊया

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर| होते रणधीर| स्मरू त्यास|

बळीस्थानी आले शूर भैरोबा| खंडोबा जोतिबा| महसुभा|

अशी लोककथा आणि पुराणकथा महात्मा फुलेंनी सांगितली. त्यात जोतिबा, खंडोबा आणि मसोबा या लोकदैवतांविषयी नवी मांडणी केली. बळीराजाचे सरदार म्हणून या क्षेत्रपाल दैवतांना नवा आयाम दिला. फुलेंची मांडणी या दैवतांचं वैदिकीकरण नाकारते. ही दैवतं अब्राम्हणी असून ती बहुजन परंपरेतली आहेत हे स्पष्ट करते. त्यांचं लोकाभिमुख असणं हे त्यांच्या बहुजनावरच्या सांस्कृतिक पगड्याचं मुख्य कारण असल्याचंही यातून स्पष्ट होतं. म्हणूनच या लोकदैवतांच्या यात्रा लोकोत्सव बनून मोठ्या प्रमाणात आजही त्याच उत्साहाने साजर्‍या होतात.

थोडक्यात जोतिबा हे इथल्या बहुजन कष्टकर्‍यांच लोकदैवत. अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. आज या देवाच्या यात्रेला लाखो कष्टकरी स्त्री, पुरुष भक्तिभावाने जमतात. सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करतात. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानव जातीच्या भल्याची मागणी करतात. सर्वांच चांगभलं करणारा देव जोतिबा आहे यावर सर्वच बहुजन कष्टकर्‍यांची गाढ श्रद्धा आहे.

हेही वाचाः 

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

सोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत

नांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.)