महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय.
न्या. ब्रिजमोहन लोया यांचा ३० नोव्हेंबर २०१४ ला संशयास्पद मृत्यू झाला. पण त्याविषयी सगळ्या सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमं चिडीचूप होती. कारण या प्रकरणात संशयाची सुई भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे रोखलेली होती. न्या. लोया यांच्यासमोर सीबीआय कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून सोहराबुद्दीन एन्काऊंटरचा एकमेव खटला सुरू होता. त्या खटल्याची निष्पक्ष हाताळणी व्हावी म्हणून २०१२ मधे सुप्रीम कोर्टाने ही केस गुजरातवरून मुंबईला हलवली होती.
सोहराबुद्दीन याला २६ नोव्हेंबर २००५ला पोलिसांनी अहमदाबादजवळ एन्काऊंटरमधे मारलं. या एन्काउंटर प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह एक प्रमुख आरोपी होते. ही केस गुजरातहून मुंबईला हलवताना सुप्रीम कोर्टाने ती सुरवातीपासून शेवटपर्यंत एकाच न्यायाधीशाने हाताळावेत असे निर्देश दिले होते. न्या. जे. टी. उत्पात हा खटला पाहत होते.
उत्पात यांनी ६ आणि २० जून २०१४ला अमित शहा यांना खटल्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. सुनावणीची पुढची तारीख येण्याच्या आदल्या दिवशी २५ जूनला त्यांची पुण्याला बदली झाली. उत्पात यांच्या जागी आलेल्या न्या. लोया यांनीही ३१ ऑक्टोबर २०१४ ला मुंबईत असूनही अमित शाह कोर्टात का येत नाहीत, अशी स्पष्ट विचारणा केली होती. पुढची तारीख १५ डिसेंबर येण्याआधीच ३१ नोव्हेंबरची मध्यरात्र ते १ डिसेंबरची सकाळ या दरम्यान कधीतरी न्या. लोया यांचा नागपूर येथील सरकारी रेस्ट हाऊसमधे मृत्यू झाला.
खरं तर, न्या. लोयांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसदेबाहेर धरणं धरलं होतं. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने न्या. लोया यांच्या मृत्यूनंतर लगेचच सीबीआयला पत्र लिहून लोयांचा मृत्यू धक्कादायक असल्याचं सरकारी रेकॉर्डवर आणलं. त्यानंतरही व्यवस्था ढिम्म होती. पण पत्रकार निरंजन टकले यांचा सविस्तर रिपोर्ट कारवां या इंग्रजी मासिकाच्या इंटरनेट आवृत्तीत २० आणि २१ नोव्हेंबर २०१७ला प्रकाशित झाला.
मुख्य प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षित केलेल्या या प्रकरणाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलं. प्रा. मुग्धा कर्णिक यांनी निरंजन टकलेंच्या दोन्ही न्यूज रिपोर्ट्सचा मराठी अनुवाद लगेच शेअर केला. असाच अनुवाद इतर भाषांमधेही झाला. अनेक न्यूज पोर्टलनी त्यावर बातम्या केल्या. न्या. लोया प्रकरण प्रिंट आणि टीवी माध्यमांनी न दाखवताही कोट्यावधी वाचकांपर्यंत पोचलं.
अपवाद म्हणून एनडीटीवी इंडिया या हिंदी न्यूज चॅनलचे संपादक रवीश कुमार यांनी या प्रकरणावर दोन कार्यक्रम सादर केले. ते टीवीबरोबरच यूट्यूबवरही हजारो लोकांनी पाहिले. पुढे चार न्यायाधीशांनी याच प्रकरणाच्या संदर्भात त्याचा थेट उल्लेख न करता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेतली.
त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर न्या. लोया संशयास्पद मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय. आता त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट संकेत दिलेत. या प्रकरणाशी संबंधित लोक त्यांना गुरुवारी भेटणार होते, असं त्यांनी गुरुवारी ९ जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितलं.
२० आणि २१ नोव्हेंबर २०१७ ला कारवां या इंग्रजी मासिकाच्या इंटरनेट आवृत्तीमधे न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूविषयी दोन बातम्या छापून आल्या. निरंजन टकले यांनी शोधपत्रकारितेचा उत्तम नमुना ठराव्यात अशा दिलेल्या या लेखांत या मृत्यूमागचं संशयास्पद गूढ मांडलं होतं.
हेही वाचा: दीपिकाच्या मौनातही जय हिंद नारा घुमतो
- न्या. लोया हे त्यांच्या सहकारी न्या. सपना जोशी यांच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले होते. आधी ते जाणार नव्हते. पण आणखी दोन सहकाऱ्यांनी आग्रह केला म्हणून ते गेले. लग्न आणि स्वागत समारंभालाही त्यांनी हजेरी लावली. नागपूरच्या रविभवन इथल्या विशेष सरकारी रेस्टहाऊसमधे ते राहत होते.
- ३० नोव्हेंबर २०१४ला रात्री ११ वाजता न्या. लोया यांनी पत्नी शर्मिला यांच्याशी मोबाईल फोनवरून ४० मिनिटं बातचीत केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना कळली.
- १ डिसेंबरला सकाळी न्या. बर्डे असं नाव सांगणाऱ्या व्यक्तीने लोया यांच्या पत्नी शर्मिला यांना मुंबईला, वडील हरकिशन लोया यांना लातूरला आणि तीन बहिणींना फोन केले. ते म्हणाले, ‘लोया यांचा नागपूरला हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय. पोस्टमॉर्टेम करून लातूर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गटेगावला त्यांचा मृतदेह पाठवण्यात आलाय.’
- कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार त्यांना दिलेली माहिती अशी होती, ‘लोयांना रात्री छातीत दुखू लागल्यामुळे नागपुरातल्या दंडे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात रिक्षाने नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर काही उपचार झाले. तिथलं ईसीजी मशीन बंद असल्यामुळे त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटल या दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. तिथे गेल्यावर ते आत येण्याआधीच मृत झाल्याचं घोषित करण्यात आलं.’
- लोयांना आग्रहाने लग्नाला घेऊन जाणारे आणि मृत्यूप्रसंगी सोबत असणारे सहकारी न्यायाधीश दीड महिन्यानंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले. त्यांनीही हीच माहिती दिली. न्या. लोया यांच्या बहीण अनुराधा बियाणी या धुळे इथे डॉक्टर आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक कार्यकर्ते ईश्वर बाहेती यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की ते शव गटेगावला पोचवण्याची व्यवस्था करतील. बाहेती यांना लोयांच्या मृत्यूबद्दल का, कसं, कधी कळलं, ते कुणालाही माहीत नाही.’
- लोया यांच्या औरंगाबाद इथे राहाणाऱ्या एक बहीण सरिता मांधणे या भाच्याच्या आजारपणामुळे सारडा हॉस्पिटलमधे होत्या. तिथे ईश्वर बाहेती पोचले. त्या सारडा हॉस्पिटलमधे असल्याचं बाहेतीना कसं कळलं, हे माहीत नाही. तिथे त्यांनी सांगितलं की मी रात्रभर नागपूरमधल्या लोकांशी बोलतोय. मृतदेह नागपूरहून गटेगावसाठी निघालाय.
- अनुराधा बियाणी यांच्या डायरीत नोंद आहे की रात्री साडेअकराच्या सुमारात शव पोचलं. नागपूरपासून शवाच्या सोबत लोयांचा एकही सहकारी आला नव्हता. फक्त अॅम्ब्युलन्सचा ड्रायवर होता. आग्रह करून लग्नाला घेऊन जाणारे दोन सहकारी न्यायाधीश आणि फोनवरून माहिती देणारे न्या. बर्डे हे सोबत नव्हते.
- लोयांची पत्नी शर्मिला, मुलगे अपूर्व आणि अनुज मुंबईहून गटेगावला आले, तेव्हा त्यांच्याबरोबर काही न्यायाधीश होते. त्यांच्यापैकी एकजण अनुजला कुणाशीही काहीही न बोलण्याच्या सूचना करत होता.
- अनुराधा बियाणी यांनी सांगितलं, लोयांच्या शर्टाच्या मागे मानेच्या बाजूला रक्ताचे डाग होते. चष्मा मानेच्या खाली गेला होता. कंबरेचा पट्टा सरकून मागे गेला होता. पँटची क्लिप मोडली होती. सरिता मांधणे यांनी सांगितलं, डोक्यावर जखम होती. डोक्याच्या मागच्या बाजूला आणि शर्टावर रक्त दिसलं होतं.
- हरकिशन लोया यांनी सांगितलं, शर्टावर डाव्या खांद्यापासून कंबरेपर्यंत रक्ताचे डाग होते. मात्र पोस्टमॉर्टेमधे कपडे कोरडे असल्याचा उल्लेख आहे.
हेही वाचा: सहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ
- पोस्टमॉर्टेम केलं याचा अर्थ पंचनामा करायला हवा आणि मेडिकोलीगल केस दाखल करायला हवी. तसंच पोलिसांनी मृताच्या सर्व वस्तू, कपडे सील करून पंचनाम्यात त्याची यादी करायला हवी. त्यानुसार सर्व वस्तू कुटुंबीयांकडे सोपवायला हव्या होत्या. पण अनुराधा बियाणी यांनी सांगितल्यानुसार कुटुंबीयांना पंचनाम्याची प्रत मिळालेली नाही.
- बियाणी यांनी सांगितलं, ‘मृत्यूआधी एक-दोन दिवस लोयांना एसएमएस आला होता की, या लोकांपासून सांभाळून राहा. पण तो एसएमएस आणि कॉल डिटेल मोबाईलमधून डिलिट केलेले होते. लोयांचा मोबाईल पोलिसांनी नाही, तर ईश्वर बाहेतींनी तिसऱ्या-चौथ्या दिवशी कुटुंबीयांकडे दिला.
- बियाणी यांना अनेक प्रश्न पडलेत. ते असे- ‘लोयांना हॉस्पिटलमधे रिक्षाने का नेलं? रवी भवनपासून रिक्षास्टँड दोन किलोमीटर दूर आहे. तिथे दिवसाही रिक्षा मिळत नाही. मग मध्यरात्री रिक्षा कशी मिळाली? हॉस्पिटलला नेत असतानाच कुटुंबीयांना का कळवलं नाही? मृत्यूनंतरही लगेच का कळवलं नाही? दंडे हॉस्पिटलमधे काय औषधोपचार करण्यात आले? रवी भवनात ३० नोव्हेंबर, १ डिसेंबर या दिवशी राहणारे वीआयपी कोण होते?’
- नागपूरच्या जीएमसी हॉस्पिटलमधे झालेल्या पोस्टमॉर्टेमच्या अहवालात प्रत्येक पानावर ’मयताचा चुलतभाऊ’ म्हणून सही आहे. त्याच व्यक्तीला पोस्टमॉर्टेनंतर मृतदेह देण्यात आला. पण हरकिशन लोया सांगतात, माझा कुणीही सख्खा किंवा चुलतभाऊ नागपुरात नाही. पोस्टमॉर्टेच्या रिपोर्टनुसार, लोया यांचा मृत्यू १ डिसेंबरला सकाळी सव्वासहा वाजता झाला. सकाळी ४ वाजता त्यांच्या छातीत दुखू लागलं. ही वेळ संबंधितांनी आधी दिलेल्या माहितीशी जुळत नाही.
- कारण लोयांच्या कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार त्यांना पहाटे ५ वाजताच फोन यायला सुरवात झाली. हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनमधील कर्मचार्यांनीही मध्यरात्रीच त्यांचा मृतदेह पाहिला होता. जीएमसी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांना वरिष्ठांकडून स्पष्ट सूचना होत्या की पोस्टमॉर्टेम झाल्यासारखं वाटेल, अशी चिरफाड करा आणि शिवून टाका.
- डॉ. अनुराधा बियाणी यांनी सांगितलं, ‘हार्टअटॅक यावा अशी त्यांच्या भावाची प्रकृती नव्हती. ते ४८ वर्षांचे होते. आज त्यांच्या आई-वडिलांचं वय ८० पेक्षा जास्त आहे. कुणालाही हृदयविकार नाही. लोया दारूला शिवतही नव्हते. ते रोज दोन तास टेबल टेनिस खेळत. त्यांना डायबेटिस आणि ब्लडप्रेशर यांचा त्रास नव्हता.’
- बियाणी यांनी स्फोटक आरोप केलाय, ‘मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी लोया यांना १०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती. त्याबदल्यात त्यांना सोहराबुद्दीन खटल्यात हवा तसा निकाल हवा होता. २०१० ते २०१५ या काळात मुख्य न्यायमूर्ती असणारे मोहित शहा रात्री उशिरा त्यांना साध्या कपड्यांत भेटायला येत. लवकरात लवकर चांगला निर्णय द्या, असा आग्रह करत.’
- हरकिशन लोया यांनीही लोया यांना ऑफर असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. लोया यांनी ऑफर नाकारल्या होत्या. त्यांनी राजीनामा देऊन गावी शेती करण्याची तयारी ठेवली होती. लोया यांची भाची नूपुर बियाणी खटल्याच्या काळात मुंबईतला त्यांच्या घरी राहत होती. तिने सांगितलं, ‘कोर्टातून आल्यावर लोया म्हणत, खूप टेंशन आणि स्ट्रेस आहे. खूप मोठी केस आहे. अनेक लोक गुंतलेत.’
- लोया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी आलेले न्यायमूर्ती एम. बी. गोसावी यांनी ३० डिसेंबरला अमित शाह यांना निर्दोष घोषित केलं. याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे त्याचीच बातमी झाली आणि अमित शहा यांच्या निर्दोष सुटकेची बातमी दुर्लक्षित राहिली.
हेही वाचा:
संसदीय राजकारणाचा फड गाजवणारे वकील
न्यायाधीशांमधेही धर्म जातीचे पूर्वग्रह असतात
आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती
सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!
फुलेंनी मुलींची पहिली शाळा भरवलेला भिडेवाडा इतका दुर्लक्षित का?
(साप्ताहिक चित्रलेखाच्या लेखावरून साभार)