कमला हॅरिस : संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्ही जगाला बदलू शकता!

१८ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे कमला हॅरीस यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. त्यांच्या येण्याने नव्या जगाची चाहूल लागलीय.

अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी पहिली महिला म्हणून निवडून येण्याचा बहुमान कमला हॅरिस यांनी मिळवलाय. अमेरिका आणि जागतिक राजकारणाच्या द़ृष्टीने ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. कमला हॅरिस यांच्या संघर्षमय जीवनातलाही हा सर्वोच्च क्षण आहे. विशेष म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर शंभर वर्षांनी एका आफ्रिकन, भारतीय वंशाच्या महिलेची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर झालेली निवड हा काव्यगत न्यायच म्हणायला हवा.

‘मी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर पोचलेली पहिली महिला आहे. पण शेवटची निश्चितच नसेल.  माझ्यापासून अनेक छोट्या मुलींनी प्रेरणा घ्यावी. अमेरिकन नागरिकांना प्रेमाच्या, सौहार्दाच्या धाग्यात बांधून एकत्र करायचंय.’ कमला हॅरिस यांनी विजयी झाल्यानंतर केलेल्या भाषणातली ही काही विधानं आहेत. त्यावरून अमेरिकेच्या भविष्यातल्या धोरणांची दिशा अधिक स्पष्ट होते. त्याचबरोबर महिलांना एका आश्वासक युगाची सुरवात झाल्याची जाणीवही करून देते.

संघर्षानंतर मतदानाचा अधिकार मिळाला

अमेरिकेत महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. बरोबर १०० वर्षांपूर्वी, १९२० मधे घटनादुरुस्ती नंतर महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला. अथक संघर्षानंतर हा हक्क मिळाला तो मात्र केवळ गौरवर्णीय महिलांनाच. तोपर्यंत कृष्णवर्णीय महिला आणि पुरुषांनाही मतदान करता येत नव्हतं. त्यासाठी पुन्हा लढा द्यावा लागला.

१९५८ मधे कृष्णवर्णीय पुरुष आणि महिलांना मतदानाची दारं खुली झाली. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्याच्या शतकी वर्षातच कमला हॅरिस या आफ्रिकन, भारतीय वंशाच्या महिलेची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर झालेली निवड काव्यगत न्यायच म्हणावा लागेल.

बराक ओबामा यांनी २०१२ मधे पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष होऊन क्रांती घडवून आणली. आज २०२० मधे कमला हॅरिस यांच्या रूपाने एका कृष्णवर्णीय महिलेला व्हाईट हाऊसमधे विराजमान होण्याचा बहुमान मिळालाय. त्यामुळे बदलाचे वारे योग्य दिशेने आणि वेगाने जाताहेत, असंच म्हणावं लागेल.

महिलांच्या हक्कासाठी ज्या महिलांनी आपलं आयुष्य वेचलं, त्यांच्या बलिदानाचं फलित म्हणून आज मी इथं उभी असल्याचं हॅरिस यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. त्याचा संदर्भ त्यामुळे महत्त्वाचा ठरतो. चळवळीतल्या महिलांची ओळख म्हणून त्यांनी पांढरा कोट आणि टाय घातला होता.

हेही वाचा : कमला हॅरिसच्या विजयाचा भारतीयांना आनंद व्हायचं काहीही कारण नाही!

कृष्णवर्णीय हक्कासाठी लढण्याचं बाळकडू

यंदाची निवडणूक अनेक गोष्टींमुळे महत्वाची ठरली. कमला हॅरिस यांनी बर्‍याच बाबतीत विक्रम नोंदवलेत. या पदावर जाणार्‍या त्या आफ्रिकन, भारतीय आणि आशिया वंशाच्या पहिल्या व्यक्ती आहेत. सॅनफ्रॅन्सिस्कोच्या जिल्हा अ‍ॅटर्नी म्हणून, कॅलिफोर्निया राज्याच्या अ‍ॅटर्नी म्हणूनही काम पाहणार्‍या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या.

या सर्व पहिल्या संधीबाबत त्या म्हणतात की, ‘मी जरी पहिली असले तरी शेवटची नक्कीच असणार नाही. खरंतर हे विधान त्यांच्या आईचं. कमला हॅरिस यांच्यावर त्यांच्या आईचा श्यामला गोपालन यांचा खूप प्रभाव आहे. आपलं हे यश त्यांनी आपल्या आईला समर्पित केलंय.

कृष्णवर्णीय संस्कृतीचं बीज

श्यामला गोपालन वयाच्या १९ व्या वर्षी १९५८ मधे उच्चशिक्षण घेण्यासाठी भारतातून अमेरिकेत गेल्या. तिथे त्यांनी कर्करोगावर संशोधन करताना नागरी चळवळीमधे भाग घेतला. त्यांची कृष्णवर्णीय वंशाच्या डोनाल्ड हॅरिस यांच्याशी ओळख झाली. पुढे दोघांनी लव मॅरेज केलं. कमला यांच्या जन्मानंतरही त्यांचं नागरी चळवळींचं काम सुरू होतं. त्या लहानग्या कमलाला घेऊन मोर्चे निदर्शनाला घेऊन जायच्या. तेव्हाच कृष्णवर्णीय हक्कासाठी लढण्याचं त्यांना बाळकडू मिळालं.

आई डॉक्टर आणि वडील अर्थतज्ज्ञ त्यामुळे घरात चांगलं शैक्षणिक आणि वैचारिक वातावरण होतं. कमला सात वर्षाच्या असताना त्यांच्या आई, वडलांचा घटस्फोट झाला. आई श्यामला यांनी स्वतःच्या हिमतीवर कमला आणि माया या दोन मुलींना वाढवलं. आजुबाजूचं वातावरण कृष्णवर्णीय संस्कृतीचं असल्यानं त्यांना आपल्या मुलींना भारतीयापेक्षा कृष्णवर्णीय मुली म्हणून वाढू देणं योग्य वाटलं. त्यांचा तो निर्णय आज योग्य ठरवला आहे. आज सर्व कृष्णवर्णीय समुदाय कमला हॅरिस यांना आपलं मानतो. या निवडणुकीच्या निकालावरून ते स्पष्ट होतं.

हेही वाचा : बायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात

कृष्णवर्णीयांसाठी केलेल्या कामामुळे मदत

कमला केवळ भारतीय म्हणून वाढल्या असत्या तर कदाचित आज असा निकाल दिसला नसता. अमेरिकन भारतीयांनी पण त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. पण कृष्णवर्णीयांच्या तुलनेत भारतीयांची संख्या अमेरिकेत कमी आहे. तसंच त्यांचे प्रश्नही वेगळे आहेत. कमला हॅरिस यांनी स्वतःला कृष्णवर्णीय मानून त्यांच्या अनेक चळवळीत योगदान दिलंय. अल्फा कापा अल्फा या कृष्णवर्णीय महिलांसाठी असलेल्या संघटनेत त्यांनी काम केलं.

महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्याचं फळ त्यांना या निवडणुकीत मिळालं; पण म्हणून त्या भारतीय संस्कारापासून दूर राहिल्या असे नाही. त्या आपल्या शेजारांच्यासोबत चर्चमध्ये जात आणि आपल्या आईसोबत मंदिरातही जात.

कमला लहान असताना आपल्या आजोळी, भारतात बर्‍याचवेळा जायच्या. त्यांचे आजोबा पी. वी. गोपालन स्वातंत्र्यसैनिक होते. लोकशाही आणि महिलांचे अधिकार याविषयी आजोबांच्या विचारांचा प्रभाव कमला यांच्यावर पडलाय. अशा दोन्ही संस्कृतींचं प्रतीक असलेल्या कमला यांचा विजय हा लोकशाही आणि वैविध्य विचारांचा विजय मानला जातो.

टीका सहन करत काम

हार्वर्ड युनिवर्सिटीमधून बी.ए. होऊन त्यांनी कॅलिफोर्निया युनिवर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली. बे एरिया इथं तेरा वर्षे फिर्यादी वकील म्हणून काम केलं. गुन्हेगारांना कमी शिक्षा देऊन त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या कार्यावर खूप टीका झाल्या, पण त्या  थांबल्या नाहीत.

त्यानंतर २००३ मधे त्या सॅनफ्रॅन्सिस्कोच्या जिल्हा अ‍ॅटर्नी म्हणून निवडून आल्या. इथूनच त्यांच्या विजयाची घोडदौड सुरू झाली. २०१० मधे कॅलिफोर्निया राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून विराजमान झाल्या. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे त्या २०१६ मधे सिनेटवर निवडून आल्या.

हेही वाचा : 'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!

मिश्र वंश चळवळीतही सहभाग

डेमोक्रॅटिक पक्षाने २०२० मधल्या निवडणुकीत ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी कोण सरस ठरेल याची यादी तयार केली तेव्हा त्यात कमला यांचं नाव पहिलं होतं. पक्षातल्या काही जणांनी त्यांच्या मिश्रवंशावर, व्यक्तिमत्त्वावर, महिला असण्यावर आक्षेपही घेतला. मागच्या वर्षी अध्यक्षपदासाठी त्यांनी आपलं नाव नोंदवून प्रचारही सुरू केला होता. पण पुरेसा निधी नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली.

मे मधे जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर जी निदर्शनं झाली त्याचं वॉशिग्टन डीसीमधलं नेतृत्व त्यांनी केलं. त्यातून कृष्णवर्णीयांचा त्यांच्यावरचा विश्वास आणि पाठिंबा वाढला. या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी कमला यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पक्षातर्फे घोषित केलं.

कमला यांचं प्रभावी व्यक्तिमत्व

२२४ वर्षांच्या अमेरिकन इतिहासातली सर्वात जास्त प्रभावी महिला म्हणून कमला ओळखल्या जातात. गोट्रस्ट या अराजकीय वेबसाईटच्या माहितीनुसार अमेरिकेतल्या सिनेटरपैकी त्या सर्वात जास्त उदारमतवादी आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या नोंदीनुसार, त्या व्यवहारी आहेत. तर फॉक्स न्यूज त्यांना परिपूर्ण व्यक्तिमत्त्व मानतं. स्वतंत्र विचारसरणी हा त्यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा पैलू आहे. उत्तम संवादकौशल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रभावी ठरतं कमला हॅरिस यांचा विजय सर्व स्तरातल्या आणि वयोगटातल्या लोकांना नवीन आशा देणारा ठरलाय.

तुमच्याकडे संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्ही जगाला बदलू शकता. प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे त्यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. अमेरिकन लॅटिन समुदायाला कमला या बायडेन यांना उत्तम साथ देतील, असं वाटतं.

भारताबद्दलची सकारात्मक भूमिका

अमेरिकन भारतीयांनी कमला यांना निवडणुकीमधे चांगलं समर्थन दिलं. ट्रम्प सरकारने जूनमधे नवीन विजावर बंदी घातली. दरवर्षी साधारणपणे एकूण ८५ हजार विजा दिले जातात. त्यापैकी ७५ टक्के विजाधारक भारतीय आहेत. नंतर ऑक्टोबरमधे लॉटरी सिस्टीम बंद केली. भारत, अमेरिका दरम्यान माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसाय मोठा आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे त्याच्यावर संकट आलं. बायडेन यांनी त्यावरचे सगळे निर्बंध हटवण्याचं आश्वासन दिलंय. पण अमेरिकेतली बेरोजगारी बघता त्यामधे बदल होण्याची शक्यता वाटते.

अमेरिकन नागरिक कमला हॅरिस यांच्या विजयाने भारतात सगळीकडे आनंदोत्सव साजरा झाला. विविध माध्यमांनी भरभरून कमला यांच्या विषयी लिहिलं. कमला यांनाही भारताविषयी प्रेम, आपुलकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्याच गोष्टी भारताच्या बाजूने करतील. त्या स्वतःला पहिल्यांदा अमेरिकन समजतात. त्यामुळे अमेरिकेच्या द़ृष्टीने जे योग्य आहे त्याला प्राधान्य देतील.

हेही वाचा : बायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात

काश्मिर प्रश्नावर चर्चा करण्याची गरज

पहिल्यांदाच कोणी भारतीय वंशाचं अमेरिकेच्या मोठ्या पदावर विराजमान झालंय त्याचा चांगला परिणाम भारत, अमेरिका संबंधावर होऊ शकतो, पण तो करून घेतला पाहिजे.

कलम ३७० रद्द करण्यात आल्यामुळे काश्मीरमधे उद्भवलेल्या परिस्थितीवर बायडेन आणि हॅरिस यांनी टीका केली होती. कमला यांना तेव्हा काश्मीरमधल्या लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आली असं वाटलं होतं. चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी भारत आणि अमेरिकेतलं लष्करी सहकार्य वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे, पण नंतर चीनवर सध्या असणारी बंधनं थोडी शिथिल केली तर भारतासाठी ते अवघड जाईल.

हेही वाचा :  

अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

 

(लेखिका अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात वास्तव्यास आहेत.)