स्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय?

१२ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतातील विशेषतः बंगालमधील स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे कामिनी रॉय. आज त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनं डूडल करून त्यांना आदरांजली वाहिलीय. डूडलवरचा चेहरा फक्त कामिनी रॉय यांचा नाही तर एकप्रकारे तो स्त्रीवादाचा चेहरा आहे.

रोजच्या सवयीप्रमाणे आज इंटरनेट उघडलं आणि गुगलकडे वळलं की एका बाईचं डूडल आपल्याला दिसतं. मरून रंगाचा ब्लाऊज आणि त्यावर फिकी पांढरी साडी घालणाऱ्या या बाईचं धारदार नाक, पाणीदार डोळे आणि गोरा सावळ्या रंगाचा तिचा चेहरा पाहून एकदमच तजेलदार वाटू लागतं.

या डूडलमधे तजेलदार बाईच्या मागे अनेक बिनचेहऱ्याच्या बाया उभ्या आहेत. चेहरा असलेल्या बाईकडे त्या मोठ्या आशेनं बघतायत. हे डूडल आहे प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका कामिनी रॉय यांचं. आज त्यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांना वाहिलेली ही आदरांजली.

पदवी शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला

कवियत्री, शिक्षणतज्ञ तसंच स्वातंत्र्य आंदोलनातली सक्रिय कार्यकर्ती अशी अनेक विशेषणं कामिनी रॉय यांना लावता येतील. भारतीय इतिहास या विषयात बीए हॉनर्स ही पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना बळ दिलं. ‘समाजातलं आपलं हक्काचं स्थान नाकारून महिलांनी घराच्या चौकटीतच कुढत आयुष्य का काढायचं?’ असा सवाल त्या २० व्या शतकाच्या सुरवातीला करत असत. तेव्हा त्यांचा हा प्रश्न म्हणजे त्या काळच्या परंपरावाद्यांसाठी तिखट मिरचीची धुरीच होती.

संवेदनशील कवियत्री

एका सधन बंगाली कुटुंबात रॉय यांचा जन्म झाला. त्यांचा भाऊ कलकत्त्याचा महापौर म्हणून निवडून आला होता. त्यांची बहीण नेपाळच्या एका शाही कुटुंबातली राजवैद्य म्हणून नावाजलेली होती.

रॉय यांचे वडील चंडीचरण सेन हे पेशाने वकील होते. सोबतच सुधारणावादी ब्राम्हो समाजाच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून घेतलं होतं. त्यांना लिहण्याची आवड होती. त्यांची ही आवड पुढे कामिनी रॉय यांनी उचलली. आणि त्यामुळेच गणितासारख्या रुक्ष विषयात गोडी असूनही रॉय फार सुंदर आणि संवेदनशील कविता लिहू शकल्या.

एक स्त्री असताना आपण आई असू

कोणाची बायकोही असू

पण एक स्त्री म्हणून आपण आपली जागा निश्चित करतो

एक स्त्री म्हणून आपण वाचा फोडतो.

हेही वाचा : चला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया!

अबला बोस यांचा प्रभाव

लग्न करून चांगल्या घरात गेली, नवरा चांगला मिळाला म्हणजे बाईच्या जीवनाचं सार्थक झालं असं मानणाऱ्या त्या काळच्या समाजात कामिनी रॉय यांनी आपला वेगळाच मार्ग ठरवून टाकला होता. खूप शिकायचं आणि समाजात सुधारणा घडवून आणत महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची वाट मोकळी करायची हा तो मार्ग.

भारतीय इतिहास हा विषय शिकून झाल्यावर त्यांनी संस्कृतमधे बीए ऑनर्सची डिग्री घ्यायचं नक्की केलं. त्यावेळी त्यांची अबला बोस या वर्गमैत्रिणीशी दोस्ती झाली. त्यावेळी अबला बोस या स्त्री शिक्षण आणि विधवांची स्थिती सुधारण्यासाठी काम करत होत्या.

नंतर या अबला बोसही फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नावारूपाला आल्या. त्यांच्या मैत्रीमुळेच कामिनी रॉय यांना महिलाच्या हक्कांचं काम करण्याची प्रेरणा मिळाली.

हेही वाचा : बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक

मिळवला महिलांचा मतदानाचा अधिकार

डिग्रीचं शिक्षण पूर्ण केल्यावर कामिनी रॉय बेथुन कॉलेजमधे प्राध्यापक म्हणून नोकरीला लागल्या. या काळात त्यांना ललित लिखाणाचा छंद जडला. त्यांचे लेख बंगाली भाषेत असत. पण त्यांची रचना, स्वरूप आणि मुद्द्यांची मांडणी एखाद्या कमी शिकलेल्या माणसालाही पटकन समजेल अशी होती.

बंगाली विधानपरिषदेत महिलांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून कामिनी रॉय यांनी खूप संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षामुळेच १९२६ च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. बाईला घराबाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती त्या काळी रॉय राजकीय मुद्द्यांवरही बोलत.

डूडल म्हणजे स्त्रीवादाचा चेहरा

रॉय यांची राजकीय समज इतकी प्रगल्भ होती की १९२२ ते १९२३ या काळात फिमेल लेबर इनवेस्टिगेशन कमिशनच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. अनेक साहित्य परिषदांमधेही त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. म्हणूनच तर आज भारतीय साहित्याचा विचार करताना कामिनी रॉय यांचं नाव घेतल्याशिवाय चर्चा पूर्ण होतच नाही, असं अनेक अभ्यासक म्हणतात.

कामिनी रॉय जरी बंगालपर्यंत सीमित असल्या तरी त्यांचं काम फक्त बंगालच्या महिलांपुरतं नव्हतं. गुगलच्या डूडलमधे कामिनी रॉय यांच्यामागे असणाऱ्या महिलांना चेहरा नसणं हे याचंच प्रतिक आहे. बंगालच्या आणि भारताच्या सीमा ओलांडून कामिनी रॉय यांनी केलेलं काम हे जात, धर्म, वर्ण, नागरिकत्वाचा चेहरा ओलांडून प्रत्येक बाईपर्यंत पोचणारं आहे. डूडलमधला कामिनी रॉय यांचा चेहरा खरंतर स्त्रीवादाचाच चेहरा म्हणावा लागेल.

हेही वाचा : 

गांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना

द्वेषावर हिंसेने विजय मिळवायचा की प्रेमाने?

मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाडीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ