चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

३० एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधे वाढ झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करतोय. हा कोरोना तर आत्ता आत्ता आलाय. पण इथं हजारो वर्षांपासून नांदत असलेल्या पुरुषीपणाच्या वायरससाठी आपण काय उपाययोजना केल्या? चला, घरात घर करून बसलेला पुरुषीपणाचा वायरस लॉकडाऊनच्या काळात मारून टाकूया.

लॉकडाऊनमधे आपण काय करतोय? फेसबुक, वॉट्सअपवर तर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे, पत्ते खेळण्याचे, मजा मस्ती करण्याचे लोकांचे फोटो वायरल होतायत. पण त्या फोटोमागचं सत्य आपल्याला परत परत तपासून घ्यावं लागतंय. द विकच्या एका बातमीनुसार, लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात काम करणाऱ्या हेल्पलाईनवर ९२ हजारपेक्षा जास्त फोनकॉल्स केल्याची नोंद झालीय.

या सगळ्या घडामोडींवर ज्येष्ठ लेखिका आणि स्त्रीवादी अभ्यासक कमला भसीन यांनी सविस्तर भाष्य केलंय. ऑल इंडिया स्टुडंट युनियन या संस्थेच्या फेसबूक लाईवमधे त्यांनी ही मांडणी केली. हिंदीतून केलेल्या या भाषणाचा रेणुका कल्पना यांनी केलेला अनुवाद इथं देत आहोत.

हेही वाचा : कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

कोरोना म्हणजे समाजाचा आरसा

प्रत्येक संकटात, प्रत्येक युद्धात आपल्या आत असतं तेच बाहेर निघतं. आत समजूतदारपणा असेल, प्रेम असेल तर तेच बाहेर येईल. आज भारतात आणि जगभरात लाखो लोक आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांची मदत करतायत. काही जण लोकांचे जीव वाचवतायत तर काही लोक ज्यांच्याकडे खायला अन्न नाही त्यांना ते पुरवतायत. त्यांच्या आत प्रेम भरलेलं आहे.

पण दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांच्या आतली भीती बाहेर पडतेय. ते प्रत्येकाकडे बोट करून घटना, घडामोडींसाठी दुसऱ्यांना जबाबदार धरतायत. हे आमच्यासारखे नाहीत, ते आमच्यासारखे नाहीत अशी भाषा ते वापरतात. अशावेळी मला माझ्या मैत्रिणीने ऐकवलेली एक नेपाळी कविता आठवते. या कवितेचा अर्थ असा की, 

ज्यांच्या डोळ्यात फुलं आहेत त्यांना सगळं जग फुलांचं वाटतं.
ज्यांच्या डोळ्यात काटे आहेत ते फक्त काटे आणि काटेच पसरवतात.

कोरोना वायरस हा आपल्या समाजाचा आरसा आहे. फक्त आरसा नाही तर मॅग्नीफिशिअंट ग्लास म्हणजे भिंगासारखा हा वायरस काम करतोय. आपल्या समाजात आधीच असलेली उच्चनीचता, शोषण या लॉकडाऊनच्या काळात आणखी मोठं होऊन आपल्याला दिसतंय. 

कोविड १९मधे महिलांवर कौटुंबिक हिंसाचार वाढतोय. फक्त भारतातच नाही तर युरोपात, चीनमधेही वाढतोय. महिलांसाठी काम करणाऱ्या सगळ्या एनजीओ त्यांच्या त्यांच्या सर्वेक्षणातून ते दाखवून देतायत. देशाची सरकारं सांगतायत. इतकंच काय, तर डब्लूएचओसुद्धा हेच सांगतंय.

घर ‘घर’ राहिलंय कुठे?

खरंतर यात नवीन काहीच नाहीय. कुठलंही युद्ध होतं तेव्हा महिलांवर अत्याचार होतोच की! तेव्हा दुसरं काय होतं? भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी काय झालं? २००२ ची गुजरात दंगल असो नाहीतर त्या आधी झालेली मुंबई दंगल असो, महिलांवर बलात्कार आणि त्यांच्यावर हिंसा होतच राहिलेत.

लॉकडाऊनमधे कुणावरची हिंसा वाढलीय? जी घर चालवते त्या बाईवरची? पण आत्ता घर घर राहिलंय कुठं? या लॉकडाऊनच्या काळात याच घराची शाळा झालीय, युनिवर्सिटी झालीय. झुमवरून शाळा कॉलेजची लेक्चर, अख्खीच्या अख्खी युनिवर्सिटी या घरातून चालते. याच घरातून आज एक कंपनी चालते. लोकांची ऑफिसेस चालतात, प्रोडक्शन युनिट चालतं. आणि हे सगळं चालवणाऱ्या बायकांवर हिंसा वाढतीय? मजेची गोष्टय ना!

कोरोनामुळे माणसांतली माणुसकी जागृत होईल, असं म्हटलं जात होतं. पण असं काहीही झालं नाही. कारण ही पितृसत्ताक हिंसा इतकी जुनी आहे, त्याची पाळमुळं इतकी खोलवर रूजलीयत की कालपरवा आलेला हा कोरोना वायरस इतक्या पितृसत्तेच्या प्राचीन वायरसला थांबवू शकणारच नाही. पण गंमत म्हणजे पितृसत्तेच्या वायरसची लागण झालेल्या कुणावरही आपण कुठलेच उपचार करत नाही. त्यातल्या कुणालाच आपण क्वारंटाईन केलेलं नाही.

हेही वाचा : बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

चांगल्या पुरुषांना समतेची भीती नाही

कोरोना येण्यापूर्वीही डब्लूएचओनं सांगितलं होतं, जगात तीनपैकी एका महिला कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरते. पृथ्वीची लोकसंख्या आहे, साडेसात शे कोटी. यापैकी अर्ध्या लोकसंख्येत महिला येतात. म्हणजे तीन साडेतीन बिलियनमधल्या एक तृतियांश बायका हिंसाचाराच्या बळी आहेत. एक ते सव्वा बिलियन बायका नवऱ्याचा मार खातात. १०० ते सव्वाशे कोटी लोकांवर. कोण करत? उरलेले शंभर ते सव्वाशे करोड. कुटुंबात सगळ्यात जास्त होते.

भारत सरकार सांगतं, आपल्या देशात ४० ते ५० टक्के पतिपरमेश्वर आपल्या बायकांवर हिंसा करतात. संपूर्ण जगात ३० टक्के पुरुष हिंसा करतात. पण ही हिंसा करतात त्या बिचाऱ्या पुरुषांचे स्वतःचे काय हाल आहेत? ते घाबरून घरात बसलेत. त्यांच्याकडे ना नोकरी आहे ना आशा आणि ना पैसा. मी काहीही करू शकतो ही भावना संपलीय. अशी घाबरलेली माणसंच हिंसा करतात. इंग्रजीत म्हटलं जातं, ‘Men of quality are not afraid of equality’ म्हणजेच, चांगल्या पुरुषांना समतेची भीती वाटत नाही.

लॉकडाऊन नव्हता तेव्हा या पुरुषांना आपली हिंसा बाहेर काढायची जागा होती. म्हणून तर फुटबॉल स्टेडीयमवर मोठमोठ्यानं ओरडणारे कित्तीतरी पुरुष आपल्याला दिसत होते. लॉकडाऊन नसता तर पुरुषांनी मारामारी केली असती, हिंसक सिनेमे बघितले असते किंवा अगदी घरात आयपीएल बघत ओ अरेरे करत बसले असते. आज त्यांच्याकडे हिंसा करायला काय आहे? फक्त एक बायको. आधी या बायकोचा चेहरा दिवसातले फक्त ३ ते ४ तास बघावा लागायचा. पण आता २४ तास तिच आणि तिच पोरं.

आम्ही भारताचे लोक काय करतो?

आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली. या ७० वर्षांत बायकांनी खूप प्रगती केली. पण त्याने बायकांवरचे अत्याचार थांबले का? तर मुळीच नाही. उटल विज्ञानाचा वापर करून आपण त्या अत्याचारांची तीव्रता वाढवली. भ्रुणहत्येसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. बलात्कारासाठी अधिकाधिक विकृत पद्धती आपण वापरत आलो. बाई शिकली म्हणून संसदेतली पितृसत्ता कमी झाली? आजही तिथे १० टक्क्यांपेक्षा जास्त महिला आलेल्या नाहीत.

हे असं का झालं? १९४८ मधे यूनायटेड नेशन्सचं युनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आलं होतं. सगळी माणसं जन्मतः स्वतंत्र आणि समान आहेत, असं या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात मांडण्यात आलं होतं. त्यानंतर आपलं संविधान आलं. त्यातही आपण अशीच भूमिका स्वीकारली. पण ज्यांच्यासाठी संविधान लिहिलं गेलं त्या वी द पीपल किंवा आम्ही भारताच्या लोकांनी काय केलं?

आम्ही भारताच्या लोकांनी संविधानाचं ऐकलं? आम्ही भारताच्या लोकांनी जातव्यवस्था संपवली? दुसऱ्या जातीत लग्नं केली? दुसऱ्या धर्माचा द्वेष बंद केला? आम्ही भारताच्या लोकांनी पितृसत्ता मानणं बंद केलं का? आपण कन्यादान बंद केलं? सगळ्या स्त्री पुरूषांना अधिकार आहेत, समान अधिकार आहेत अशा एका स्वतंत्र देशात कन्येचं दान होतं? आणि हजारो लोक बघतात. एक पुरुष त्या बाईला उचलून दुसऱ्या पुरूषाला देतो. हे संविधानातल्या तत्त्वाला, मुल्यांना धरून आहे का?

संविधानात हे सगळं लिहिलंय. पण संविधान वाचतोय कोण? आपण सगळे नमाज पढतो, गीता वाचतो, रामायण वाचतो, सीतेबद्दल बोलतो. पण घरात मुलांसोबत बसून संविधान कोण वाचतंय?

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

बदलाची सुरवात घरातून करायला हवी

आता संविधानाचा आदर्श ठेऊन आणि मानवी हक्कांचा हात धरून आपल्याला पितृसत्तेच्या वायरसला हरवायचं आहे. कोविडदरम्यानही आणि कोविडनंतरही ही लढाई चालू राहील. कारण, कोविडनंतरच्या परिस्थितीचे बायकांवर खूप मोठे परिणाम होणार आहेत. कोविडनंतर बायकांवरचं नियंत्रण वाढेल, एकही पैसा न घेता त्या करत असणारं काम अजून वाढणार आहे. कुटुंबात कुणाला डिप्रेशन आलं, कुणी आजारी पडलं, कोण सांभाळतं? कोविडनंतर हेच होणारंय. पुरूषांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्यांचं बाहेर पडणं आणखी कमी होईल. यातून मुलींचे बालविवाह वाढण्यापर्यंत गोष्टी जाऊ शकतील.

आपल्याकडे कायदे खूप आहेत आणि खूप चांगले आहेत. वर्मा कमिटीनं तर रेपबद्दल फार चांगल्या गोष्टी केल्यात. भंवरी देवीचा रेप २२ वर्ष आधी झाला होता. केस अजून चाललीय. १०-१२ वर्ष तर निर्भया केसला लागली. पण सगळी व्यवस्थाच पितृसत्ताक आहे. संसदेत बसलेली लोकही फाशी देतात आणि न्याय दिला असं जाहीर करतात. पण फाशी दिल्याने न्याय मिळतो का, हो?

म्हणूनच बदलाची सुरवात आपल्याला घरातून करायचीय. आम्हा भारतीय लोकांना बदलायची गरज आहे. हे बदल घडवण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्डची गरज पडत नाही. आपण आज, आत्ता, या क्षणाला आपल्या घरात समानता आणू शकतो. या समानतेच्या सॅनिटायझरने आपण आज पितृसत्तेचा वायरस नष्ट करू शकतो. पितृसत्तेच्या वायरसची लागण झालेल्यांना आपण आज क्वारंटाईन करू शकतो. मित्रांनो, त्यासाठी कुणाचीही परवानगी लागत नाही.

ममता बाईकडेच असली असती तर ती बुद्धात कशी आली?

घरातलं काम हे घरातल्या सगळ्यांचं काम असायला हवं. ते फक्त बाईचं काम आहे, पुरूषाचं नाही, ते फक्त बायकोचं आहे, आईचं आहे पण नवऱ्याचं किंवा बाबांचं नाही हा समज बदलत नाही तोपर्यंत समता येऊ शकत नाही. पुरुष मुलं सांभाळण्यासाठी पुढे येत नाहीत, मुलांना छातीशी धरून ठेवत नाहीत, तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत.

एखाद्या माणसाचा जीव किती मौल्यवान आहे, त्याला वाढवण्यासाठी किती कष्ट लागतात हे पुरूषांना कळेल तेव्हा पुरुष बंदुक उचलणं सोडून देतील. कुणाला दंडुका घेऊन मारायला त्यांचे हात धजावणार नाहीत. मुलांचं संगोपन करण्यात पुरूषांनी पुढाकार घ्यायाला हवा. त्यातूनच त्यांच्यात मायेची भावना जागृत होईल.

मायेची भावना बायकांमधे काही जन्मतः येत नाही. किंवा वयात आल्यावर, आई झाल्यावर माया तयार करणारा हार्मोन बाईच्या शरीरात निर्माण होत नाही. बायका मायाळू बनतात ते सरावामुळे. ममता बाईकडेच असली असती तर ती बुद्धात कशी आली? गुरूनानकांमधे कशी आली? मोहम्मदमधे कुठून आली? आणि हिंसा हा पुरूषांचा स्थायीभाव असला असता तर आपण पाहिलेल्या दुष्ट बायका कुठून आल्या?

मित्रांनो, पितृसत्ताही नैसर्गिक नाही आणि फेमिनिझमही नैसर्गिक नाही. ते आपण कोणती मूल्य स्वीकारलीयत त्यावर आधारलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही मूल्यं शोधत बसायची गरज नाहीय. ती मूल्यं संविधानाने, ह्युमन राईट्स डिक्लेरेशनने आधीच आपल्याला दिलेली आहेत. सगळं रेडीमेड मिळालंय!

हेही वाचा : अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

पितृसत्ता पुरुषांचं नुकसान करते

महिलांना संपत्ती देणं चालू केलं पाहिजे. आपण त्यांना दुसऱ्याची संपत्ती म्हणजेच पराया धन मानत बसलो तर ती नेहमी दुसऱ्यांच्या दबावाखालीच राहील. केरळमधे एक कायदा झाला होता, प्रॉपर्टी असेलल्या बायकांना कमी हिंसेचा सामना करावा लागतो. आम्ही एक घोषणा द्यायचो,

‘बेटी दिल मे 
बेटी विल मे
ना दहेज ना महेंगी शादी 
बेटी को देंगे संपत्ती आधी

विल म्हणजे मृत्यूपत्र.

बायकांनी पितृसत्तेविरूद्ध गेल्या २०० वर्षांपासून आवाज उठवलाय. त्यात काही पुरुषही आमच्यासोबत होते. हे सगळे पुरुष न्यायप्रिय होते. आजही सगळ्या न्यायप्रिय पुरुषांनी पितृसत्ता त्यांचंही नुकसान करतेय हे ध्यानात घ्यायला हवं. पितृसत्ता त्यांना अमानवी बनवते. सगळे पुरुष बलात्कारी नाहीत. पण सगळे बलात्कारी पुरुष आहेत. सगळे दहशतवादी, सुसाईड बॉम्बर्स, रस्त्यावर दंगली करणारे, तोडफोड करणारे पुरुष आहेत. हे पुरुष असे जन्माला आलेले नव्हते. पितृसत्तेच्या वायरसची लागण त्यांना झालीय. आपल्याला कसं नातं हवंय हे या पुरुषांना कळालं पाहिजे.

आजकालच्या मुली पतिपरमेश्वर नाही, तर जोडीदार शोधतायत. म्हणून लग्न तुटतायंत. कारण पुरूषांना बरोबरीची सवय नाही आणि मुली बरोबरीशिवाय राहणाऱ्या नाहीत. घरात बरोबरी नसेल तर बाहेरही नसणार. संसद, पोलिस, न्यायाधीश सगळे घरातून तयार होतात. म्हणून घरातून बदलण्याची सुरवात आपण करायला हवी.

हेही वाचा :  

आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

भाजप नेत्यांना ट्रोल करून महाआघाडी चकमकी जिंकेल, युद्ध नाही

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कुळकथा

मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?

कोर्टाचं आदेशपत्र जसंच्या तसं: राहुल कुलकर्णींना कोर्टाने जामीन दिला पण `सपोर्ट` का केलं नाही?