कपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'

०६ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली.

कपिल देव निखंज यांना 'महान' अशी उपाधी द्यावीच लागेल. भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा ‘देव’ असं त्यांना म्हटलं तरी ते अतिशयोक्तीचं होणार नाही. खराखुरा अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ते वावरले. १९८३ चा वर्ल्डकप त्यांच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं पटकावला होता. एका प्रदीर्घ कारकीर्दीनंतर ते निवृत्त झाले. आता त्यांच्या त्या विश्वविजयावर हिंदीत ‘८३’ हा सिनेमाही येऊ घातलाय.

आताचा आघाडीचा अभिनेता रणबीर सिंग कपिलदेव यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दीपिका पदुकोन ही कपिलची बायको रोमी हिच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमामुळे कपिलदेव कोण, त्यांनी काय केलं होतं याची थोडी तरी कल्पना आताच्या युवापिढीला येईल.

देशप्रेम आझादांच्या तालमीतले कपिलदेव

कपिलदेव रांगडा, गावरान असा भन्नाट तरुण. हरयाणाचा हरहुन्नरी अशी आताही त्यांची ओळख आहे. सुरवातीपासून खेळाची आवड. क्रिकेटसाठी खूप मेहनत घ्यायचे. चंदिगडला देशप्रेम आझाद यांनी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर लावलं होतं. कपिल देव आणि त्यांचा खास दोस्त योगराज सिंग तिथं जायला लागले. योगराज म्हणजे युवराज सिंगचे वडील बरं का! ते सांगतात, संध्याकाळी गायी, गुरं चरून घरी परतायची तेव्हाच हे दोघंही घरी परतायचे. घरी आल्यावरही कपिल यांचा खेळ सुरुच असायचा. मंद उजेडातही चेंडू टाकायचा सराव नाहीतर व्यायाम चालूच असायचा.

इथं गुराढोरांचा संदर्भ महत्वाचा आहे. कपिलने धष्टपुष्ट व्हावं म्हणून त्यांच्या वडलांनी घरी चक्क एक म्हैस आणली होती. तिच्या दुधावर कपिल पोसले गेले. अथक मेहनत घेणारे कपिल देव भन्नाट वेगवान बॉलिंग करतात ही बाब चाणाक्ष आझाद सरांच्या नजरेत आली नसती तरच नवल होतं. त्यांनी कपिल आणि योगराज दोघांनाही फास्ट बॉलिंगसाठी प्रोत्साहन दिलं.

त्यांचा मूळ उद्देश भारताकडे जलदगती बॉलर नाहीत या समस्येवर तोडगा काढण्याचाच होता. त्यांना कपिल यांच्यात आशेचा किरण दिसला आणि पुढे कपिल यांनीही हा विश्वास सार्थ ठरवला. पुढे कपिल यांना हेमू अधिकारींनी युवकांसाठी प्रशिक्षण शिबीर चालवलं होती त्यासाठी घेतलं. या शिबिरात कपिल यांच्या बॉलने आपली चमक दाखवली. शिवाय बॅटही फिरवून दाखवली. पण तिथं जेवणासाठी दोनच चपात्या मिळत होत्या. ते पाहून बंडही केलं.

रणजीतच दाखवली गुणवत्ता

वयाच्या १५ व्या वर्षीच कपिल हरयाणाकडून रणजी स्पर्धेत खेळले. पदार्पणातच त्यांनी पंजाबच्या बॅट्समनची दाणादाण उडवली. दुलिप स्पर्धेत पश्चिम विभागाच्या रथी महारथी बॅट्समनचीही भंबेरी उडवली आणि लगेचच ते टीम इंडियासाठी निवडले गेले. तेव्हा त्याचं वय होतं १९. पहिला दौरा होता पाकिस्तानचा. त्या दौऱ्यात पाकिस्ताननं भारताच्या फिरकी बॉलिंगचं थडगं उभारलं आणि आता भारतीय क्रिकेटला वेगवान बॉलर्सची नितांत आवश्यकता आहे ही गोष्ट अधोरेखित झाली.

पाकिस्तान दौऱ्यात कपिल यांच्याकडून फार मोठी कामगिरी झाली नसली तरी त्यांच्यात गुणवत्ता आहे हे मात्र स्पष्ट झालं. कपिल यांनी नंतर आपल्या बॅटचे तडाखेही दिले. विंडीजविरुद्ध त्यांनी झंझावती खेळी केल्या. ते अष्टपैलू होतील अशी आशा तेव्हाच निर्माण झाली. फिल्डींगमधली चपळाईही दिसली.

हेही वाचा: ‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

चेस्ट ऑन एक्शननं बॉलिंग

कपिल हे खूप आक्रमकपणे मैदानावर वावरायचे. भारतीयांमधे क्वचित दिसणारा जोश, उत्फुल्लता त्यांच्या देहबोलीतून दिसायची. इंग्लंड दौऱ्यावेळी ते बॉल स्विंग करण्यात तरबेज होते. त्यांचा आउट स्विंगर आधीपासून चांगला होता. चेस्ट ऑन एक्शननं बॉलिंग करत असल्यानं हा त्यांचा आउट स्विंगर अधिक धारदार झाला होता.

शिवाय ते डोकं वापरून बॉलिंग करायचे. क्रीझचा वापर करून आणि लयीत धावत बॉल टाकण्याच्या त्यांच्या लकबीमुळे ते हा हा म्हणता प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरू लागले. मात्र त्यांना नेटमधे आणि मॅचमधे सतत बॉलिंग करावी लागत होती. त्याचबरोबर बॅटिंग जोरकसपणे चालली होती. हूक, पूल असे धाडसी फटके त्यांनी लिलया खेळले.

हूक करताना त्यांचा उजवा पाय सहज वर असा दुमडायचा की ती पोझ नटराजासारखी व्हायची. त्यांचा हा फटका पुढे नटराज या नावाने लोकप्रिय झाला. आधी कपिलदेव अष्टपैलू म्हणून स्थिरावले आणि त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकूळ घालणाऱ्या इयान बॉथम या इंग्लंडच्या ऑलराऊंडरशी त्यांची स्पर्धा होऊ लागली. पाकिस्तानचे इमरान खान आणि न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांच्यामुळे मग ही स्पर्धा चौरंगी बनली.

पहिल्याच लढतीत वेस्ट इंडिजचा पराभव

१९८३ च्या इंग्लंडमधल्या वर्ल्डकपसाठी कपिल देव यांच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व आलं. पण १९७५, १९७९ च्या वर्ल्डकप स्पर्धेतल्या भारताच्या सुमार कामगिरीमुळे ८३ च्या वेळी कुणीही टीमकडून कसलीही अपेक्षा केली नव्हती. मात्र कपिल देव नेहमीसारखे सकारात्मक होते. खडूस इंग्लिश समीक्षक टीम इंडियाबद्दल थट्टेत लिहित होते. यामुळे कपिल देव चवताळले होते.

टीम मिटिंगमधे यावरच बोलणं व्हायचं आणि याचा परिणाम झाला. आणि मग 'हम भी कूछ कम नही' हे टीमनं दाखवून दिलं.

विशेष म्हणजे टीममधे बॉलिंग, बॅटिंग, फिल्डींग या तिन्ही विभागात थोडी थोडी उपयुक्तता ठेवणारे सहा, सात खेळाडू होते. त्यांचा छान वापर कपिल यांच्याकडून झाला आणि मग पहिल्याच लढतीत बलाढ्य वेस्ट इंडीजला पराभूत करायची किमया घडली. तरीही हा ‘रामभरोसे’ विजय समजला गेला होता.

क्रिकेटच्या इतिहासातली जबरदस्त खेळी

वेस्ट इंडीज विरोधातल्या विजयामुळे भारतीय खेळाडूंना स्वसामर्थ्याची ओळख झाली होती. त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र अचानक लिंबू टिंबू अशा झिम्बॉब्वेने टीम इंडीयाला अडचणीत आणलं. भारताची अवस्था ४ बाद ९ आणि ५ बाद १७ अशी केली. ४ बाद झाल्यावर स्वतः कपिल बॅटिंग करायला मैदानात उतरले. त्यांच्यासाठी ही अग्निपरीक्षा होती.

कधी नाही ते सरळ बॅटने खेळत त्यांनी आधी २६ ओवरमधे हाफ सेंच्युरी काढली. पुढचं अर्धशतक १३ ओवरमधे केलं आणि नंतर तर त्याला ९ ओवर पुरली. बरोबर बिन्नी, मदनलाल, किरमाणी यांना घेत त्यांनी झंझावात निर्माण केला होता. टीम इंडियाला २६६ असा स्कोर गाठून दिला.

क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातली ही जबरदस्त खेळी म्हणून आजही गणली जाते. नेमकं तेव्हाच बीबीसीआयचे कर्मचारी संपावर होते आणि या खेळीचं शुटिंगच झालं नाही.

हेही वाचा: अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

लॉर्डसच्या मैदानावरचा ऐतिहासिक क्षण

सेमीफायनलमधे इंग्लंडची गाठ भारताशी होती आणि इंग्लिश समीक्षकांनी निर्वाळा दिला ‘इंग्लिश टीम फायनलमधे’. भारताला काय आपला टीम हा हा म्हणता हरवेल अशीही दर्पोक्ती होती. कपिल पुन्हा उसळले आणि त्याचे सहकारीही. झालं उलटंच. टीम इंडिया अंतिम फेरीत पोचली. इथं पुन्हा सगळ्यांचा कौल वेस्ट इंडीजला होता. अंदाज, आडाखे, हमी, खात्री सारं वेस्ट इंडीजच्या बाजूनं होतं. भारताचा स्कोर जेमतेम १८३.

विव रिचर्डस बेलगामपणे चौफेर टोलेबाजी करायला लागला होता.तो मॅच लवकर संपवायला निघालाय असंच वाटत होतं. आणि त्या भरात त्यानं एक उंच फटका मिड विकेटच्या जरा मागे लगावला. तिथं कुणी नव्हतं. चपळ कपिल देव तेव्हा जणू वर्ल्डकप पकडायलाच उलटे धावत सुटले. ते वीसएक मीटर धावत गेले आणि त्यांनी तो थक्क करणारा कॅच घेतला. पुढं चिवटपणे टीम इंडियानं वेस्ट इंडिजला डोकं वर काढू दिलं नाही. इथं इतिहास घडला.

लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर मग कपिलदेव यांनी तो झळाळता वर्ल्डकप ऐटीत उंचावला. तिथं खरं तर भारतीय क्रिकेटला नवी दिशा मिळाली. वन डे हा प्रकार एक फॅड समजणारे भारतातले क्रिकेट पंडित अवाक झाले. त्यांच्याहून अचंबित झाले इंग्लिश क्रिकेट विद्वान. भारतातली क्रिकेटची लोकप्रियता यानंतर कळसाला पोचली आणि ती अद्याप कायम आहे. मग टेस्ट क्रिकेटमधेही भारताची छाप पडू लागली. भारतीयांमधला न्यूनगंड गेला.

कपिल कायम तडफेनं खेळत राहिले

कपिलदेव आणि सुनील गावस्कर यांच्यात नेतृत्वाची मात्र पुढे अदलाबदल होत राहिली. या दोघांमधे सतत काहीसा उंदरा, मांजरासारखा खेळ राहिला. कपिलदेव हे आपल्या बॅटिंगच्या गुणवत्तेला पुरेसा न्याय देत नाहीत, अशी गावस्कर यांची तक्रार होती. कपिल त्यांच्याच मस्तीत नेहमी राहायचे. तशात त्यांचं इंग्लिश भयंकर होतं. यामुळे खरं तर सांगायचंय ते बाहेर न येता वेगळंच काही बोललं जायचं. त्यामुळे गैरसमजही व्हायचे.

टीम इंडिया विश्वविजेता होण्यामागचं रहस्य सांगताना संदीप पाटील म्हणाले होते, 'कपिलच्या इंग्रजी भाषणामुळे आम्ही एवढंच समजायचो की आम्हाला चांगलं खेळायचंय. हेच रहस्य.' अर्थात संदीप हे सारं गंमतीत म्हणाले होते. यावरून कपिल यांच्या इंग्रजीची कल्पना यावी.

कपिल तडफडेनं खेळत राहिले. त्यांनी त्यांच्या पहिल्या टेस्टमधलं शतक ९६ वरून षटकार मारत पूर्ण केलं होतं. एकदा इंग्लंडविरुद्ध फॉलो ऑन चुकवताना त्यांनी एडी हेमिंग्ज यांच्या एका ओवरमधे लागोपाठ चार सिक्स लगावले होते. हाच त्यांचा शिरस्ता होता. त्याला कोण काय करणार? ते त्यांच्याच मस्तीत सतत खेळले. टेस्ट क्रिकेटमधे सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रमही केला. आणखी अनेक विक्रम त्यांनी केले. अनेक पुरस्कारही मिळवले.

हेही वाचा: इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते

स्वभावानं रोखठोक मनानं हळवा

कपिलदेव स्वभावानं मोकळा ढाकळा, रोखठोक माणूस. जसं बहुतेक असतात, तसाच खुशाल शिव्या हासडणारा. पण मनानं चांगला. सर्वांना मदत करू पाहणारा. बलविंदर संधू यांनी त्यांच्या ‘द डेविल्स पॅक’ पुस्तकात एक किस्सा दिलाय. १९८३ च्याच वेस्ट इंडीजविरुद्धच्याच ‘पोर्ट ऑफ स्पेन’ टेस्टमधे कपिलदेव दुसऱ्या डावात बॅटिंग करत होते. विंडीज आग ओकत होते. अशावेळी तळाचा संधू हेल्मेट न घालता मैदानावर उतरले. त्यांना बघून कपिलनं लाखोल्या वाहायला सुरवात केली.

कपिल यांचा राग संधूना दुखापत होईल या भीतीनं होता. आणि नंतर खरोखर महाकाय जोएल गार्नरने आपल्या ओवरमधे सगळे बॉल संधू यांच्यावर बाउन्सर म्हणून मारले. तेव्हा विंडीजचे खेळाडू हसतही होते. संधू तेव्हा कपिल यांच्या हळवेपणानं हेलावला होता. कपिल देववर मॅच फिक्सिंगवरून टीवीवर खुलासा करायची वेळ आली. त्यांचे डोळे पाणावले तेव्हा संधूलासुद्धा वाईट वाटलं होतं.

गोव्यावरून फोन करत संधूंनी कपिलला जरासं दटावलंच, ‘अरे तू एवढा झुंजार, एवढा उत्तुंग. तू या कचकड्यांच्या पुढे रडलास कसा? तू त्यांना गप्प करशील याची मला खात्री आहे.’ तेव्हा कपिलही म्हणाले, ‘नाही. मी भावनेत वाहून गेलो. यापुढे असं नाही होणार माझ्याकडून. मी रडणार नाही.’ कपिलने अशी खूप माणसं जोडली.

क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं

कपिल देव प्रेमळ आहेत. बायको रोमीवर त्यांचं खूप प्रेम आहे. बरेच दिवस त्यांना मूल नव्हतं. तेव्हा त्यांनी तिला खूप जपलं होतं. त्यांच्यामधे खिलाडू वृत्तीच खेळामुळे वाढली. क्रिकेटच नाही तर फुटबॉल, गोल्फ, टेनिससुद्धा उत्तम खेळतात. त्यांना खेळत राहायला आवडतं. कपिल देव आयुष्याकडे सकारात्मकतेनं बघतात. त्यांच्या या आनंदी, खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा ते वरच्या उंचीवर घेऊन गेले.

कपिल देव हा माणूस महान खेळाडू आहे. १३१ टेस्टमधे त्यांनी ५ हजार २४८ रन्स काढले. ४३४ विकेट घेतल्या आणि ६४ कॅच पकडल्या. तर २२५ वन डेमधे ३७८३ रन्ससहीत ५३ विकेट आणि ७२ कॅच पकडल्यात. खरं तर ही आकडेवारीही त्यांची महानता दाखवायला अपूर्ण आहे.

हेही वाचा: 

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन