आज ४ फेब्रुवारी. बार्शी ते उस्मानाबाद परिसरातल्या गावागावात शाळांचं जाळं उभारणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा जन्मदिन. घरोघर धान्य मागून त्यांनी बोर्डिंग उभी केली. त्या परिसरातली बहुजनांची पहिली पिढी मामांमुळेच शिकली. प्रचंड कष्टाने उभारलेल्या शिक्षणसंस्था आजही उत्तम सुरू आहेत आणि मामासाहेबांना आदरांजली म्हणून हा दिवस समाजदिन म्हणून साजरा करत आहेत.
महाराष्ट्राच्या शिक्षण चळवळीला मोठी परंपरा आहे. या शिक्षण चळवळीतून बहुजन समाजाची आत्मोन्नती घडवण्यासाठी अनेकांनी अपार मेहनत घेतली. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे त्यातलंच महत्वाचं नाव. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना मॅट्रिकनंतर शिकता आलं नाही मात्र इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गावोगावी पोचवली.
कर्मवीर मामासाहेब जगदाळेंच मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातलं चारे. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९०३ मधे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भिकार सारोळे इथं झाला. वारकरी कुटुंब असल्याने घरचं वातावरण तसं संस्कारी होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी घरून विरोध झाला. १९२३ मधे सातवी पास झाले. १९३० मधे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘सोलापूर को - ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियन’ चे सुपरवायझर म्हणून त्यांनी कामही केलं.
या सगळ्या काळात त्यांना मदतीसाठी अनेक सहकारी मिळाले. नव्या ओळखीही वाढल्या. परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आलं नाही ही खंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजेत या तळमळीतून मामांनी बार्शीमधे १९३४ मधे श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली. पुढे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन त्याच्या अनेक शाखा काढल्या आणि शिक्षणप्रसाराचं काम अधिक जोमाने पुढे नेलं.
साधारण १९३४ चा काळ. बोर्डिंग सुरू करण्याचा विचार कर्मवीर जगदाळे मामांना स्वस्थ बसू देत नव्हता. एकदा येडशी गावचे शंकरराव रास्ते त्यांना भेटायला आले. मामांनी खेड्यातून बोर्डिग सुरू करण्याचा मनोदय त्यांना बोलून दाखवला. त्यावर रास्ते म्हणाले, `मामा, मग तुम्ही येडशीला का बोर्डिंग काढीत नाही?’
आर्थिक अडचणींसोबत लोकांची सहानुभूती आणि जागेचा प्रश्नही होताच. तो मामांनी बोलूनही दाखवला. `येडशीलाच काय पण एखाद्या डोंगरातही बोर्डिग काढेन,` असं म्हणायलाही ते विसरले नाहीत. रास्ते यांनी मामांना सहकार्य करण्याचे कबूल केले.
येडशी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार. येडशीच्या हद्दीपर्यंत बालाघाट डोंगराच्या रांगा. डोंगरालगतच येडशी गाव आहे. हा सगळा परिसर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या महाबळेश्वरचा भाग. तिथं बोर्डिंग सुरू करण्याचा मामांनी निश्चय केला आणि १ मार्च १९५२ रोजी येडशीला ‘सुभाष विद्यार्थी वसतिगृह’ सुरू केलं. हे बोर्डिंग म्हणजे बार्शीच्या श्री शिवाजी बोर्डिंगची प्रतिकृतीच. सुरुवातीला काही काळ हे बोर्डिंग एका वाड्यात सुरू करण्यात आलं.
पुढे येडशी रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच काही एकर जागा मामांनी खरेदी केली. ३१ जुलै १९५२ रोजी त्या जागेवर बोर्डिंगच्या नियोजित इमारतीचा कोनशिला समारंभ कोल्हापूरचे भाई माधवराव बागल आणि डॉ. भा.वा. मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्या जागेवर उभारलेल्या पत्र्याच्या शेडमधे गावातलं वसतिगृह हलवले. ३० नोहेंबर १९४७ मधे गाडगेबाबांच्या हस्ते मुलींसाठी भारतीय बालिकाश्रम वसतिगृहाची स्थापना झाली. पुढे बार्शीच्या भारतीय बालिकाश्रमातील मुली येडशीच्या बोर्डिंगमध्ये आणल्या.
मामा खेडेगावात वाढले. लहानाचे मोठे झाले. बोर्डिंग समाजशिक्षणाचं केंद्र व्हावं हा त्यांचा प्रयत्न होता. मुलांमधे सामाजिक जाणीवा विकसित व्हाव्यात, जातधर्माचे गटतट मोडून पडावेत, मुलांनी एकोप्याने राहावं, हा त्यांचा या मागचा विचार होता. त्यासाठी बोर्डिंगमधल्या विद्यार्थ्यांचा दिनक्रम आखीव रेखीव बनवण्यात आला होता. वाचनाची आवड वाढावी म्हणून एक ग्रंथालय सुरू करण्यात आलं. मुलांमधे एकमेकांविषयी ममत्व भाव वाढावा, संवाद व्हावा हाही उद्देश यामागे होता.
येडशीला फक्त मराठी सातवीपर्यंतच शाळा होती. तिथेच हायस्कूल काढायचं मामांनी ठरवले. १९५०-५१ या शैक्षणिक वर्षात सातवीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला नव्हता. हा वर्ग स्थानिक रहिवाशी जगताप मास्तरांकडे होता. गावकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. जगतापांची बदली करण्यात आली. हा राग त्यांच्या मनात कायम होता.
जून १९५२. रात्रीची वेळ. सर्व मुलं गाढ झोपेत होती. जगदाळेमामांचे सहकारी रा. ज. हंगरगे बोर्डिंगचा जमाखर्च लिहीत होते. अचानक दारावर बाहेरुन धक्के मारण्याचा आवाज येऊ लागला. पाच सहा लोक हातात काठ्या घेऊन उभे होते. ते बहुतेक मामासाहेब जगदाळे यांना मारण्याच्या बेतानेच आलेले होते, हे त्यांना उमगलं. जगदाळेमामा हे सर्व ऐकत होते. जगतापांची बदली या सगळ्याला कारण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
`पुढे तुमचीच मुलं इथं शिकतील. तुम्ही मला मारलंत, तरी माझ्या समाधीचा प्रत्येक दगड भावी पिढ्यांना माझे विचार ऐकवेल,` असं म्हणत खूप संयतपणे मामांनी शिक्षणाविषयीची आपली तळमळ व्यक्त केली. त्यांच्या या बोलण्याचा आलेल्या लोकांवर परिणाम झालाच. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि निघून गेले.
१९५१ ते १९६१ ह्या काळात कर्मवीर मामासाहेब जगदाळेंच्या संस्थेने विशेष शैक्षणिक कामगिरी करत आपला आलेख अधिक उंचावत नेला. ४ डिसेंबर १९५१ ला संस्थेचे जनता विद्यालय हे हायस्कूल स्थापन झालं. मामांनी शेतकी शिक्षणाला तांत्रिक शिक्षणाची जोड दिली. किमान कौशल्यावर आधारीत कार्यक्रम आणि त्यासाठी अत्यावश्यक शिक्षण मुलांना देण्यात आलं. एप्रिल १९५४ मधे बार्शी येथे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाची स्थापना झाली. तर १९६३ ला महात्मा फुले विद्यामंदिर ही प्राथमिक शाळा स्थापन केली. त्यांनी स्थापन केलेलं महाराष्ट्र विद्यालय हे आजही स्वत:ची वेगळी ओळख कायम ठेवून आहे.
यासोबत त्यांनी अनेक शिक्षणसंस्था काढून उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरात शिक्षणाचं काम अविरत चालू ठेवलं. त्यांनी सुरू केलेल्या शाळा आणि त्यांची वर्षं अशी, जून १९५४ मधे महात्मा गांधी विद्यालय - काटेगाव, वखारिया विद्यालय - उपळे, जून १९५६ मधे जयहिंद विद्यालय - कसबे तडवळे, भारत विद्यालय - उस्मानाबाद, १९५८ मधे छत्रपती शिवाजी विद्यालय - वाशी, लोकसेवा विद्यालय - आगळगाव, किसान कामगार विद्यालय - उपळाई, १० जून १९६० मधे महाराष्ट्र संत विद्यालय - तेर, श्री शिवाजी महाविद्यालय - बार्शी, जून १९६१ मधे संत तुकाराम विद्यालय - पानगाव, संत ज्ञानेश्वर विद्यालय - भातंबरे.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबरच काळाची पावलं ओळखत शेतकी, नर्सिंग, कौशल्य विकास कार्यक्रमांना समोर ठेवून महाविद्यालये काढण्यासाठी मामांनी पुढाकार घेतला. गाव खेड्यातल्या मुलांची तगमग मामा जाणून होते. त्यामुळे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच संस्थांमधे वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली. या सगळ्या काळात डोळे दिपतील अशी शैक्षणिक संकुले कर्मवीर मामासाहेब जगदाळेंनी उभारली.
त्यांच्या या कामात अनेकजनांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. संस्था उभारणीसाठी आर्थिक पाठबळ दिलं. शंकरराव निंबाळकर, वा.म. कुदळे, सं.मा. बरांगुळे, बा.गे. मोहिते, डॉ. शकुंतला करपे, भ.र. कांबळे, जनाब नजीरद्दीन नायकवडी, बापूराव मोहिते असे त्यांच्या कामात सोबतीने उभे राहणारे अनेक सहकारी होते.
१९७४ चं साल. मामांची तब्येत वारंवार बिघडत होती. अशातच अर्धांगवावायूचा झटका आल्यामुळे सोलापूरच्या एका हॉस्पिटलमधे त्यांना दाखल कराव लागलं. तिथल्या सगळ्या सोयीसुविधा बघून त्यांच्या डोक्यात हॉस्पिटल उभारण्याचा विचार आला. गोरगरिबांना कमी खर्चात आरोग्यसेवा मिळावी, हा त्यांचा उद्देश होता. १९७५ मधे बार्शीला एक हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उभं केलं. सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवेसाठी हा खूप मोठा आधार होता.
मामासाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने भारावलेले होते. माणसाने स्वार्थासाठी देवाला देवळात बंदिस्त केलं आहे. मंदिरं बांधण्यापेक्षा सगळी देवळं ज्ञानमंदिरं झाली पाहीजेत, असं ते ठामपणे सांगत. पुण्याच्या कसबा पेठेतील संकेश्वर मंदिराची खाजगी मालकी मामांचे मित्र भ.र. कांबळे यांना बक्षिसपत्र म्हणून दिली होती. मामासाहेबांनी याच संकेश्वर मंदिराच्या जागेवर महात्मा फुले विद्यामंदिर स्थापन करण्यात आलं. प्रत्यक्षात त्यांनी देवळाच रूपांतर ज्ञानमंदिरात करुन दाखवलं.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रातलं काम अफाट होतं. या कामाची दखल घेत मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी दिली. २४ फेब्रुवारी १९८० रोजी पुढे मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. आर. भोसले यांनी बार्शीला येऊन समारंभपूर्वक त्यांना ही पदवी प्रदान केली. पुढे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनीही डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. हा खरंतर त्या पदव्यांचा सन्मान होता.
त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था या बहुजन समाजाचा मुक्तिअध्याय होत्या. त्या ज्ञानाचं केंद्र ठरल्या. कमवा आणि शिका सारख्या योजना राबवून श्रमाच्या प्रतिष्ठेच मोल त्यांनी विद्यार्थ्यांमधे रुजवलं. शिक्षणाविषयी तळमळ, गोरगरिबांविषयी असलेली कणव हा त्यांच्या कृतीचा भाग बनला. शिक्षणक्रांती घडवून आणणारा, त्यासाठी अविरत झटणारा हा अवलिया ३० मे १९८१ रोजी कायमचा काळाच्या पडद्याआड गेला.
(विशेष संदर्भः व. न. इंगळे लिखित कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे पुस्तक)