कस्तुरबा आणि गांधीजी

२३ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


कस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतिदिन. देशाला, जगाला गांधी नावाचा महात्मा मिळाला. त्यामधे एक बायको म्हणून कस्तुरबांचं योगदान खूप मोठं होतं. स्वातंत्र्य लढ्यात त्या गांधीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण गांधींपुढेच कस्तुरबा गेल्या. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातल्या लेखाचा हा संपादित अंश.

कस्तुरबा बापूंहून वयाने मोठ्या होत्या. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८६९ चा. तर बापूंचा २ ऑक्टोबर १८६९ या दिवशीचा. त्यावरून त्यांच्यात वाद झडत, थट्टाही होत. ‘मी तुमच्याहून मोठी असल्यानं तुम्ही माझं ऐकलं पाहिजे’ असं बा म्हणत. तर बापूंना त्यांचं मोठं असणं मान्यच करता यायचं नाही. १८८३ मधे त्यांचा विवाह झाला. दोन्ही घराणी तोलामोलाची होती.

लग्‍नानंतरची काही वर्ष तेव्हाच्या रीतीनुसार बा त्यांच्या माहेरी राहिल्या. त्या सासरी आल्या तेव्हा त्या पूर्णपणे निरक्षर होत्या. तेव्हा बापूंनी त्यांना अक्षरओळख करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बांनी त्यांना त्यात पराभूत केलं. त्या काहीएक शिकल्या नाहीत.

पुढे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर बा गांधींसोबत आगाखान पॅलेसमधे बंद असतानाही गांधींनी त्यांना भूगोल शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र कलकत्त्याची राजधानी लाहोर असल्याचं उत्तर त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर त्यांनी ती शिकवणी तात्काळ थांबवली. विवाहाच्या आरंभकाळात बापूंना कस्तुरबांविषयी वाटणारा ओढा कमालीचा शारीरिक होता. घरीदारी आणि सर्वत्र माझ्या मनात तिचेच विचार असतं ही गोष्ट बापूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलीय.

गांधी थेट बांविरोधात उपोषण करतात तेव्हा

त्यांचं पहिलं मूल लहानपणीच वारलं. दुसरा हरिलाल. त्याचा जन्म १८८८ चा. मणीलाल १८९२, रामदास १८९७ तर धाकटा देवदास १९०० मधला. बा आणि बापूंचं वैवाहिक जीवन ६२ वर्षांचं होतं. पण १९०६ मधेच वयाच्या छत्तीसाव्या वर्षी बापूंनी बांच्या संमतीने बह्मचर्याची शपथ घेतली. ‘नंतरच्या काळात आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो आणि मनानेही परस्परांच्या फार जवळ आलो’ अशी नोंद बापूंनी करून ठेवलीय.

त्यांना ब्राँकायटिसचा त्रास होता. हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले होते. बापूंच्या आश्रमात येणारं सारं काही सार्‍यांच्या हक्‍काचं असायचं. त्यातून बापूंचं असंग्रहाचं व्रत आश्रमात फारसं काही येऊही द्यायचं नाही. आलं त्यात आणि आहे त्यात सारं भागवावं लागायचं. सार्‍यांचा स्वयंपाक एकत्र आणि जेवणंही एकत्रच व्हायची. ती कमालीची साधी असायची.

हेही वाचाः गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?

एकदा कस्तुरबांच्या माहेरची माणसं त्यांना भेटायला आली आणि आश्रमातलं ते जेवण पाहून मनातून निराश झाली. परत जाताना त्यांनी बांच्या हाती २५ रुपये कोंबले. कधीतरी आपल्या मुलांना काही गोडधोड करून खाऊ घाल, असं त्यांना ते जाताना म्हणाले. आश्रमाच्या नियमानुसार बांनी ते पैसे सामाईक खात्यात जमा करायला हवे होते. पण ते त्यांनी स्वतःजवळ ठेवले. बापूंना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी बांची सायंकाळच्या प्रार्थना सभेत जाहीर कानउघाडणी केली.

 ‘ज्याची पत्नी त्याचं ऐकत नाही त्याचं म्हणणं समाज तरी कसा ऐकेल’ असं ते म्हणाले. त्यावर वैतागलेल्या बा म्हणाल्या, ‘हे पैसे माझ्या माहेरचे आहेत. ते माझं स्त्रीधन आहे. त्यावर तुमचा काहीएक हक्क नाही.’ बांच्या या अवताराने बापूच अवाक् झाले आणि बांचा निषेध म्हणून त्यांनी एक दिवस उपवास केला. तेवढ्यावर न थांबता बांच्या निषेधाचा एक अग्रलेख हरिजनमधे लिहूनही ते मोकळे झाले.

उपोषणं वाढवायची काळजी

बापूंच्या वारंवारच्या उपोषणांना बा कंटाळत. १९३० मधे बापूंनी आत्मशुद्धीसाठी २१ दिवसांचा उपवास जाहीर केला. तेव्हा मात्र त्या हादरल्या. मीराबेनना सांगून त्यांनी बापूंना एक तार पाठवली. ‘हा उपवास थांबवा. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या जबाबदार्‍या मोठ्या आहेत.’ असं सारं त्यांनी त्या तारेत लिहिलं. ती तार मिळाली तेव्हा बापूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी तात्काळ उत्तराची तार पाठवून काळजी करू नकोस, असं त्यांना कळवलं.

पुढे १९३२ मधे गांधीजींनी पुणे कराराच्या वेळी उपोषण केलं तेव्हा त्यांची प्रकृती एकदम बिघडली. बा तुरुंगात आल्या आणि त्यांनी बापूंची खालावलेली तब्येत पाहिली. त्या काहीशा वैतागाने म्हणाल्या, ‘जिवाची काळजी नाही. आमचीही काळजी नाही. कितीदा हे उपवास’. एवढं म्हणून त्या आत गेल्या.

हेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

देश आणि समाज यासाठी खडतर तपश्‍चर्या करणार्‍या थोरांच्या कुटुंबीयांना विशेषतः त्यांच्या पत्नींना काय सहन करावं लागतं याची कल्पना सामान्यपणे इतरांना येत नाही. त्यातून चरित्रं पुरुषांची लिहिली जातात. बासारख्यांच्या वाट्याला त्याही बाबतीत उपेक्षाच येत असते. ‘कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकेल याची जाण ठेवून जगा’ असे उद‍्गार काढणार्‍या कस्तुरबांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात घेतलेला सहभाग आणि त्यासाठी अनुभवलेला तुरुंगवास डोळ्यासमोर आणला की आपण हतबुद्ध होतो.

स्वातंत्र्य आंदोलनांच्या प्रत्येक टप्प्यावर साथ

१९१६ मधे त्या बापूंसोबत चंपारणच्या मोहिमेत सहभागी झाल्या. १९३० मधे सरदार पटेलांच्या नेतृत्वात झालेल्या बारडोलीच्या करबंदी आंदोलनात भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास पत्करला. १९३२ मधे त्यांना ब्रिटिश सरकारने कायदेभंगाच्या आरोपावरून अटक करून तुरुंगात डांबलं. १९३३ मधे त्यांना साबरमती आश्रमात अटक केली आणि ५ महिन्यांच्या एकांत कोठडीत डांबलं गेलं. १९३९ मधे राजकोट आंदोलनात त्यांना पुन्हा अटक झाली आणि याही वेळी त्यांच्या वाट्याला एकांत कोठडी आली.

१९४२ च्या चले जाव आंदोलनात त्यांना बापूंसोबत अटक झाली आणि पुण्याच्या आगाखान पॅलेसमधे डांबलं गेलं. एवढा कारावास अनुभवलेली ही न शिकलेली आई म्हणते, ‘स्नेह आणि समन्वयासाठी तुम्ही बोलता, तसा विचार करता आणि त्यासाठी एकत्र येता तेव्हाच तुम्ही सुखी होता.’ पुढे जाऊन ‘दुबळ्यांना क्षमाशील होता येत नाही. तो समर्थांचा सद‍्गुण आहे’ असं कोणत्याही ज्ञानसंपन्‍न माणसाने काढावे तसे उद्गार काढतात.

हेही वाचाः गांधीजींना तुकोबा भेटले होते

आश्रमातल्या शिस्तीबाबत बापू कमालीचे कठोर असत. त्यातल्या सार्वजनिक संडासांची सफाई सार्‍या आश्रमवासीयांनी आळीपाळीने करायची असे. बांना ते काम कधी जमलं नाही. आफ्रिकेतल्या टॉलस्टॉय आश्रमात त्यावरून त्यांची बापूंशी भांडणं होत. मात्र बांनी ते काम अखेरपर्यंत कधी केलं नाही आणि त्याची खंत बापूंनाही कायमची राहिली. ते एकमेकांना बा आणि बापूच म्हणायचे.

मुलांच्या बाबतीतही कठोर नियम

बापू सार्‍यांशी आत्मीयतेनं वागत. मात्र आपल्या मुलांबाबत ते कमालीची शिस्तप्रिय आणि काहीसे कठोर होते. ‘एखाद्या कलावंतानं, ज्ञानी माणसानं, नेत्यानं आपली परंपरा आपल्या नंतरच्या पिढ्यांमार्फत पुढे नेऊ नये काय,’ असा प्रश्‍न १९२४ मधे त्यांना एका पत्रकाराने विचारला. बापू म्हणाले, ‘निश्‍चितच नाही. अशा माणसाचे अनुयायी अनेक असतात. त्यांची संख्या त्याच्या मुलांहून मोठी असते. द्यायचंच झालं तर त्यानं या मोठ्या वर्गाला द्यायला हवं.’

बापू स्वतःबाबत जेवढे कठोर आणि निग्रही होते तेवढेच आपल्या मुलांनीही असावं असा त्यांचा आग्रह होता. आपली मुलं भक्‍त प्रल्हादासारखी निग्रही आणि सत्याग्रही असावी असं ते म्हणत. हरिलाल गांधीजींच्या मागे गुजरातेतच राहिला होता. १९०६ मधे वयाच्या १८ व्या वर्षी तो लग्‍न करायला तयार झाला, तेव्हा बापूंनी आपले ज्येष्ठ बंधू लक्ष्मणदासजी यांना लिहिलं. ‘त्यानं लग्‍न केलं काय आणि न केलं काय मला त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. मी त्याचा विचार करणं थांबवलंय.’

हेही वाचाः खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

एवढ्या अल्पवयातलं त्याचं लग्‍न बापूंना मान्य नव्हतं. सहा वर्षानंतर मणीलाल या त्यांच्या दुसर्‍या मुलाला दक्षिण आफ्रिकेतील एका विवाहित भारतीय महिलेनं आपल्या जाळ्यात ओढलं. त्यावर चिडलेल्या गांधींनी त्यांच्या विवाहालाच नव्हे तर एकत्र येण्यालाही विरोध केला. त्यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. पुढे जाऊन मणीलालनं कधी लग्‍नच करू नये असाही आदेश त्यांनी काढला.

१९२७ मधे बांच्या आग्रहावरून बापू नमले आणि मणीलालला त्याच्या वयाच्या ३५ व्या वर्षी विवाह करता आला. बापूंनी त्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण द्यायला नकार दिला. त्याचा राग पहिल्या दोघांनी मनात धरला.

रक्ताच्या नात्याहून विचाराचं नातं महत्त्वाचं

व्यक्‍तिमत्त्व आणि नीती यांचा विकास अधिक मोलाचा आहे असं सॉक्रटिससारखंच बापूही म्हणत असत. अर्थातच ते कोणत्याही तरुणाला न पटणारं होतं. मगनलाल या आपल्या पुतण्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. त्याने त्यांचा ब्रह्मचर्य राखण्याचा आदेश विवाहित असूनही पाळला होता. हा मगनलाल मृत्यू पावला तेव्हा बापूंनी लिहिलं, ‘तोच माझे हात होता, पाय होता आणि डोळेही होता. त्याच्या मृत्यूनं वैधव्य आलेल्या त्याच्या पत्नीचे हुंदके मला ऐकू येतात. पण मी तिला कसं सांगू की मला तिच्याहून जास्तीचं वैधव्य आलय.’

रक्‍ताच्या नात्याहून विचाराचं नातं बापूंना महत्त्वाचं वाटत असावं. बांना मात्र आपल्या मुलांविषयीचा लळा मोठा होता. १९१६ मधे मणीलालनं आश्रमाची एक रक्‍कम कोणालाही न सांगता हरिलालला पाठवली. हरिलाल तेव्हा कलकत्त्याला उद्योग करण्याच्या प्रयत्नात होता. बापूंच्या कानावर ते आलं तेव्हा त्यांनी मणीलालला सरळ आश्रम सोडून जाण्याचाच आदेश दिला. शिवाय त्याच्याविरुद्ध त्यांनी एक दिवस उपवासही केला. सारा दिवस मणीलाल बापूंची समजूत घालत आणि त्यांना उपोषण सोडण्यासाठी विनवत राहिला.

बा आणि देवीदास सारा दिवस रडत राहिले. पण बापू बधले नाहीत. त्यांनी मणीलालला काही खर्चाचे पैसे देऊन आश्रमाबाहेर घालविलं. दोन महिने अज्ञातवासात घालवल्यानंतर तो पुन्हा बापूंना भेटायला आला. यावेळी बापूंनी त्याला जी ए नटेसन या मद्रासी प्रकाशकाच्या नावानं ओळखपत्र दिलं. ‘त्याला पत्रकारिता शिकवावी. मात्र त्याला त्याचं अन्‍न स्वतः शिजवायला लावावं आणि त्याला सूत कातायलाही भाग पाडावं’ असं त्या पत्रात त्यांनी लिहिलं.

मणीलालची परीक्षा पूर्ण झाली तेव्हा बापूंनी त्याला दक्षिण आफ्रिकेत पाठवून ‘इंडियन ओपिनियन’चं संपादन करायला लावलं. पुढे तो भारतात येत राहिला. बापूंना भेटतही राहिला. बापू त्याच्याशी आत्मियतेनं वागले, पण त्यांच्या मनातली त्याच्याविषयीची अढी कधी गेली नाही. एकदा तो त्यांना म्हणाला, ‘बापू, तुम्ही आमचे लाड कधी केले नाहीत. आम्हाला कपडे धुवायला लावले. लाकडं फोडायला लावली. बागकाम आणि स्वयंपाकही आमच्यावर लादला. आता मात्र तुम्ही बदलला आहात. आश्रमात नव्यानं आलेल्यांचे तुम्ही लाड करताना दिसता.’

हेही वाचाः ७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय?

बापू त्यावर खळाळून हसले आणि मुलांना म्हणाले, ‘अरे, बघा हा मणीलाल काय म्हणतो ते.’ मात्र  मणीलाल तेवढ्यावरही त्याचा संयम सांभाळून जगला. हरिलालला ते जमले नाही. त्याचं धुमसणं सुरूच राहिलं. त्याची पत्नी १९१८ मधे वारली. तेव्हा त्याच्या दुसर्‍या विवाहाला गांधींनी विरोध केला. मग तो दारूच्या आहारी गेला. त्या नशेत तो बापूंना शिवीगाळ करू लागला.

धर्मांतर करून तो अब्दुल्ला झाला. मुस्लिम लीगने त्याला पक्षात घेऊन गांधींविरुद्ध सभा घ्यायला उभं केलं. पुढं बाच्या मृत्यूच्या काळात सरकारनं त्याला पकडून बांच्या भेटीला आणलं. तेव्हाही तो प्यायलेलाच होता. पाचच मिनिटात त्याला बांपासून दूर केलं गेलं. बांचा जीव मात्र त्याच्यासाठी अखेरपर्यंत तळमळत राहिला. आमच्या शिस्तीमुळे तो बिघडला याची खंत त्यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली.

बापूंच्या मांडीवरच घेतला अखेरचा श्‍वास

‘चले जाव’ची १९४२ ची घोषणा झाल्यानंतर बांना बापूंसोबत आगाखान पॅलेसमधे आणले गेलं. तिथं त्या बापूंच्या सेवेत रमल्या असतानाच त्यांचा अखेरचा आजार उसळला. आपल्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्‍त केली, तेव्हा त्या क्षेत्रातले नामांकित डॉक्टर्स तेथे बोलावले गेले. पण आजार बळावत गेला. 

अखेरच्या काळात देवदासनं त्यांच्यासाठी तेव्हा नुकतंच प्रचारात आलेलं पेनीसिलीनचं महागडं इंजेक्शन आणलं. पण ते लावू द्यायला बापूंनी नकार दिला. आता अखेरच्या काळात तिच्या देहाला वेदना नकोत, असं ते म्हणाले. ब्राँकायटिस आणि हृदयविकार अशा अनेक आजारांनी आणि तुरुंगवासातील कष्टप्रद जीवनानं जर्जर झालेल्या बांनी अखेर २२ फेब्रुवारी १९४४ ला सायंकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी बापूंच्या मांडीवर डोकं ठेवून अखेरचा श्‍वास घेतला.

त्यांच्या जाण्यानं गांधीजी कोलमडलेच. बांचं शव ठेवलेल्या दालनाच्या एका कोपर्‍यात दोन्ही पाय पोटाशी घेऊन मूकविलाप करणार्‍या बापूंचं चित्र पाहणार्‍यांचे डोळे आजही ओलावणारे आहेत. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. पुढचा त्यांचा प्रवास देशाच्या सहवासातला राहिला.

हेही वाचाः 

भवरलालजींनी माळरानावर साकारले गांधीविचार

अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?

(साप्ताहिक साधनामधून साभार.)