केला होता अट्टहासः शोषणमुक्त भारत प्रत्यक्षात येण्यासाठी तरुणांनी वाचायला हवी अशी कादंबरी

२१ जुलै २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


१९६० च्या दशकांत डाव्या विचारांच्या तरुणांनी गरिबी, शोषण, सावकारी, जमीनदारी यांच्याविरोधात आवाज उठवला. या संपूर्ण क्रांतीचा वाचनीय वृत्तांत म्हणजे ‘केला होता अट्टहास’ ही कादंबरी. हिन्दी साहित्यिक शिवदयाल यांच्या 'एक और दुनिया होती'चा हा अनुवाद आहे. या रेखा देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या या कादंबरीच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.

'केला होता अट्टहास' म्हणजे हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या ‘एक और दुनिया होती' या कादंबरीचा अनुवाद. कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंधांतून विणलं गेलं आहे आणि यात मुख्यतः अन्याय समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं सगळं आयुष्य खर्ची घालणारे, जयप्रकाशजींच्या समग्र क्रांतीच्या विचायांनी भारलेले बिहारमधले तरुण आहेत. 

या तरुणांना वर्षानुवर्षं सातत्यानं अशा प्रकारचं काम करण्यासाठी आवश्यक असं मनोबल कुठून आणि कसं लाभलं असेल हे जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा ग. प्र. प्रधानांनी लिहिलेल्या जयप्रकाशांच्या चरित्राकडे वळले. आणि त्यावरून १९६० आणि ७०च्या दशकातील बिहारमधल्या वातावरणाची, या तरुणांच्या मन:स्थितीचीही कल्पना येऊ शकली.

त्यावेळेस बिहारमधील विद्यार्थ्यामधे केवढा तरी असंतोष खदखदत होता. शिक्षणक्षेत्रातील वशिलेबाजी, लाचलुचपत, परीक्षांच्या निकालातही भ्रष्टाचार, अनेक केंद्रांवर परीक्षांच्या वेळी झालेली सामुदायिक कॉपी यामुळे, प्रामाणिक विद्यार्थी संतापलेले होते.

१९७४च्या फेब्रुवारीत बिहार विद्यापीठ, भागलपूर विद्यापीठ, पाटणा विद्यापीठ आणि मगध विद्यापीठ यांच्याशी संलग्न असलेल्या ६५ महाविद्यालरांतील विद्यार्थ्यांची एक परिषद भरली. परिषदेत १८ मार्चला विधानसभेवर मोर्चा नेऊन मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन द्यायचं असा निर्णय झाला होता. पण बिहारचे मुख्यमंत्री गफूर आणि त्यांचे सहकारी यांनी ही विद्यार्थी चळवळ दडपून टाकण्याचं ठरवलं.

हेही वाचाः इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात

१८ मार्चला हजारो विद्यार्थी पाटण्यामधे जमले असताना त्यांच्यावर निष्ठुरपणे लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला. त्यात चार विद्यार्थी मृत्युमुखी पडले. विद्यार्थ्यांनी याचा निषेध केला आणि गफूर सरकारच्या राजीनाम्राची मागणी करणाऱ्या  विद्यार्थी चळवळीतले हे लोक वेगवेगळ्या शहरांमधेही पोचले. गफूर सरकारच्या दडपशाहीचा निषेध सर्वत्र होऊ लागला.

या दडपशाहीमुळे विद्यार्थी काहीसे भांबावलेले होते. विद्यार्थ्यांना नेमके काय करायला हवं हे कळत नव्हतं. म्हणून मार्गदर्शनासाठी ते जयप्रकाशजींना भेटले. खरं तर जयप्रकाशजींची प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे त्यांची या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी नव्हती. परंतु विद्यार्थ्यांच्या हट्टामुळे यांना विद्यार्थ्यांची विनंती मान्य करावी लागली. मात्र त्यापूर्वी यांनी विद्यार्थ्यांना काही अटी घातल्या होत्या.

जयप्रकाशजींनी सांगितलं होतं, ‘तुम्ही हे आंदोलन अहिंसेच्या मार्गानेच चालवलं पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक कार्यकारिणीनेच आंदोलनाचा कार्यक्रम एकमताने ठरवला पाहिजे.’ या अटी विद्यार्थ्यांनी मान्य केल्या. पुढे हे चळवळीचं लोण बिहार आणि इतरही राज्यांमधे पसरतच होतं.

पाटण्यामधे ५ जून १९७४ला, जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली एक अभूतपूर्व मोर्चा निघाला. त्यात सामील होण्यासाठी बिहारच्या कानाकोपऱ्यांतून पाच लाखांहून अधिक लोक पाटण्यात आले होते. मोर्चात पुढे फक्त ‘विद्यार्थी संघर्षवाहिनी'चा फलक होता. सर्वात पुढे उघड्या जीपमधे जयप्रकाशजी होते. मागे ‘विधानसभा बरखास्त करावी’ अशा आशयाच्या पत्रकावर सह्या केलेले एक कोटी कागद घेऊन जाणारे काही ट्रक्स होते. आणि यांच्यामागे स्त्रिया, शेतकरी आणि इतरेजन यांच्या प्रचंड रांगा होत्या.

गांधी मैदान फुलून गेलं होतं. बरोबर तीन वाजता जयप्रकाशजी तिथे पोचले आणि ‘लोकनायक जयप्रकाश झिंदाबाद’ अशा गगनभेदी घोषणा करून लोकांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानांनी लिहिलेल्या चरित्रातील असं सर्व वर्णन वाचून, त्या वातावरणातला थरार आजही जाणवतो.

तेवढ्यात बातमी आली की याच मोर्चाच्या अखेरच्या भागातल्या लोकांवर गोळीबार झाला आहे. अर्थातच लोक प्रक्षुब्ध झाले. आता एक मोठी दंगल उसळण्याची शक्यता होती. पण जयप्रकाशजींचा लोकांवर इतका प्रभाव होता, त्यांनी ताबडतोब घोषणा केली, ‘हमला चाहे जैसा होगा, हाथ हमारा नहीं उठेगा!’ लोक शांत राहिले. आता त्यांनी शांत लयीत आपलं भाषण सुरू केलं आणि ती दंगल होऊ दिली नाही.

त्यांनी सांगितलं, भ्रष्टाचाराचं समूळ निर्मूलन करायचं असेल तर राजकीय भ्रष्टाचाराबरोबरच जमीनदारी नष्ट करून कसणाऱ्याची जमीन झाली पाहिजे. जातिव्यवस्था तोडली पाहिजे. युवाशक्तीने आमूलाग्र समाजपरिवर्तनासाठी, आपलं सर्वस्व पणाला लावलं पाहिजे आणि याच सभेत त्यांनी प्रथम ती क्रांतिकारी कल्पना स्पष्ट केली, ‘संपूर्ण क्रांती’ची.

छात्रसंघर्ष वाहिनीच्या एका मेळाव्यात ते म्हणाले, ‘मी जाहीर सभेत लोकांना ग्रामस्वराज्याचा गांधीजींचा कार्यक्रम सांगितला. पण ही गोष्ट केवळ आंदोलनातून साध्य होणारी नाही. त्यासाठी समाजमानस आणि समाजरचना या दोन्हींमधे मूलभूत परिवर्तन घडवून आणावे लागेल आणि हे काम तुम्ही तरुण मंडळीच करू शकाल. जमीनदारी, सावकारी नष्ट केली पाहिजे. आजच्या जुन्रा अन्राय्र समाजरचनेच्या जागी, ‘तेजस्वी, आत्मनिर्भर समाज’ निर्माण होणं, जात, धर्म आदि भेदांच्या पलीकडे जाऊन एकात्म राष्ट्र निर्माण होणे यालाच मी ‘संपूर्ण क्रांती' म्हणतो.’

हेही वाचाः संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

तेव्हा, अशा परिस्थितीच्या मुशीतून घडलेले काही तरुण ‘केला होता अट्टहास’ या कादंबरीच्या केंद्रभागी आहेत. तरुणांचा हा गट ‘कसेल त्याला जमीन' देण्यासाठी जमिनीशी संबंधित लढ्यांमधे आणि चळवळींमधे कार्यरत आहे. सामाजिक परिवर्तनासाठी धडपडणाऱ्या या तरुणांना, त्यांना असलेली ‘क्रांती'ची आस स्वस्थ बसू देत नाही.

कमालीचं खडतर जीवन त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलं आहे. या कादंबरीत ते ज्या पद्धतीने काम करतात, ते तर समजतंच आणि अशा कार्यकर्त्यांना कुणाकुणाशी लढावं लागतं, काय काय सोसावं लागतं, कशाकशा आशा-निराशा पचवाव्या लागतात, याचीही कल्पना येते. आणि सरतेशेवटी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा कशा प्रभावी ठरतात त्याचंही नैराश्यजनक दर्शन!

याखेरीज त्यांच्यातीलच एक जण ‘कार्यकर्ता'पण झेपणारे नाही म्हणून वा परिस्थितीशी तडजोड म्हणून म्हणा, एका फार मोठ्या शासकीय प्रकल्पावर नोकरी स्वीकारतो. तिथे त्याने घेतलेल्या अनुभवांवरून अशा प्रकल्पांच्या ठिकाणी असलेलं वातावरण, तेथील वेगवेगळ्या युनियन्सचं परस्परांशी आणि अधिकाऱ्यांशी असलेले संबंध, ताणतणाव, तेथे कृत्रिम रीतीने निर्माण केलेल्या प्रचंड जलाशयामुळे निर्माण झालेले विस्थापितांचे प्रश्न अशा कितीतरी गोष्टी अवगत होतात.

हे तरुण बुद्धिमान आहेत, संवेदनशील आहेत आणि विचारी आहेत. कादंबरीच्या ओघातच यांच्या संभाषणांमधून, शिबिरातील चर्चांमधून, पत्यांमधून, मनोगतांमधून देशातल्या त्या काळातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर खल होत असतो आणि अन्य देशांतल्या घडामोडींवरचेही विवेचन, मतमतांतरे सहजपणे रेत राहतात.

सोविएत संघाबरोबरच पूर्व युरोपमधेही ‘समाजवाद’ कोसळल्यानंतर जगभर जी व्यवस्था उदयास येत गेली त्या अनुषंगाने युरोप, अमेरिका, आफ्रिका यामधील महत्त्वाच्या चळवळी आणि खळबळीही या कादंबरीच्या कवेत येतात.

ही कादंबरी म्हणजे केवळ घटनांची जंत्री नाही. कादंबरीतील मुख्य पात्रांचे भावविश्व, त्यातला तारुण्यसुलभ रोमँटिसिझम, तोही तर आहेच कादंबरीत, संयमित आणि हळुवार. जमिनीशी असलेल्या नात्याबरोबरच स्री-पुरुषांमधल्या बदलत्या नात्यांचाही इथे वेध घेतला गेला आहे.

सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजही जमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणाचे, बेकारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी या चळवळी सुरूच आहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापक स्वरुपात. त्यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असतं असंही नाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरी महत्त्वाची वाटते.

पुस्तकाचं नावः केला होता अट्टहास
लेखकः शिवदयाल
अनुवादः रेखा देशपांडे
पानंः २७२   किेंमतः २५०
संपर्कः ०२०-२४४५९३५

हेही वाचाः 

'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं ही खरंच मिरवण्याची गोष्ट आहे?