यल्लम्माची यात्रा हे जोगतिणींचं, तृतीयपंथीयांचं माहेरघरच

०३ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोकूटनूरला यल्लम्मा देवीची यात्रा हे तृतीयपंथीयांचं म्हणजे हक्काचं ठिकाण. तिथे त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन संपतो. ते इथे अगदी मोकळेपणानं वावरत असतात. तेच जोगतिणींचंही

मिरज स्टेशनला परतीच्या प्रवासात वेटिग रुममधे एक ग्रुप बसला होता. हिरव्या साडीतल्या एका पाठमोऱ्या बाईला हात लावून ‘जरा जाऊ द्या’, असं म्हणत मी रिकाम्या खुर्च्यांकडे झेपावले. त्यानंतर आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून हसलो आणि चंद्राशी म्हणजेच चंद्रकला चौरसिया हिच्याशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. वेटिंग रुममधले अनेकजण कोकूटनूरमधल्या यल्लम्माच्या यात्रेला आलेलेच लोक होते. मिरज स्टेशनच्या त्या वेटिंग रूममधे बसून आम्ही सगळेच परतीच्या प्रवासाला निघालो होतो. आमच्या महालक्ष्मीची म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेसची वाट बघत आम्ही थांबलो होतो.

गप्पांमधून कळलं चंद्रा मुंबईला कांदिवली भागात राहते. दरवर्षी यात्रेला येते. जशी इथे येते तशी ती सौंदत्तीलाही यल्लम्माच्या यात्रेला जाते. माझ्याशी बोलताना तिच्या ग्रुपलाही मधेमधे सूचना देण्याचं तिचं काम सुरूच होतं. घरातल्या एखाद्या कर्त्या बाईसारखं! चंद्रा मला तिचा धर्म, जोगतिणीचं काम समजवायचा प्रयत्न करत होती.

अखंड सौभाग्यवती भव हा इथे शाप आहे

तिचं जगदंबेशी लग्न झालंय हे तिनेच मला सांगितलं. ‘मी कुणाबरोबर लग्न केलं आणि तो नवरा मेला तरी मी विधवा होणार नाही. माझ्या हातातल्या बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र काढणार नाही. मी श्रृंगार करणार. कारण माझं लग्न जगदंबेशी झालंय.’ चंद्रा बोलत होती. जोगतीण बनण्यासाठी जगदंबेशी लग्न लावून दिलं जातं.

‘आमचं खरं लग्न जगदंबेशी झालेलं असतं. नवरा फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी असतो.’ चंद्रा तिचं जगणं स्पष्ट शब्दात तिच्या स्वरात सांगत होती. पण, मला आपलं उगीच भरुन आलं. समाजाने त्याची जोगतिणीची गरज भागवण्यासाठी देवाचा आधार घेऊन अखंड सौभाग्याचं आमिष तिला दाखवलं होतं. चंद्रा त्यात अलगद अडकली होती. विवाहित बायकांना दिला जाणारा 'अखंड सौभाग्यवती भव' हा आशीर्वाद जोगतिणींसाठी शापच आहे.

चंद्रा काय करते, याचं उत्तर होतं `मी घरीच असते.` घरी ती कुठला व्यवसाय करते याचं तिनं न सांगितलेलं उत्तर मला उमगलं होतं. महालक्ष्मीच्या येण्याच्या अनाउन्समेंटने आम्ही सगळे लगबगीने प्लॅटफॉर्मकडे निघालो. झपाझप पावलं टाकत सहकाऱ्यांना एकेक सूचना करत चंद्रा कधी गर्दीत मिसळली कळलंच नाही.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

यल्लम्मानं आजार बरा केला

चंद्राच्याच ग्रुपमधे एक जोगप्पा होता. त्याचं नाव मी विसरले. गोरेगावला सिद्धार्थ नगरमधे तो देवळात पुजारी आहे. `मी संसार सांभाळून हे सर्व करतो.` त्याचं कुटुंब जोगेश्वरीत राहतं असं त्याने सांगितलं.

यात्रेमधे यल्लम्माच्या दर्शनाला रांगेत भेटलेली कल्याणची गौरी पाटील दरवर्षी नेमाने यात्रेला येते. गौरी सांगते, या यात्रेत तिला समाधान मिळतं. गौरी स्वतः ज्योतिष सांगते. यल्लम्माने तिला बरं केलं असं ती म्हणते. लहानपणी दोन्ही पायांनी गौरी लुळी झाली होती. जोगत्याने तिला सांगितलं की ती त्याच्याबरोबर यल्लम्माच्या पायावर गेली तर तिची शारीरिक त्रासातून सुटका होईल.

गौरीला बाळ जोगतीण म्हणून सोडण्यात आलं. गौरीच्या सांगण्याप्रमाणे ती त्यानंतर देवीच्या कृपेने स्वत:च्या पायावर उभी राहू लागली. तिच्या व्याधी दूर झाल्या. गौरीच्या आधी तिचे आजोबा जोगती होते. ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी गौरी जोगतीण झाली. तिने सांगितलं म्हणून ती आज खूष आहे, असं आपण मानूयात. यात्रेत येणाऱ्या प्रत्येक जगाला म्हणजे देवीच्या टोपलीला हात लावून वाकून नमस्कार करणारी गौरी तशीच त्या गर्दीत हरवून गेली.

४५ व्या वर्षी जोगप्पा झालेला विठ्ठल

यल्लम्माच्या मंदिरापासून थोडं पुढे असलेल्या एका जागेत देवीची पालखी ठेवली होती. लोक तिथे दर्शनाला जात होते. तिथे दर्शनाला आलेला सतीश गोकाक भेटला. १४ व्या वर्षी जोगती झालेल्या सतीशचं वय आता ६२. पण चेहऱ्यावरुन अंगकाठीवरुन त्याचं वय लक्षात येत नव्हतं. सतीशच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे यल्लम्मा. यल्लम्माच्या देवळातून, पूजेतून जे मिळेल त्यावर त्याची गुजराण चालते. 

सतीश सौंदत्तीला राहतो. तसंच नेमाने कोकूटनूरला यात्रेला येतो. मधे मधे सतीशला बायका 'शरणं' असं म्हणून जात होत्या. यल्लम्मावर जगणाऱ्या सतीशला खरंतर पेन्शन मिळणं गरजेचं आहे. पण त्याला पेन्शन मिळत नाही.

सतीशबरोबर विठ्ठल होता. पांढरा सदरा लेंगा घातलेला विठ्ठल हा ४५ व्या वर्षी जोगप्पा झाला. त्याला कारण त्याच्या डोक्यात आलेली जट असं तो सांगतो. अवघ्या दहा वर्षांपूर्वीच विठ्ठल जोगप्पा झाला होता. तोही सौंदत्तीलाच राहतो.

हेही वाचा: पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

उड्या मारणाऱ्या बायका म्हणजे अंगात देवी आलीय

यात्रेला येणारे सगळे श्रद्धा, परंपरा, रीत, नवस अशा गाठी मनात बांधून आले होते. त्यांचं लग्न जगदंबेशी झालंय म्हणून हे लोक येतात. पण रीत म्हणून येण्याची त्यांच्यावर जबाबदारी जास्त आहे. पण सबंध यात्रेत किन्नर म्हणजे तृतीयपंथी आणि त्यातल्या जोगतिणी आत्मविश्वासानं आणि आनंदानं वावरत होत्या त्याला तोड नाही.

देवीच्या देवळासमोर जे देवीचे मुखवटे नाचवण्याची प्रथा आहे. तिथे किन्नर समाज अगदी आनंदाने नृत्य करताना पाहणं एक वेगळा आनंद देणारा सोहळा असतो. काहींना त्यांचं कंबर हलवून नाचणं खटकत होतं. पण स्वतःसाठी जगायला त्यांच्याकडे तेवढाच नाच होता.

बघ्यांना नाच आवडलाच तर पाच-दहा रुपये किन्नरांच्या गाठी बांधले जातात. एकमेकांवर गुलाल उधळत हलगीच्या तालावर ते नाचत असतात. एका मोठ्या टोपलीत देवी ठेवली जाते. त्याला देवीचं जग असं म्हणतात. किन्नारांपैकी अनेक जण देवीचे जग डोक्यावर ठेवून मोठ्या आनंदाने नाचत असतात. कुटुंबांकडून जग फिरवले जातात. त्यात बायका किंवा पुरुष नाचत नाहीत. त्यासाठी किन्नर समाजातल्या लोकांना पैसे देऊन नाचवलं जातं. इतर वेळेस बायका जोरजोरात उड्या मारताना दिसल्या की समजायचं त्यांच्या अंगात देवी आलीय.

यात्रेतलं किन्नरांचा, जोगती, जोगतीणींचा वावर इतका सहज असणं आणि त्यांच्याकडे समाजाने हे कोण, कुठून आले, आपल्यात कसे, अशा नजरेने न बघणं मला खूप महत्त्वाचं वाटतं.

किन्नर करतात नाटकात कामं

एरवी मुंबईसारख्या बड्या शहरात अनेकांच्या गर्दीतही एखादा नट्टापट्टा केलेला किन्नर सहज वेगळा दिसून येतो. इथे कोकुटनूर यात्रेत सगळी किन्नर समाजाची झालेली सरमिसळ हे यात्रेचे आणखी एक रूप म्हणावं लागेल. इथे किन्नर समाजाची स्वत:च्या ओळखीसाठी, अस्तित्वासाठी चालू असलेली फरफट नामशेष झाल्यासारखी वाटते. इतर समाजासारखी त्यांची असणारी संख्या आणि देवीसाठीची श्रद्धा हीच काय ती समीकरणं कदाचित त्यासाठी कारण असावीत. किन्नर हे आपल्यातलेच लोक आहेत, अशा नजरेने त्याकडे पाहिलं जातं.

यात्रेदरम्यान रात्र जागवण्यासाठी रात्री काही ठिकाणी नाटकं होतात. त्यामधे काही ठिकाणी पुरुषच स्त्रियांची भूमिका करतात. तर काही ठिकाणी चक्क किन्नरही स्टेजवर नाटकात भूमिका करताना दिसतात. रात्रभर चालणाऱ्या या नाटकात पाठांतर तर भरपूर लागत असणार. काही लोक मन लावून ही नाटकं बघत होते. प्रेक्षक वर्गात स्त्रिया अधिक. पण या यात्रेच्या निमित्ताने पहिल्यांदा किन्नर समाजातल्या व्यक्तींना नाटकात अभिनय करताना पाहिलं.

माहेरी आलेली मुलगी जसं हसत, खिदळत असते, तशा स्वच्छंदपणे किन्नर समाजातल्या या साऱ्याजणी वावरत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांनी धरलेल्या हलगीतल्या ठेक्यावर ताल धरताना ते समाधान दिसलं. देवीची आरती करताना, जग नाचवताना दिसलं. आपली नृत्याची कला सादर करुन यात्रेतल्या गर्दीतल्या बघ्यांकडून काय मिळतील ते पैसे बोटांच्या फटीत धरुन नाच करताना दिसतात. छान वाटतं.

किन्नर समाज तसा हसरा. दु:ख हृदयात दडवून ओठांवर हसू सजवूनच ते आपल्याला भेटतात. पण इथे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बेगडी नव्हता. मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना, लग्न-समारंभात 'खुशी' म्हणून पैशांसाठी नाचताना जे समाधान मिसिंग असतं ते इथे दिसत होतं. आपल्या हक्काच्या ठिकाणी असल्याची जाणीव आणि तसा वावर त्यांचा या जत्रेत मला भासला. त्यासाठी मला यल्लम्मा भावली आणि आवडली. अर्थात यल्लम्माच्या दारातही त्यांचा समाजाने ‘लादलेला प्रपंचाचा’ मार्ग सुटत नाहीच.

हेही वाचा: 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास 

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?