आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!

०६ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट.

त्या दिवसानंतर खरं तर मला आरशात बघतानाही सतत तिच समोर दिसायची. माझी मैत्रीण. कॅन्सर ट्रिटमेंटमुळे तिचे केस गळायला लागले होते. काहीच दिवसांत तिच्या डोक्यावर अक्षरशः टक्कल पडणार होतं. तिचा कोमेजलेला, केविलवाणा चेहरा पाहून मला कसंसच झालं. अशा मुला-मुलींसाठी आपल्या केसांचा विग बनवला जातो आणि त्या विगसाठी आपण आपले केस दान करू शकतो, असं मला समजलं. आणि परवा मी केस दान केलेसुद्धा!

छोट्या गावात वाढले

लहानपणी माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीला कॅन्सर झाला होता. तिची अवस्था पाहून मला स्वस्थच बसवत नव्हतं. तेव्हापासून तिच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनात होती. तिच्याविषयी मला फार कळवळून यायचं. तिला वेदना आतून होत असल्या तरी त्याचे परिणाम तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत होते. त्यात केस गेल्यामुळं आता आपण पूर्वीसारखे सुंदर राहिलो नाही या भावनेमुळे तिला मानसिक त्रासही होत असावा. मला वाटलं, हिच्या थोड्या शारिरीक वेदना मी घ्याव्यात. पण मी तसं करू शकत नव्हते.

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमधे मी लहानाची मोठी झाले. हे गाव तसं लहानसंच. गावाच्या एका टोकाला असणाऱ्या घरात काही खलबतं झाली की त्याचा आवाज लगेच दुसऱ्या टोकाला असणाऱ्या घरात ऐकू जावा असं हे गाव. अशा गावात बाई आणि पुरुषाविषयीच्या पारंपरिक समजुतीत मी मोठी झाले.

बाईनं कसं असावं याच्या काही चौकटी या पारंपरिक समजुतीत आखुन दिलेल्या असतात. त्यात बाईचे केस कसे काळेभोर, लांब, दाट असावेत अशी अपेक्षा सगळ्यांच समाजाची असते. अशा वातावरणात वाढलेली असताना बाईच्या सुंदरतेच्या सगळ्या संकल्पना फाट्यावर मारून मी असं काहीसं संवेदनशील पाऊल कसं उचललं याचं आज अनेकांना आश्चर्य वाटतं.

लोक तर बोलणारच!

आजकाल आपल्या आजूबाजूला खांद्यापर्यंत केस असणाऱ्या किंवा बॉब कट असलेल्या महिला खूप दिसतात. अशा महिलांना स्वीकारलंही जातं. पण थेट डोक्यावरचे सगळे केस काढून टाकायचे आणि डोकं न झाकता लोकांच्या नजरांकडे बघत रोजच्यासारखं कॉलेजला जायचं, बसने, रस्त्याने प्रवास करायचा, म्हणजे अनेकांसाठी अवघड असतं!

पण माझा प्रवास मात्र या सगळ्यापासून फारच वेगळाय. कारण माझ्या प्रवासासाठी फार फार महत्वाची शिदोरी माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी बांधून दिलीय. आई वडलांनी मला कधीही कुठली गोष्ट करू नको, असं म्हटलं नाही. मला हवं ते करू दिलं. मनात आलेली गोष्ट मारून जगायचं नाही, असं त्यांनी मला लहानपणापासून सांगितलंय. लोक काय म्हणतील याचा विचार ते करत नाहीत.

आई मला नेहमी एकच गोष्ट सांगते, ‘किरण आपण घोड्यावर बसून प्रवास करू लागलो तर लोक नावं ठेवतात. घोड्याला त्रास देते म्हणतात. आणि घोड्यावरून उतरून त्याच्यासोबत पायी चालायला लागलो तर लोक वेड्यात काढतात. तेव्हा घोड्यावर बसून जायचं की घोडा असताना पायी चालत जायचं हे आपण ठरवायचं असतं. लोकांनी चांगलं म्हणावं याचा विचार करत बसायची काही गरज नाही.’

आईचे हेच शब्द आणि बाबांचा पाठीवरचा हात मला नेहमीच बळ देत आलेत. त्यांच्या या शब्दांमुळेच आपले केस दान करता येतात हे कळल्याबरोबर मी लगेचच तसं करण्याचा निर्णय घेतला. आई-बाबांच्या या शिकवणीमुळेच मी टक्कल केलं तर लोक काय म्हणतील याचा विचार माझ्या मनात आला नाही.

हेही वाचा : जेम्स बॉण्डच्या जन्माचा ५७ वर्षांपूर्वी हलला पाळणा

केस कापण्याचा तीन वर्षांचा प्रवास

साधारण तीन वर्षांपूर्वी मला या उपक्रमाबाबत माहिती मिळाली. संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्रा डॉट कॉम या वेबपोर्टलचे संपादक. औरंगाबादच्या एमजीएम जर्नालिझम कॉलेजमधे मी पत्रकारितेचं शिक्षण घेते. आमच्याच कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. ते अवयवदानासाठी मोठी चळवळ चालवतात.

कॅन्सर पेशंटसाठी विग बनवता यावा म्हणून केस दान करायची इच्छा मी त्यांना बोलून दाखवली. त्यांनी माहिती काढून पुण्यातल्या ‘मदत’ या संस्थेतल्या पायल मुजूमदार यांचा नंबर मला मिळवून दिला.

पायल मॅडमशी मी बोलले आणि लगेचच केस कापण्याचा निर्णय घेऊन टाकला. केस कापण्याच्या दुकानात गेले. डोक्यावरचे सगळे केस काढले आणि ते कुरिअर करून लगेचच पुण्याला पाठवून दिले.

केस पॅक करण्यासाठी वेगळं पाऊच

तीन वर्षांपूर्वी या उपक्रमाविषयी माहिती मिळाली तेव्हा कळलं की केस दान करण्यासाठी केस साधारण २१ ते २२ इंच लांब असावे लागतात. ते विशिष्ट प्रकारे कापले पाहिजेत तरच विग बनवण्यासाठी वापरता येऊ शकतात. तेव्हा माझा बॉय कट होता. मी केस वाढवायला सुरवात केली. माझे केस वाढल्यावर मी मोजून पाहिले. गरजेनुसार भरत होते.

पण मुद्दा होता तो केस पॅक करण्यासाठी झिप पाऊच मिळवण्याचा. केसांना हवा लागणार नाही, असं एक घट्ट पाकिट केस पाठवण्यासाठी हवं होतं. ते मिळता मिळत नव्हतं. त्या पाऊचसाठी औरंगाबादमधली सगळी दुकानं, सगळी मार्केट्स मी पालथी घातली. अखेर दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर हे झीप पाऊच मिळालं.

आज माझे केस पुण्याला पोचलेत. लवकरच तिथून ते संस्थेमार्फत मुंबईला जातील. त्याचा विग केला जाईल. आणि कॅन्सरच्या केमोथेरपी उपचारांमुळे केस गेलेल्या कोणत्यातरी व्यक्तीला हा विग घालता येईल. हा विग त्या माणसानं घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तोच मला सारखा आठवतोय.

हेही वाचा : तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

केस काढणं फार छोटी गोष्ट

या आठवणीमुळेच डोक्यावरचे सगळे केस काढूनही मला रोजच्या जगण्यात कोणतीच गोष्ट अवघड वाटत नाहीय. सगळ्या कॉलेजमधे माझं कौतूक होतंय. मी अगदी नेहमीसारख्या मुडमधे वावरतेय. जणू काही झालंच नाहीये! डोक्यावरचे सगळे केस काढून मी काही वेगळं केलंच नाहीये. मी फार छोटी गोष्ट केलीय.

केस काढण्याआधी लोक माझं इतकं कौतूक करतील, असं मला कधी वाटलंच नव्हतं. मी केस काढले ते माझ्या मैत्रिणीची आठवण ठेवून. मी केस काढले ते माझ्या या मैत्रिणीसारख्या इतर लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं म्हणून. आणि ही खरंच फार छोटी गोष्ट आहे.

समाजासाठी, त्यातल्या लोकांसाठी अजून खूप काम करता येऊ शकतं. पुढे जाऊन मी ते करेनही. पण आत्ता विद्यार्थीदशेत मी जे करू शकते ते करणं मला माझं कर्तव्य वाटतं. मी हेच कर्तव्य पूर्ण केलंय. कोणासाठी काहीही मोठं काम केलेलं नाहीय.

हेच खरं सौंदर्य

केस काढल्याचे फोटो आणि त्याचं कारण फेसबुकवर वायरल झाल्यापासून लोक खूप कौतूक करतायत. अनेकांचे फोन येतायत. माझी मावशी, काका, आत्या आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांना माझा अभिमान वाटतोय. खूप छान काम केलंस, असं सगळेच मला म्हणताहेत.

माझ्या कॉलेजमधूनही मला खूप सपोर्ट मिळतोय. माझ्या सगळ्या मैत्रिणी, सगळ्या मित्रांना माझं हे काम आवडलंय. माझे शिक्षक, माझे कॉलेजमधले प्राध्यापक सगळे माझं कौतूक करतायत. कॉलेजने तर माझा सत्कारही केलाय. तेव्हा मला फार छान वाटलं.

आता मी आरशात पाहते तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा आनंदी चेहरा दिसतो. माझ्या या कापलेल्या केसांचा विग ज्या डोक्यावर घातला जाईल त्या डोक्यात, त्या चेहऱ्यावर किती आनंद असेल याचा विचार माझ्या मनात येतो आणि अलगद माझ्याही चेहऱ्यावर हसू फुलतं. कौतूक झाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा हे हसू फार फार मोठं आहे. आरशात पाहिल्यावर मला सगळ्यात सुंदर वाटत असतं.

हेही वाचा : 

सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

सरकारने कायदा करून रूग्णांची लुबाडणूक थांबणार?

स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?

लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच

(शब्दांकन: रेणुका कल्पना)