कधीकाळी ऑलराऊंडरचा बोलबाला असलेल्या क्रिकेटमधे आता बॅट्समनची चलती आहे. बॅट्समन्सनी क्रिकेटची गणितच बदलून टाकलंय. त्यामुळे आता केवळ कोण किती छक्के ठोकले याचीच चर्चा क्रिकेडवेड्यांमधे होताना दिसते. बॉलर केवळ नावाला उरलेत. आजच्या दिवशीच इंटरनॅशनल क्रिकेटमधे पहिल्यांदा बॉल थेट सीमारेषेपल्याड गेला होता. पण त्या सिक्सरला तेव्हा सहा रन मिळाले नाहीत.
क्रिकेटमधे काळानुसार अनेक बदल झालेत. होताहेत. सुरवातीच्या काळात बॅट्समन आणि बॉलर दोघांचीही चलती असायची. मॅच विनर होण्याचा मान दोघांनाही मिळायचा. त्यामुळे आपल्याला अनेक ऑलराऊंडर दिग्गज खेळाडूही बघायला मिळाले. पण आता क्रिकेटमधे बॅट्समनला झुकतं माप मिळतंय. टीमच्या विजयात बॅट्समन एकहाती भूमिका पार पाडतायत.
कमी होत असलेली मैदानाची लांबीरुंदी, वाढत चाललेली बॅटची जाडी, बदललेलं खेळाचं स्वरुप यामुळे चौके आणि छक्के लगावणाऱ्या खेळीला प्रचंड महत्त्व आलंय. त्यातच टी-२० च्या उदयामुळे तर आता सिक्सरांचे मीटरच सुरु झालेत. किती उंच, किती लांब याची उत्सुकता अधिक असते. मॅचच्या चर्चेचा विषय चौक्या, छक्क्यांवर येऊन पोचलाय. या सगळ्या चर्चाबहाद्दरांसाठी, क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
कारण आजच्या दिवशीच इंटरनॅशनल क्रिकेटमधे पहिला छक्का लगावण्यात आला होता. या गोष्टीला आता १२० वर्ष झालीत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या ॲडलेड ओव्हल ग्राऊंडवर दुसरी वनडे मॅच होणार आहे. याच ग्राऊंडवर १८९८ मधे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट मॅच झाली होती. याच मॅचमधे क्रिकेटच्या इतिहासातला पहिला सिक्सर मारला गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या जो डारलिंग यांनी हा सिक्सर मारण्याचा मान पटकावला होता.
या डावखुऱ्या फलंदाजाने बॉल लिलया मैदानाबाहेर मारला होता. पण त्याकाळी बॉल थेट मैदानाबाहेर मारल्यावर ५ धावाच मिळत होत्या. त्यामुळे याला सिक्सर म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. पण नंतरच्या काळात याच पाच रन्सचं रूपांतर सिक्सरमधे झालं.
जो डारलिंग यांनी ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपदही भुषवलं होतं. त्यांनी २१ टेस्ट मॅचमधे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं होतं. डार्लिंग यांनी एकूण ३४ टेस्ट खेळल्या. ६० डावात त्यांनी २८.६ च्या सरासरीने १६५७ रन्स काढले. यात तीन शतकं आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत भारताचा ३४ धावांनी पराभव करत आपला हजारावा विजय संपादन केला होता. तसंच पहिला सिक्सर मारण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्यात खेळाडूच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचं क्रिकेटमधील योगदान या खेळाला समृध्द करणारं आहे.
मॉडर्न क्रिकेटमधे याच सिक्सला आता फार महत्व आलंय. आता बॅट्समनने किती सेंच्युरी केल्या. याच्याबरोबरच किती सिक्सर मारले याचीही चर्चा होते. त्यामुळेच स्टायलिश युवराजला सिक्सर किंग असं टोपण नाव पडलं. तसंच क्रिकेटच्या इतिहासात काही सिक्सरही फेमस झालेत.
श्रीलंकेविरुद्ध २०११ च्या वर्ल्डकप फायनलमधे धोनीने मॅच सिक्सर मारत संपवला होता. तसा धोनीचा सिक्सर मारून मॅच संपवण्यात हातखंडा आहे. पण भारतीय फॅन्सच्या मेमरीमधे हा सिक्सर कायमचा फीट झालाय. दरवर्षी २ एप्रिलला या सिक्सरचे विडिओ पुन्हा पुन्हा काढून पारायणं केली जातात.
शाहीद आफ्रिदी हे नाव घेतलं की फक्त आणि फक्त आठवतात ते त्याचे सिक्सर मारण्यासाठी आसूसलेले हात. म्हणूनच त्याच्या एखाद्या इनिंगची चर्चा होण्याऐवजी त्याच्या सिक्सरचीच चर्चा जास्त असते. म्हणूनच तो वनडे मॅचमधे सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याने ३५१ सिक्सर मारलेत.
तसंच सर्वात लांब सिक्स मारण्याचा विक्रमही या बूम बूम आफ्रिदीच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मॅचमधे त्याने १५८ मीटर लांब सिक्सर मारला होता. हा रेकॉर्ड अजूनही कुणाला मोडता आला नाही.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर २०१३मधे रोहितने विक्रमी द्विशतक ठोकलं होतं. हे द्विशतक जितकं नावाजलं गेलं तितकेच या इनिंगमधे त्याने मारलेले १६ सिक्सर नावाजले गेले. त्याने या इनिंगमधे तब्बल १६ सिक्सर मारुन डिविलियर्स आणि ख्रिस गेल यांच्या एका वनडे मॅचमधे सर्वाधिक सिक्सर मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
(लेखक पत्रकार आहेत. ते ज्युनियर लेवलवर महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळलेत.)