अख्ख्या जगाला उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा, या प्रश्नाने वेड लावलंय. आता काही दिवसांतच आपले ट्रम्पतात्या तेच ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उत्तर कोरियाला जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांकडून बोलणी सुरू आहे. पण त्याआधी उत्तर कोरिया नेमका कसाय हे माहीत हवं ना! तर मग उत्तर कोरियाचं अंतरंग उलगडून ही स्टोरी वाचायला पाहिजे.
उत्तर कोरिया हे नाव उच्चारताच आपल्यासमोर येतो धिप्पाड अंगाचा माणूस किम-जोंग-उन. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा. हुकूमशहा. उत्तर कोरियाने स्वत:चं, स्वत:पुरतं असं जग तयार केलंय. त्या जगाचा हा सर्वेसर्वा. हे जग खूप रहस्यमय आहे. गूढ आहे. लोकांमधेही या रहस्यमय जगाविषयी खूप कुतुहल आहे. त्यामुळेच की काय उत्तर कोरियाविषयी नेहमी काहीना काही उलटसुलट चर्चा सुरू असते. अनेकांना तर उत्तर कोरिया म्हणजे छळछावणी आणि तुरुंगमय जग असचं वाटतं. पण खरंच हे सगळं असंच आहे?
गेल्या महिन्यात ‘द विक’ या इंग्रजी साप्ताहिकाने उत्तर कोरियावरचा एक रिपोर्ट छापलाय. त्यात डॉ. एन. जे. नादराजन यांचा इनसाइड नॉर्थ कोरिया नावाने उत्तर कोरियातला ग्राऊंड रिपोर्ट आलाय. स्थानिक टुरिस्ट गाइड घेऊन त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला. या गाइडने सुरवातीलाच काय करू नये, याची भली मोठी यादीच नादराजन यांच्या हातात दिली. आणि काय करायचंय हे त्या टूर ऑपरेटरनेच ठरवलं. गाइडला सोबत घेऊनच त्यांनी वाचकांना उत्तर कोरियाची सफर घडवून आणलीय.
उत्तर कोरियाला जाण्यासाठी विसा काढण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. अनेक टप्पे पार केल्यावर तिथे जायला मिळतं. आपण भारतीय लोक उत्तर कोरियाच्या नवी दिल्लीतल्या दुतावसात विसासाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर विसा मिळायला काही दिवस लागू शकतात. कधीकधी आठवडा तर बऱ्याचदा तो मिळतही नाही. आणि विसा मिळालाच तर एका रहस्यमय जगातलं वास्तव उघड्या डोळ्यांनी बघायची संधी आपल्यासाठी खुली होते.
अनेक नियम आणि अटी पूर्ण केल्यावर उत्तर कोरियाचा विसा मिळतो. त्यानंतरही आपल्याला उत्तर कोरियात फिरण्यासाठी सोबत स्थानिक गाइड असणं कम्पलसरी आहे. उत्तर कोरियाला दरवर्षी जवळपास ६००० पर्यटक भेट देतात. यातले बहुतेक पर्यटक हे अमेरिका, जर्मनी यासारख्या पाश्चात्य देशांतले आहेत. चीनी पर्यटकांसाठी मात्र नियम काहीसे शिथिल आहेत. त्यामुळे चीनी पर्यटक मोठ्या संख्येने उत्तर कोरियाला जातात.
जवळपास सगळे परदेशी पर्यटक उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातल्या बॉर्डरला भेट देतात. या दोन देशांना वेगळं करणारा डिमिलिटराईज्ड झोन हा जगातला सगळ्यात धोकादायक सीमाभाग आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुखही या बॉर्डरवर एकमेकांना हस्तांदोलन करत भेटले होते. हस्तांदोलनाचा हा फोटोही तेव्हा खूप गाजला होता.
उत्तर कोरियाला जाण्यासाठी विमान आणि रेल्वे असे दोन वाहतुकीचे पर्याय आहेत. हे दोन्ही पर्याय चीनमार्गेच उपलब्ध आहेत. एअर कोरिया आणि एअर चायना या विमान कंपनी सेवा देतात. चीन वगळता इतर देशांचे पर्यटक एअर चायनानेच उत्तर कोरियात जाण्याचा पर्याय निवडतात. पण उत्तर कोरियाला जाण्यासाठी पर्यटक अनेकदा चीनमार्गे ट्रेनने जाण्यास पसंती देतात. राजधानी बीजिंगहून उत्तर कोरियाला जाण्यासाठी ट्रेन आहे. आणि तसं बघितलं तर पर्यटकांसाठी हाच एकमेव मार्ग आहे.
चीनच्या सीमावर्ती भागात असलेल्या डान्डोंग इथल्या यलो नदीवरचा चीनी कोरियन फ्रेंडशीप ब्रीज चढून जावं लागतं. तिथून उत्तर कोरियातल्या ड्रेब सिनुइजू स्टेशनसाठी ट्रेन मिळते. सिनुइजू स्थानकावरून जवळपास सात तासानंतर आपल्याला उत्तर कोरियाचं गावकुस दिसायला लागतं. अगदी पश्चिम घाटासारखं. जिथे डोंगराच्या पायथ्याशी घनदाट छताची घरं असतात. इथे रस्ते पक्के नाहीत. वाहतुकीसाठी सायकल किंवा बैलगाडी यांचा वापर केला जातो.
आपल्याला उत्तर कोरियामधे मोबाईलही घेऊन जाता येतो. पण तो दैनंदिन कामासाठी वापरताच येत नाही. कारण तिथे आंतरराष्ट्रीय सिम कार्ड कामच करत नाही. लोकल नंबरवर कॉलच करता येत नाही. देशाचा कोड ८५० आहे आणि लँडलाइन नंबर दोन मालिकेमधे विभागलेत. बाहेरच्यांसाठी ३८१ नंबर आणि स्थानिकांना ३८२ नंबरवर कॉल करता येऊ शकतो.
उत्तर कोरियात एंट्री करण्याआधीच आपल्याला वर्च्युअल प्रायवेट नेटवर्क डाउनलोड करून घ्यावं लागतं. ते तिथे अनिवार्य आहे. उत्तर कोरियाने एकदा मोबाईल फोनवर बंदी घातली होती. परंतु आता ४० टक्के लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत. बहुतेक ऍपलचे क्लोन आणि इतर हाय एंड ब्रँड आहेत. पण यावर सर्वसामान्यांसाठी इंटरनेटची सुविधा नाही. अख्ख्या देशात एकच इंटरनेट सर्विस प्रोवायडर आहे. देशभरात १०२४ आयपी अॅड्रेस आहेत. सरकारी अधिकारी आणि परदेशी नागरिकांनाच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे.
इथे इंग्रजी भाषेतले न्यूजपेपर नाहीत. इंग्रजी आणि फ्रेंचमधे निघणारं प्योंगयांग टाइम्स हे साप्ताहिक आहे. दोन किंवा तीन टीवी चॅनेल आहेत. तेही सर्व स्थानिक भाषेत. परदेशी पर्यटकांच्या हालचालींवर सरकारी यंत्रणेची बारीक नजर असते. मिलिटरीच्या आणि संवेदनशील भागात फोटोग्राफीला परवानगी नाही. देशातला बराचसा भाग मिलिटरीच्या ताब्यात आहे.
एकदा का आपण आपल्या गाईडला सोडून हॉटेलमधे गेलो, की हॉटेलचे सगळे दरवाजे बंद केले जातात. आपल्याला लॉन्सवर चालायचीही परवानगी नसते. परंतु बार, रेस्टॉरंट, जिम आणि पूल वापरण्यास मोकळे असतात.
उत्तर कोरियाला तिथल्या शांत, निवांत, प्रसन्न वातावरणामुळे लॅण्ड ऑफ मॉर्निंग काम असंही म्हटलं जातं. राजधानी प्योंगयांग ताओदोंग नदीच्या काठावर आहे. कोरिया १६ व्या आणि १७ व्या शतकात चीन आणि जपानच्या ताब्यात होता. जपानने १९१० मधे कोरियावर आक्रमण केलं आणि प्रचंड औद्योगिकीकरण केलं. यूएसएसआर अर्थात तेव्हाच्या सोविएत रशियाने उत्तर कोरियावर पूर्णतः नियंत्रण मिळवलं होतं. अमेरिकेनेही दक्षिणेत प्रशासक नेमला होता.
तीन वर्षांनंतर, ९ सप्टेंबरला किम इल-सुंग यांनी जपानविरुद्ध गनिमी युद्ध पुकारलं. त्याने रशियाच्या मदतीने उत्तरेत प्रचंड ताकद मिळवली. या युद्धात प्योंगयांगचं अख्खं सौंदर्य नष्ट झालं. किम इल-सुंग यांचं प्योंगयांग पुन्हा बांधण्याचं स्वप्न होतं. पुढे त्यांनी देशाची राजधानी प्योंगयांग जगाला अर्पण केली.
इथे स्वयंपूर्ण नागरी शहरं आहेत. ५ ते ६००० लोकवस्तीचा डोंग अर्थात प्रशासकीय विभाग तयार करण्यात आलाय. सगळीकडे सारख्याच सोयीसुविधा असतात. राजधानी प्योंगयांगत १८ जिल्हे आणि एक काऊन्टी आहे. प्योंगयांगमधे आपलं लक्ष वेधून घेणारी पहिली गोष्ट म्हणजे ३३० मीटर उंच पिरामिडसारखी दिसणारी गगनचुंबी इमारत, रियॉंग हॉटेल. १०५ मजली टॉवर रात्रीच्या मंद वातावरणात उजळून निघतो.
राजधानीतली दोन दर्शनीय स्थळं मानसदे ग्रँड स्मारक आणि सूर्याचे कुमसुस मेमोरियल पॅलेस प्रसिद्ध आहेत. ही दोन्ही ठिकाणं स्थानिक लोकांसाठी पवित्र आणि धार्मिक आहेत. पर्यटकांनाही इथे वाकून औपचारिक गोष्टी, फुलं घेऊन आज्ञेचं पालन करावं लागतं.
किम इल-सुंगचं अधिकृत निवासस्थान म्हणून १९७६ मधे बांधलेला कुमसुसन महल तसंच किम आणि त्याचा मुलगा यांचा मकबराही इथे आहे. तो जगातला सगळ्यात मोठा मकबरा आहे. १९९४ मधे हा महल एक मकबऱ्यात रुपांतरित करण्यात आलाय. हॉलमधे कॅमेरे, मोबाईल फोन आणि वॉलेट्स घेऊन जायला परवानगी नाही. तिथे अत्यंत भक्तीभावाने आणि पारंपरिक ड्रेस घालूनच प्रवेश मिळतो. तिथे किमच्या सार्वजनिक जीवनातल्या फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. अनेक पातळ्यांवरचं सुरक्षेचं कडं पार करून इथे आपल्याला एंट्री मिळते.
उत्तर कोरियाकडे जगातली चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी लष्करी ताकद आहे. सैन्यदलाच्या कसरती पर्यटकांनाही बघण्यासाठी खुल्या असतात. लोक किम इल-संग चौकाच्या मार्गावर आपल्या सैनिकांना नाचत गात अभिवादन करतात.
द ग्रँड पीपल्स स्टडी हाऊस १९८२ मधे बांधण्यात आलंय. त्यात राष्ट्रीय वाचनालय आहे. उत्तर कोरियाने पर्यटकांसाठी प्योंगयांग, सारीवन आणि चोंगजिनसह आणखी काही शहरं खुली केलीत. जॅंगबॅंगच्या खोऱ्यात सारीवोनमधील लोकगट इथे कोरियाचा सांस्कृतिक वारसा आपल्याला बघायला मिळतो. राजधानी प्योंगयांगमधे अवकाश आणि अणुऊर्जा केंद्रही आहे.
चोंगजिनपासून जवळपास दीडशे किलोमीटरवर कोरीयन समुद्र आहे. तिथून जवळच चिल्बोसान पर्वत आहे. हा सगळा भाग पर्यटनाच्या दृष्टीने खूपच सुंदर आहे. सरकार आता चिल्बो पर्वतच्या सभोवतालचा परिसर पर्यटकांसाठी हळुहळु खुला करतेय. चिल्बोसन हा किल इल-सुंगच्याही खूप आवडीचं ठिकाण आहे.
इथले रस्ते चांगले नाहीत. ८०० किलोमीटर अंतर पार करायला आपल्याला किमान तीन दिवस लागतात. चॉन्जजिन आणि प्योंगयांगला जोडणारी एक स्लो रेल्वेलाईन आहे. परंतु अनियमित वीजपुरवठा आणि वारंवार होणाऱ्या अपघातामुळे हा रेल्वे प्रवास खडतर आहे.
इथली भाषाही खूप गमतीची आहे. कोरियन भाषेचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. कारण एखाद्या शब्द किंवा वाक्यांशाचा अर्थ उत्तर आणि दक्षिण कोरियामधे वेगवेगळा असू शकतो. त्याच भान प्रत्येकवेळी ठेवावं लागतं.
१९९० च्या दशकापर्यंत ग्रामीण भागातलं जनजीवन खूपच यातनादायी, कष्टाचं होतं. ग्रामीण भाग देशाच्या मुख्य शहरांशी अक्षरशः तुटलेला होता. शेतीचीही खूप दुरवस्था होती. गेल्या दशकभरात मात्र उत्तर कोरियामधे सामाजिक, आर्थिक बदल झालाय. काहीप्रमाणात खासगीकरण आलाय. त्यामुळे समाजातले तळातले लोक स्वत: कामधंदा करू लागलेत. सरकारनेही त्यांना तसं करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. सरकारी अधिकाऱ्यांसोबतच इतर काही लोकही श्रीमंत आणि प्रभावशाली बनलेत. हळूहळू कठोर राजकीय वर्गव्यवस्था बदलतेय.
उत्तर कोरिया जगातल्या सर्वात सुरक्षित देशांपैकी एक आहे. तिथे गुन्हेगारी अक्षरशः नाहीच. महिला अत्याचारांची केस नसल्यात जमा आहे. तसंच उत्तर कोरिया शून्य प्रदूषण असलेल्या देशांमधे मोडतो.
राजधानी प्योंगयांग इथल्या पॉश एन्क्लेवमधे महागडे डिपार्टमेंटल स्टोअर, फॅन्सी रेस्टॉरंट्स आणि २४ तास उघडी असणारी कॉफीची दुकानं आहेत.
उत्तर कोरियामधे उच्च शिक्षितांची संख्याही आता वाढतेय. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य आहे. सगळ्यांना तिथे सहज एंट्री मिळते. सर्वांसाठी घर हा राजकीय धोरणाचा भाग आहे. लोकांनी त्यांची संस्कृती जपलीय. आपल्या सांस्कृतिक वारशाचा इथल्या लोकांना खूप सारा अभिमान आहे. त्यांच्यात कौटुंबिक नातेसंबंधाची स्थितीही खूप चांगली आहे.
उत्तर कोरिया अनेक विरोधाभास घेऊन उभाय. त्यामुळेच जगाला उत्तर कोरियाचं गूढ जाणून घ्यावं वाटतं. जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या उत्तर कोरियातला हा बदल आपल्या सगळ्यांना खूप दिलासा देणारा आहे. विकासाचं, प्रगतीचं वारा जसं तिथे पोचेल, तसं जग आणखी सुंदर होईल.