कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय.
कोल्हापूर म्हटलं की काहीतरी वेगळं घडणार असा बहुतेकांचा अंदाज असतो. विधानसभेच्या निवडणुकीत हेच घडलं. झणझणीत कोल्हापुरी मिसळमधे जशी विविध पदार्थांची सरमिसळ असते तशीच कोल्हापूरच्या राजकारणात विधानसभेच्या निकालाने काही पक्षांची जिरवलीय तर काहींना पुन्हा संधी दिलीय.
हेही वाचाः २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?
कोल्हापुरातल्या दहापैकी विद्यमान आठ आमदारांना जनतेने घरी बसवलंय. कोल्हापूरी भाषेत सांगायचं तर आठ आमदारांना बसपाळी दिली. यामधे सर्वात जास्त नुकसान झालं ते शिवसेनेचं. कारण विद्यमान आमदारांमधे जिल्ह्यातले दहापैकी सहा लोकप्रतिनिधी एकट्या शिवसेनेचे होते. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातले दोन्हीही खासदार शिवसेनेचे बनले आहेत.
असं असताना जिल्ह्यातील शिवसेनेला एकमुखी नेतृत्व नव्हतं. समन्वय तर अजिबातच नव्हता. पक्ष म्हणून एकसंघ लढण्याऐवजी सगळेजण वेगवेगळे लढत होते. त्यामुळे व्हायचं ते नुकसान शिवसेनेचं झालं. फक्त राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात्र आपली जागा राखण्यात यश मिळवलं.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्यात सहा भरभक्कम जागा मिळाल्या होत्या. असं असतानाही मातोश्रीने एखादं वजनदार मंत्रीपद किंवा शिवसेनेची ताकद वाढेल अशा पद्धतीचं ठोस काही कोल्हापूरकरांना दिलं नाही. साहजिकच याचाही राग कोल्हापूरकरांमधे खदखदत होता. त्याचाही परिणाम या निवडणुकीत निश्चितपणे झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच शिवसेनेची हालत सहावरून एक अशी दयनीय बनली.
दुसऱ्या बाजूला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळू न शकलेल्या काँग्रेसने मात्र लढवलेल्या पाच जागांपैकी चार जागांवर घवघवीत यश संपादन केलं. काँग्रेसच्या दृष्टीने हे यश जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी कामी येणार हे स्पष्ट आहे. या यशामधे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या रणनीतीचा मोठा वाटा दिसून आला. त्यांनी पक्षाला झिरोवरून हिरो म्हणजे चारवर नेलं.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील हे भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांचा एकतर्फी पराभव केला. मुळात ही लढत सुरवातीपासून टफ फाईट वाटत होती. पण आमदार पाटील यांच्या गनिमी काव्यामुळे ती एकतर्फी झाल्याचं निकालानंतर स्पष्ट झालं. त्यामुळे वयाने सर्वात तरुण असलेले ऋतुराज पाटील हे प्रचंड मतांनी आमदार झाले.
जिल्ह्याच्या राजकारणात पाटील विरुद्ध महाडिक या घनघोर राजकीय लढाईत पाटील गटाने बाजी मारली. दक्षिणवर विजय मिळवून जिल्ह्याच्या राजकारणात आमदार पाटील यांचा दबदबा वाढलाय.
हेही वाचाः विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?
कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला तुलनेने नवखे असलेल्या काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी खिंडार पाडलं. जाधव यांच्या विजयामधे अनेक फॅक्टर दिसतात. असं असलं तरी यामधे आमदार पाटील यांच्या गावाचा म्हणजे कसबा बावड्याचा वाटा निर्विवाद आहे. कारण शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत समोर प्रतिस्पर्धी दिसत नव्हता. ते सहज निवडून येतील असं वातावरण होतं.
करवीरमधून काँग्रेसचे पी. एन. पाटील यांनी शिवसेनेचे हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेले चंद्रदीप नरके यांचा, तर हातकणंगलेतून राजूबाबा आवळे यांनी शिवसेना आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राधानगरी भुदरगडमधले उमेदवार के. पी. पाटील यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं.
कागल विद्यापीठाचे कुलगुरू मानले जाणारे हसन मुश्रीफ हे पाचव्यांदा भरभक्कम मतांनी निवडून आले. चंदगडमधून राजेश पाटील यांनी विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात दोन आमदारांची संख्या कायम ठेवण्यात यश मिळवलंय. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी शिवसेना आमदार सत्यजित पाटील यांचा पराभव करत पुन्हा राजकारणाची धावती ट्रेन पकडली.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून देणारे प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून निवडून आले. इचलकरंजीच्या राजकारणाची नस माहीत असलेल्या आवाडे यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आता निकालानंतर दिसून आलं. आता आवाडे काँग्रेसमधे परतणार की शिवसेनेत सामील होणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात. दोन टर्म आमदार असलेल्या भाजपच्या सुरेश हाळवणकर यांचा पराभव मात्र पक्ष संघटनेला विचार करायला लावणारा आहे.
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले पण तिकीट वाटपात स्वाभिमानीला जागा गेल्याने बंडखोरी करत निवडणूक लढवलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिरोळमधून निवडून आले. यड्रावकर हे राष्ट्रवादीच्या गोटात पुन्हा जातात की दुसरा मार्ग पत्करतात याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. यड्रावकरांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा पराभव केला.
हेही वाचाः हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव
विधानसभेच्या निकालात ठळक बाबी पाहिल्या तर महापुराच्या काळात सत्ताधारी भाजप सरकारकडून फारसं काम झालं नसल्याची नाराजी उघडपणे समोर आली. दुसऱ्या बाजूला भाजपचे दोन आमदार आणि शिवसेनेचे सहा आमदार तसंच भाजपचे राज्यातले हेवीवेट नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम अशी ताकतीची खाती असतानाही कोल्हापूरसाठी म्हणावा तसा या मंत्रिपदाचा उपयोग झाला नसल्याची भावना कोल्हापूरकरांमधे साचून राहिली होती.
कोल्हापूरकर नेहमी राजकीय सत्तेच्या विरोधात उघडपणे बंड करत आलेत. हे बंड निवडणुकीच्या मतांच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरत आलंय. देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वत्र काँग्रेस एके काँग्रेस असं सुरू असताना कोल्हापुरात मात्र शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकवला जायचा. त्याकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांची ओळख असलेली गांधीटोपी वापरणं सुद्धा तत्कालीन कार्यकर्त्यांना मुश्कील असायचं, इतका शेकापचा दबदबा होता.
सध्याच्या विधानसभेचा निकाल ही आगळ्यावेगल्या कोल्हापुरी बाण्याचं प्रतीक आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त लक्षवेधी विषय राहिला तो पाटील विरुद्ध महाडिक गटाचा. कारण आमचं ठरलंय, आता दक्षिणबी जिंकलंय असं म्हणत सतेज पाटील गटाचा मोर्चा जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणावर प्रभाव असलेल्या गोकुळ दूध संघ आणि राजाराम सहकारी साखर कारखान्याकडे वाळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
महाडिक गटाकडून विधानपरिषद, खासदारकी आणि आता विधानसभा लागोपाठ काढून घेतल्यानंतर आमदार पाटील हे स्वस्थ बसणार नाहीत. महाडिक गटाकडे असणारे गोकुळ आणि राजाराम हे सहकाराचे गड जिंकण्यासाठी पुन्हा ‘आमचं ठरलंय, आता एवढंच उरलं’ असा नारा देत हल्लाबोल करतील हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. या निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
राज्याच्या सत्तेवर दावा सांगणाऱ्या शिवसेनेलाही एकाच जागेवर समाधान मानावं लागलें. सत्तेविरोधात बंड पुकारणारा कोल्हापूर पॅटर्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. याबरोबरच जनसुराज्य पक्षाने उभं केलेल्या उमेदवारांनी नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवारांचा घात केला. भाजपने शिवसेनेला आणि शिवसेनेने भाजपला मदत केली की नाही आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला शिरोळची जागा का मिळवता आली नाही याची उत्तरंही जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणारी आहेत.
हेही वाचाः
कोल्हापुरी ‘आमचं ठरलंय’ कॅम्पेनची इनसाईड स्टोरी
शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?
सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण
(विजयकुमार पाटील हे कोल्हापूर इथले ज्येष्ठ पत्रकार आहेत.)