स्क्विड गेम: वर्गसंघर्षाची कहाणी सुपरहिट होतेय?

२१ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवरची ‘स्क्विड गेम’ ही नवी कोरियन सिरीज करतेय. ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलंय.

लहानपणी उन्हं मावळतीला जाईपर्यंत कंबरेतून निसटणाऱ्या ढगाळ चड्ड्या सावरत आपल्या यारदोस्तांसोबत खेळलेल्या वेगवेगळ्या खेळांच्या आठवणी क्षणात आपल्याला रम्य भूतकाळात घेऊन जातात. कालांतराने वयासोबत जबाबदाऱ्या वाढत जातात, बालपणीचे सवंगडी एकेक करून वेगळ्या वाटा धरतात आणि खेळ मागेच पडतात.

मागे वळून पाहताना आपल्या सगळ्या बाललीला आपल्याला मनापासून हसवतातच, त्याचबरोबर पुन्हा असला बालिशपणा न करण्याची मूक ताकीदही देतात. पण काही अपरिहार्य कारणांमुळे पुन्हा हेच खेळ खेळावे लागले तर? आणि यावेळी खेळाचा निकाल आपली शाश्वती ठरवत असेल तर? खेळताना आपल्या जीवासोबतच आपले नातेसंबंध आणि चारित्र्यही पणाला लागणार असेल तर? अश्या परिस्थितीत खेळायचं की मागे फिरायचं? अश्या कित्येक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सच्या ‘स्क्विड गेम’ या नव्या कोरियन सिरीजमधून केला गेलाय.

जर तुम्ही हंगर गेम्स, बॅटल रॉयाले, मेझ रनरसारख्या सुप्रसिद्ध सर्व्हायवल ड्रामाचे चाहते असाल तर ‘स्क्विड गेम’ची निर्मिती खास तुमच्यासाठीच केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण हा एक ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलं आहे.

थिएटर्स बंद असताना ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी घरात अडकलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विडा उचलला आणि जगाच्या कानाकोपऱ्यातला, विस्मृतीत गेलेला, तथाकथित मान्यतांच्या आधारे कमी लेखला गेलेला, दुर्लक्षित कंटेंट प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला. यात नेटफ्लिक्सने खऱ्या अर्थाने बाजी मारली.

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

२०१८ आणि २०१९पासूनच नेटफ्लिक्सने डार्क, पिकी ब्लाईन्डर्स, ब्रेकिंग बॅडसारख्या सिरीज प्रेक्षकांसाठी खुल्या केल्या. एप्रिल २०२०मधे बहुचर्चित ‘मनी हाईस्ट’चा चौथा सिझन नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आणि वाऱ्याच्या वेगाने प्रसिद्धही झाला. आता या सगळ्यांवर मात केली आहे ती एक महिन्याभरापूर्वी रिलीज झालेल्या ‘स्क्विड गेम’ने!

दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या काही लोकांना निवडायचं आणि त्यांना एखादा खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं ज्यात हारणारा खेळाडू थेट आयुष्यातूनच बाद केला जातो, हे कथानक याधीही बऱ्याच सिनेमात सढळहस्ते वापरलं गेलंय आणि त्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसादही दिलेला आहे तर काही कलाकृती तोंडघशीही पाडल्या गेल्या आहेत.

‘स्क्विड गेम’सारखी सिरीज १३.२ कोटींहून अधिक लोकांनी पाहिलेली आहे. आजपर्यंत नेटफ्लिक्सवरचा कोणताही कंटेंट इतकी लोकप्रियता गाठू शकलेला नाही. कथानकात तोचतोचपणा असतानाही या सिरीजच्या जबरदस्त यशासाठी प्रेक्षकांनी लॉकडाऊनमधे ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या पारड्यात टाकलेल्या झुकत्या मापाला श्रेय देणं म्हणजे या कलाकृतीच्या निर्मात्यांवर अन्यायच ठरेल. यातले मेंदू थक्क करणारे भव्यदिव्य सेट्स, वास्तवाशी साधर्म्य दाखवणारी उपकथानकं आणि संभाव्य निकाल प्रेक्षकांना आधीच माहित असतानाही शेवटपर्यंत जपलेला रक्ताळलेला थरार ही त्रिसूत्री प्रेक्षकांना आठ तास खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते.

‘पॅरासाईट’ या साऊथ कोरियन सिनेमाला २०२०मधे ऑस्कर मिळाला आणि तिथल्या मनोरंजनविश्वाने संपूर्ण जगाच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. हा पहिलाच सिनेमा होता जो इंग्रजी नसूनही ऑस्कर मिळवू शकला होता. या सिनेमात साऊथ कोरियातल्या वर्गसंघर्षावर ब्लॅक कॉमेडीचा आधार घेऊन भाष्य केलं गेलं होतं.

‘स्क्विड गेम’मधले सर्वच खेळाडू याच वर्गसंघर्षाचा बळी ठरत आहेत आणि या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना हा खेळ खेळण्याची संधी दिली जाते. बाहेरच्या जगात बेरोजगारी आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेली विशी ते चाळीशीतल्या साडेचारशेहून अधिक खेळाडूंची निवड या खेळासाठी केली जाते. हा खेळ नक्की कुठे खेळवला जातोय, याचे कर्ते-करविते कोण आहेत यापासून सर्वच खेळाडू अनभिज्ञ आहेत.

एका बाद होणाऱ्या खेळाडूमागे बक्षिसाची रक्कम एक मिलियन वोनने वाढवली जाते. ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वावर चालणाऱ्या या खेळामधे खेळाडूंना माघार घ्यायचीही संधी दिली जाते पण माघार घेणाऱ्यांना फक्त जीवनदान मिळणार आणि त्या क्षणापर्यंत जमा झालेली बक्षिसाची रक्कम मृतांच्या नातेवाईकांमधे वाटली जाणार अशी अटही घातली जाते.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

पहिल्याच खेळात मरणाच्या कचाट्यातून वाचल्यानंतर आपण कोणत्या जाळ्यात अडकलो आहोत याची खेळाडूंना कल्पना येते आणि ते या खेळातून माघारही घेतात पण बाहेरच्या जगात मागे लागलेला देणेकऱ्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते पुन्हा हा खेळ खेळण्याचा निर्णय घेतात. खेळ संपेपर्यंत स्वार्थ, मत्सर, सौजन्य, विश्वास, प्रेमासारख्या विविध मानवी भावभावनांच्या व्याख्या वेळोवेळी बदलत जातात.

प्रत्येक खेळागणिक वाढत जाणारी क्रौर्याची परिसीमा बघताना अंगावर काटा येतो पण नुकत्याच ओसरलेल्या महामारीचे मानसिक आणि आर्थिक परिस्थितीवर झालेले परिणाम ही सिरीज पाहताना वारंवार डोळ्यांसमोर उभे राहतात आणि खेळाडूंसोबतच प्रेक्षकांच्याही संवेदना बोथट होत जातात.

खेळात एकेका खेळाडूचा बळी जात असताना शाळेतल्या फळ्यावरचे नीतीमूल्यांचे धडे देणारे सुविचार मनात गर्दी करू लागतात पण त्या काचेच्या मडक्यात जमा होणाऱ्या नोटांच्या गड्ड्या बघितल्या की ‘काला बाजार’मधलं कादर खानचं ‘पैसा बोलता है’ हे गाणं आपोआपच डोक्यात ठेका धरतं आणि मनातली सुविचारांची गर्दी मिटवायला भाग पाडतं.

या खेळाचे सूत्रधार नक्की कोण आहेत हे आपल्याला शेवटच्या काही एपिसोड्समधे कळतं. एव्हाना सिरीजमधल्या मृत्यूच्या रक्तरंजित सोहळ्यांमधे आपणही रंगून गेलेलो असतो. व्हीआयपी म्हणून ओळखले जाणारे या खेळाचे सूत्रधार हे समाजाच्या उच्चभ्रू वर्गातले काही धनाढ्य लोक असतात ज्यांनी केवळ स्वतःच्या मनोरंजनासाठी हा सगळा प्रपंच उभारलेला असतो.

मनोरंजन म्हणून हा मृत्यूचं तांडव असलेला खेळ पाहणारे आपण प्रेक्षकरुपी मायबाप आणि सूत्रधार यांच्या मनोरंजनाच्या व्याख्येतलं साधर्म्य अश्या पद्धतीने दाखवणाऱ्या वांग डोंग-ह्युक या लेखक-दिग्दर्शकाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. 'कंगाल लोक आणि श्रीमंत लोकांमधलं साम्य माहितीय? त्यांच्या जीवनात कसलीही ‘मजा’ नाही' हे प्रमुख सूत्रधाराच्या तोंडी असलेलं वाक्य सिझनच्या शेवटच्या एपिसोडमधे या खेळाच्या विजेत्याला ऐकवलं जातं. या एका वाक्यातच संपूर्ण सिरीजचं सार सामावलं आहे.

हेही वाचा: द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

सूत्रधारांनी घातलेले मुखवटे सत्तरीच्या दशकातल्या उच्चभ्रू सिक्रेट सोसायटी आणि त्यांच्या पार्ट्यांचे संदर्भ अधोरेखित करतात, ज्यांच्याबद्दल मध्यमवर्गीयांना कायमच आकर्षण वाटत आलेलं आहे. त्याचसोबत ‘इलुमिनाटी’सारख्या शक्तिशाली सिक्रेट सोसायटीचाही यात हात असावा, अश्याप्रकारे काही प्रसंग चित्रित करण्यात आले असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली नसती तर नवलच!

या खेळाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी आणि त्यातल्या सूत्रधारांची जुजबी माहिती प्रेक्षकांना पहिल्याच सिझनमधे समजली आहे. या सीझनचा शेवट आणि लोकप्रियता पाहता लवकरच दुसरा सिझनही येऊ शकतो.

हा खेळ आणखी कुठे आणि कश्या पद्धतीने सुरु आहे? व्हीआयपींच्या मुखवट्यामागे असे किती चेहरे आहेत? खेळाडूंच्या मानसिकतेबद्दल तर कळालं पण तिथल्या कामगारांचा यात काय फायदा असावा? तेही असेच हतबल असतील का? एका रात्रीत अचानकपणे अज्ञात कालावधीसाठी लुप्त होणाऱ्या लोकांचा शोध का घेतला जात नसावा? विजेत्याच्या बँक खात्यात अचानक जमा होणाऱ्या भल्यामोठ्या रकमेची चौकशी का केली जात नसावी अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी असल्याने नव्या सिझनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत.

महामारीच्या सुरवातीच्या काळात जवळच्या लोकांनी दाखवलेली स्वार्थी वागणूक आपल्याला प्रेक्षक म्हणून या सिरीजमधे गुंतायला भाग पाडते. स्वार्थासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे सत्य आपल्याला माहित असूनही यातल्या प्रत्येक बळीला नीतीमूल्यांचे सोयीस्कर लेबल लावून आपण जिवंत राहिलेल्यांचं समर्थन करू लागतो. महामारीतून सावरू पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनोवस्थेवर अश्यारीतीने परिणाम करून त्यांना सिरीजकडे आकृष्ट करून घेऊ शकणाऱ्या या गोळीबंद कथानकातच सिरीजच्या अभूतपर्व वायरल यशाचं रहस्य सामावलं आहे.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती