ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

११ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश.

श्रीकृष्ण हे भारताच्या इतिहासातलं सर्वांत प्रभावशाली आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व. अभ्यासू विचारवंतांपासून नृत्यगानलुब्ध रसिकांपर्यंत सर्वांसाठी कृष्ण ‘वेधवंती’ ठरला. कृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेल्या भगवद्गीतेनं हिंदू धर्मात प्रमाणग्रंथाचं स्थान पटकावलं. तर त्याच्या चरित्रावर आधारित असलेला ‘भागवतपुराण’ नावाचा ग्रंथ वैष्णवांच्या संप्रदायासाठी अधिष्ठानग्रंथ ठरला.

कृष्णाची ओळख करुन देणारं साहित्य

तत्त्वज्ञान आणि कला यांच्यात चिरंतन द्वंद्व असल्याचं प्लेटोचं मत सर्वांना माहीत आहेच. कृष्ण ही व्यक्ती आणि गीता हा ग्रंथ या दोन्ही गोष्टींची ओळख मला बालवयातच झाली. वडील श्रीधरअण्णांच्या ग्रंथ भांडारातून ज्ञानेश्‍वरी, गीतारहस्य, यथार्थदीपिका, गीताई, असे गीतेसंबंधीचे ग्रंथ वाचायला मिळाले. महादेवभाई देसाईंचं ‘गीता एकॉर्डींग टू गांधी’ वाचलं. नंतर विवेकानंदांचे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग हे गीतेशी संबंध असणारे ग्रंथही वाचले.

हे वाचन चालू असतानाच ‘प्रसाद’ मासिकाचा कृष्णचरित्रावरील विशेषांक वाचला. भारताचार्य चिंतामणराव वैद्य आणि बाळशास्त्री हरदास यांची कृष्णचरित्रंही वाचायला मिळाली. कॉलेजात गेल्यावर इरावती कर्वे, आनंद साधले, शं. के. पेंडसे, प्रेमा कंटक यांनी लिहिलेली पुस्तके वाचली. हे वाचन चालू असताना अण्णांशी रोज चर्चा व्हायची. याच दरम्यान महानुभाव पंथात प्रचलित असलेलं श्रीचक्रधर निरूपित श्रीकृष्णचरित्र वाचलं.

डॉ. वि. रा. करंदीकर यांनी लिहिलेलं ‘भगवद्गीतेचे तीन टीकाकार’ हा तौलनिक अभ्यासावर आधारित ग्रंथही वाचायला मिळाला. याच काळात आचार्य रजनीश गीतेवर आणि कृष्णावर काही वेगळी मांडणी करत होते. ती काही प्रत्यक्ष ऐकली, काही वाचली. आचार्यभक्त विष्णुशास्त्री बापट, टिळकभक्त ज. स. करंदीकर, तसंच पं. श्री. दा. सातवळेकर यांची भाष्यंही याच काळात वाचनात आली.

हेही वाचा : रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

कृष्णचरित्रासाठी गीता, महाभारताचा आधार

गीतेचा संबंध महाभारताच्या कथनाशी येतो आणि गीतेचा पहिला अध्याय गीता आणि महाभारत यांना जोडणारा सेतू आहे. पहिल्या अध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेला कर्मासंबंधीचा प्रश्‍न गीतार्थाची संदर्भचौकट उभी करतो आणि तिच्या मर्यादेतच गीतेचा अर्थ लावला पाहिजे, असं मी माझ्या एका प्रबंधात म्हटलंय. त्यानुसार लावलेला अर्थ हा अर्जुनाच्या प्रश्‍नाचं समाधानकारक उत्तर ठरला पाहिजे, या दिशेनं ‘मी असा गीतार्थ काय असेल’ याची मांडणी प्रबंधातून केली.

पदवी मिळाली, पण जिज्ञासा संपली नाही. ज्या महाभारताच्या कोंदणात गीतार्थाचा तेजस्वी हिरा शोभतो, त्या महाभारताचा आधार मी प्रत्येकवेळी घेतला होता. पण याच महाभारतात कृष्णाचं चरित्र प्रसंगाच्या रुपात काही प्रमाणात आलंय. तर उरलेलं चरित्र महाभारताचाच भाग असलेल्या हरिवंशात आलेलं आहे. याशिवाय, विष्णु, वायू, भागवत, पद्म वगैरे पुराणांमधूनही कृष्णचरित्र आढळतं.

कृष्णाच्या सैद्धांतिक, वैचारिक चरित्रासाठी

गीतार्थ शोधताना जर महाभारताचा आधार घ्यावा लागतो, तर याचीच दुसरी बाजू म्हणजे, महाभारतातल्या कृष्णचरित्राची मांडणी करतानाही गीतेचा आधार घ्यायला पाहिजे. कृष्णाचा गीतोपदेश ज्या महाभारतात येतो, त्याच महाभारतात कृष्णचरित्राची पुरेशी झलक बघायला मिळते. काळाप्रमाणे महाभारत हे श्रीकृष्णाच्या चरित्राचं सगळ्यात प्राचीन आणि म्हणून सर्वांत विश्‍वसनीय साधन होतं.

ते आधारभूत धरून त्यानुसार त्याच्या प्रकाशातच इतर साधनांनी पुरवलेलं कृष्णचरित्राचं इतर साहित्य तपासून घ्यायला हवं. ती माहिती जर महाभारतामधल्या चरित्रगाभ्याशी सुसंगत असेल, तर स्वीकारली पाहिजे. ती तशी जुळत नसेल तर नाकारली पाहिजे. कृष्णाचं स्वत:चं चरित्र त्याने केलेल्या उपदेशाशी, म्हणजे गीतेशी कितपत सुसंगत आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसं केलं, तर निष्पन्न होणारं कृष्णचरित्र हे नेहमीचं चरित्र न राहता, कृष्णाचं सैद्धांतिक किंवा वैचारिक चरित्र ठरेल!

यामुळे कृष्णाची उक्ती आणि कृती म्हणजेच वाणी आणि करणी यांच्यामधल्या संबंधावर प्रकाश पडेल. कृष्णाच्या ज्या कृतींना ‘कृष्णकारस्थानं’ म्हणून हिणवण्याची प्रथा आहे, त्यांच्यामागचं तात्त्विक अधिष्ठान काय होतं, याचं उत्तर देता येईल.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कृष्णचरित्राची दोन प्रारूपं

कृष्णाकडे ईश्‍वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातला मानव म्हणून पाहून त्याचं चरित्र लिहिण्याचं कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्‍वराचं, त्याच्या कृतीचं अनुकरण करणं मानवाच्या शक्तीबाहेर आहे. त्याला देवार्‍यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते.

याउलट तो तुमच्या-आमच्यासारखा असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घ्यायला हवी. तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येतील. त्यांचं अनुकरण करणं शक्य होईल. हा दैवी अवतरण म्हणजे खाली येणं आणि मानवी आरोहण यांच्यातला फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसर्‍यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.

कृष्ण सर्वश्रेष्ठ राजकीय विचारवंत

महाभारतातला कृष्णाचा वावर हा राजनीतिनिपुण मुत्सद्दी या रूपात आहे; पण त्याची ही मुत्सद्देगिरी विधिनिषेधशून्य राजकारण्याची नसून धर्माची, म्हणजे नैतिक मूल्यांची चाड बाळगणार्‍या तत्त्ववेत्त्याची आहे. हे तत्त्वज्ञान म्हणजे केवळ विवेकाचं नसून कर्माचं तत्त्वज्ञान आहे, विशेष करून राजकीय तत्त्वज्ञान आहे. डावपेच खेळत प्रतिस्पर्ध्यावर मात करणं, एवढ्यापुरतीच त्याची नीतिकल्पना मर्यादित नाही.

या संदर्भात भारतीय परंपरेतल्या धर्म आणि नीती यांची चर्चा अर्थपूर्ण ठरते. सुदैवाने भारतातील राजनीतीच्या विचारांची परंपरा प्रदीर्घ आहे. तिला शुक्रबृहस्पतीपासून शिवकाळातल्या ‘आज्ञापत्र’कार रामचंद्रपंत अमात्यांपर्यंतचा इतिहास आहे. महाभारत हे तर राजनीतीच्या सिद्धान्तांचे जणू भांडारच आहे. महाभारताने वर्णन केलेल्या राजकीय विचारवंतांमधे कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे.

हेही वाचा : गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

नीतीच्या साहाय्याने धर्माच्या चौकटीला छेद

कृष्ण जसा नीतिनिपुण आहे, तसाच तो धर्मज्ञसुद्धा आहे. धर्म आणि नीती यांच्या मर्यादा जाणून घेऊन त्यांचा समन्वय करणे आणि तोही धर्माच्या रक्षणासाठी, हे त्याचं जीवनव्रतच आहे. त्याची सर्व कर्म याच उद्देशाने प्रेरित झालेली असतात. त्याची धर्माची संकल्पना ग्रांथिक, यांत्रिक आणि साचेबद्ध नाही. धर्म माणसाला शक्य असलेल्या कर्मांचं सार्वत्रिक वर्गीकरण उपलब्ध करून देतो. धर्माच्या या ठोकळेबाज संकल्पनेला चिकटून राहिलं, तर धर्म आणि धर्माचरण करणारे लोकच संकटात येण्याची शक्यता असते.

अशावेळी धर्माला अपवाद करून केलेलं कर्म समर्थनीय ठरतं. हीच नीती. कृष्णाच्या नीतीची ही संकल्पना प्रसिद्ध काश्मिरी पंडित क्षेमेंद्र याने स्पष्ट केलीय. नीती म्हणजे अमला प्रज्ञा आणि सूक्ष्म दृष्टी. नीतीच्या साहाय्यानं धर्माच्या वैश्‍विक चौकटीला अपवाद करण्याची स्थळं दिसू लागतात. ती धर्माशी सुसंगत आणि धर्माला पूरक ठरते. अपवादात्मक परिस्थिती ओळखून तिच्यात वरकरणी अधर्म वाटणारे; परंतु अंतिमत: धर्म ठरणारे कृत्य म्हणजे महाभारताच्या भाषेत योग. कृष्ण हा धर्मज्ञ, नीतिज्ञ आणि योगेश्‍वर आहे.

प्रचलित तत्त्वधारांचा यथोचित उपयोग करून कर्म न करण्यापेक्षा, म्हणजे अकर्मापेक्षा, कर्म करणे कसे समर्थनीय आहे, हे कृष्ण दाखवून देतो. धर्माचा आधार घेत कर्माचे समर्थनीय आणि असमर्थनीय असे गट होतात. मात्र, नीतीच्या सहाय्याने अपवादात्मक परिस्थिती ओळखून धर्माच्या चौकटीला छेद देणं कसं समर्थनीय ठरतं, हेही तो दाखवून देतो.

हेही वाचा :

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा?

‘सदानंद मोरे सांगतायत, हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र 

ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव