केके: छोड़ आए हम वो गलियाँ

०६ जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.

थेट काळजाला भिडणार्‍या गुलजार यांच्या गीतांसारखाच हृदयस्पर्शी स्वर लाभलेल्या कृष्णकुमार कुन्नथ उर्फ ‘केके’ या गायकाचं वयाच्या ५३ व्या वर्षी अकालीच निधन झाल्यावर, त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसणं साहजिकच होतं. त्याचं ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गएऽऽ, हाँ लुट गएऽ’ हे गाणं ऐकलं आणि डोळ्यांत टचकन पाणी आलं नाही, असा माणूस विरळाच!

कोलकात्यामधल्या आपल्या रसिक चाहत्यांना सुरांची मेजवानी देण्यासाठी आलेल्या ‘केके’चा तो शेवटचाच कार्यक्रम ठरेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. मग हे का घडलं? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे. रसिक चाहत्यांवरच्या, कलेवरच्या आपल्या प्रेमामुळे विपरीत परिस्थितीशीही कलाकारांना तडजोड करावी लागते आणि ते असं त्यांच्या जीवावरही बेतू शकतं, असं म्हणावं का?

कलाकारांना प्रतिष्ठा असते, असं जुन्या जमान्यात ओरडून सांगण्याची वेळ आली होती तशी आता कलाकारांना जीवही असतो, हे ओरडून सांगावं लागणार आहे का? ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा बटण दाबताच गाणं सुरू करणारी आधुनिक यंत्रं नाहीत, हे समजणं गरजेचं आहे.

वंगभूमीत ‘केके’ची हेळसांड?

कोलकात्याच्या उल्टाडांगामधल्या गुरुदास कॉलेजच्या नजरुल मंच या बंदिस्त सभागृहात दोन दिवस केकेच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभागृहाची जितकी प्रेक्षकक्षमता होती त्यापेक्षा तिप्पट अधिक प्रेक्षक आले होते, असं म्हटलं जातं. सभागृहाच्या वातानुकूलन यंत्रणेतही बिघाड होता. शिवाय एका वीडियोमधे दिसतं की, गर्दी हटवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशरमधून फोमही सोडण्यात आला होता आणि लोकांची पळापळ सुरू होती.

या सर्व घटनांनीच या उमद्या गायकाचा अक्षरशः गुदमरून जीव घेतला का? पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमावेळीही ‘केके’ घामाघूम झाला होता. मात्र दुसर्‍या दिवशीही तशीच स्थिती होती. कोलकात्यातला भीषण उकाडा, गर्दी, सुविधांचा अभाव अशा स्थितीत जीव तोडून गाणार्‍या या गायकाच्या जीवाची पर्वा कुणी केली नसेल का?

कोलकाता आणि एकूणच प. बंगालमधे कलाकारांना मोठाच सन्मान मिळत असतो. ‘साहित्यशिल्पी’ म्हणजेच लेखक-कवी असोत किंवा शिल्पकार, चित्रकार, संगीतकार व गायक असोत. बंगाली लोक कला-साहित्य आणि कलाकारांवर मनापासून प्रेम करतात. अशा वंगभूमीत ‘केके’ची हेळसांड झाल्याने मृत्यू झाला असेल, तर ते धक्कादायकच आहे.

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

कलाकारांनाही प्रतिष्ठा असते

जुन्या जमान्यात गाणं प्रतिष्ठेचं मानलं जात नसायचं. अशा काळात एका प्रख्यात शास्त्रीय गायिकेला गाण्याच्या कार्यक्रमांवेळी जी तुच्छतेची वागणूक मिळायची, ती तिच्या लेकीने लहानपणापासून पाहिली होती. ही लेक पुढे स्वतः मोठी शास्त्रीय गायिका झाल्यावर तिने कार्यक्रम करत असताना आपली कलाकार म्हणून प्रतिष्ठा काटेकोर जपली.

कार्यक्रमाच्या आधी सर्व काही नीट आहे की नाही, हे पाहिल्याशिवाय त्या आपला कार्यक्रम सादर करत नसत. प्रसंगी ‘अहंकारी’, ‘फटकळ’ अशी शेलकी विशेषणंही पत्करून त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहात असत. एक कलाकार आधी माणूस असतो आणि त्यालाही स्वाभिमान तसंच जीवही असतो, हे समजून घ्यावं लागतं. तसं समोरच्या लोकांना समजत नसेल, तर ते स्पष्टपणे समजून द्यावंच लागतं. या गोष्टीलाच हल्ली ‘व्यावसायिकपणा’ म्हटलं जात असेल, तर तेही स्वीकारलंच पाहिजे.

मानधनापासून ते कार्यक्रमाच्या सुव्यवस्थेपर्यंत सर्व काही समाधानकारक असलं तरच आपली कला सादर करण्याचा या कलाकारांना हक्क आहेच. केवळ रसिकांच्या प्रेमापोटी, गळ घालून, अत्याग्रहाने त्यांच्याकडून कशाही प्रकारे कला सादर करवून घेणं हे कुणासाठीही भूषणावह नाही.

सध्या काही गायक आणि अभिनेतेही आपले कार्यक्रम सादर करत असताना आपल्या अटींची योग्य पूर्तता होते की नाही, हे पाहत असतात. त्याबाबत त्यांना दोष देणं हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच आहे. त्यांनाही काही वाईट पूर्वानुभव आलेले असू शकतात आणि ते टाळण्यासाठी ते अशा सुव्यवस्थेबाबत आग्रही असू शकतात, हे समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या काही ज्येष्ठ नाट्यकलाकारही नाटक सादर करण्यापूर्वी अशा काही गोष्टी पाहत असत.

अनेक प्रश्न अनुत्तरित

कलेच्या क्षेत्रातली अनमोल रत्नं रसिकांनीच जीवापाड जपायची असतात. ‘ऊस गोड लागला म्हणून मुळासह खाऊ नये’ याचंही भान ठेवणं गरजेचं असतं. कोलकात्यातल्या कार्यक्रमावेळी असं भान राहिलं होतं का? हा खरा प्रश्न आहे. तसं भान असतं, तर ‘केके’सारख्या गुणी गायकाला आपण कायमचे मुकलो नसतो!

‘केके’च्या चेहरा आणि डोक्यावर जखमांच्या खुणाही दिसून आल्यामुळे पोलिसांनी त्याच्या मृत्यूची नोंद ‘अनैसर्गिक मृत्यू’ अशी केली. त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला होता की तो गर्दीत, धक्काबुक्कीत कोसळला होता? हॉटेलमधे चक्कर येऊन पडला होता की आणखी काय झालं होतं? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात काहूर माजवून गेले.

चाहत्यांना त्याच्या या अकाली एक्झिटने जर इतकं शोकाकुल केलं असेल, तर लहानपणापासूनची सोबती-सवंगडी असलेली त्याची पत्नी ज्योती कृष्णा आणि त्याच्या नकुल, तमारा या दोन अपत्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही न केलेली बरी.

हेही वाचा: आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

केकेच्या लग्नाची गोष्ट

मल्याळी कुटुंबात जन्म घेतलेला ‘केके’ लहानाचा मोठा झाला तो राजधानी दिल्लीत. त्यामुळे दाक्षिणात्य भाषांबरोबरच हिंदीवरही त्याची पकड चांगली होती. सहावीत असतानाच त्याची ज्योतीशी ओळख झाली होती आणि पुढे तरुणवयात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

ज्योतीच्या वडलांनी ‘मुलाला नोकरी असेल तरच मुलगी देऊ’, असं म्हटल्यामुळे ‘केके’ने सेल्समन म्हणून नोकरी करायला सुरवात केली होती. पुढे तीन महिन्यांतच कंटाळून त्याने ही नोकरी सोडली आणि संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबई गाठली.

गाण्यांची वाट पाहिली जायची

सिनेसृष्टीत ब्रेक मिळण्यापूर्वी त्याने अकरा भाषांमधे तब्बल ३५०० जिंगल गायिली होती. ‘केके’ला पार्श्वगायक म्हणून पहिली संधी दिली ए. आर. रहमानने. त्याचे ‘कल्लुरी साले’ हे दक्षिणेतलं पहिलं गाणंही हिट झालं होतं. १९९६मधे गुलजार यांच्या ‘माचिस’ सिनेमातल्या ‘छोड आए हम वो गलियाँ’ या गाण्यातल्या काही ओळी ‘केके’ने गायिल्या होत्या.

केकेला हिंदीत पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली, ती ‘हम दिल दे चुके सनम’च्या ‘तडप तडप’नेच. या गाण्यातल्या आर्तता आणि सुरांचं भान अशी दुहेरी कसरत करण्याचं जे अफलातून कौशल्य त्याने दाखवलं, ते पाहून सगळेच थक्क झाले. वरच्या पट्टीतला आवाज गाण्यातला दर्द आणि मार्दव सांभाळत कसा लावता येऊ शकतो, याचा नवा आविष्कारच त्याने घडवला होता.

‘ओम शांती ओम’मधल्या ‘आँखो में तेरी’ गाण्यातल्या ‘अजब’च्या ‘अ’मधला त्याचा खर्ज आजही लख्ख आठवतो. लांबलचक ओळींमधून फिरणार्‍या ताना, हरकती घेत असताना आणि कुठेही कानाला त्रास न देता, ‘सुकून’च देणारा त्याचा आवाज ही त्याची खासियत होती. ‘गँगस्टर’ मधलं ‘तूही मेरी शब है’ हे त्याचं गाणं एकांतात बसून खिडकीबाहेरचा पाऊस पाहत असताना जी गाणी ऐकावीशी वाटतात त्यापैकीच एक आहे.

‘बचना ऐ हसिनो’ सिनेमातलं ‘खुदा जाने’ गाण्यासाठी तर फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्याच्या ‘पल’सारख्या अल्बममधली गाणीही लोकप्रियच आहेत. आपली गाणी लोकांना आवडतात म्हणून कुठलीही ढीगभर गाणी करणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला आहेच. ‘केके’च्या मृत्यूने कलेबरोबरच कलाकारांनाही जपणं किती गरजेचं आहे, याचं भान सर्वांनाच यायला हवं.

हेही वाचा: 

प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही